पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तृप्ती शोधतो आहे


तृप्ती शोधतो आहे

पंचतारांकित चवीला भोगतो आहे
भाकरी पिठल्यात तृप्ती शोधतो आहे

अंतरी भक्ती नसोनी, रोज जगदंबे,
पोट भरण्या जोगवा मी मागतो आहे

का मनाची व्यर्थ केली स्वच्छता इतकी?
आज जो तो चेहर्‍याला पाहतो आहे

मंदिरी जो कैद आहे देव, त्याला मी
का अजूनी सर्वसाक्षी मानतो आहे?

साजरा फादर्स डे करतोस का पोरा?
दान पिंडाचे मृतात्मा मागतो आहे

वाट नाही पाहिली केंव्हा कुणी ज्याची
त्या भणंगालाच मृत्यू टाळतो आहे

रोजचे घटतेच आहे मुल्य पैशांचे
छापल्या नोटात गांधी हासतो आहे

मनसुबे ऐकून घरचे, स्त्री भ्रुणालाही
जन्म श्वानाचा हवासा वाटतो आहे

मुखवट्यांवर भाळला "निशिकांत" इतका की
चोरही साधूच त्याला भासतो आहे



निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--राधा
लगावली--(गालगागा) X३ गा


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू