पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

व्यक्तिमत्त्व विकास... आयुष्याची यशस्वी वाटचाल

व्यक्तीमत्व विकास...... आयुष्याची यशस्वी वाटचाल
दि.२९ जून, २०२२.

अनेकदा असे म्हटले जाते की " कोणताही माणूस हा परिस्थितीचा परिणाम असतो " याचाच अर्थ असा की माणसाच्या जन्मापासून ते त्याचे व्यक्तिमत्व घडत जाण्यापर्यंतचा त्याचा प्रवास हा त्या त्या वेळच्या परिस्थितीचा परिणाम असतो व त्यातून त्याचं व्यक्तिमत्व घडत जातं. लहानपणापासून बालकाची जसजशी शारीरिक व बौद्धिक वाढ होते व ते बालक ज्या कुटुंबात जन्म घेते त्याचा अनुवंशिक व कौटुंबिक परिणाम हा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे त्या बालकांवर होत असतो. नंतर व ते बालक जसे जसे मोठे होत जाईल, शाळेत जाईल तर तेथे देखील त्याचेवर शालेय वातावरणातील सामाजिक संस्कार घडतात. लहान वयात त्याच्या कुटुंबातील आई-वडिलांकडून तसेच घरातील वडीलधाऱ्याकडून स्वच्छता, टापटीप, नेटकेपणा, खरे बोलण्याची सवय, चांगले मार्गदर्शन या बाबी बालकाला शिकविल्या जातात, असे पालक त्यांच्या पाल्यासाठी बालसंस्काराचं विद्यापीठच असतात असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

मूल जसं मोठं होतं व शाळेत जाऊ लागतं त्यावेळी ते तेथील शिक्षकांच्या व इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येते. तेथे त्याच्या वयानुरूप व शिक्षणासोबत जे सामाजिक संस्कार शिक्षकांकरवी रुजविले जातात त्यातून त्याचे मन निर्भय होते, हळू हळू चांगल्या-वाईट गोष्टीतील फरक त्यास दृश्यमान होऊ लागतो व या काळातच नित्य नियमित खरे बोलण्याची त्यास सवय लागते, त्याच्या स्वभावात धाडस निर्माण होते व आत्मविश्वास जोपासला जातो आजूबाजूस घडणाऱ्या कोणत्या गोष्टी गैर आहेत व कोणत्या गोष्टी संस्कार संवर्धनासाठी आवश्यक आहेत हे ताडले जाते, योग्य ते मार्गदर्शन करण्यास तेथील शिक्षक तत्पर असतातच व यातून त्याचे व्यक्तिमत्व निर्भीड होण्यास मदत होते.

कोणत्याही व्यक्तीचे स्वातंत्र्य हे त्याची निर्भयता असते. मनातील जे विचार समाजाच्या उत्थानासाठी आवश्यक असतात ते तसे आचरणात आणण्यासाठी मन खंबीर असणे अतिशय महत्वाचे असते. मनाचा दुबळेपणा व कचखाऊ वृत्ती त्यास त्याच्या सामाजिक कर्तव्यापासून सदैव परावृत्त करीत असते त्यादृष्टीने समाजासाठी जी काही कर्तव्ये नागरिक नात्याने करावयाची असतात ती पार पाडण्यासाठी निर्भयता असणे जरुरीचे असते व त्याची मुहुर्तमेढही बालवयातच रोवली जाते व त्यासाठी निर्भयता हा अतिशय महत्वाचा घटक व्यक्तिमत्व घडण्यासाठी आवश्यक ठरतो.

एखादी व्यक्ती जेव्हा सज्ञान होते तेव्हा ती देशाचा नागरिक म्हणून तिला जे घटनेने अधिकार प्रदान केलेले असतात त्यात प्रामुख्याने विचारात घेतलेला अधिकार म्हणजे विचार-स्वातंत्र्य व ते व्यक्त होण्याचा मिळालेला अधिकार ! लोकशाही मध्ये प्रत्येक नागरिकास मिळालेला हा अधिकार बहुमोल आहे व त्याचा यथायोग्य वापर करण्याची जबाबदारी देखील नागरिकांवर टाकण्यात आलेली आहे. आपल्या वक्तव्याने कोणताही समाज वा कोणतीही व्यक्ती दुखावली जाणार नाही हेही पाहावे लागते. खरे स्वातंत्र्य म्हणजे त्याची निर्भयता ! शिक्षणाने सुसंस्कृत झालेले आपले मन व विचार समाजापुढे स्पष्टपणे व निर्भयतेने मांडण्याचे सामर्थ्य आपल्याला संविधानाने देऊ केले आहे त्या स्वातंत्र्याचा समाजाच्या पुनरुत्थानासाठी वापर झाला पाहिजे इतके आपले विचार सक्षम व समाजासाठी मार्गदर्शक ठरायला हवेत.

आपल्याला मिळालेले विचार स्वातंत्र्य हे बहुपेडी असते त्यात जसे चांगला विचार समाजात ताठ मानेने जगण्याच्या कल्पना रुजविण्याचे सामर्थ्य असले पाहिजे त्याचप्रमाणे जुन्या चालीरीती ज्या समाजाला पुढे नेण्यापासून वंचित करतात त्याचा धिक्कार ठामपणे व्यक्त करता आला पाहिजे. जुन्या अंधश्रद्धा यांना मूठमाती देऊन नवीन दृष्टी समाजाला देण्यासाठी आपले विचार प्रगल्भ असणे आवश्यक आहे व आपला सामाजिक विचार समाजाकडून स्वीकारला जाईल इतपत आपली विचारधारा परिपक्व असणे गरजेची आहे.

आजपर्यंत आपल्या देशातील मोठमोठ्या व्यक्तिमत्वांनी समाजजीवन समृद्ध केले आहे. त्यात प्रामुख्याने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, राजा राजर्षी शाहू छत्रपती, सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर, पंडित जवाहरलाल नेहरू, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील,आचार्य विनोबा भावे,साने गुरुजी, लोकनायक जयप्रकाश नारायण, पंडित लाल बहादूर शास्त्री, साहित्यिक पु.ल.देशपांडे, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे,भारतरत्न डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम ही झळाळणारी व्यक्तिमत्वे होती त्यांनी देशाला समतेचा, विश्वबंधुत्वाचा, विचार दिला, स्वच्छतेचे धडे दिले, स्त्री-शिक्षण, विधवा विवाह इ. लोकशाहीचा विचार जनमानसात रुजविला व सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात ते यशस्वीही झाले.

जुन्या असामाजिक परंपरा व अंधश्रद्धा दूर करण्याचे त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले व जनमानसाला नवीन दिव्यदृष्टी देण्याचे काम केले व सामाजिक शोषणाविरुद्ध आवाज उठविण्याचे काम व अंधश्रद्धा व सामाजिक असमतोल या दोन्हीही समाजविघातक बाबीवर त्यांनी प्रहार केले. त्यादृष्टीने जुन्या परंपरा सोडून क्षितिजापर्यंत झेप घेण्याची उमेद उराशी बाळगल्यास होणारी मानवी प्रगती समस्त समाजासाठी उद्बोधक ठरते त्यादृष्टीने व्यक्तिमत्व घडणे अथवा ते घडविले जाणे दोन्ही बाबी एकमेकांना पूरक तर आहेतच व त्याच्यावर देशाची प्रगती अवलंबून असते हे तितकेच खरे !

व्यक्तिमत्व विकासावर सध्या मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो तो विज्ञान प्रसाराचा. आय.टी. तंत्रज्ञान असो, संगणकातील अद्यावत सुविधा असो, वा मोबाईल मधील विविध एप्स असो नवीन पिढीला आकृष्ट करून आकाशाला गवसणी घालण्याची संधी निर्माण करून देत आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील प्रगती नविन पिढीला त्यांचे व्यक्तीमत्व घडण्यासाठी खुणावत आहे व पात्र असणारे तरुण समाजामध्ये आदर्श निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत, त्याचाच एक भाग म्हणून यु.पी.एस.सी वा एम.पी.एस.सी. परीक्षा पास होण्यासाठी ते धडपडत असतात.

खरंतर, कोणत्याही व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास हा त्याच्या कुटुंबापूर्ती मर्यादित असत नाही तर ती संकल्पना खूप व्यापक आहे. चांगल्या व्यक्तिमत्वाचे परिणाम केवळ संबंधित व्यक्तीच्या कुटुंबावरच होत नसतात तर ते बहुआयामी असतात व त्याचा समस्त समाजमनावर परिणाम होतो. त्या व्यक्तितील होणाऱ्या चांगल्या बदलाचे परिणाम समस्त समाजास दिशादर्शक ठरतात व त्यावर राज्याचे व पर्यायाने देशाचे पुनरुत्थान होत असते असे मला वाटते. त्यामुळे आदर्श व्यक्तिमत्वासाठी शिक्षण, सर्वसमावेशक असा आदर्श सामाजिक विचार, धाडस, सभाधीटपणा, सामाजिक बांधिलकी व आपल्याबरोबर समस्त समाज पुढे घेऊन जाण्याची वैचारिक कुवत या बाबी परिणामकारक ठरतात असे मला वाटते.

दि.२९ जून, २०२२. सुधीर नारायण इनामदार..

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू