पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ता घट

ले.©सौ. पूनम राजेंद्र. 

आई,  हा छोटासा घट बघ ना. किती सुंदर दिसतोय.

आपण हा घेऊयात का?

अगं तो नवरात्रीचा घट आहे.  आपल्याकडे कुठे घट बसतात!

मग काय झालं? आपल्या हाॅलमधे ठेवुयांत. मनीप्लांट लावून ठेवू त्यात. छान वाटेल नं.

बरं तर. एवढा आवडला आहे तर घेऊयातच.

येSsस्स म्हणत लेकीने खुषी जाहीर केली.

घरी गेल्यावर लगेच त्याच्यासाठी  घरच्या खिडकीतल्या जागेची योजनाही करून टाकली.

पण खरंच, त्याच्यामुळे खिडकी लक्षवेधी झाली.

तो एक छोटा घट जातायेता लक्ष वेधून घेत होता खरा.

त्याच्याकडे लक्ष गेलं आणि अचानक कबीराचा दोहा आठवला.

मग आश्चर्य दाटलं. 

"जैसा घटा वैसा मता,

घट घट और सुभाव |

ज्या घट हार ना जीत है,

तां घट ब्रह्म समाय || "(कबीर )

आश्चर्य अशासाठी की एवढासा दिसणारा हा आपला मातीचा घट आणि आकाशाहूनही सूक्ष्म, व्यापक आणि  दृष्टीला न दिसणारे ब्रह्म. ते कुठून एवढ्याश्या घटात सामावायला.

सही है नं!

पण मग कमाल वाटली ती कबीराच्या याच कल्पकतेची. हा असा डोळ्यांनी दिसणारा मातीचा छोटा घट आणि न दिसणारे ब्रह्म कशी जोडणी सुचली नं.

हे  संत बाकी कमालच असतात.  आपल्या नेहमीच्या वापरातल्या वस्तूला असं सुंदरतेने ब्रह्मविद्येशी जोडून देतात. तेही  इवल्याश्या  दोह्यात किंवा ओवीत  गुंफून देतात. त्यातली शब्दयोजनाही अशा रितीने मनाचा ठाव घेणारी असते की त्यामुळेच वेगळेपणाने लक्षात ठेवावे लागत नाही. तर ऐकल्यावर आपोआप लक्षात राहून जाते.

मग विचार आला हे कसं काय घडतं त्यांच्याकडून!

म्हणजेच ते संत ब्रह्माशी इतके तदाकार असले पाहिजेत.

म्हणूनच  वेद उपनिषद न जाणणा-या सामान्यांमधे  ब्रह्माप्रती सजगता  रुजवण्याचा हा संतबोलीचा मार्ग ब्रह्माने स्वतःच निवडला असावा.  त्याच्याशी एकरूप असलेल्या विविध देशीय  देहधारी संतांच्या बोलीमधून तो हे काम अखंड ऊत्साहाने करत रहाताना दिसून येतो. आपले संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली,  तुकाराम, नामदेव, एकनाथ, सावता माळीे, जनाबाई, चोखा महार यांच्याबद्दल आपण जाणतोच. 

खरंतर वेदशास्त्र जाणणारे जाणकार ब्रह्माप्रती सजग असतातच.  मग आपल्यासारख्या  संसार, नोकरी,  व्यवसाय, शेतीच्या चाकोरीत  फिरणा-या सामान्य बुध्दीला सजग करण्यासाठी  त्याच्याकडून ही संतबोलीच्या अभंग ओव्यांची बीजपेरणी. अगदी मायबोलीतून.  कारण ती आपल्या  मनाचा ठाव घेते. आपल्या ह्रदयघटातल्याच्या दिव्यत्वाचा  मागोवा घेऊ पहाते. आपल्यातल्या त्या दिव्य तेजाची जाणीव जागवते.

त्यातलाच  "ता घट ब्रह्म समाय" हा कबीराचा दोहा. छोटासाच पण  अर्थपूर्ण. चपखल  शब्दयोजनेने आपोआप लक्षात राहणारा.

घट म्हणजे कुंभ, कलश , जलपात्र हा एक अर्थ.

तर घट म्हणजे आपला देह, मन, हृदय, हा दुसरा अर्थ.

हार जीत, मान अपमान म्हणजे द्वंद्वभाव.

त्या द्वंद्वापल्याड गेलेलं मन म्हणजेच अ-मन.

विशाल एकजिनसी ब्रह्मभाव धारण केलेलं मन. ब्रह्मात सामावून ब्रह्म झालेलं मन.

कबीराचा हा एक छोटासा दोहा.

सृष्टीच्या रूप, रस, स्वर,  स्पर्श, गंध यांत  रमलेले आणि भावनांच्या सरमिसळणीत गुंगलेले आपले सतत विचारात हरवलेले मन ते ब्रह्मलीन अभेद अ-मन. केवढा विशाल अर्थ सामावलाय या दोह्यात.

घटासारखाच असे हृदयघट

भिन्न परी स्व-भावाने हर घट

ज्या घटी हो समान हार-जीत

ब्रह्मभाव सामावलेला तयात

(*अर्थानुसार अनुवाद प्रयत्न.)

 

तर अशी विविध प्रांतात, विविध बोलीभाषेत, विविध उदाहरणांतून ही  उपनिषदीय महावाक्यांची  शहाणीव मनीमानसी रुजली गेलीये. खरंच या संतवाणीचं कौतुकच आहे.

हीच शहाणीव आगळ्या अशा  गीतसंगीतरुपातून व्यक्त होताना  पुढच्या लेखात वाचायला आवडेल ना?!

घटाकडे पाहून आठवलेल्या  'तां घट 'च्या अर्थाचा आनंद आहेच.  पण आहाS ... पावसाळी गारव्याची झुळूक, खिडकीतल्या त्या घटात वाढत असलेल्या मनीप्लांटचा हिरवागार आनंद डोलवती झालीये.  तो मुलायम गारवाही मनात अलवार आनंद पेरता झालाय.

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू