पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भूगोलाचे मास्टर

भूगोलाचे मास्तर

गुरुदक्षिणा

कोकणातील एका छोट्याशा खेड्यातील सुंदर कौलारू घर . घराजवळून झुळु झुळु वाहणारी नदी . समोर हिरवळ . गुलाब , मोगरा , शेवंतीचे ताटवे . प्रवेशद्वाराजवळील कमानीवर चढवलेला कृष्णकमळाचा वेल . अंगणात झोपाळा .
घरासमोरून जाणारा प्रत्येक जण क्षणभर थांबून हे चित्र डोळ्यात साठवून घेई . आणि हो ! घरावर वळणदार अक्षरात लिहिलेली '' सांदीपनी आश्रम " ही पाटी
सगळ्यांचे लक्ष वेधून घेई .
घरात राहणारी मुख्य माणसे दोनच . सेवानिवृत्त मुख्याध्यापक रघुनाथराव आणि त्यांची पत्नी जानकी वहिनी . सगळा गाव त्यांना काका - काकू म्हणे .पहाटे लौकर उठून , स्नानादि उरकून काका काकू अंगणात येत . काकू तुळशीला पाणी घालून, प्रदक्षिणा घालून वृंदावनात पणती ठेवत . तोवर सूर्योदय होई . काका उगवत्या सूर्यनारायणाला अर्घ्य देऊन ,बागेतील ताटव्यांचे निरीक्षण करून झोपाळ्यावर येऊन बसत . दोघांचा हा नित्यक्रम होता . प्रसन्न सकाळी झोपाळ्यावर बसून सूर्योदय पहाणे , नदीचे झुळझुळ संगीत व पक्ष्यांची मधुर किलबिल ऐकणे . काकू सकाळची स्तोत्रे हलक्या आवाजात म्हणत . काका बरेच जुने वर्तमानपत्र वाचत बसत . हो !त्या लहान खेड्यात वर्तमानपत्र येऊन पोचायला ८ दिवस लागत . गड्याने धारोष्ण दुधाचे पेले आणून द्यावे . दूध पिऊन काका काकू उठून घरात जात . जाता जाता पूजेसाठी 'देवाला आवडतील ' म्हणून दूर्वा , तुळस , बेल , लाल , पांढरी , पिवळी फुले स्वहस्ते परडी भरून घेऊन जात . प्रसन्न सुवासिक सकाळ , सूर्यकिरणे दिवसभराची ऊर्जा देत .दोघांच्या आयुष्यातील संध्याकाळ अशी शांत व्यतीत होत होती .समाधानी , कृतकृत्य . घरात मूळ माणसे जरी दोन तरी दिवसभर माणसांची वर्दळ असे . सकाळच्या वेळात गावकरी, तरुण काकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी तर संध्याकाळी स्त्रिया काकूंचा लहान बाळांचे संगोपन , गरोदरपण , बाळंतपणातील घ्यावयाची काळजी , स्त्रियांच्या विविध समस्या अशा विषयांवर सल्ला घेण्यासाठी येत . येणाऱ्या प्रत्येकाचे शहाळ्याचे पाणी देऊन स्वागत रामा गडी व त्याची पत्नी सखू तत्परतेने करत .
अशाच एका सकाळी काका काकू झोपाळ्यावर बसले असतांना अचानक दुरुन मुलांचा , माणसांचा गलबला ऐकू येऊ लागला . कसली गडबड म्हणून उठून बघेतो सांदीपनी आश्रमाच्या दारात दुतर्फा प्रचंड धुरळा उडवीत एक आलिशान कार येऊन उभी राहिली .ज्या गावात बैलगाडी हे एकच वाहन होते , तिथे आलिशान कारचे आगमन म्हणजे मुला_ माणसांना नाविन्यच होते . म्हणूनच अख्खा गाव वेशीपासून गाडीबरोबर धावत आला होता .
" कोण आले ? " म्हणायच्या आत गाडीतून एक उंचा पुरा , रुबाबदार तरुण खाली उतरला . गाडीतून त्वरेने उतरुन तो धावत काका काकूं जवळ आला आणि त्यांना साष्टांग नमस्कार केला .
"मुकुंदा तू ? असा अचानक ? "
त्याला पोटाशी धरत दोघांनी एकदमच विचारले .
घरभर एकच धांदल उडाली . मुकुंद दादा आला ची बातमी वाऱ्याच्या वेगाने गावभर पसरली . सगळा गाव संदीपनी आश्रमात गोळा झाला . दोन शहाळी घेऊन रामा धावला .सखू पदराआडून कौतुकाने बघत होती .आख्ख्या गावाला नारळ पाणी देण्यासाठी गड्यांची धावपळ सुरू झाली. शहाळ्यामागून शहाळी झाडावरुन उतरत होती . सोलली जात होती , फोडली जात होती . उन्हाचा तडाखा वाढत होता .
" आई _ बाबा तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायला आलोय . गेली तीन वर्षे मी " भारताची कौटुंबिक संस्कृती " ह्या विषयावर संशोधन करत होतो . मला त्यासाठी डॉक्टरेट मिळाली असून त्या माझ्या प्रबंधासाठी मला नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे .आपल्या गावात दूरदर्शन नाही . वर्तमानपत्र यायला वेळ लागतो म्हणून ही खुषखबर देण्यासाठी स्वतःच आलो . हे घ्या वर्तमानपत्र _ तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांनी वाचायला आवडते म्हणून घेऊन आलो .
बातमी ऐकून आई बाबा भारावून गेले . काकांनी पट्कन चष्मा पुसून डोळ्यांवर ठेवला .आधाशासारखे मुकुंदाचा पानभर फोटो , बातमी बघत राहिले .
एव्हाना सखूने पुरणाची हंडी चढवली सुध्दा . घराघरातून ओले नारळ खवले जाऊ लागले .
मुकुंदाला कुठे ठेऊ नि कुठे नको असे गावाला वाटत होते . त्याने आपल्या घरी जेवायला यावे असे गावातल्या प्रत्येक आजी , आई , मावशी , काकूंना वाटत होते . पण मुकुंदाचा मुक्काम थोडा होता . त्यामुळे दोन दिवसांनी एकत्रगाव जेवण करण्याचे ठरले . घरासमोर मांडव पडला . सगळ्या स्त्रियांनी अनेक पदार्थ करून आणले . रोजच आनंदोत्सव साजरा होत होता .
अखेर मुकुंदाचा परतीचा दिवस उजाडला . . गावाने त्याची सजवलेल्या बैलगाडीतून , वाजतगाजत मिरवणूक काढली .एक महिन्यानी परत येण्याचे कबूल करुन त्याने गावाचा , आई -बाबांचा निरोप घेतला .
कबूल केल्याप्रमाणे बरोबर एक महिन्यानी मुकुंदा , त्याची पत्नी व दोन मुले बरोबर घेऊन आला . आला तो वेगळीच बातमी घेऊन ........ ???
आणखी दोन महिन्यांनी " नोबेल पारितोषिक वितरणाचा " समारंभ होता . त्यासाठी आईबाबांना मानाचे निमंत्रण होते . त्यांना तो बरोबर घेऊन जाणार होता .
आणि ते पण कायमचे .
थोडे मुकुंदाच्या बालपणाकडे वळते .
नेहमीप्रमाणे काका सकाळचे आन्हिक आटोपून शेताकडे गेले .परत येताना त्यांच्या डोक्यावर टोपली ,वरून केळीचे पान झाकलेले .
"जानकीबाई !बाहेर या ! "
त्या लगबगीने बाहेर आल्या .
" हे काय ? तुमच्या डोक्यावर टोपली ?शेतावरची गडी माणसे कुठे गेली ? "
" जानकीबाई नीट ऐका . ही देवाची आपल्याला देणगी आहे .मी परत येत होतो तेव्हा शेताच्या बांधावर मला हे गोजिरवाणे परब्रह्म सापडले . जणू कुणा देवकीने त्याचे रक्षण ०हावे म्हणून आपल्या शेताच्या बांधावर आणून ठेवलेले .आजपासून तुम्ही याची यशोदामाता व्हा . "
कूस उजवत नव्हती म्हणून जानकीबाईंच्या मनात , अव्यक्त खंत होतीच . आज तर देवाने इतक्या गोंडस रुपात येऊन त्यांची खंत पुसून टाकली . त्यांनी प्रेमाने बाळाला बाहेर काढून छातीशी धरले . जणू प्रेम पान्हाच फुटला .
पुढील आयुष्यात कधीही प्रॉब्लेम येऊ नये अशा दूरदृष्टीने काकांनी बाळाला रीतसर दत्तक घेतले . काकूंनी सगळा गाव बोलावून हौसेने बारसे केले . श्रीकृष्णासारखा टोपलीतून आला म्हणून मुकुंद नाव ठेवले .दिसामाजी बाळ लाडा , कौतुकात वाढत होता .कुशाग्र बुध्दी , लाघवी स्वभाव . त्यामुळे सगळ्यांचा लाडका . शिक्षणात पहिला नंबर कायम . सगळ्या हौशी काका - काकू पुरवत होते .
काकांच्या टेबलावरचा पृथ्वीचा गोल फिरवत बसणे त्याला फार आवडायचे .
" बाबा बघा !ही पृथ्वी कशी गोल गोल फिरते . जरा बोट लावले की दुसरे देश दाखवते . किती मोठे जग आहे !मी पण असाच देशोदेशी फिरणार !तुम्हाला पण फिरवणार ! "
काका हसून म्हणत ,
" बाळा !तू नुसता जगभर फिरणार नाहीस . एक दिवस तू जग जिंकशील . "
दोघे टाळ्या वाजवत .
उच्च शिक्षणासाठी मुकुंद परदेशात जायला निघाला . तेव्हा काही एका विचाराने त्याला त्याचे जन्म रहस्य सांगीत ले .आई बाबा आपले जन्मदाते आईवडील नाहीत हयावर त्याचा विश्वास बसला नाही .
"अशक्य ! बाबा आज अचानक अशी चेष्टा का करता ?माझा नाही विश्वास . काही असो . कृष्ण हा नंद सुतच होता , यशोदा नंदन होता . असतील वसुदेव -देवकी जन्मदाते .मी मात्र तुमचाच मुलगा आहे . "
मुकुंदने मन विचलित होऊ दिले नाही .परदेशात गेला तो काही ध्येये निश्चित करूनच .
खूप मेहनत करुन उत्तम यश मिळवायचे .
आई बाबांचा नावलौकिक वाढवायचा .
ज्या बाबांनी भूगोल शिकवला त्यांना पृथ्वी गोल दाखवायचा . त्यांच्यामुळेच आपल्या मनात जग पाहण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली .
आईबाबांना खूप सुखात ठेवायचे .
आज त्याने प्रत्येक ध्येय साध्य केले ." नोबेल पारितोषिक सर्वोच्च बहुमान मिळवला . सत्कार समारंभात मातापिता म्हणून त्यांचा जाहीर सत्कार होणार ह्या कल्पनेनेच त्याला खूप आनंद झाला होता .
सांगितल्याप्रमाणे तो आधी कळवून गावी आला . गावकऱ्यांनी रस्ते रांगोळ्यांनी सुशोभित केले होते . रस्त्याच्या दुतर्फा लावलेली इवलाली रोपे आनंदाने डुलत होती . घराघरातून पंचपक्वान्नांचा सुगंध दरवळत होता .
आई बाबा , मुकुंद , गावकरी देवळाकडे निघाले .कृतज्ञता म्हणून गावच्या देवळाला मुकुंदाने सुवर्णकलश अर्पण केला .
" बाबा, आई निघू या . तुमची तिकीटे घेऊनच आलो आहे . घराची काळजी करु नका . सांदीपनी आश्रम रामा , सखू संभाळतील . इथे ग्रंथालय सुरु करु . मी दरवर्षी पुस्तके पाठवीन . जमेल तेव्हा आपण गावाला भेट देऊ . कशालाच नाही म्हणू नका .
तुम्ही दोघे माझे जन्मापासूनचे गुरु आहात . मार्ग दाखवत राहिलात . ही माझी गुरुदक्षिणा स्वीकार करा .????
चला , सूनबाई , नातवंडे वाट बघत आहेत .

लेखिका ः
सुलभा गुप्ते
ह .मु. कैरो ( ईजिप्त )
५ सप्टेंबर २०२२
गुरुपौर्णिमा

__ _ _ _

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू