पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आषाढाच्या पहिल्या दिवशी

आषाढाच्या पहिल्या दिवशी 
~~~~~~~~~~~~~~~


" मेघदूत " ही महाकवी कालिदासांची एक महान रचना, " जगभरात अद्वितीय ठरलेली ... !" 

शापग्रस्त विरही यक्ष आषाढात भरुन आलेल्या ढगाला पाहून बेचैन होतो आणि आपल्या प्रेयसीच्या आठवणींनी व्याकूळ झालेल्या अवस्थेत त्या ढगाला प्रार्थना करतो की, " हे बंधू तू माझा दूत हो आणि माझा निरोप माझ्या प्रेयसीपर्यंत पोहोचता कर, तुला त्रास जरुर होईल पण एका भावाचे काम दुसरा भाऊच करणार, नाही तर कोण करणार ?"

आपल्याच मस्तीत जाणा-या त्या ढगालाही विरही यक्षाची ही कळकळीची विनंती त्यांच्यामधे निर्माण झालेल्या स्नेहामुळे मान्य करावीच लागली आणि अखेर तो यक्षाचा दूत झाला. 

पूर्वीच्या काळी संदेश वहनासाठी पशु-पक्षांचा साधन म्हणून उपयोग करुन घेतल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत पण आषाढातील पहिल्या दिवशी पाण्याने भरुन आलेल्या ढगाचा असा उपयोग करुन घेण्याची कल्पना सर्वप्रथम महाकवी कालिदास यांनाच सुचली आणि म्हणूनच " मेघदूत " एक महाकाव्य ठरले. वास्तविक या महाकाव्यात फक्त १२१ श्लोक आहेत आणि यात सुध्दा केवळ १४ श्लोक हेच फक्त " निरोपाचे " आहेत, बाकीचे सर्व श्लोक त्या ढगांची वाटचाल व या वाटचाली संदर्भातील दिशा निर्देश या बद्दलचे आहेत आणि म्हणूनच जरी " मेघदूत " हा एक लहानसा काव्यसंग्रह असला तरी यात केल्याप्रमाणे विरहाचं वर्णन इतरत्र कुठेही सापडत नाही असे जाणकारांचे मत आहे. 

आषाढ आणि श्रावण या महिन्यांना प्रणय आणि प्रणय क्रीडेमध्ये अतिशय महत्व आहे आणि केवळ संस्कृतमध्येच नव्हे तर इतर भाषांमध्ये सुध्दा याबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे. एक उर्दू भाषिक कवी तर म्हणतो की ......


तौबा की थी, मै न पिऊंगा कभी शराब  ।
बादल का रंग देख, नीयत बदल गयी  ।। 


" मेघदूत " या महाकाव्याचे भाषांतर जगभरातल्या अनेक भाषांमध्ये झालेले आहे. याच्या इंग्रजी भाषेतील अनुवादाचा मान ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत प्राध्यापक एच. एच. विल्सन यांना जातो. त्यांनी १८१३ साली  " क्लाऊड मेसेंजर " या नावाने हे भाषांतरीत पुस्तक कलकत्ता येथे प्रकाशित केले होते. जर्मन, फ्रेंच, रशियन, सिंहली आदि विदेशी भाषांबरोबरच हिंदी, उर्दू, बंगाली, मराठी आदि भारतीय भाषांमध्ये सुध्दा "मेघदूत" चे भाषांतर झालेले आहे. 

संस्कृत भाषा न समजणा-या मराठी वाचकांसाठी, हळवं मन, प्रेमळ स्वभाव, मराठी भाषेवर प्रभुत्व लाभलेल्या आणि आमच्या " शब्दसाधना परिवार, धुळे " चे एक आधारस्तंभ असलेल्या श्री राजाभाऊ कुलकर्णी यांचे " आषाढाच्या पहिल्या दिवशी " या नावाचे एक पुस्तक दिनांक १२ जुलै, २०१० रोजी प्रकाशित झालेले असून  मराठी भाषेसाठी त्यांनी हे एक बहुमोल योगदान दिलेले आहे असे मला वाटते. 

आषाढाच्या पहिल्या दिवशी आणि कविकुलगुरु महाकवी कालिदास दिनानिमित्त आज हा लेख लिहिण्याची बुध्दी झाली हे मी माझे भाग्य समजतो. 


दिवाकर चौकेकर, गांधीनगर (गुजरात)

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू