पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पुस्तक चळवळ

*पुस्तक चळवळ (Book Movement)*
          

तुम्हाला हे शब्द वाचल्यानंतर थोडा आश्चर्य वाटलं असेल की, हे आणखी नवीन काय?माझ्या डोक्यात खूप दिवसापासून ही संकल्पना येत असून ती सत्यात उतरावी यासाठी या लेखाचा प्रपंच. आज काल वाचक संख्या रोडावत चालली आहे, हे कटू सत्य! मला वाटतं आता सध्य घडीला फक्त दहा टक्के वाचक शिल्लक आहेत.ते वाढण्यासाठी आपल्या साहित्यिकांना पर्याय शोधावे लागणार आहेत आणि पुस्तक चळवळ (Book Movement) हा सुंदर पर्याय आपल्यासमोर आहे. या चळवळीत आपल्याला केवळ पुस्तकांची अदलाबदल (Exchange of books) ही संकल्पना राबवायची आहे.सध्या तुम्ही सर्वे केला तर तुम्हाला लक्षात येईल की, ग्रंथालयात देखील कदाचित पस्तीस टक्के वाचक शिल्लक नाहीत.मग ती ग्रंथालयातील पुस्तके वर्षानुवर्षे त्या ग्रंथालयात तशीच बसून आहेत, किंबहुना मी म्हणेन ती सद्यस्थितीत सडत आहेत.कित्येक वाचक प्रेमींच्या घरी देखील वैयक्तिक अल्मारीत ही पुस्तके सडत आहेत किंवा त्यांना कदाचित वाळवी देखील लागली असेल.
                        प्रत्येकाला प्रत्येक पुस्तक विकत घेणं जमत नाही.कित्येक गोरगरिबांना वाचनाची गोडी असते, परंतु पैसा नसल्यामुळे वाचनाची गोडी मोडीस काढावी लागते. यावर चांगला पर्याय म्हणजे 'पुस्तक चळवळ'.यात आपल्याला आपल्या जवळील एक पुस्तक दुसऱ्यांना देऊन त्यांच्या जवळील एक पुस्तक घ्यावे लागणार आहे आणि ही पुस्तक चळवळ पुढे चालू ठेवावी लागणार आहे.पुस्तक घरच्या अलमारी मध्ये फक्त शोभेची वस्तू म्हणून न ठेवता ते वाचकापर्यंत पोहोचलं तर किती मोठं भाग्य! वाचाल तर वाचाल! ही म्हण सत्यात उतरवण्यासाठी पुस्तक चळवळीचा चांगला हातभार लागेल असं मला वाटतं.फक्त प्रामाणिकपणा ह्यात जपला गेला पाहिजे, म्हणजे तुम्ही बदललेलं पुस्तक पुन्हा त्या मूळ मालकाला देऊन आपलं पुस्तक परत घेतलं पाहिजे आणि ही चळवळ अविरतपणे पुढे चालवली पाहिजे. मी आणि माझे मुंबईचे मित्र प्रशांत गाडेकर, धनु कोळी हे असेच करतात. आम्ही पुस्तकं अदलाबदली करून वाचतो, त्यामुळे होतं असं की, आमचा खर्च वाचतो आणि वेगवेगळी पुस्तके हाताळली जातात.
                  लहानपणापासूनच मला पुस्तके वाचण्याची गोडी लागली. 'श्यामची आई' या साने गुरुजींनी लिहिलेल्या करूण रसयुक्त पुस्तकांने माझी सुरुवात झाली. पुढे बाबा कदम, बाबुराव अर्नाळकर यांची पुस्तके तसेच चांदोबा सारखी बाल मासिके वाचण्यास भेटली. हा गुण पुढे खूपच उपयोगी आला. मी बहिणीकडे पुण्यात गेल्यावर दगडूशेठ हलवाई मंदिरात गणेशाचं दर्शन घेतल्यानंतर आप्पा बळवंत चौकात हमखास आवडीचं पुस्तक घ्यायचो किंवा कुठेही पुस्तक प्रदर्शन भरलं की हमखास एक-दोन पुस्तक आणायचो. वेळ भेटेल तेंव्हा ती वाचायचो.
                 2017 ला माझा अपघात झाला आणि मग ही वाचनाची गोडी मला उपयोगी पडली, कारण पुस्तकासारखा दुसरा मित्र या जगात कोणीही नाही.पार्ट्या पुरतं जवळ येणारे मित्र या जगात खूप भेटतील, परंतु दुःखात तीन टक्के उपयोगी पडतात, हे कटू सत्य मी आता चांगल्या प्रकारे जाणतोय आणि अनुभवलंय सुद्धा‌. पुस्तकं ही तुम्हाला कधी फसवणार नाहीत, परंतु तुमचे कांही मित्र तुम्हाला फसवतील, वाईट गोष्टींत अडकवतील, व्यसनाधीन करतील. घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार, "जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकर आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या, भाकर तुम्हाला जगवेल, पण पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल."
                      वाईट मित्रांच्या संगतीत राहून आयुष्य बरबाद करण्यापेक्षा पुस्तकाला मित्र बनवा.मोरोपंतांनी 'केकावली' मध्ये जो संदेश दिला तो पाळण्याचा प्रयत्न करा- "सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो |
कलंक मतीचा झडो,
विषय सर्वथा नावडो ||"
इंग्रजी मधला एक सुविचार मला आठवला- 'Man is known by the company which he keeps'.(म्हणजेच मनुष्य त्याच्या संगतीवरून ओळखला जातो.)
                       पैसा कमवणे आजकाल खूप सोपे झाले आहे परंतु ते टिकवणे महाकठीण!आपल्या पैशाचं योग्य नियोजन केलं तर या जन्माचं, पूर्ण आयुष्याचं सार्थक होईल. वाममार्गाने, भ्रष्टाचाराने कमावलेला पैसा वेश्यालय आणि मदिरालयात बरबाद करताना मी पाहिलं आहे. लक्षात घ्या चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस.आपल्या चुका सुधरा आणि स्वतःला चांगल्या संगतीत गुंतवून या मनुष्य जन्माचे सार्थक करा. एक चारोळी आठवली-
साहित्याची गोडी
शिकवी आयुष्याचे सार
उमगेल जगण्याचं मर्म
नाही वाटणार आयुष्य भार
                  लहान मूल घरातील मोठ्या व्यक्तीचं अनुकरण करतं, त्यामुळे मोठ्या व्यक्तींना वाचन चालू केलं पाहिजे. मग निश्चितच लहान मुलं पुढे वाचतीलच. भाषा संवर्धनाचे काम देखील यातूनच घडणार आहे. वाढदिवसाला पुस्तक भेट द्या, विनाकारण खर्च टाळून वैचारिक पातळी वाढवा. यातून पुस्तकांची विविधता जपली जाईल. नवोदित लेखकांना स्थान आणि जुन्या लेखकांना मान मिळेल. तरुण पिढीला वाचनाकडे वळवा.पुस्तक पुस्तकाला जोडून माणसं माणसाला जोडण्याचं काम करा. माणूसपण जपा. वाचन संस्कृती रुजवा आणि वाढवा.
                       मग आलंय ना लक्षात!आपल्या घरात फक्त संग्रहालय न करता पुस्तक चळवळ वाढवा. आपल्या गावात, परिसरात, गल्लीत एकमेकांची पुस्तके अदलाबदली करून पुस्तक चळवळ वाढवा.आपल्या पुस्तकांची यादी इतरांना द्या आणि इतरांची घ्या.पुस्तके वाचा, विनाकारण शोभेची वस्तू म्हणून अल्मारीत ठेवू नका. बघा हा छोटासा प्रयत्न करून!मला या कार्यात तुमची साथ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद!
©®-विश्वेश्वर कबाडे (बहुभाषिक कवी, लेखक) अणदूर
भ्रमणध्वनी 93 26 80 74 80
 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू