पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मातृदिन

*मातृदिन* 

      आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण अमावस्येच्या दिवशी म्हणजे 'पिठोरी अमावस्येच्या' दिवशी मातृदिन साजरा करण्याची पूर्वापार परंपरा आहे. आज पिठोरी अमावस्या आहे. चला, आईच्या ऋणाची जाणीव ठेवत तिच्याप्रती आदर व्यक्त करून आईची महती गात आज आपण मातृदिन साजरा करूया. 

"आई असते एक धागा, 

वातीला उजेड दावणारी समईतली जागा, 

घर उजळतं तेव्हा तिचं नसतं कुणाला भान, 

विझून गेली अंधारात की,

सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान"...

       कवी फ. मुं. शिंदे यांच्या कवितेतील या ओळी आईची महती सांगतात; मोठे झाल्यावर आईची गरज संपली म्हणून आईला विसरता कामा नये; असे कवी या काव्यपंक्तीतून आपणाला बजावतो. खरेतर, आई इतकं अधिक जवळचं आपणाला अन्य कोणीही नसतं; आईच्या आठवणींनी आपल्या हृदयाचा एक कप्पा कायम व्यापलेला असतो; त्यामुळे आईला विसरणे केवळ अशक्य असतं.

      आज मातृदिनी मी माझ्या आईचे गुणगान गाणार आहे. आईचा जन्म १९२० चा असावा. कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यातील वेदगंगा नदीकाठच्या गंगापूर या खेड्यातील गावच्या पाटलाची ही लाडकी पोर लग्न होऊन कोल्हापूरच्या आमच्या वाड्यात आली. वडिल सरकारी नोकरीत अंमलदार होते. कोल्हापुरात सहकारी चळवळीचा पाया ज्यांनी घातला त्या बिनीच्या शिलेदारांमध्ये त्यांचा समावेश होतो. वडिलांचे समाजकार्यही मोठे होते. 

      आई स्वतः अशिक्षित होती. मात्र मुलांनी वडिलांसारखं शिकून मोठं व्हावे; ही तिची तळमळ असायची. आम्ही नऊ भावंडे, सहा भाऊ, तीन बहिणी. संसाराचा गाडा रेटताना, सगळ्यांचं हवं, नको बघताना नि सगळ्यांचं सर्व काही एकटीने करताना आईची तारांबळ उडे; त्यात पुनः पै-पाहुणे, आल्या-गेल्यांची भर असायची; रोजच दोन चार माणसांचा अधिकचा स्वयंपाक आईला करावा लागे; आई सर्वांची ताई होती. शेजार पाजारच्या आया बायांना या ताईचा नेहमीच आधार वाटे. 

      आई-वडिल दोघेही परोपकारी वृत्तीचे असल्याने सर्वांसाठी आमचे घर म्हणजे मुक्तद्वार होते; आई सतत कामात व्यग्र असायची; तथापि कामाच्या राम रगाड्यातही आईचे आमच्याकडे कधी दुर्लक्ष झाले नाही; तिने आम्हाला कधी काही कमी पडू दिलं नाही. आईने आमच्यावर कधी कुठली बंधने लादली नाहीत; पण तरीही आम्हाला तिचा धाक होता. तिने आमचे कधी फाजील लाड केले नाहीत. आम्हा सगळ्या भावंडांना तिने चांगले वळण लावले. तिचं एकच म्हणणं असायचं. "सन्मार्ग सोडू नका, नेकीने वागा, चांगली संगत धरा, कुणाशी दुजाभावाने वागू नका. तुमच्या बाबांना समाजात फार मोठा मान आहे; अडी अडचणीच्या वेळी ते सगळ्यांना मदत करतात; पेच प्रसंगात मार्गदर्शन करतात; गोर गरीबांना पोटाशी धरतात; म्हणून लोक त्यांच्या पाया पडतात; त्यांची मान खाली जाईल असे वागू नका!" 

       बदलीच्या नोकरीमुळे वयाच्या तिशीत मी कोल्हापूर सोडले. इतर सर्व भाऊ, बहिणी कोल्हापुरातच असल्यामुळे आई कोल्हापुरातच राहिली. वडिलांच्या मागे आईला दरमहा पेन्शन मिळत असे; त्यामुळे आईला कधी कुणाकडे काही मागावे लागले नाही; उलट तीच सर्वांना काहीबाही देत राही. कधीतरी चार-आठ दिवसांसाठी ती माझ्याकडे राहायला येई. तेवढाच आईचा प्रत्यक्ष सहवास मला मिळे. आई ७० वर्षे जगली; तिची सेवा करायचे भाग्य मला फार कमी लाभले; ही सल मात्र मनात कायम राहिली. 

      मित्रहो! माणसाचं आयुष्य हा एक ग्रंथ मानला तर त्यात आई नावाचे एक भलं मोठं प्रकरण असतं; त्याची पाने मिटवतो म्हटलं, तरी मिटवता येत नाहीत; म्हणून आजच्या मातृदिनी आईचे स्मरण करूया.

 *सर्जेराव कुइगडे* 

 दि. २६/०८/२०२२

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू