पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

लोकमान्य टिळक - मंडालेच्या तुरुंगातील

लोकमान्य टिळक - मंडालेच्या तुरुंगातील

 

सरकारला जाब विचारणारे

होता टिळक तुम्ही स्वयंसिद्ध

दे माय धरणी ठाय केले 

मागतांना स्वराज्य जे जन्मसिद्ध

 

     "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळणारच" अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांची पत्रकारिता, त्यांनी सुरू केलेल्या मराठा आणि केसरी यातून त्यांचे जहाल लेखन वाचून इंग्रजांचे धाबे दणाणून जायचे. पुण्यात रँड चा वध झाल्यानंतर  सरकारने जी मुक्ताफळे उधळली ते पाहून "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?" असे जळजळीत अग्रलेख लिहिणारे टिळक, डोईजड होतात आहे, सरकारला पर्याय निर्माण होतो आहे हे सरकारच्या लक्षात आले. त्यांचा बंदोबस्त करावाच लागेल. खुदिराम बसू आणि प्रफुल्लचंद्र यांचा बॉम्ब चा प्रयोग यशस्वी झाला, मुझफरपूर येथे मिसेस केनेडी आणि त्यांची मुलगी या बॉम्ब स्फोटात मारल्या गेल्या.  केसरी आणि इतरही वृत्तपत्रातून यावर बराच उहापोह झाला, त्यामुळे सरकार बिथरले आणि अटक सत्र सुरू केले. राजद्रोहाचा आरोप टिळकांवर लावून त्यांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली.  मंडाले च्या तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली. 

     तुरुंगात असतांना एखाद्याचे मन, डोके ठिकाणी राहणे शक्यच नाही. पण टिळकांनी हे सगळं देशासाठी स्वीकारले आणि शांतपणे या शिक्षेचा स्वीकार केला. जे आहे ते स्वीकारले की जगणे कसे  शक्य होते याचा परिपाठच टिळकांनी डोळ्यासमोर ठेवला.

     मंडालेच्या तुरुंगात असतांना त्यांचा सार्वजनिक जीवनाशी अजिबातच संबंध नव्हता. महिन्यातून एक पत्र घरी पाठवता यायचे तेही अधिकाऱ्यांनी पाहून त्यात काही आक्षेपार्ह नाही याची खात्री करूनच. घरून आलेले पत्र सुद्धा असेच सेन्सर व्हायचे. वर्षातून तीन चार वेळा त्यांचा भाचा धोंडोपंत विद्वान्स भेटायला येत असे. एवढाच त्यांचा बाहेरच्या जगाशी संबंध येत असे.

     तपस्वी वृत्तीने जीवन जगत होते टिळक मंडालेच्या तुरुंगात. लेखन वाचन यावर त्यांचा जास्त भर होता. टिळक स्वतः म्हणतात, " जर राजकारणातच बाहेर राहिलो असतो तर असा वेळ मिळाला नसता आणि इतके ग्रंथ लेखन झाले नसते."  भगवद्गीता, महाभारत, ऋग्वेद, वेदांत या विषयावरील जर्मन पंडीत वेबर चे ग्रंथ वाचता यावेत म्हणून त्यांनी जर्मन भाषेवरील पुस्तके मागवून ती भाषा आत्मसात केली आणि हे ग्रंथ वाचले. किती ही चिकाटी, अभ्यासू वृत्ती. फ्रेंच, पाली या भाषेची व्याकरणाची पुस्तके मागवून त्यांनी या भाषा  शिकून घेतल्या. या काळात  पुस्तके बाळगण्याची परवानगी मिळाली त्यामुळे बंदिवासातील काही काळ माझा सत्कारणी लागला. नाहीतर हे दिवस खूप कठीण गेले असते असे टिळकांनी स्वतः सांगितले आहे. पुस्तके मागितली की त्याचीही तपासणी व्हायची. सुरवातीला चारच पुस्तके बाळगण्याची परवानगी मिळाली. पण पुढे ग्रंथलेखनासाठी म्हणून सगळीच पुस्तके ठेवण्याची परवानगी मिळाली. ग्रंथलेखनासाठी कागद आणि पेन्सिल मिळत असे.  म्हणजे पहा किती विपरीत परिस्थितीत टिळकांनी लेखन केले आहे, 

     ब्रह्मदेशातील उन्हाळा टिळकांना सहन होत नव्हता. त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम व्हायचे.  त्यासाठी त्यांनी अंदमान साठी अर्ज केला होता पण तो मान्य झाला नाही. हिवाळ्यात त्यांना जरा बरे वाटे.  मधुमेहाचा त्रास सुरवातीला कमी झाला. पण नंतर मात्र  वाढला होता. त्यामुळे प्रकृति क्षीण होत होती. वयोमानानुसार प्रकृति क्षीण होतच होती, घरगुती  कारणांचाही  त्याच्या मनप्रकृतीवर आणि शरीरप्रकृतीवर परिणाम होत होता. पत्नी सौ सत्यभामाबाई  यांच्या निधनामुळे त्यांना जबर धक्का बसला. टिळक कर्मयोगी असले तर भावनिक होते. तपस्वी जीवन जगणाऱ्या धैर्यशील टिळकांना ते बंदिवासात असतांना ही घटना घडली याचे फार दुःख झाले. 

     वयाच्या सोळाव्या वर्षांपासून टिळक गीताग्रंथाचे मनन, अध्ययन करीत होते. त्याच्या जगण्यात,वागण्यात गीतेतील शिकवण उतरली होती. अध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या टिळकांनी गीतेवरील गीतारहस्य हा ग्रंथ चार महिन्यात पूर्ण केला. जाज्वल्य देशाभिमान असलेले, वेदांत, गीतेतील कर्मयोगावर भाष्य करणारे टिळक म्हणजे  समाजाला  योग्य दिशा देणारा पुरुषोत्तम होय.

     देशाच्या उद्धारासाठी जन्मभर कष्ट सोसणारे, करणारे योगेश्वर टिळक  ते हेच.

     लोकमान्य झालात तुम्ही

     युगपुरुष आणि धर्मवेत्ता

     लेखणीही करारी तुमची

     घाबरत असे इंग्रजी सत्ता

 

रसिका राजीव हिंगे

     

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू