पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझा विमानाचा पहिला प्रवास

...... माझा पहिला विमान प्रवास.....


      पहिला प्रवास म्हंटल की प्रत्येकाचा वेगळा अनुभव असतो. मी  एकट्याने बसचा पहिला प्रवास दहावी पास झाल्यानंतर दहा किलोमीटर हरीगांव ते श्रीरामपूर  असा केला होता. इतरांसॊबत जाणे आणि एकट्याने प्रवास करणे यात खूप फरक असतो. घरट्यातून आपल्या पंखाच्या बळावर पाखराने घेतलेली पहिली झेप अगदी त्या झेपेबरोबर जरी तुलना केली तरी वावग ठरू नये इतक त्या मध्ये साम्य आहे. कारण त्या उंच झेपेतून जस ते पाखरू कितीतरी गोष्टी शिकत, पंखात बळ येत, आत्मविश्वास वाढतो तसच बहुधा पहिल्या प्रवासात असत ..


 पहिला प्रवास मग तो कोणाचाही असो.. सगळं कस अनभिज्ञ् असत. नदीला जशी तिच्या प्रवासात येणाऱ्या अडथळ्यांची कल्पना नसते अगदी तसच पण तरीही ती तिच्या ठरलेल्या जागी पोहचतेच..

पहिल्या प्रवासात प्रत्येकाच्या मनात एक भीती, संशय आणि आत्मविश्वास कोठेतरी हरवल्यासारखे वाटते.

माझ्या विमानाच्या पहिल्या प्रवासाचा अनुभव हा  सुद्धा खूप वेगळा होता.


लहानपणी  हरीगावला असताना  एखाद्या वेळेस घराच्या छतावरून  सैन्यदलाच  किंवा एखाद्या नेत्याचे खाजगी हेलिकॉप्टर चालल्याचा आवाज आला की आम्ही घरातून बाहेर पळत यायचो.

 मग आवाजाच्या दिशेने चाळीतील आम्ही सगळी मुलं वरती आकाशाकडे त्याला शोधण्याचा प्रयत्न करीत. आम्ही घरात अभ्यास करत  असताना असा प्रसंग वर्षातून कधी कधी घडत असे.


 लहानपणी ही हवेत उडणारी वस्तु दिसली की चाळीत मुलांचा एकच गोंधळ माजायचा . खेळण्यात बघितलेली वस्तू प्रत्यक्षात दिसली कि तिचा  आनंद गगनात मावत नाही,आमचेही तसेच व्हायचे परंतु पंधरा वीस सेकंदात मात्र ते हेलिकॉप्टर गायब झाले की आम्ही मग उगाचच अंदाज बांधायचो.

 मग कोणी म्हणायचं  त्यात मंत्री होते,  तर कुणी म्हणायचं ते सैन्यदलाच होत,पण एकंदरीत आम्हाला मात्र तो क्षण खूप आनंद द्यायचा.

त्यावरून मग चर्चा सुरु झाली की घरातील किंवा शेजारील त्या बद्दल थोडीफार माहिती देऊन आमच्या ज्ञानात भर टाकत .


रात्रीच्या वेळी जेवण करून बाहेर ओट्यावर लोळत पडलो की आमचे डोळे त्या काळ्याकुट्ट आकाशात दिसणाऱ्या चांदण्या मोजण्याचे प्रयत्न करत , मात्र त्या मोजतांना  लूक लुक करणारे विमानाचे दिवे  दिसले की आमचे चांदण्या मोजणे भंग होऊन लक्ष त्या विमानाकडे जात असे.

विमान हे आकाशात खूप उंचावरून चाललेले असायचे मात्र त्यांची वेळ  ही ठरलेली असायची.कधी कधी एकाच वेळी  दोन दोन विमान आकाशत दिसत . लहान असताना ते कुठून आले आणि कुठे चाललय हा प्रश्न आमच्या बुद्धिमत्तेच्या बाहेरचा होता,आमच्या आकलन शक्तीच्या बाहेरचा होता,आम्ही फक्त उडणाऱ्या विमानाचा आणि लुकलुकणाऱ्या दिव्यांचा आनंद तेव्हढा घ्यायचो.

खरंच कोणतीच गोष्ट दूर किंवा जवळ असत नाही, तुमचा दृष्टीकोन तिला जवळ किंवा दूर ठरवतो . जो पर्यंत आपण काही प्राप्त करण्याचे ध्येय ठरवत नाही किंवा ते विचार आपल्या मनात येत नाही तोपर्यंत ती गोष्ट किंवा वस्तू आपल्याला मिळतच नाही हे खरं आहे. म्हणून तुम्हाला जे मिळवायचे त्याची प्रथम इच्छा मनात निर्माण व्हायलाच पाहिजे, तेव्हाच ती प्रत्येक्ष रूपात अवतरते.


2006 साली  खऱ्या अर्थाने विमान प्रवास इच्छेचा अर्थात विमानाचा पहिला प्रवास करण्याचा योग आला आणि तोही थेट आंतरराष्ट्रीय विमानाने !!!

 निमित्त होतं मोरोक्कोतील नोकरी.. 

 त्यावेळी मनात आनंद, भीती उत्सुकता या  सर्वांचे एक मिश्रण तयार झाल होत.यशाची पायरी ही अशीच असते,तिच्यामध्ये आनंदा बरोबर जबाबदारीही वाढत जाते.


रेल्वे आणि बसचा प्रवास कित्येक वेळा केला होता, परंतु विमानाचा प्रवास म्हटला की पहिल्या वेळेस मनात धाकधूक होतेच. शिवाय आपला देश,परिवार,नातेवाईक सर्वांना सोडून विमानाने परदेशात जायचे तेव्हा नाही म्हंटल तरी हा विचार कोठेतरी मनात भीती निर्माण करतोच .आम्ही लहान असताना शाळेतल्या सहलीने औरंगाबादला विमान आणि विमानतळ बघायला गेलो होतो तेव्हा विमानतळ  व त्या वरील खुर्च्या बघूनच  आम्हाला किती आनंद झाला होता हे सांगायला नको. त्या नंतर कित्येक दिवस आम्ही विमानतळ बघून आलो हे सगळ्यांना खूप अभिमानाने शाळेत सांगत होतो.


एअरपोर्ट वर पत्नी,मुलगा आणि मेव्हणा सोडवायला आले होते.काळजावर दगड ठेवून मी सर्वांचा निरोप घेतला आणि आत गेलो.

माझ्या सोबत माझे मित्रही होते. आमचा  प्रवास सोबतच होणार होता.

पहिल्यांदा हा सर्व अनुभव,ते मुंबई विमानतळ,तो परिसर, परदेशी पर्यटक हे सगळं आमच्यासाठी नवीन होत आणि आम्हाला आत प्रवेश करण्यापासून सगळं विचारपूस करतच जायचं होत कारण 

यापूर्वी कधीही साधा कोणाला विमानतळावर सोडवायला येण्याचा सुध्दा योग माझ्या नशिबी आला नव्हता.


मुख्य दरवाजातून पासपोर्ट दाखवून आम्ही आत गेलो खरं... पण पुढे काय करायचे इथपासून सुरवात होती.

मग काय.. एकच पर्याय.. दिसेल त्याला चौकशी करणे.

आत गेल्यावर एअर लाईन चे ऑफिसर प्रवाश्यांना गाईड करायला उभे असतात त्यांना विचारा अशी माहिती एकाने दिली.. तोपर्यंत आम्हाला आमच्या बॅगा security चेक्स मधून चेक करून घ्याव्या लागल्या. इतर लोकांचे बघून आपणही त्यांच्या प्रमाणे कृती करायची म्हणजे आपण चुकत नाही अस त्या वेळी मला वाटलं.

पुढे आल्यावर एका एअर लाईन च्या ऑफिसरला तिकीट दाखवून "बाबा आता तूच आम्हाला मार्ग दाखव."असे मनातच म्हणालो.

त्यानेही माझी इच्छा मनोमनी ऐकली असावी आणि त्याने कोणत्या विंडो जवळ जायचे तो काउंटर नंबर पण सांगितला. ही काय पद्धत असते हे आम्हाला काहिही माहित नव्हते, फक्त एवढेच माहित होते की या ठिकाणी आपल्या बॅगा द्याव्या लागतात.

आमच्या बॅगा ताब्यात घेऊन त्यांनी आम्हाला बोर्डिंग पास दिला .

बोर्डिंग पास घेऊन आम्ही निघालो खरे, मात्र आम्ही चुकून दुसऱ्या गेटवर गेलो.

 ज्या गेट नंबरवर  आमचे विमान उभे असणार होते तेथे जायच्या ऐवजी आम्ही दुसऱ्याच गेटवर जाऊन बसलो...


वेळेप्रमाणे एक तास राहिला होता.

एका तास अगोदर बोर्डिंग सुरु होईल हे सांगितलेले काउंटर वर ऐकले होते, आणि आम्ही ज्या गेटवर उभे होतो तिथे तर काहीच हालचाल आम्हाला दिसेना मग काय पुन्हा

विचारपूस!!

तेव्हा एकाने सांगितले तुमचे विमान हया गेटवर नाही तर दुसऱ्या गेट वर उभे असणार आहे.

आता दुसरा सांगितलेला नंबर शोधत आम्ही पळत सुटलो.

आणि शेवटी कसेतरी आमच्या दुबईला जाणाऱ्या गेट वर पोहचलो...

अर्धा तास राहिला होता,बरेच प्रवासी आत गेले होते.शेवटी दहा मिनिट उरली असतांना आम्ही विमानात पहिल्यांदा प्रवेश केला.

सगळा अनुभव नवीन होता.

Emirate चे बोईंग 777 हे  विमान आणि आतल्या नजाऱ्याने डोळयांचे पारणे फेडले.. लहानपणी आमच्यासाठी आकाशात उडणारी ही "तबकडी" !!!

आज प्रत्येक्ष तिच्या आत आपण प्रवेश केलाय हे खरं वाटत नव्हत.कित्येक वर्ष फक्त मनात असलेला विचार आज साक्षात समोर घडतांना दिसत होता.


त्यावेळी सीट वर बसतांना अचानक एक विचार मनामध्ये आला,

म्हणजे आता आपण आपला देश, आपली माणसं सोडून जाणार?हे खूप अवघड होत,क्षणात 

भीतीने पोटात गोळा आला.एकीकडे परदेशात निघाल्याचा आनंद आणि दुसरीकडे आपल्या देशाला  सोडून जायचं हया विचाराने मनामध्ये घालमेल चालू झाली .मिळालेल्या सुखापेक्षा भासणाऱ्या उणीवांच दुःख जास्त वाटत होत. आयुष्यात सगळ्याच गोष्टी एका वेळी मिळत नाही. काही कमवण्यासाठी कसला तरी त्या तुलनेतला त्याग करावाच लागतो.

आपला देश सोडून मी आठ हजार किलोमीटर दूर जाणार होतो. अकरा किलोमीटर गेलो तरी पत्नी,आई, मुलगा यांची नजर रस्त्याकडे लागायची.. आज त्यांच्या मनाची काय अवस्था असेल हे सांगायला नको... खूप दुःखदायक आणि गहिवरून आणणारा हा प्रसंग होता.

थोड्याच वेळात वैमानिकाने

" विमान उड्डाणासाठी तयार आहे.पुढील काही मिनटात ते  दुबईकडे झेप घेईल"  ही सूचना सांगितली.

सर्व जण सीट बेल्ट लावून आपापल्या जागेवर बसले होते. एअर हॉस्टेसने प्रत्येक प्रवासी आणि त्यांचे सीट बेल्ट चेक करून ती सुध्दा आपल्या जागेवर बसली .

धावपट्टीवर विमानाने हळू हळू वेग घेतला..............

विमानाच्या चाकांचा येणारा आवाज कानात स्पष्टपणे घुमत होता, हळूच आमचे विमान वरच्या दिशेला गेले आणि जमिनीवर येणारा चाकांचा आवाज शांत झाला.... क्षणभर सगळीकडे शांतता होती.

त्या विमानाने चाके आपल्या पोटात घेऊन झाकून टाकले.

थोडा वेळ आमच्या कानावर खूप दबाव आला. ही एक विमानात अगदी नेहमी उदभवणारी समस्या असते पण आम्हाला ती नवीन होती.

मी माझा देश सोडला होता. वाईट तर खूप वाटत होते, पण पर्याय नव्हता...मातृभूमी सोडणे काय असते याची जाणीव खऱ्या अर्थाने त्या क्षणाला झाली आणि मातृभूमीची किंमतही त्या क्षणी कळाली आता परत लवकर येणे नाही हे मनाला समजावणं सोपं नव्हत.


थोड्या वेळात पुन्हा वैमानिकाने सर्वांशी संवाद साधला.

" विमान आता दुबई च्या मार्गाने सुरक्षित निघाले आहे, तुम्ही सीट बेल्ट काढू शकता,emirate बरोबर आपल्या प्रवासाचा आनंद घ्या ".

मी मात्र हे ऐकत असतांना,माझ्या मनात 'आपण काहीतरी गमावतोय' ही बाब  सतत हुरहूर निर्माण करत होती....

न कळत हात हॅन्ड बॅग मध्ये ठेवलेल्या काचेच्या बाटली कडे गेला.

आठवण करून तिच्या मध्ये आणलेली मातृभूमीची माती हातात घेतली, आणि बघत राहिलो..तीच आता आठवण म्हणून सोबत असणार होती पुन्हा परत येऊ पर्यंत........!!!


©© प्रकाश  फासाटे.

मोरोक्को...

212661913052.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू