पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कवेत निसर्गाच्या

दोन्ही बाहूस पहा पसरुनि चेहऱ्यावरी सुस्मित । 

पाऊल रोवून तो स्थिरमति खडकावरी ठाकत ।। १ ।। 


नाही भय अन् नाही गोंधळही त्याच्या मनी माजला ।

भासे रम्य आसमंत अवघा नजरेत जो मावला ।। २ ।। 


घालुनि प्रेमळ साद शिखर ते बोलावित भावुक । 

पादाक्रांत तयांसि चल करु भय त्यासी ना ठाऊक ।। ३ ।।


झाला मोद तयास जव दिसे शिखरावरी पोचला । 

घेता श्वास भरोनी शुद्ध मग आनंद मनी दाटला ।। ४ ।।


पाहुनी लोभस भव्य दिव्य धरा त्याने मनी जाणले । 

दिसती क्षुद्र कितीक तिजवरी ही मानवी पाऊले ।। ५ ।। 


होऊनी सद्गद शरण जातसे या पंचतत्त्वांस तो ।

परमपित्या मज कुशीत घेई प्रेमे तुला वंदितो।। ६ ।।

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू