पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जीवाला शिव भेटतो तेव्हा......

स्वातंत्र्य व्यक्तिमत्त्वाचे

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने शाॅपिजन द्वारे कथा स्पर्धा आयोजित.

स्पर्धेसाठी कथा

(सत्यघटनेवर आधारित कथा)


शीर्षक - जीवाला शिव भेटतो तेव्हा.....




                         गावाकडच्या टोलेजंग वाड्यात वासडीकर आडनावाचे सुखवस्तू एकत्र कुटुंब राहत होते. नुकतेच त्यांच्या सुनेचे दिवस भरत आलेले असल्याने काळजी घेतली जात होती.गावात श्रीमंत लोकवस्ती असली तरीही पाहिल्या तर अगदीच जुजबी सुविधा होत्या. ग्रामीण रुग्णालय तर नावालाच होते. खाजगी दवाखाना टाकायची कुणाची हिंमत होत नव्हती कारण तेथून शहर हाकेच्या अंतरावर होते. इथे कोण तब्येत दाखवणार हा प्रश्न होता. मात्र वाड्यात कुटुंबाने शहरासारख्या सुविधा केलेल्या होत्या. 


                      एक दिवस अचानक आई..गं...आई..गं....!!आवाज येताच विमल काकुंनी सुधा च्या रुमकडे धाव घेतली. तिला नवव्या महिन्याच्या कळा सुरू झाल्या होत्या. काकुंनी मुलगा हरीश ला आवाज दिला अन परिस्थिती सांगितली. "लवकर गाडी बोलावं. सुधा चे दिवस भरलेत. तिला दवाखान्यात हालवावे लागेल."

विमल काकुंनी सांगताच गाडी दारात आली आणि सुसाट वेगाने ग्रामीण रुग्णालय गाठले व तिला दाखल केले गेले." डॉ. ही आले तपासले व नर्स ला काही गोष्टी सांगून आपल्या कॅबिनमध्ये चालले गेले. 


             याच शहरात वासडीकर कुटुंबाच्या परिचयाचे एक चांगले सद्गृहस्थ राहत होते. "कधीही मदत लागली तर जरूर सांगा.."म्हणत पूर्वीच त्यांनी कुटुंबाला सांगितलेले होते. त्यांनाही हरीश च्या बाबांनी निरोप पाठवून बोलावून घेतले. इकडे सुधाला अतिशय वेदना होत होत्या. जीव कासावीस झाला होता.डॉक्टरांनी थोडा वेळ वाट पाहू परंतु वेळ पडलीच तर सिझेरीन करावे लागेल असे कुटुंबाच्या कानावर घालून ठेवले होते. पण घरचे काही केल्या  सिझेरिनला तयार होत नव्हते. इंजेक्शन दिले तरीही उपयोग होत नव्हता. शेवटी डॉक्टरांनी कडक शब्दात सांगितले. "सिझेरिन नाही केले तर बाळ हातचे जाईल." तेव्हा कुठे सगळे तयार झाले. डॉ. सिझेरिन च्या तयारीत असतांना कोण जाणो सुधाला जोरजोरात कळा सुरू झाल्या व धाडकन बाळ बाहेर पडले. पण...पण....!!  त्याची हालचाल अजिबात जाणवत नव्हती. मुडकुळा पडावा तसे ते अर्भक बाहेर येऊन पडले होते. हे दृश्य पाहून विमल काकुच्या पायाखालची जमीन सरकली. हे काय झाले.... सगळे हवालदिल झाले. सुधाच्या छातीत धडधड वाढली होती.आक्रोश करायलाही आवाज फुटत नव्हता. बोबडी वळावी अशी गत झाली होती. डॉक्टरही घाबरले होते. सिझेरीन साठी हातात वेळ होता तरीही हे कसे घडले? हा प्रश्न त्यांना पडला होता.क्षणाचाही विचार न करता ताबडतोब डॉक्टरांनी बाळाला तपासले पण छे....!! हतबल होत "ओह!! हाती आलेले बाळ गेले हो....!!" म्हणत त्यांनी अॅप्रेनला हिसका मारला. जरा नाराजीतचं नातेवाईकांकडे पाहून ते तेथून निघून गेले. रडारड सुरू झाली.सुधा ला तर हुंदके आवरत नव्हते. हरीश ना उमेद होऊन सुधाला समजावण्याचा प्रयत्न करत होता. कोणी कोणाला समजावयाचे? घरावरचं दुःख कोसळले होते. 


                त्याचक्षणी का कोण जाणे नातेवाईका च्या परिचयाचे असलेल्या त्या सद्गृहस्थांनी बाळाकडे पाहिल्यावर क्षणभर भुवया उंचावल्या. काहीतरी जाणवले त्यांना ते बाळ जिवंत असल्याचे वाटले. पण स्वतः डॉक्टरांनी मृत घोषित केल्यावर जिवंत कसे असणार असे पुटपुटतचं ते जागीच थांबले. परंतु मृत का होईना आता बाळाला घरी तर न्यावेच लागेल व तिथेच क्रियाकर्म करावे लागेल म्हणत ते कपड्यात गुंडाळून घेण्यासाठी त्याच्या जवळ गेले. पाहतो तर बाळाचे अंग काहीसे गरम जाणवत होते. क्षणात त्यांनी त्याच्या छातीवर कान लावला असता किंचित हलकेसे ठोके जाणवले. चमत्कार झाल्यासारखे ते क्षण होते. क्षणाचाही विचार न करता त्यांनी जोराचा आवाज डॉक्टरांना दिला. "डॉक्टर कृपया बाळाला पुन्हा तपासा ते जिवंत आहे असे वाटतेय...हो...!! तुम्ही काहीतरी करा...plz plz...!!" म्हणत त्यांनी स्वतःच्या तोंडाने बाळाला श्वास भरवायला सुरुवात केली. जीव एकवटून ते बाळात प्राण फुंकत होते.बाळाला गोंजारत होते. "कसे शक्य आहे हे....!!" म्हणत डॉ. नी स्टेथसस्कोप ने ठोके तपासले, असता ते ही अवाक!! झाले. ताबडतोब स्टाप ला बोलावले. पपिंग आणले गेले व उपचार सुरू झाले.मध्येच डॉ. सद्गृहस्थाकडे तर सद्गृहस्थ डॉ. कडे बघत होते. उन्हाळ्यात मृगजळ दिसताच, धाव घ्यावी पण ते सारं फोल ठरावं. असं  काहीसं वैरी मन चिंतत होते. आता काहीही होवो प्रयत्न करुया असा दिलासा डॉ.नी त्यांच्याकडे पाहून दिला व उपचार सुरू केले. म्हणतात ना.....भगवान के घर देर है, अंधेर नहीं!! असेच काहीसे घडत होते. काही मिनिटांतच बाळ जोरजोरात श्वास घेऊन रडायला लागले. जो टाहो त्याने फोडला तो ऐकून सुधा च्या व कुटूंबाच्या जीवात जीव आला. काय आनंद होता तो....!! अवर्णनीय.डाॅक्टरांनी बाळाला लगेच सुधाच्या छातीवर झोपवले. तिने त्याला पाहताच आनंदाश्रू नी हलकेच कवटाळून कुशीत घेतले. डोळे ओलेचिंब भिजलेले होते.  हरीश ने ते हलकेच येऊन तिचे डोळे पुसले व सुधाच्या सासुने तिच्या पाठीवरून हात भिरवत जवळ घेतले. बाळाला जवळ घेताच सुधाला पान्हा फुटला व बाळ चुटुचुटू दूध पिऊ लागले. बघा ना....आईचा पान्हा हा निसर्गनिर्मित देण आहे. सारे व्हिटॅमिन मिळण्याचा महत्वपूर्ण भाग आहे. बाळाच्या भुकेसाठी भगवंताने एवढी मोठी सोय करून दिलीय, की ती कुणीही तयार करू शकणार नाही. क्षणात तेथील सगळ्यांचे देवाला आपोआप हात जोडले गेले.नवस केले गेले. देवाच्या मनात काय असते कोण जाणे पण जड पडलेल्या जीवातही जीव आणणे शेवटी त्याच्याच हातात असते. पडलेले चेहरे ,दवाखान्यात पसरलेले दुःखी वातावरण आता आनंदी झाले होते. गेलेले बाळ जिवंत झालेय ही बातमी हा..हा..म्हणता वाऱ्यासारखी परिसरात पोहचली होती. कोण ते सद्गृहस्थ? ज्यांनी बाळाला जीवनदान दिले. कोणी अवतारी पुरुष तर नाही ना ? हे बघायला एकच गर्दी झाली होती. साक्षात कृष्ण म्हणा किंवा अल्लाह म्हणा कोणाच्या तरी रुपातून देवचं अवतरले आणि बाळाला जीवनदान दिले. अशी चर्चा आपसात सुरू झाली. ज्या अवलियामुळे बाळ वाचले त्यांच्या पुढे तर नातेवाईकांनी लोटांगण घातले. डोळ्यात पंचप्राण आणून बाळाच्या आजी आजोबा,बाबा व घरातील प्रत्येक सदस्यांनी मनापासून आभार मानले. आज तुम्ही नसता तर...? "काय घडले असते हो..!!" हा प्रश्न करत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती.तुम्ही देवासारखे धावून आलात. हे ऋण कधीही विसरणे शक्य नाही म्हणाले. त्यांनीही शुभेच्छा व आशीर्वाद देत तेथून आनंदाने सर्वांचा निरोप घेतला.

                    ही सत्यघटना आहे. पण आजवर त्या सद्गृहस्थांनी कधीच आपल्या नावाचा कुठेही गवगवा केला नाही. ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते त्यांनाच हा प्रसंग माहिती आहे.आजकाल कुठेही काही मदत केली की लगेच सोशल मीडिया वर तासनतास बातम्या झळकत असतात पण ही घटना माझ्या लहानपणीची (काही वर्षांपूर्वींची) नक्की वर्ष आठवत नाही. तेव्हा ना मिडिया होता, ना कुणी त्यांना सर्वांसमोर(जगासमोर) आणण्याची दखल घेतली. त्यांनी ही स्वतः कधी वाहवा!! कौतुकाची अपेक्षा केली नाही. सदसद्विवेकबुद्धी ने हातून योग्य ते कार्य घडले हेच पुण्याचे संचीत म्हणत ते आजवर निरामय आयुष्य जगत आहेत. आणखीही अनेकांच्या कामी येत गेले पण कुठेही पेपरबाजी नाही की फोकस मध्ये ते आले नाहीत. "स्वातंत्र्य स्वातंत्र्य काय असतं हो तर हेच, जे निरामयपणे पार पाडले जाते." 


           जेव्हा ही घटना मला समजली तेव्हा लहान होते पण आता सहज तपास घेतला असता ते मृत घोषित केलेले बाळ आजघडीला इंजिनिअर झालेले आहे कळाले. ते संपर्कात नसले तरीही आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने त्याची जन्माच्या दिवशीची जगण्यासाठीची धडपड आठवली. " मी जिवंत आहे" हे ते अर्भक तरी कसे सांगणार होते? तरीही स्वातंत्र्य मिळवायची जिद्द म्हणून कुणीतरी त्याच्यासाठी धावून आलेले होते. नियतीला जेव्हा सगळं चांगलं करायचे असते तेव्हा ती पूर्णतः यथायोग्य करतेच करते. याची प्रचिती आली. त्या क्षणी ते सद्गृहस्थ नसते तर?? हा सुद्धा प्रश्न मनात येऊन गेला. त्या परिस्थितीत एकाच ठिकाणी दोन जीवांनी स्वतःचे स्वातंत्र्य अनुभवले होते. बाळाने जगण्याचे तर सद्गृहस्थांनी कुणाला तरी जीवनदान देता आले याचे. त्या दोघांच्याही आयुष्यात "जीवाला शिव भेटल्याची अनुभूती देणारी घटना घडली होती. स्वातंत्र्य व्यक्तिमत्त्वाचे यालाच तर म्हणता येईल. आजघडीला या घटनेपासून ते बाळ (आजचा तो तरूण ) कदाचित अनभिज्ञ असणार. कोणी त्याला हे सारे सांगितले असणार की नाही मला माहीत नाही पण याची साक्षीदार म्हणून लेखनीतून सत्यघटनेला न्याय द्यावा वाटला. "नेकी कर, पाणी में डाल" या उक्तीप्रमाणे त्या सद्गृहस्थाचे कार्य आज या निमित्ताने सर्वांसमोर मांडावेसे वाटले. शेवटी एकच सांगणे आयुष्य किती मिळाले या पेक्षा ते कशा पद्धतीने जगले हे अधिक महत्त्वाचे असते हेच खरे....!! खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य उपभोगणे यालाच म्हणता येईल.



सौ.प्रज्ञा.रा.कुलकर्णी.

#राज्ञी

मो -९६५७९४८३९४

वसमत

जि.हिंगोली

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू