पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

निर्भय मन

स्वातंत्र्य व्यक्तीमत्वाचे

शॉपीजन प्रकाशनच्या स्पर्धेसाठी कथा

 

 तिची कथा

 

"हो आम्ही तृतीयपंथी आहोत. आम्हाला आमच्या न्याय हक्काची जागा लोकशाही देशात हवी आहे. आम्ही देखील माणसं आहोत. शिखंडी राजा म्हणून स्वीकार करण्यात आला. पुरातन काळी देखील अधिकार होते. शंकराचा मोहीनी अवतार आहे. अर्धनारी नटेश्वर ही संकल्पना अध्यात्मात आहे. सगळ काही तूम्ही मान्य करतात. आजचे आमचे अस्तित्व का मान्य करत नाही? का समाज आम्हाला हसतो? आम्ही माणसं आहोत. आम्हाला माणसासारख जगू द्या."

मीरा पंडित या तृतीयपंथीची मुलाखत टि.व्ही.वर सुरू होती. आणि अलका नेहमीप्रमाणे तिचे किचनमधील काम करता करता ऐकत होती. रोजचे रांधा, वाढा, उष्टी काढा इतकेच काम तिला माहिती होते. नृत्यकलेची आवड असून सराव करू शकत नव्हती. तिचे मानसिक स्वातंत्र्य लग्नानंतर हिसकावले गेले होते.

पदवीधर असून देखील ती चूल आणि मूल या विश्वात हरवली होती. मीरा पंडितचे भाषण ऐकून ती प्रभावित झाली. अलकाची मुले आता महाविद्यालयात जाऊ लागली होती. मुलांकडे बघत ती जगणे शिकत होती. तिच्या इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून ती मन मारून जीवन जगत होती. आपला देखील स्वत:चा स्वत:वर अधिकार आहे. फक्त इतरांच्या सुखासाठी आपण जगत आहोत. हे तिच्या लक्षात येत नव्हते. घराच्या चार भिंती म्हणजे इतकेच आयुष्य असा गैरसमज तिने केला होता. या जगाच्या पलीकडे देखील व्यापक जग आहे. ही कल्पना तिला नव्हती. पतीसाठी सर्वस्व त्याग करायचा, स्वत:कडे दुर्लक्ष करायचे, इतकेच तत्वज्ञान तिच्या मेंदूवर कोरले गेले होते.

संस्कृत भाषेची आवड तिला होती. यत्र स्त्री तत्र देवता पुज्यते...जेथे स्त्रीची पुजा होते, तेथे देवतांची पुजा होते असे म्हणतात. परंतू घराबाहेर न पडता देखील तिला अनेक कथा, व्यथा महिलांच्या ऐकायला मिळाल्या. धुणी भांडी काम करायला येणारी बाई, तिच्यासोबत गप्पा मारता मारता अलकाला अनेक गोष्टी माहिती झाल्या. 

अलकाचे गाव तसे लहान, तिथे अज्ञान, अ़धश्रध्देचा बाजार भरलेला होता. काम करता करता बाई सांगत होती, "ताई तूम्ही बाहेर पडत नाही, तेवढ चांगल आहे. अहो गावात सहा पायांची देवगाय आणली होती एका माणसाने, सगळेजण पाया पडत होते. आमच्या चाळीत रात्री घुघंरांचा आवाज येत होता. भगताकडून लिंबू आणले, तेव्हा सगळे बरे झाले. तूम्ही शिकलेल्या तूम्ही विश्वास ठेवत नाही."

अलका म्हणाली, "सगळ्या गोष्टी खऱ्या ठरत नाही. विज्ञान माहिती नसल्यामुळे हे सगळ घडत असत बघा."

बाईला काही समजले नाही. ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी अलका बाजारात भाजी घेण्याची जात होती. तिची शेजारची सुधाकाकू सोबत होती. तेवढ्यात रस्त्यात त्यांना भाजी घेणारा ,साडी नेसलेला तृतीयपंथी दिसला. सुधाकाकूने त्याला दहाची नोट दिली आणि म्हणाली, "एक रूपया दे बाबा, बच्चो को आशीर्वाद, घर मे बरकत".

अलका आश्चर्याने बघू लागली. 

सुधाकाकू म्हणाली, " हे लोक कोणाला रूपया देत नाहीत, आपण घ्यायचा त्यांच्याकडून लक्ष्मी टिकून राहते."

अलका मनातल्या मनात म्हणाली, "लक्ष्मी चंचल असते. अशा लोकांमुळे लक्ष्मी घरात टिकत असेल तर हे लोक देशाच्या सत्तेत का नाहीत?"

मीरा पंडितचे वाक्य तिला पुन्हा आठवले.

घरी आल्यावर तिचा नवरा पुन्हा रागाने बोलला, "हे बघा घर, ही बघा बाई, एम.ए. बी.एड. नेट सेट  पीएचडी, हिशोबात रहा नाहीतर कायमची झोपवून टाकीन, इतका वेळ भाज्या आणायला, तूझा जीव घेऊन टाकीन".

अलकाला या सगळ्या बोलण्याची सवय झाली होती. ती म्हणाली, " सुधाकाकू सोबत होत्या, खूप गर्दी होती बाजारात, त्यामूळे उशीर झाला."

तिचा नवरा वाट्टेल तसे बोलत होता, वाट्टेल तसे जगत होता. अलका मात्र स्वत:चे अस्तित्व ओळखू शकत नव्हती. निर्भय मन तिला माहीत नव्हते. आयुष्याला काळ खात असतो. असे तिने बालपणी ऐकले होते. आपण काहीतरी कला जीवन जगण्याची कला शिकली पाहिजे, असे तिला सतत वाटायचे, ती भजनात मन रमवायची, तिच्या नवर्याला तिच्याविषयक सोयर सुतक नव्हते. त्याचे नेहमीचे उत्तर तिला माहिती होते. 

"मी नृत्यकला शिकवण्याचे क्लास घेऊ का?"

"नाही नाचकाम करणारी बाई वैश्या असते."

"प्रत्येक बाई वैश्या नसते, देवाधर्माच्या नावावर मुरळी नाचते, ते समाजात चालते, सिनेमात अंगप्रदर्शन सगळे पाहतात, घरात मात्र स्त्रीला कवडीची किंमत दिली जात नाही."

"तू शून्य आहेस, घर नीटनेटके ठेव, जेवण चविष्ट बनव, हेच तूझे जीवन आहे."

अलका मात्र शांतपणे प्रत्येक वेळी मुलांसमोर तमाशा नको म्हणून माघार घेत होती.

चारचौघींसारखी असून तिला तिचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य नव्हते. मनासारखे जगता येत नव्हते. तिला पंजाबी ड्रेस घालायला खूप आवडत असे.‌ परंतू मिस्टरांना साडी आवडते, म्हणून ती साड्याच वापरत होती. नवरा जसा आदेश देईल त्याप्रमाणे जगत होती. 

"गुलामाला गुलामीची जाणिव करून द्या, तो बंड करणार."

अलकाची मुलगी मुग्धा मोठ्याने निबंध वाचत होती. अलका म्हणाली, "हळू आवाजात वाच, बेटा".

एका दिवशी मुले बाहेरगावी आजी आजोबासोबत गेले होते. घरात अलका आणि तिचा नवरा दोघेजण होते. अलका गच्चीवरचे वाळलेले कपडे काढत होती. तेवढ्यात पावसाची एक सर तिच्या अंगावर आली. तिचे अंग शहारले. ती अंगावरची साडी सावरत घरात आली, तिचा नवरा राम तेरी गंगा मैली सिनेमा बघत होता. अलकाला थंडी वाजत होती. त्यामुळे तिने कपडे सोफ्यावर ठेवले. आणि मिस्टरांच्या कुशीत शिरली. नवरा तिला दूर करत म्हणाला, "मी काही ऋषी विश्वामित्र नाही, तू काय रंभा नाहीस. माझ्यासाठी माझे आईवडील हाच माझा संसार आहे. तू नाहीस, तू शून्य आहेस."

अलकाच्या डोळ्यात पाणी आले.

तिचा दिनक्रम ठरलेला होता. सकाळी ऊठून पाणी भरणे, घर, आंगण स्वच्छ करणे, लादी पुसणे, बाईने धुतलेले कपडे वाळत घालणे, त्यांनतर स्वयंपाक, दुपारी मुलांची शाळा, आणि दुपारी लहान मुलांचे क्लास, सायंकाळी परत मुलांना शाळेतून आणणे, त्यानंतर रात्रीचा स्वयंपाक, या दिनचर्येत तिचे स्वत:चे स्थान नव्हते. तिच्या इच्छा, आकांक्षा वेगळ्या होत्या. तिला नृत्याची आवड होती. गाण्याची आवड होती. तिच्याजवळ मोबाईल होता. परंतू मिस्टरांना विचारल्याशिवाय ती काही करू शकत नव्हती. एकदा श्रावणी पौर्णिमेनिमित्त सुत्त पठण बोलण्याची संधी तिला ऑनलाईन मिळाली. तिच्या आवाजातील तल्लीनता ऐकून तिला पुण्याला भावगीत गायनासाठी स्पर्धेसाठी निवडण्यात आले. सुत्त पठनाची परवानगी मिस्टरांनी दिली होती. मात्र स्पर्धेसाठी तिला पुण्याला घेऊन जाणार नाही. असे त्याने सांगितले. ती निराश झाली. 

काही दिवसांनी तिला त्या गोष्टीचा विसर देखील पडला. एका दिवशी दुपारी ती लहान मुलांना शिकवत होती. कवितेला चाल लावून बोलून दाखवत होती.

टपटप पडती अंगणामध्ये....

प्राजक्ताची फुले........

मुले तल्लीन होऊन हसत खेळत शिकत होते. तिचे मिस्टर दाराबाहेर शांत उभे होते. तिला चाहुल देखील नव्हती. शेवटी क्लास संपला. मुले आपापल्या घरी गेली. मिस्टर आतमध्ये आले. त्यांना बघून अलका पाण्याचा ग्लास घेऊन आली. ती म्हणाली, "तूम्ही तोंड, हात, पाय धुवा. मी जेवायला वाढते."

तो काही न बोलता शांतपणे खुर्चीवर बसला. तिने टेबलवर जेवणाचे ताट ठेवले. त्याने त्याच्या मोबाईलची शुटींग दाखवली. ती म्हणाली, "हि कविता मी आज शिकवली."

मिस्टर म्हणाले, "पुढील महिन्यात स्पर्धा आहे गायनाची आमच्या    ऑफीसला, येशील का?"

अलकाने हसतच मानेने होकार दिला. काही दिवसांनी मिस्टरांना विसर पडला. अलका देखील विसरली. 

स्वभावाला औषध नसते तेच खरे आहे. असे अलकाला वाटले. तिला स्वत:ची गुणवत्ता सिध्द करण्याची संधी मिळत होती. परंतू मिस्टर आपल्याला टाळत आहेत. असे तिला वाटले. निर्भय मन हेच स्वातंत्र्य हे तिला समजत होते. मात्र उमजत नव्हते. कळत होते, मात्र वळत नव्हते. 

एका दिवशी तिच्या सासूने तिच्यासोबत विनाकारण भांडण केले. सासू म्हणाले,"म्हशीने राधांयचं, हेल्याने खायचं, घरात स्वच्छता नाही, निघून जा, घर सोडून."

मिस्टर घरात नव्हते. अलका रडायला लागली. तिचे मूले घरी आली. मुले म्हणाली,"मम्मा आज घ्यायला आली नाहीस, आम्ही एकटे आलो घरी, तू का रडतेस?"

ती न बोलता किचनमध्ये गेली. मुलांनी मात्र आजीला चांगलेच प्रश्न विचारले, मुलांना कळायला लागले होते. मुले म्हणाली, "काय गं म्हतारे, काय बोलते आमच्या मम्माला? हे आमचे देखील घर आहे. तूझे एकटीचे नाही. आमची मम्मा सगळ छान करते, तू काय बसल्या ठिकाणी आयत्या बिळात नागोबा, जेवण वेळेवर, दिवसभर फक्त सिनेमा बघत बसायच, काय काम करतेस तू?"

आजी देखील भांडण करू लागली. "मम्माचे शिकविलेले बोलके पोपट आहे सगळे, निघा माझ्या घरातून". लहान मुलाला एक चापट तिने मारली, तेवढ्यात मिस्टर घरी आले, त्यांनी पाहिले. ते म्हणाले, "आई लहान मुलांना मारू नये".

अलकासाठी तिच्या सासूचे वागणे नवीन नव्हते. तिचा स्वभाव देखील तिला माहित होता. अलका आजारी असली तरी स्वयंपाक करत होती. मात्र तिचे थकलेले मन, शरीर तिच्या मुलांशिवाय इतर कोणीही समजू शकत नव्हते. शेवटी मुलाला ताप आला. अलका मीठ, पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवत होती. रात्रभर जागी राहून ती ताप तपासत होती. सकाळी सकाळी ती झोपली, मुलाचा ताप उतरला, मात्र अलकाचे अंग तापले. मिस्टरांनी सकाळी बघितले. तिच्या सासूची नेहमीप्रमाणे बडबड सुरू झाली, "सकाळचे आठ वाजले तरी चहा मिळत नाही, मुल शाळेत जाणार नाही का आज? मुले नाटकी, मुलांची आई नाटकी, निघा माझ्या घरातून".

आता मात्र मिस्टर रागावले, "आई, अलकाला ताप आला आहे, रात्रभर ती मुलासाठी जागी होती, सकाळी झोपली, तू कालपासून सारख अस का बोलतेस? घर सोडून निघून जा?"

सासू म्हणाली, "माझी या घरात वेळेवर जेवणाची सोय कोणी करत नाही. मला दरमहा पाच हजार तूझ्या पगारातून खर्चासाठी पाहिजे, नाहीतर तूम्ही निघून जा."

शेवटी मिस्टर तिला पाच हजार दरमहा देण्यासाठी तयार झाले. अलकाला औषध दिले. काही दिवसांनी अलका बरी झाली. नेहमीप्रमाणे घरातील कामे करू लागली. 

पुढील महिन्यात पुन्हा सासूचे तेच भांडण सुरू झाले. आता मात्र मिस्टरांचा सयंम तुटला. तो म्हणाला, "आई आम्ही जातो या घरातून जातो. तू जिंकलीस, आम्ही हरलो."

शेवटी दुसऱ्या गावात त्यांनी स्वत:चे घर घेतले. अलका तिचे काम नेहमीप्रमाणे नवीन घरात करत होती. मिस्टरांमध्ये झालेला बदल तिच्या लक्षात आला होता. तिच्यासाठी त्याने नवीन पंजाबी ड्रेस आणले. गाण्याचे क्लास घेण्याची परवानगी दिली. 

निर्भय मन हेच खरे स्वातंत्र्य हा विचार तिला समजला.

तिच्या जीवदवाखान्यातच अर्थाने सुरूवात झाली, आणि महिन्याभराने सासूचा पुन्हा फोन आला, "तब्येत बरी नाही, घरी परत  या."  मिस्टरांनी नकार दिला. शेवटी अलका म्हणाली, " स्त्रीच स्त्रीची शत्रू ठरते, जेव्हा आपण जवळ होतो, तेव्हा त्यांनी दूर केले, आणि आता पुन्हा का बोलवत आहे?"

मिस्टर म्हणाले, "लहान मुल आणि म्हातारे माणस सारखी असतात. मात्र आमची आई जिद्दी, हट्टी स्वभावाची आहे. तिला इतरांच्या भावनेची पर्वा नाही. आता गरज पडली तर आपली आठवण आली, स्वभावाला औषध नसते हेच खरे, मी देखील त्या वातावरणात सतत तेच ते शब्द ऐकून निगरगठ्ठ बनलो असतो. बरे झाले तिने स्वत: आपल्याला दूर केले."

अलका म्हणाली,"इतरांचा अपमान करणे ही आपली संस्कृती नाही. आपण एकदा जाऊन भेटू पुढील महिन्यात."

नेहमीप्रमाणे दोघे विसरले आणि आठ दिवसांनी पुन्हा फोन आला, यावेळी शेजारच्या काकू बोलत होत्या, सासू कोरोनामूळे दवाखान्यातच वारली. मोजक्या लोकांना दवाखान्यात हजर राहण्याची परवानगी होती. शेवटी अलका आणि मिस्टरांना शेवटचे दर्शन देखील झाले नाही. मिस्टर म्हणाले, "आईच्या इच्छेप्रमाणे झाले, आम्हाला आधीच दूर लोटले होते, आता काय सांत्वना, कुणाला द्यावी, जिवंतपणी स्त्रीला तूच्छ लेखण्याची सवय लावली, त्यामुळे आंधळ्यासारखी अवस्था झाली होती."

अलका म्हणाली, "मी गांधारीसारखी डोळ्यावर पट्टी बांधली नाही, शांत राहिले, सयंम आणि श्रध्देच्या बळावर सगळ साध्य होते असा अनुभव मला मिळाला. निर्भय मन हेच खरे स्वातंत्र्य असते हे तूम्ही मला प्रसंगावधान राहून शिकवले, मी तूमच्या ऋणातच आहे."

मिस्टर म्हणाले, "माझ्या स्वभावाला औषध नव्हते. शेवटी काळ वेळ सर्वात बलशाली आहेत. हे मी शिकलो, माझ्यात देखील बदल झाला. तू सोबत आहेस, त्यामुळे सगळ बरोबर आहे."

अलका डोळे पुसत म्हणाली, "नाही हो मी शून्य आहे."

मिस्टर म्हणाले,"शून्याशिवाय करोडो रूपये व्यर्थ ठरतात."

शेवटी अलकाला तिचे मानसिक स्वातंत्र्य उशीरा का होईना मिळाले. आनंदी मनाचे तेज तिच्या चेहर्यावर झळकत होते. जणूकाही प्राजक्ताची फुले टपटप अंगणात पडत आहे. असे तिला वाटले.

 

प्रज्ञा हंसराज बागुल

कसारा ठाणे

8080453480

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू