पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

संघर्ष

संघर्ष


मध्यंतरी पुण्यात एका सांस्कृतिक कार्यक्रमात मी कथाकथन करण्यासाठी गेले होते. कार्यक्रमानंतर जेवणाचेही आयोजन होते.खरतर मला बाहेर काही खाल्ल की आजकाल त्रासच व्हायचा.मी त्यांना जेवणाचं राहू द्या असही म्हणाले परंतु त्यांनी मला थांबण्याची विनंती केल्यानंतर माझाही नाईलाज
झाला. तिथेच थोडा फेरफटका मारताना मला ती दिसली .तेच तेजस्वी डोळे ,कणखर आवाज परंतु पूर्णपणे कायापालट झालेली अतिशय कृश झालेली माझी बालमैत्रिण संध्या. जेवणाची सर्व व्यवस्था तीच पहात होती. तिच्या आवाजामुळेच
माझं लक्ष तिच्याकडे गेलं.
"संध्या न तू ? "अस विचारताच क्षणभर गोंधळली ती.अखेर तीस वर्षांनंतर भेटलो होतो." ओळखलस मला" कशी ओळखणार म्हणा कारण लग्नानंतर सुखवस्तू पणाची सर्व लक्षणे माझ्या शरीरावर पसरली होती. तिने नकारार्थी मान डोलावली."अगं मी राणी तुझी बालपणापासूनची मैत्रिण"मी अस म्हणताच तिच्या नजरेत ओळख दिसली .तिने मला कडकडून मिठी मारली.आमच्या दोघींच्या डोळ्यातून गंगा-यमुना वाहू लागल्या आसपास चे लोक आमच्याकडे आश्चर्याने पहात होते. भानावर येऊन आम्ही दोघींनी डोळे पुसले. कार्यक्रम आयोजकांनी मला विचारले आपण ओळखता एकमेकांना ? या सौ.संध्या जोशी पुण्यातील काही नामवंत स्वयंपाकाचे ठेके घेणाऱ्या लोकांपैकी एक ".मी त्यांना हसून सांगितले ,"अहो ही माझी बालमैत्रिण संध्या आहे." थोडफार बोलून आम्ही दोघींनी एकमेकांचे मो .नंबर घेतले आणि रविवारी बालगंधर्व नाट्यमंदिराच्या जवळच्या बगीच्यात भेटायचे ठरवले.घरी आल्यावर पण माझ्या नजरेसमोरून संध्याची कृश मूर्ती ,तिची साधारण रहाणी हलत नव्हती.
संध्या आणि मी एकाच कॉलनीत रहात होतो.लहानपणापासून एकाच शाळेत शिकलो.अगदी खास मैत्रिणी. पुढे कॉलेजला
मी आर्टस आणि तिने सायन्स निवडल्यामुळे रोजच्या भेटीगाठी कमी होऊ लागल्या .त्यातच आम्ही गावाबाहेरच्या कॉलनीत रहायला गेलो. मग महिन्यातून एकदा भेट व्हायची.संध्या पहिल्यापासून हुशार स्वाभिमानी होती. स्वतःच्या मतांवर ठाम असायची.रंगाने गहूवर्णी ,तेजस्वी पाणीदार डोळे, कुरळे केस कुणीही प्रेमात पडावे अशी.घरची परिस्थिती माझ्या पेक्षा थोडी डावीच होती.आमच्या दोघींची मात्र खूप गट्टी होती. माझे लग्न विसाव्या वर्षीच झाले. तिचे थोडे उशीरा झाले. तिने बी एस सी करून पुढे बी फार्मा केले.अधूनमधून माहेरी आले की तिच्याविषयी कळायचे.तिच लग्न चांगल्या घरात होऊन तीही सुखी असल्याच कळायचं.मी मध्यप्रदेशात असल्याने तिची माझी भेट नंतर झालीच नाही. त्याकाळी फोन वगैरे नसायचे. पण इकडून तिकडून बातमी लागायची. विचार करता करता केव्हा डोळा लागला कळलच नाही.मधले दोन तीन दिवस बेचैनीतच गेले.
रविवारी संध्याकाळी मी तिला भेटायला गेले.इकडच्या तिकडच्या गप्पा मारून मी अखेर माझ्या मनात डाचत असलेला प्रश्न तिला विचारला, "संध्या एक विचारू तुला वाईट तर नाही वाटणार?"
"नाही गं पण मला माहित आहे तू काय विचारणार आहे .माझी ही अवस्था पाहून तुला बरेच प्रश्न पडले असतील ना ?पण तू माझी काळजी करू नको.म्हणजे बरी आहे गं "
मी तिला अगदी गळच घातली तेव्हा तिने मला जे सांगितले ते ऐकून मला थोडं वाईट तर वाटल पण त्याहीपेक्षा तिच्या जगण्याच्या धडपडीच कौतुक जास्त वाटलं. त्याचप्रमाणें तिचं स्वप्न साकारण्यासाठी तिची खटपट अभिमानास्पद वाटली.
संध्याच लग्न एका श्रीमंत मुलाशी झाल होतं.त्याने तिला मागणीच घातली होती सासू-सास-यांनाही ती पसंत होती. संध्याच्या आईवडिलांनाही राजेश आवडला होता.उंच सावळा एकुलता एक इंजिनिअर मुलगा आणखी काय हवं ?त्यातून संध्याला धाकट्या दोघी बहिणीच होत्या. घरची परिस्थिती
सुमारच होती.वडिल शिक्षक होते .आईने प्राथमिक शाळेत शिक्षिका होती .त्यात तिघी मुलीच असल्याने काटकसरीने संसाराचे गाडे सुरू होते. संध्याचे लग्न श्रीमंत घरात करण कस जमेल या चिंतेत दोघेही होते परंतु सासरचे लोक
चांगले असल्याने त्यांनी फक्त ' मुलगी आणि नारळ द्या 'असे सांगून दोन्हीकडून लग्न करून घेतले. पहिले पाच,सहा वर्ष सर्वकाही सुरळीत सुरू होते.तिला दोन मुली झाल्या.दृष्ट लागेल असा संसार सुरू होता.अखेर नियतीच्या मनात काय असते ते आपल्याला कळत नाही. राजेशने अचानक नोकरी सोडून बिझिनेस करायचा निर्णय घेतला. सासू सासरे पण हो म्हणाले.परंतु दुर्दैव अस की राजेशच्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा लोकांनी घेतला .धंद्यातील भागीदाराने त्याला चांगलेच गोत्यात आणले.या सर्व परिस्थिती मुळे रहाता बंगला ,गाडी सर्व काही विकाव लागलं. सासूसास-यांनी हाय खाऊन अंथरूण धरले आणि वर्षभरात दोघंही गेले.आणि मग संध्याची ख-या अर्थाने जगण्यासाठी धडपड सुरू झाली. राजेश पार निराशेत बुडला. दिवसेंदिवस काहीच न करता घरात बसून असायचा. संध्याने त्याला खूप हिंमत देण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. त्यानंतर त्याच्या मनाने कधी उभारी धरलीच नाही. काही नाहीतर काही समाजसेवेत तरी मन रमव असही त्याला सांगून पाहिलं. काही वर्ष त्याने तेही केल परंतु नंतर दारूच्या व्यसनाधीन झाला. कधीमधी घरी यायचा मुलींना मारहाण, संध्याला शिवीगाळ करायचा. लोक घरी पैसे मागायला येऊ लागले.संध्याने अंगावरचे सर्व दागिने विकून उधारी चुकवली. आणि ती कोल्हापूरला आली.बी फार्मा असल्याने काही मेडिकल स्टोर्सवाल्यांनी तिला नफ्यात २५%पार्टनरशिप मध्ये कामावर ठेवले. फावल्या वेळात ती ट्युशन्स करून कसाबसा घरखर्च चालवू लागली.पण दैवाला तेही मंजूर नव्हते नव्हते .तिथेही तिच्या नव-याने ब-याच लोकांकडून पैसे घेतले होते ते तिला त्रास देऊ लागले. मुलींचे शिक्षण सुरूच होते .धाकट्या मुलीला शिक्षणात फारशी रुची नसल्याने १२वी नंतर तिचे.लग्न लावून दिले. मोठी मुलगी मात्र इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती.त्यावेळी नातेवाईकांनी थोडीफार मदत केली.पण नव-याची कणभरही साथ नव्हती.मग तिने घरपोच जेवणाचे डबे द्यायला सुरूवात केली. हाताला चव असल्याने तो धंदा चांगला सुरू झाला. चार पैसे गाठीशी जमवून थोडफार कर्ज घेऊन तिने दोन रूम किचन चांगला फ्लॅट घेतला. आता थोडासा जम बसू लागला होता. मोठ्या मुलीने ऑफिसमधील मुलाशीच लग्न करण्याची इच्छा दर्शवली मग तिचेही लग्न लावून दिले. दोन्ही लग्नात फक्त एक गोष्ट जमेची
होती की मुलंवाल्यांनी काहीच मागितले नाही. हळुहळू संध्याच्या ओळखी वाढू लागल्या. मग तिला कुणीतरी पुण्याला जायचा सल्ला दिला.
पुण्यातही तिने दोन बायकांना हाताशी धरून पंधरा वीस जणांच्या स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. हळूहळू तिचा जम बसू लागला. हे सर्व करत असताना तिने राजेशला देखील व्यसनमुक्ती केंद्रात पाठवून त्याला पुष्कळ ताळ्यावर आणले. त्याने पण तिला कामात थोडीफार मदत करायला सुरूवात केली केली .तिने केलेले डबे पोचवू लागला . मोठी मुलगी- जावई चांगले मिळाले आहेत.ते तिला आता काम नको करू म्हणतात. पण ती स्वाभिमानी असल्याने त्यांची मदत नाकारते.मीही तिला म्हटले ,'आता थकली आहेस काम करू नको पण ऐकेल ती संध्या कसली ?आता ती तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करते.मी तिला विचारल "आता काय स्वप्न पूर्ण करण्याच वय आहे का तुझं ?आता साठी जवळ आली तुझी."त्यावर ती हसून म्हणाली , " अगं आता कुठे मी माझ्यासाठी जगू शकते. इतकी वर्ष हाता तोंडाची गाठ घालून देण्यासाठी मेहनत केली .आता मी माझं स्वप्न पूर्ण करणार"
मी पण तिच्या स्वप्नाविषयी जाणून घ्यायला
उत्सुक होतेच." मग आता काय चालली आहे खटपट ?" ती म्हणाली "अगं मी पै -पै वाचवून पांच वर्षांपूर्वी कोकणात जमीन घेतली आहे तिथे मी काजूची झाडं लावली आहेत.यावर्षी पहिल्यांदा काजू आले आहेत." मला आश्चर्यच वाटलं. "काय ?संध्या तुला वेडबीड तर नाही लागलं?अगं किती मेहनत असते त्यातून तुला नव-याची मदतही नाही .कमालच करते कस जमवते तू हे सगळ."

ती म्हणाले मेहनत तर खूप आहे पण त्यामागे सुद्धा एक कारण आहे. तुला आठवत आपली एक मैत्रीण श्रीमंत होती. ती
फ्रॉकच्या खिशात काजू बदाम भरून आणायची .तिची मर्जी असली तर ती कधीकधी एखादा काजू आपल्याला द्यायची.मला खूप आवडायचे काजू .आईला मी आणायला सांगायची पण परिस्थितीमुळे तीही लाचार होती गं. नंतर पुष्कळवेळा नातेवाईकांकडे पण काचेच्या बरणीत ठेवलेले काजू मला खुणवायचे. आईला तर मी म्हणायची मला नवीन फ्रॉक नको मला काजू आणून दे. त्यावर ती गंमतीत म्हणायची पण की आपण तुझ्यासाठी काजूचा व्यापार करणारा नवराच शोधू.पण कसचं काय.लग्नानंतर चार पाच वर्ष सुबत्ता होती तेव्हां काजू खायला मिळाले.पण नंतर सर्व फासेच पालटले आणि जे माझ्या नशीबात घडलं ते परत एकदा माझ्या मुलींना सोसावं लागलं.माझ्या लहान मुलीला काजूच फार वेड होतं .तेव्हाच मी मनात ठरवल होत एक ना एक दिवस मी जरूर काजूची शेती करेन. माझ्या नातीला काजू खूप आवडतात .आज ती मागते तेव्हा मुठभर का होईना मी तिच्या हातावर काजु ठेऊ शकते."
अग पण कस केलं तू हे सर्व ? तशी तू लहानपणा
पासून जिद्दी आहेस पण सोप नाही गं."सोप तर नव्हतच गं .मला कोकणात डोंगरावरची खडकाळ जमीन कमी भावात मिळते अस कळल्यावर मी आणि माझी लहान मुलगी आम्ही दोघी तिथे गेलो.तेथील लोकांनी आम्हांला बाईमाणूस पाहून खूप त्रास दिला. बर डोंगराळ जमीन खणून काढण्यासाठी मजदूर आवश्यक होते .पण तेवढी पैशाची सोय नव्हती.
ह्यांनी नेहमीप्रमाणे हात वर केलेच होते.अखेर दोन मजदूर लावून जमीन खणली आणि ती माती दगड वहाण्याचे काम आम्ही दोघी मायलेकींनी केले.खूप थकून जायचो .रहायची सोय नसल्याने कोल्हापूरहून ८०कि .मी .दूर गावी जायचो आणि संध्याकाळी परत यायचो.अखेर आमची चिकाटी पाहून.गावातील लोकांनी थोडी मदत करायला सूरूवात केली.मग आम्हांलाही हुरूप आला.पांच वर्ष खूप मेहनत केली तेव्हा आता फळ हाताला लागले.यावर्षी काजू खूप लागले.पण त्यांना साफ करण ,एक एक काजू सोलण खूप किचकट काम आहे.पण आता थोडीफार मदत नवरा करत आहे.तरी पैशाचे व्यवहार मी त्याच्या हाती ठेवले नाही.. मागच्या वर्षी काजूची पहिली फसल आली.पण तिथेही तिचे दुर्दैव आड आले.माझ्या आईची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष झाले .गावातील लोकांनी खूप काजू पळवले.नुकसान झाले नव-याने नेहमीप्रमाणे हात उंच केले. तिची हिंमत बांधण्याऐवजी तिला दूषणंच दिली.पण मी परत एकदा कामास लागली.यावर्षी चांगले उत्पन्न झाले. आता आम्ही दोघही कोकणातच असतो. मला जेवणाची काही विशेष मोठी ऑर्डर मिळाली की मी पुण्यात येते .नवरा तिथेच रहातो आणि काजूची देखभाल करतो.आज तिच्या काजूची गुणवत्ता सर्वदूर पसरली आहे.आपले काजू देशभरात,परदेशात विकले जावे हे माझे स्वप्न आहे. आता काजूबरोबरच ती हापूस आंबा पण छोट्या प्रमाणावर पुण्या-मुंबईला पाठवते. एक जमिनीचा तुकडा आणखीन घेऊन तिने आणखी काजूची झाडं लावली आहेत."तिचा खटाटोप ऐकून मी तर धन्यच झाले .न राहवून मी तिला घट्ट मीठी मारली. तिने बरोबर माझ्यासाठी काजू आणले होते .त्या काजूंइतका गोडवा आजपर्यंत कधीच दूस-या काजूंमध्ये खाण्यात आला नव्हता. वयाची साठी जवळ आली आहे.पण तिच्यातील आत्मविश्वास थोडाही कमी झाला नाही. अजूनही कष्ट करून स्वतःच्या ध्येयपूर्तीसाठी ती झटत आहे.तिच्या जीवनसंघर्षाची कहाणी ऐकून मी तर भारावून गेले. तिच्याविषयीचा अभिमान आणि कौतूक मनात दाटून आले.पहिले जगण्यासाठीची तिची धडपड आणि आता स्वतः काही करून दाखवावे ही जिद्द पाहून मी तिच्यापुढे नतमस्तक झाले !..


सौ ऐश्वर्या डगांवकर.
इंदूर .मध्यप्रदेश.
मो .नं.९३२९७३६६७५.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू