पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

व्यक्त अव्यक्त

 व्यक्त-अव्यक्त

-नीलिमा रवि

अबोध मनी रुतले ते उमजले
बोध घ्यावयाला
अव्यक्त भाव साकारुन आले
व्यक्त व्हावयाला

अचेतन मनतळी अक्षरे पहुडली
चेतना स्फुल्लिंगवायला
अगम्य रसायने त्यात मिसळली
गमले शब्द मग सांगायाला

अजोड रेशीमबंध विणत गेले
जोड तरल सुमने गुंफायाला
अघटित सूत्र कसे गवसले
घट अर्थांचे भरावयाला

अस्फुट भावनांचे शिंपण झाले
स्फुट काही स्पष्ट करावयाला
अनवधाने मज काव्य जमले
अवधान मिळाले जगावयाला

रस ग्रहण: ऋचा दीपक कर्पे


"व्यक्त अव्यक्त" शीर्षकच खूप सुंदर आहे.. आणि शीर्षकात जो विरोधाभास आहे तोच कवितेत शेवट पर्यंत टिकवून ठेवला आहे आणि मला वाटते तोच ह्या कवितेचा आत्मा आहे.
अबोध मनी रुतले ते उमजले
बोध घ्यावयाला
अव्यक्त भाव साकारुन आले
व्यक्त व्हावयाला
कवयित्री म्हणते, तिच्या अबोध मनावर जे संस्कार झाले आहे, जे काही त्या मनात रुजवले, रुतले आहे ते तिला आता उमजले आहे. आणि त्यातून बोध घेऊन ती तिच्या मनातील अव्यक्त भावना साकारण्यासाठी सज्ज झाली आहे.
अचेतन मनतळी अक्षरे पहुडली
चेतना स्फुल्लिंगवायला
अगम्य रसायने त्यात मिसळली
गमले शब्द मग सांगायाला
कवयित्रीच्या अचेतन मनाच्या तळाशी जी अक्षरे आहेत तीच तिच्यात चैतन्य निर्माण करत आहेत म्हणजेच चेतना स्फुल्लिंगत आहे.. 'स्फुल्लिंगवायला' हा अतिशय सुंदर आणि आगळावेगळा शब्द ह्या जागी उपयोग केला आहे..
अचेतन मनाच्या तळाशी साचलेले शब्द कवयित्रीच्या मनाला चेतना देत मनाला जागृत करत आहे, त्यात अगम्य रसायने मिसळून ती गम्य शब्दांद्वारे तिच्या भावना प्रकट करत आहे. स्वतः च्याच मनात दडलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी तिला आता शब्द सुचू लागले आहेत.
अजोड रेशीमबंध विणत गेले
जोड तरल सुमने गुंफायाला
अघटित सूत्र कसे गवसले
घट अर्थांचे भरावयाला
कवयित्री भावनेचे अजोड रेशिमबंध विणत जाते.. आणि साधी सोपी शब्द रूपी सुमने गुंफुन एक तरल लयबद्ध काव्य माला तयार करते..
येथे रूपक अलंकार वापरून काव्य सौंदर्य निर्माण केले आहे. आजपर्यंत जे शब्द जे सूत्र कधीच गवसले नव्हते ते आज अचानक सुचले आणि अर्थपूर्ण ओळींनी काव्यघट भरले!
खरंच कविता ही अशीच जन्म घेते. ठरवून किंवा विचार करून कविता करता येत नाही.. तो एक क्षण असतो.. अचानक मनात एक वादळ उठते, नकळतच शब्द जुळून येतात... आणि कवितेचा जन्म होतो! आणि तीच खरी कविता असते!
अस्फुट भावनांचे शिंपण झाले
स्फुट काही स्पष्ट करावयाला
अनवधाने मज काव्य जमले
अवधान मिळाले जगावयाला
मनात लपलेल्या काही अस्फुट भावनांचे शिंपण झाले आणि अचानकपणे सारे चित्र स्पष्ट झाले.. एक एक ओळ जुळत गेली आणि कवयित्रीने एक सुंदर काव्य रचले.
तिला तिच्या मनासारखी कविता अचानक जमली! अगदी अनावधानाने!
काहीही विचार न करता तिच्या मनातील भावना काव्य रूपात व्यक्त झाल्या!
काव्यनिर्मितीचा प्रवास घडवून आणणारी आणि कमी शब्दांत खूप काही व्यक्त करणारी एक अर्थपूर्ण कविता. एक एक शब्द अगदी विचार करून निवडला आहे.
देवपूजा करताना आपण बागेतून आपल्या आराध्य देवते साठी जशी फुले निवडतो अगदी तसेच शब्दांच्या बागेतून ताजी सुवासिक फुले वेचून कवयित्री काव्य पूजेला बसली आहे. कवयित्रीच्या कल्पनाशक्ती आणि शब्दांची निवड अप्रतिम आहे.
ह्या सुंदर कवितेसाठी कवयित्रीचे अभिनंदन आणि पुढील काव्य प्रवासासाठी भरघोस शुभेच्छा!

©ऋचा दीपक कर्पे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू