पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्वप्नपूर्ती

*स्पर्धेसाठी कथा -* 

*स्वप्नपूर्ती* 

 

©️सौ.मंजिरी भातखंडे

 

आज सासूबाईंची पंच्याहत्तरी ची गडबड चालू होती. सासरची माहेरची जवळपास पन्नास माणसं जमली होती. शाल्मली छान जांभळ्या रंगाचा शालू नेसून, थोडेसेच-- पण नीटनेटके ठसठशीत दागिने घालून,आल्या गेलेल्यांचे अगत्य करण्यात गुंतली होती.

 

 थोड्याच वेळात शोभा काकू, शाल्मलीच्या सासूबाई बाहेर आल्या. निळ्याशार साडीत सुंदर दिसत होत्या. सदा हसतमुख, कितीतरी कठीण प्रसंगांना तोंड देत आयुष्यात आजवर इथवर पोचल्या होत्या. पण कष्टाचं चीज झालं,शाल्मली सारखी सून मिळाली याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होतं. 

 

 पाच सुवासिनींनी शोभा काकूंचं औक्षण केलं आणि पेढा भरवला. तबकातला एक पेढा काकूंनी अतिशय प्रेमाने शाल्मलीला भरवला. प्रेमाने मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यात अश्रु जमले..... अश्रूंना वेळीच बांध घालून परत पाठवायचं कसब तसं त्यांना अनेक वर्षे जमलं होतं.

 

 त्यांच्या नजरेसमोरून गतकाळातील काही आठवणी झरझर सरकल्या. नवरा गेल्यानंतर खूप कष्टाने फराळाचे पदार्थ बनवून त्या विकायच्या. पोळी भाजी बनवून द्यायच्या. छोट्या-मोठ्या समारंभासाठी जेवणाची ऑर्डर सुद्धा पूर्ण करायच्या.

 

  अशातच जमेल तशी पुंजी जमवून मुलाला इंजिनियर केला. मुळातच हुशार असलेल्या सोहमने स्वतःच्या कर्तृत्वावर चांगल्या कंपनीत नोकरी मिळवली. 

  सोहमलाही आईचे कष्ट ठावुक होते. पण तिने असं दुसऱ्यांच्या घरी जाऊन स्वयंपाक करणं त्याला मान्य नव्हतं. तो बरेच वेळा सांगायचा, आई आता मी कमावता झालोय तुझा हा व्यवसाय बंद कर.... पण कठीण प्रसंगात ज्या व्यवसायाने त्यांना जीवन जगण्यासाठी हातभार लावला, तो व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात नाही पण जमेल तसा चालू ठेवायचा असं त्यांचं म्हणणं होतं.आणि हाच निर्णय मुळात त्या दोघांमधील वादाचा मुद्दा ठरला होता.

  

   अशातच एके दिवशी,ही बघ तुझी होणारी सून अशी म्हणून शाल्मलीची ओळख त्याने आईशी करून दिली. मनातून खरंतर सोहम चा थोडासा रागच आला होता शोभा काकूंना.पण ...खरंच शाल्मली सावळी असली तरी निटस आणि लोभस होती. अगदी पहिल्यांदा पाहिल्या क्षणी आवडावी अशीच. 

   

   आपल्या मुलाच्या पसंतीस काहीही खोडा न घालता त्यांनी त्या लग्नाला परवानगी दिली. नाव ठेवण्यासारखं खरंच काही नव्हतं... मुलाच्या बरोबरीने नोकरी करणारी सून मिळाली होती त्यांनीही तिला हसत मुखाने स्वीकारलं.

   

 रोजच सासुबाई शाल्मलीला व सोहम ला डबा देत असत. एकत्र डबा खाताना ऑफिसमधील इतरांनाही शाल्मलीच्या सासूबाईंच्या हातचे पदार्थ आवडू लागले आणि यातूनच सोहमला आवडणार नाही हे माहिती असून सुद्धा, शाल्मलीने सासुबाईं समोर कंपनीतले कॅन्टीन चालवायला घेण्याचा प्रस्ताव मांडला...  हाताखाली चार बायका कामाला देऊन त्यांच्या व्यवसायाला एक मूर्त रूप देण्यासाठी आणि त्यांचे स्वप्न पूर्णत्वाला नेण्यासाठी शाल्मलीने मदत केली.

 

 गेली वीस वर्ष अगदी योग्य मॅनेजमेंट करून हाताखालच्या बायकांकडून शोभा काकू सर्वकाही व्यवस्थित करून घेत होत्या. हा सगळा पट डोळ्यासमोरून सरकत होता... आणि तेवढ्यातच सून बाईंच्या गोड शब्दातील शुभेच्छा शोभा काकूंच्या कानावर पडल्या.

 

 "आजच्या समारंभाच्या उत्सवमूर्ती... माझ्या सासुबाई, नाही नाही माझी आईच!! त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. त्यांची अनेक रूपं मी आजवर पाहिली त्या साक्षात *अन्नपूर्णा* तर आहेतच पण घरातील मनःशांती ढळू न देता प्रसंगी स्वतः शांत राहून अख्खं घर एकत्र बांधून ठेवणाऱ्या *गृहलक्ष्मी* आहेत. त्यांच्या रूपाने माझ्या मुलाला आजी नाही तर नेहमी साथ देणारी *मैत्रीण* मिळाली. माझ्या पाठीशी उभ्या होत्या म्हणून मी नोकरी करू शकले. सोहम सारखा गुणी नवरा मला त्यांच्याचमुळे मिळाला.

 त्याहीपेक्षा त्यांच्या सहवासात मला माझ्या आई वडिलांची आठवण कधीच आली नाही. अशा प्रेमळ,शांत, सुस्वभावी सासुबाई नाहीतर मला दुसरी *आईच* मिळाली आहे. *स्त्री शक्तीचे उत्तम उदाहरण म्हणून मी त्यांच्याकडे पाहते..."*

 

डोळ्यातले अश्रू लपवत शाल्मलिने सहेतूक सोहम कडे पाहिलं आणि सोहमनेही सर्वांसमोर आईला घट्ट मिठी मारली.

 

" पहा....ज्या घरात सासूसूनेचं असं एकमत असत ना, त्या घरात, घरचा मुलगाच, माझ्यासारखा एका बाजूला राहतो. माझ्या विरोधाला न जुमानता माझ्या आईच स्वप्न पूर्ण करण्यासाठी शाल्मलीने आईला दिलेला पाठिंबा पाहून क्षणभर मलाच तिचा हेवा वाटतोय.... की खरा मी मुलगा आहे ??की मुलगी आहे आईची ???"

पण प्रेम आणि विश्वासा वरती ही जागा स्वतः शाल्मलीने मिळवली. ज्या घरात सासु सुना, मायलेकींसारख्या राहतात त्या घराचं माझ्या घरासारख नंदनवन व्हायला वेळ लागत नाही."

 

 सोहम चे हे उद्गार ऐकून जमलेल्या साऱ्यांच्या डोळ्यातून प्रेमाचा वर्षाव अखंड झरत होता आणि शाल्मली, सोहम दोघेही आईच्या मिठीत सामावले गेले आणि हे सगळे दृश्य कायमसाठी फोटो रुपात साठवू पाहत होता आज्जीचा लाडका नातू????????

 

...*©️सौ. मंजिरी धनंजय भातखंडे*

 पुणे 8623063167

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू