पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अपशकुनी

अपशकुनी.....?


शांताला सकाळपासून अस्वस्थ वाटत होते . तिला नववा महिना चालू होता. तिने सकाळी कसाबसा स्वयंपाक केला. तेवढ्या श्रमानेही तिला थकल्यासारखे वाटू लागले . तिचा चेहराही उतरला होता. तिने नवऱ्याला.....वसंतला न्याहरी दिली . न्याहरी करतांना वसंताचे शांताच्या चेहऱ्याकडे लक्ष गेले . तिचा मलूल झालेला चेहरा पाहून तो म्हणाला," शांते , तुझा चेहरा का असा उतरलाय ? तुला बरं नाही का ? चल आपण दवाखान्यात जाऊ ." शांता लगेच पदराने चेहऱ्यावरचा घाम पुसत म्हणाली," नको मी बरी हाये. आधी तुम्ही तुमची कामं करून या. मंग जाऊ आपण दवाखान्यात." वसंता म्हणाला," ठीक हाये.तू जरा आराम कर . मी हा गेलो अन् हा आलो." जातांना वसंता ओटीवर बसलेल्या आपल्या आईला म्हणाला, " आये , शांताला जरा बरं न्हाय . तिच्यावर वाईच लक्ष ठीव . मी शेतात जाऊन मजुरांला पगार देऊन लगेच माघारी येतो.अन् शांतेला दवाखान्यात घेऊन जातो."
वसंता बैलगाडी घेऊन शेतात गेला. लगेच शांताने गोधडी पसरली आणि त्यावर ती आडवी झाली. पण तिची अस्वस्थता कमी न होता वाढतच होती. थोड्याच वेळात पोटात कळाही सुरू झाल्या. तेंव्हा मात्र ती "आत्याबाई ....आत्याबाई " असे म्हणून सासूला हाका मारू लागली.
न्याहरी करून शांताची सासू ओटीवर बसली होती. कमरेत थोडी वाकलेली , चेहऱ्यावर सुरकुत्यांची जाळी , पांढरेशुभ्र मुलायम केस, डोळे खोल गेलेली , बऱ्याच दातांनी तोंडातील ठाणे सोडलेले . तरी कष्ट केलेले शरीर जाणवत होते . ती स्वभावाने अतिशय मायाळू होती . ती कधीही कुणाला दुखवत नसे.
शांताचा आवाज ऐकताच तिने भिंतीला टेकवलेली काठी हातात घेतली व भिंतीचा आधार घेत उठली. आणि घरात गेली. तिने शांताचे दाताखाली ओठ दाबत विव्हळणे, कळा सोसणे पाहिले. शांतेच्या कपाळावरचा घाम पदराने पुसत ती म्हणाली ," धीर धर पोरी , मी सुईणीला बोलावणे धाडते. वसंतालाबी निरोप धाडते." नंतर ती ओटीवर आली . शेजारणीला बोलावून, सुईणीला घेऊन यायला सांगितले. तिथेच खेळत असलेल्या मुलाला म्हणाली, " शेतावर जा रं बाळा , वसंताकाकाला घरला बोलावलं म्हणून सांग." मुलगा धावतच गेला.
शांताचे विव्हळणे चालूच होते . तिची सासू तिच्याजवळ बसून तिच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवत , तिला धीर देत होती. इतक्यात सुईण आली. तिने शांताला तपासले आणि म्हणाली," आजे, हिला दवाखान्यात न्यायला हवं . हिचं लक्षण काही ठीक दिसत नाही." शांताची सासू म्हणाली , "वसंताला निरोप धाडला हाये. इलच इतक्यात ." तोपर्यंत सुईण आपल्या परीने प्रयत्न करीत होती .
वसंताला निरोप मिळताच , झाडाखाली उभी करून ठेवलेल्या बैलगाडीत तो उडी मारून बसला. बैलांचे कासरे हातात घेऊन , " चल रं ऽ ,माझ्या दोस्ता, घरी लवकर जायाला हवं "असं म्हणत सुसाट गाडी पळवत होता. घरी येतात त्याने अंगणात गाडी उभी केली आणि गाडीतून खाली उडी घेतली. "आये, आलो गं मी " असे म्हणत तो ओटीवर येत नाही तोच बाळाच्या रडण्याचा आवाज आला.
थोड्याच वेळात सुईण दुपट्यात गुंडाळलेल्या बाळाला घेऊन आली. म्हणाली," मुलगी झाली हाये...घ्या तिला "असे म्हणत वसंताच्या आईच्या हातात दिले. आणि वसंताला म्हणाली," दादा , वहिनींची तब्येत लई खराब हाये. दवाखान्यात नियायला हवी ." असे म्हणत ती आत गेली. शांता शेवटची घटका मोजत होती. ती सुईणीला म्हणाली, " ताई ह्यांनला बोलवा ." सुईणीने हाक मारून वसंतला बोलावले . तो शांताजवळ गेला . तिचा हात हाती घेऊन म्हणाला," शांते , घाबरू नकोस. मी तुला मोठ्या डॉक्टरकडे घेऊन जाईन." शांता त्याचा हात घट्ट पकडत म्हणाली , " त्याचा कायबी उपेग होनार न्हाय . मला सोडून कुठंबी जाऊ नका.माझं डोकं तुमच्या मांडीवर ठिवा.आपल्या लेकीला संभाळा ." वसंताने तिचे डोके मांडीवर ठेवले. आणि शांताने प्राण सोडला .
वसंताने हंबरडा फोडला. आजूबाजूचे लोकही शेतातून परतले होते . ते जमा झाले. नंतर शांताचे सर्व विधी .... अंत्यसंस्कार झाले . सगळे आपापल्या घरी गेले.
वसंताने घरी आल्यावर आंघोळ केली.शेजाऱ्यांनी आणलेली पिठलं, भाकरी खायला कोणीतरी त्याला बळंबळं बसवलं . खरंतर त्याची भूकच मेली होती . पण कसेबसे चार घास खाऊन तो उठला व ओटीवर जाऊन बसला . त्याची आई बाळाला घेऊन आली. त्याच्याजवळ देत म्हणाली," वसंता, अरे बघ , ही तुझी पोर. घे जरा तिला. कशी नक्षत्रवानी हाय रं पोरगी ! " पण वसंता लगेच झटक्यात उठला आणि चालू लागला. जातांना म्हणाला , " तुझ्याजवळच ठेव ती अपशकुनी कार्टी . मला नको दाखवूस. माझ्या शांतीला गिळलं तिनं ." ते ऐकून त्याची आई म्हणाली," असं नगं रे ऽ बोलूस पोरा ! शांता गेली वाईट झालं . पण त्यात या लेकराचा काय दोष ? " पण हे बोलणे ऐकायला वसंता तिथे होताच कुठे ? तो आतल्या खोलीत जाऊन झोपला .
वसंताचा आपल्या पोरीवरचा राग जात नव्हता. पोरगी आई विना, आजीच्या प्रेमळ छत्रछायेखाली , गाईच्या दुधावर वाढत होती . वसंतला दुसरे लग्न करायचा सारे आग्रह करत होते. पण तो स्पष्ट नकार देत होता . आजीने घरच्या घरी नातीचं बारसं केलं ' गीता ' नाव ठेवलं.
शेजारीही गीताला 'अपशकुनी , आईला गिळणारी ' म्हणत . गीता मोठी होऊ लागली . ती अतिशय प्रेमळ व गुणी होती. तिचे गोड बोलणे, नम्रतेने वागणे , शिवाय आईसारखी देखणी, सुंदर अशा या गीताचे नंतर सारेच कौतुक करू लागले . पण गीता आपल्या वडिलांना खूप घाबरायची. वसंताचे आपल्या पत्नीवर....शांतावर खूप प्रेम होते. ती गेल्यामुळे तो अजूनही गीताचा राग करायचा. तिच्या हातून थोडी जरी चूक झाली तरी तो तिला बदड, बदड बदडायचा . आजी कशीबशी आपल्या नातीला त्याच्या तावडीतून सोडवायची .
वसंता गीताकडे ढुंकूनही पहात नसे. पण आजीने कंबर कसली. ती नातीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. गीता सहा वर्षाची झाली , तरी वसंता तिला शाळेत घालायचे नाव घेईना . शेवटी आजीच तिला घेऊन शाळेत गेली. हेडमास्तरांना भेटून तिला शाळेत घातली. गीता शाळेत जाऊ लागली . तिथे ती छान रमली. ती अभ्यासात हुशार होतीच. एक हुशार व गुणी विद्यार्थिनी म्हणून तिचे कौतुक व्हायचे. पण तरी ती मनातून दुःखी होती . कधीतरी आपल्या वडिलांच्या तोंडून एक तरी कौतुकाचा....प्रेमाचा शब्द ऐकायला मिळावा यासाठी ती आसुसली होती . कधीतरी तिला नैराश्य यायचे . पण आजीचा हळुवार प्रेमाचा.... मोरपंखी स्पर्श तिला दिलासा द्यायचा.बळ द्यायचा.
गीताची सातवी झाली. सातवीच्या पुढे शिकण्यासाठी गावात शाळा नव्हती. आजीने शिक्षकांकडून शहरातील शाळेची माहिती मिळवली आणि त्यांच्याच मदतीने शहरातील एका मुलींच्या शाळेत गीताचे नाव घातले . गीताची प्रगती पाहून तिला सहज ऍडमिशन मिळाली. त्याबरोबरच तेथील होस्टेललाही तिला ऍडमिशन मिळाली.
हळूहळू गीता तेथे रमू लागली. तिने स्वतःला अभ्यासात गुंतवून घेतले. सुट्टीत घरी जायची तेंव्हा वडिलांचे प्रेम तर तिला मिळायचेच नाही. पण आजी मात्र तिचे कौतुक करायची.... प्रेम करायची. आईच्या प्रेमाची उणीव गीताला भासू नये म्हणून धडपडायची. खरे तर आजीला आता फारसे काम होत नव्हते. नात आली की, मात्र उसनं अवसान आणून ती नातीसाठी जमेल तेवढं करायची .तिच्या आवडीचं खाऊपिऊ घालायची. पान पिकायला लागलं होतं हे खरं.पण याच आजीला बघून गीताच्या विराण मनावर पालवी फुटायची. आजीच्या मऊ सुरकूतलेल्या प्रेमळ हाताच्या स्पर्शाने गीताची मनकळी फुलायची.
एकदा सुट्टीत गीता घरी आली. पाहते तर घरात एक नवीनच स्री.... गळ्यात नवीन मंगळसूत्र, पायात जोडवी, हातभर बांगड्या, कपाळावर मोठं कुंकू लावलेली ही स्रीे घरात सराईतासारखी वावरत होती. आजी गीताला म्हणाली , " गीता , ही तुझी नवीन आई . मला आता कायबी काम होत न्हाय, म्हणून तुझ्या बापाने हिला लगीन करून आनली . " हे ऐकून गीताला वाईट वाटले.तिच्या मनात आले, " बाबांनी आपल्याला लग्नालाही बोलावले नाही. मी अपशकुनी म्हणून मला बोलावले नसेल. आजीला मला बोलवावेसे वाटले तरी आजीचं त्यांनी ऐकलं नसणार ." तिच्या डोळ्यांत आलेलं पाणी , आवंढा गिळून तिने गिळले. तिने त्या आई झालेल्या स्त्रीला वाकून नमस्कार केला. गीताचे रूप पाहून आई चकित झाली. गीताचे आता कळीपण संपून फुलात रूपांतर झाले होते . गोरीपान, सरळ नाक, टपोरे बोलके डोळे, लांब काळेभोर केस, नाजूक अंगकाठी अशा या गीतेवरची कुणाचीही नजर ढळायची नाही.
गीता आजीच्या ओढीने प्रत्येक सुटीत येतच होती.पण एक दिवस अचानक शेजारच्या काकांनी , गीताला आजी आजारी असल्याचे कळवले. गीता शहरातून धावतच घरी आली. आजी अंथरुणावर झोपली होती. पण ती इतकी अशक्त झाली होती की, ती अंथरुणात दिसतही नव्हती. तिच्याभोवती सगळे जमले होते. गीता दारातूनच रडत "आजे " म्हणत धावतच आजी जवळ आली. आजीने गीताची चाहूल लागताच डोळे उघडले. गीताकडे डोळे भरून पाहिले. आपला थरथरता हात गीताच्या गालावरून फिरवला . तिचे डोळे पुसले. गीताच्या डोक्यावर हात ठेवला. आणि तिच्याकडे बघतच आजीने प्राण सोडले .जणू आजी गीताचीच वाट पाहत होती. तिच्यातच तिचा जीव गुंतला होता.
आजी गेल्यानंतर गीताला खऱ्या अर्थाने पोरके झाल्यासारखे वाटले. आजीच्या आठवणीने तिचे सतत डोळे भरून यायचे. आजी गेल्यानंतर गीताचे घरी येणे कमी झाले. कारण घरी जायचे कोणासाठी असा तिला प्रश्न पडायचा. वडील तिचे तोंडही बघायचे नाही आणि नवीन आईत कधी मायेचा ओलावा जाणवला नाही. त्यातल्या त्यात एक बरे होते वडील तिच्या फीसाठी व खर्चासाठी नियमीत पैसे पाठवत होते.
गीता ग्रॅज्युएट झाली. तिला पुढे शिकायचे होते. नोकरी करायची होती. पण एक दिवस तिला घरी बोलावण्यात आले. ती घरी आली. घरात खूपच सुधारणा झाली होती. नवीन सुंदर टाईल्स लावल्या होत्या. घरात किंमती सामान आले होते. शिवाय आईच्या अंगावर चार दागिनेही दिसत होते. गीताच्या मनात आले....बाबांना लॉटरी लागली की काय ? अशा विचारात ती असतांनाच आईने तिला हाताला धरून सोफ्यावर बसवले. स्वतःच्या हाताने गीताला चहा दिला. नंतर हळूच ती गीताला म्हणाली, " गीता मी तुझे लग्न ठरवले आहे. खूप श्रीमंत आणि चांगली माणसं आहेत . त्यांनी तुला पसंत केले आहे." असे म्हणत तिने गीताला मुलाचा फोटो दाखवला. फोटो पाहताच गीता किंचाळली." काय या मुलाशी माझं लग्न ठरवलंस ? श्रीमंत बागायतदाराचा बिघडलेला हा मुलगा आहे. हे साऱ्या गावाला माहीत आहे .मी नाही या मुलाशी..... पंकजशी लग्न करणार.आई , तुझ्या पाया पडते, पण माझे या मुलाची लग्न लावू नकोस. माझे आयुष्य बरबाद होईल." पण आई तिचे म्हणणे ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हती . मुलाकडची श्रीमंती पाहून तिचे डोळे चकाकले होते. गीताचे वडील तिच्याबाबतीत उदासीन होते. याचा फायदा घेऊन गीताच्या आईने एक प्रकारे गीताचा सौदाच केला होता . पंकजने गीताला गावात पाहिले होते . तिच्या सौंदर्यावर तो भाळला होता . त्याने आई-वडिलांना सांगून , गीताच्या आईला आमिष दाखवून , गीताला मागणी घातली होती. म्हणूनच आईने गीताचे काही ऐकून घेतले नाही . उलट तिला एका खोलीत कोंडून ठेवले. दोन दिवसातच मुहूर्त होता. लग्नाची तयारीही झाली होती .
गीता खूप रडत होती. पण आता तिचे ऐकायला, तिची राखण करायला आजीही नव्हती. लग्नाच्या दिवशी गीताला तयार करून बोहल्यावर उभे केले. लग्नात आई आपले दागिने आणि भारी पैठणी नेसून मिरवत होती. लग्नाचा थाटही काही औरच होता. गीताचे लग्न झाले. ती भरल्या डोळ्यांनी सासरी निघाली पण तिचे अश्रू पुसायला किंवा तिच्यासाठी गळ्यात पडून रडणारे कुणीही नव्हते. श्रीमंतीने नटलेल्या मोठ्या घरात गीताचा गृहप्रवेश झाला. दुसऱ्या दिवशी घरात पूजा झाली.
पहिल्या रात्री तिची खोली सुंदर सुगंधी फुलांनी सजवली होती. गीतानेही सुंदर दागिने व सुंदर साडी नेसली होती. सुंदर मोगऱ्याचे गजरे माळले होते. हातात केशरी दुधाचा ग्लास घेऊन ती आपल्या खोलीत आली. खोलीत पंकज नव्हता. तिने ग्लास स्टुलावर ठेवला आणि ती पंकजची वाट पहात बसली. खूप उशीर झाला तरी पंकज आला नव्हता. दमल्यामुळे गीताचे डोळे लागू लागले . तेव्हाच पंकज झोकांड्या खात खोलीत आला. त्याने धाडकन दार लावले. झोकांड्या खातच तो गीताजवळ आला. गीता घाबरली. त्याच्या तोंडाला येणाऱ्या दारूच्या भपकाऱ्यामुळे तिला शिशारी आली. तिने त्याला दूर लोटले पण त्यामुळे पंकजचा अहंकार दुखावला गेला आणि एखाद्या श्वापदासारखा तो तिच्यावर तुटून पडला.
दुसऱ्या दिवशी गीताला उठवत नव्हते. तिचे सारे अंग ठणकत होते. पण गीता कशीबशी उठली आणि आवरून बाहेर आली.लगेच सासूने तिचे दागिने ताब्यात घेऊन तिला घरकामाला जुंपले ते रात्रीपर्यंत. मग रोजच दिवसभर काम, सासूचा जाच आणि रात्री पंकजचा अत्याचार.... तिला सारंच असह्य होत होते. माहेरचे दार तर बंदच होते. तिला नैराश्य वाटू लागले. तिच्या अंधारलेल्या काळजाला कोठेही कवडसा दिसत नव्हता.
तशातच तिला दिवस गेले . तिला वाटले बाळाच्या चाहूलने सारे बदलेल. तिचा त्रास संपेल. पण तसे काहिही झाले नाही. उलट तिला पाचवा महिना चालू असतांना एका शुल्लक कारणामुळे पंकजने तिला लाथांनी तुडवले. ती अर्धमेली झाली. त्यातच तिला रक्तस्त्रावही सुरू झाला. तेंव्हा नाइलाजाने तिला दवाखान्यात नेले. तेथे ती जिन्यावरून पडली, असे सांगण्यात आले. डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली पण तिचे अबाॅर्शन झाले होते.गीताला खूप वाईट वाटले.कसेबसे तिने स्वतःला सावरले.
एकदा जवळपास कोणी नाही, असे पाहून गीता डॉक्टरीणबाईंना हात जोडून , रडतच म्हणाली, " प्लीज, मला या राक्षसांच्या तावडीतून सोडवा. तुमचे फार उपकार होतील . पोलिसात तक्रार करून काही उपयोग होणार नाही . कारण साऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची..... पुढार्‍यांची माझ्या सासऱ्यांबरोबर उठबस आहे." डाॅक्टरीणबाईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला शांत केले आणि तिला मुंबईतील आपल्या मैत्रिणीचा.... समाजसेविका रेखाताईंचा फोन नंबर दिला . आणि सांगितले, " ती तुला नक्की मदत करेल. घराबाहेर कसे पडायचे ते तू बघ."
गीता हॉस्पिटल मधून घरी आली. तिचे पुन्हा तेच हाल सुरू झाले . एक दिवस ती देवदर्शनाला जाते म्हणून घराबाहेर पडली. जाताना जे थोडे पैसे तिने बाजूला काढून ठेवले होते ते बरोबर घेतले आणि तिने तडक बस स्टॉप गाठला. समोर एक बस उभी होती. त्यात ती चढली. नंतर मुद्दामच वेगवेगळ्या बसेस बदलत ती मुंबईला पोहोचली. पोचल्यानंतर तिने रेखाताईंना फोन केला. त्या लगेच गीताला घ्यायला गेल्या आणि तिला घरी घेऊन आल्या. रेखाताईंनी तिला चार दिवस तिचा मानसिक व शारीरिक थकवा जावा म्हणून विश्रांती घ्यायला लावली. रेखाताईंना डॉक्टरीणबाईंमुळे सर्व कल्पना होतीच.
नंतर गीताने पुढील शिक्षण घ्यायचे ठरविले. तिने आयुष्यात खूप सोसल्यामुळे रेखाताईंच्या मदतीने तिने लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतली. नोकरी करत तिने एलएलबी पूर्ण केले. त्याच दरम्यान तिने लढा देऊन पंकज पासून घटस्फोट मिळवला. घटस्फोटानंतर तिला खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाल्यासारखे वाटले.तिने मुक्त श्वास घेतला. आणि त्याबरोबरच गांजलेल्या स्त्रियांना न्याय मिळवून द्यायचा तिने वसाच घेतला.अनेक जणांना तिने न्याय मिळवून दिला.अनेकांचे अश्रू पुसले.अनेकांची ती आधारवड झाली.
बापाने अपशकुनी ठरवलेली तीच गीता..... आता गांजलेल्या लोकांना शुभशकुनी वाटत होती..... शुभशकुनी....!!


- स्मिता भलमे
- 9421058149

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू