पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भारत माता की जय!

हर घर तिरंगा…  हर मन तिरंगा… .. 

खूप सुंदर ओळी आहेत..

आजकाल आमच्या शहरात रोज ऐकू येत आहेत. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव, जोरदार तयारी सुरु आहे. 

प्रत्येक घरावर तिरंगा! प्रत्येकाच्या मनात सार्थ अभिमान! देशासाठी! 

देशभक्ती एक भावना जी मनामनात जागृत असते, एक अखंड वात जी भारतीयांच्या मनात सदोदित तेवत राहाते…!

आता काही लोक म्हणतात खरे की 15 ऑगस्ट रोजीच सर्वांचे देशप्रेम अगदी ओसंडून वाहाते.. 

सर्वांना त्याच दिवशी देशाची आठवण येते..! 

तिरंग्यासह फोटो घेतले जातात! अगदी विचारू नका! एका दिवसाचे काय ते कौतुक! 

पण मला एक सांगा दिवाळीच्या दिवशी दिवे लावले तर काय इतर दिनी दिव्यांचे महत्त्व नसते? 

होळीला रंग खेळला तर काय रोजच्या आयुष्यात रंगाचे महत्त्व कमी होते? 

नाही ना? तसेच, राष्ट्रभक्ती एक भावना आहे, जी सर्व भारतीयांमध्ये खोलवर रुजलेली आहे! 

तिला एखाद्या परिभाषेत किंवा अर्थात बांधणे शक्य आहे का? अगदी छोट्या छोट्या गोष्टीत… भारत भूमीच्या एकेका कणात आणि एकेका मनात आतपर्यंत ती भावना ठासून भरली आहे, आणि तिला सिद्ध करून दाखवण्याची मुळीच गरज नाही!

कंप्युटर वर बसून डेटा एंट्री करताना देखील आज मैचमध्ये भारत जिंकला पाहिजे, हा विचार ज्याचा डोक्यात असतो तो राष्ट्रभक्त आहे! 

परदेशात नोकरी करताना तेथील आपल्या बांधवांना जो मदत करतो, अडी अडचणीत त्यांना मदतीचा हात देतो तो देशभक्त आहे.. 

परदेशात राहून बॉलिवूड चित्रपट बघणारा पण राष्ट्रभक्त आहे! 

सणावारी भरजरी शालूचा पदर सांभाळून, नथ घालून मिरवणारी प्रत्येक स्त्री देशभक्त आहे. 

अगदी चव घेऊन पुरणपोळी खाणारी, आणि त्या नंतर समाधानाचा ढेकर देणारी मंडळी पण देशभक्त आहे! 

स्वयंपाकघरात काम करताना कानात हेडफोन लावून हिंदी-मराठी गाणी ऐकणारा पण देशभक्त आहे! 

आणि बाथरूम मधे अंघोळ करत करत "मेरे देश की धरती..." गाणारा पण देशभक्त आहे.

थंडीत गोधडीची ऊब घेताना 'तो' कसा उभा असेल एवढ्या थंडीत सीमेवर, हा विचार ज्याचा मनात आहे, तो देशभक्त आहे! 

राष्ट्रध्वज बघून जर एखाद्याचा अंगावर जर काटा येत असेल तर तो देशभक्त आहे! 

जन-गण-मन गाताना एखाद्या जर ऊर भरून येत असेल, तर तो राष्ट्रभक्त आहे! 

कारण देश म्हणजे एक भूखंड नव्हे तर तो मेळावा आहे, संस्कृतीचा, भाषेचा, कलेचा.. 

भारत देशातील पोशाख, खाद्यपदार्थ, कला, संस्कृती, साहित्य, नाती व माती जपणारा व त्यावर भरभरून प्रेम करणारा प्रत्येक भारतीय देशभक्त आहे!

तर कुठलीही शंका, संशय, गोंधळ मनात न ठेवता जल्लोषात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करा, तिरंग्यासह सेल्फी घ्या, फेसबुक वर अपलोड करा, इंस्टाग्राम वर स्टोरी पोस्ट करा, स्टार मेकरवर देशभक्ती गीते म्हणा… शॉपिज़न वर देशभक्तीपर रचना अपलोड करा..

आणि आज, दिवसातून एकदा तरी बेंबीच्या देठापासून अगदी कुठलाही विचार न करता जोरात म्हणा… .. "भारत माता की जय"

 

जय हिंद!

जय भारत!

 

©ऋचा दीपक कर्पे

 



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू