पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जस्ट पुणे थिंग्स- पी एम टी बस



पी एम पी एम एल किंवा पी एम टी अर्थात पुण्याची वाहतूक राणी. अंक गणित लक्षात राहणाऱ्यांच्या एकदम सोयीची म्हणजे पी एम टी. का? अहो बस ला नंबर असतातच पण गाडी कुठे जाणार हे नंबर वरून ओळखायचं हे मला पुण्यातच पाहायला मिळालं. 


या शहरात तुम्ही नवखे असाल आणि एखाद्या ठिकाणी जाण्याबद्दल बस कोणती पकडू असं विचाराल तर थेट नंबर  ऐकाल. दोन मिनिटं वाटेल.... हैं? ही काय पद्धत आहे सांगायची? काय 52 काय 111 काय 117? कोणी तरी नीट सांगा रे!  बस चं नाव म्हणजे कुठुन कुठे जाणारे , कुठून येणारे , कुठल्या मार्गे जाणारे वगैरे सगळं नंबर वर अवलंबून.  "काय हो, 37 नंबर गेली का?"," आज 64 नंबर कुठे राहिली काय माहित?" ," 117 चा ड्रायव्हर बदलला काय हो?, नै हा थांबत नाही मला यायला जरा उशीर झाला तर",असे अनेक संवाद ऐकायला मिळतील. 


बसमध्ये विविध प्रकारचे लोकं प्रवास करताना दिसतील. कॅटेगरी बाळ ते कॅटेगरी वयस्कर पर्यंत सगळे ;लटकत, लोंबकळत, अडखळत, ढकलत-बुकलत, तोल सांभाळत सफर करताना दिसतात. कंडक्टर मात्र बरोबर रस्ते काढत बस च्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सहजगत्या ये जा करताना दिसतात. त्यांनी बहुधा वर्तमानपत्रातील सशाला गाजर शोधायचा रस्ता दाखवा किंवा मांजराला उंदरपर्यंत पोहोचवा अशा प्रकारची रस्ते शोधायची कोडी सोडवली असतील. इथे डाव्या बाजूला स्त्रियांसाठी राखीव जागा असते. पुरुष मंडळींनी उजवीकडे बसायचं. दुपारच्या मधल्या वेळात या गोष्टी लागू होतात हो स्त्रियांनी डावीकडे आणि पुरुषांनी उजवीकडे. कारण तेव्हा गर्दी नसते. मात्र ऐन गर्दीच्या 'टायमाला' या मुद्द्यावरून महाचर्चा सुरू होते.


"की बॉ या बायकांचं बरं आहे, या डावीकडे बसल्या तरी हक्काची जागा, उजवीकडे बसल्या तरी आम्ही काही उठवू शकत नाही मग आम्ही पामरांनी जायचं कुठे? बरं एवढं यांचं प्रस्थ आहे इथे तरी यांच्यासाठी महिला विशेष बस जातात. आमच्या जमातीत काही 'विशेष' नाहीच का हो?"


"का हो दादा, हाय का नी?"


दादांना विचारताय खरं पण दादांचं लक्ष आहे कुठे? 

दादा म्हणतायत ,"हे तरुण पोरगं केव्हाचं बसलंय तंगड्या पसरून शीट वर, काही मानुसकी च ऱ्हायली नाई,एखानदा उठला असता लगेच म्हाताऱ्याला बघून, कधी उतरनारे कोनास ठाऊक? "


यात होतं काय तर उजवीकडे की डावीकडे या  विषयावर बोलणाऱ्या त्या एका म्होरक्याचा तसा पोपटच होतो. बरं बस तुडुंब भरलेली असताना सुद्धा निव्वळ कामावरची श्रद्धा म्हणून हटकून प्रत्येक स्टॉप ला थांबे घेणारे ते महान चालक वाहक vs. समस्त लटकत प्रवास करणारा प्रवासी वर्ग यांचं जे तोंडातल्या तोंडात फुसकटण चालू असतं ते भारीच! 

Start

वैतागलेल्या काकू- "ओ आता चला पुढे, कुठे स्टॉप घेताय सगळे? डोक्यावर बसवताय का आमच्या?" 

.

.

नवीन चढणारा प्रवासी - " तुमच्या वेळेस पण असंच म्हटलं असेल नई इतर लोकांनी?"

End


की मग गालातल्या गालात हशा!


तुम्ही तिकडे काहीही करा, हाणामारी करा, भांडा, केसांच्या झिंज्या उपटा कंडक्टर च्या तोंडी ठराविक आणि ठरलेलीच वाक्य,


Start

"चला पुढे सरका, जागा सोडू नका, व्हा पुढे; पुढचा स्टॉप अमुक अमुक, उतरणारे पुढे चला, तिकिटाचं कोण बाकी आहे का?, सुट्टे पैसे घ्या, पास दाखवा"

End


साधारण मूड बरा असेल तर बंदया पैशांचे सुट्टे करून मिळतात. एखादा शिस्तीचा कंडक्टर असेल तर पोरांना चांगला दम भरतो, "काय रे दारातून वर येता येत नाही का? शायनिंग मारतोय होय? चल हो वर इकडे"...(पुढील वाक्य हळू आवाजात)"च्यायला आमच्या डोक्याला ताप एक एक काही झालं म्हणजे?"


हे वाक्य नेमकं कोणी तरी सजग व्यक्ती ऐकणार आणि त्याला री ओढून पुढे सुरू होतं,


Start

"हल्लीची पिढी

.

.

.

अवघड आहे"

End


या सगळ्या भानगडीत ड्रायव्हर भडकलेला असतो. त्याचे वेगळेच प्रॉब्लेमस असतात. पुण्यातल्या ट्रॅफिक मध्ये गाडी चालवणे हा जम्बो प्रॉब्लेम.त्यानंतर कर्णकर्कश हॉर्न ऐकणे, गाण्याच्या कार्यक्रमात दाद देताना जसे हात वर करतात तसे करून वेगळ्या प्रकारच्या ओव्या म्हणणे, कट्स काढत जाणाऱ्या लोकांसोबत गाडी चालवणे, एवढं मोठं बस च धूड सहीसलामत योजलेल्या ठिकाणी नेणे वगैरे वगैरे. मग येतात प्रो लोकं जे सिग्नल मध्ये बस पकडतात किंवा बस मधून उतरतात. हल्ली बी आर टी मुळे बस ना तीन दरवाजे आले आहेत. आता ड्रायव्हर लोकं करतात मज्जा, काय करतात, दारच उघडत नाही की बोंबलले उतरणारे आणि चढणारे पण. छे! भलते सलते लाड नाही! स्टॉप म्हणजे स्टॉप. अधे मधे उतरू-चढू देणार नाही. बस बोंबलत! "सूड दुर्गे सूड"जणू अशा अविर्भावात ड्रायव्हर असतो. म्हणजे काय! पुण्याच्या बस चा आहे तो शेवटी. काही वेळेस ते बरोबर ही असतं कारण चालत्या बस मधून उतरणे , सिग्नल ला चढणे-उतरणे हा स्टंट सगळ्यांच्याच मुख्यत्वे बस चालक-वाहकाच्या अंगाशी येऊ शकतो.


यांचं आटपलं की आता येते गुंतवळ कॅटेगरी! लांबलचक गुंतवळ असावा तसे कानात इअर फोन घालून बसणारी मंडळी.  यातही प्रो लोकं असतात. इअरफोन लावून बस मध्ये चढतात, उतरतात, तिकीट काढतात. तसं सगळं सुरळीत चालू असतं त्यांचं पण....पण जर का चुकून काही ऐकूच आलं नाही, किंवा चुकीचं ऐकू गेलं की मग संपले, जे कोणी प्रतिस्पर्धी असतील ते 'खाऊ का गिळू' या प्रकारे गुंतवळ कॅटेगरी शी संवाद साधतात. हे प्रतिस्पर्धी शक्यतो वयस्कर आणि थकला दमलेला कर्मचारी वर्ग या विभागातले असतात. 

Start

प्रतिस्पर्धी- "उपटून टाका ती  कानातली यंत्र,जळले तुमचे इअरफोन ते"

.

.

गुंतवळ कॅटेगरी- "अहो काका,पण मी नीटच सांगितलं ना तुम्ही विचारलं ते"


प्रतिस्पर्धी- "अरे तुम्ही मुलं म्हणजे.....


गुंतवळ कॅटेगरी-  "ओके सॉरी आजोबा"

(५ मिनिटांनी  पुन्हा गाणी सुरू)

End


काही नवखे लोकं कंडक्टर ना ,"ओ काका,अमुक अमुक स्टॉप आला की सांगाल का?" असं म्हणून पुढच्या प्रत्येक स्टॉप ला अशा प्रकारे कंडक्टर कडे आशेने बघतात की त्या कंडक्टर च्या  मनात असं येत असेल झक मारलो नी सांगतो म्हटलं. मॅप लावा म्हणायला हवं होतं की काय?" 


बाकी बस चं वातावरण म्हणजे ; कुठे  राजवर्धन आणि काकू भांडत असतात, कुठे स्वामी  भक्तांना आशीर्वाद देताना दिसतात, कुठे हास्यजत्रा सुरू असते, कुठे राजकारण उफाळून आलेलं दिसतं तर कुठे नुसतं गॉसिप ऐकू येतं, कधी फोन वर बोलायचे स्किल्स दिसतात म्हणजे शेजारच्याला पण ऐकू येणार नाही पण समोरच्याला थेट ऐकू जाईल अशी संभाषणकौशल्य, कधी घरी जाऊन करायच्या पाककृतींचे व्हिडीओ, आणि खूप काय काय...! 


सगळंच काही वाईट नाही बरं, कधी तरी आपण बसलेल्या जागी वयस्कर, अपंग लोकांना बसायला जागा देणारे ही दिसतात. कधी तरी एखाद्या आजींना पैसे मोजून द्यायला मदत करतात. एखादे क्युटसे आजोबा चार वेळा त्यांच्या मंडळींना हाका मारत बस च्या मागच्या दरवाज्याकडून पुढच्या दरवाज्याकडे घेऊन जाताना दिसतात. आजी वैतागून ,"होय हो येतेय..तुम्ही व्हा पुढे" असं म्हणताना दिसतात तो भाग वेगळा! पण आपल्या जिवाच्या मानाने सांभाळून सगळ्या गोष्टी करत असतात. बस शेवटच्या ठिकाणाला पोचायला आली की काही शार्प डोक्याचे लोकं "ओ मास्तर जरा पाचशे चे सुट्टे बघा की असले तर" अशी मागणी करताना दिसतात. काहींचा मात्र आपण बरं नी आपलं काम बरं असाच भाव दिसतो. कोणाच्या अध्यातमध्यात नाही. बस आली, बसमध्ये बसलो, तिकीट काढलं, जागा मिळाली तरी ठीक नाही तरी ठीक, योग्य जागी उतरलो, बास!


एकूणच काय सगळ्या वृत्तींची मिसळ बसमध्ये बघायला मिळते. बघायला मिळते म्हणण्यापेक्षा अनुभवायला मिळते. अनेक अनोळखी लोकं भेटतात, बोलतात, आपली सुख-दुःख ही सांगतात. तुमच्या मनात ऐकायचं आहे की नाही याने त्यांच्या सांगण्याला काही फरक पडत नसतो.त्यांचं ध्येय एकच असतं, 'बोलणे'. मूग गिळून बसणं त्यांच्यात नसतं आणि सगळ्यांचं सगळं ऐकणं आमच्यात. मग संवाद 'हम्म' मध्ये बदलतो. 'हम्म' हा शब्द अनेक प्रकारच्या भावना व्यक्त करतो बहुधा, याची प्रचिती मला बस मध्येच आली. याच हम्म मागच्या भावना आणि प्रसंग इथे लिहून टाकले! आता 'हम्म' मोकळा झाला. नवीन लोकांच्या नवीन  गोष्टी ऐकण्यासाठी!

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू