पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शिक्षक दिवस

आजचीच गोष्ट. मी ऑफिसचे काम करत बसले होते, एक बाई आईला भेटायला आल्या. सोबत पहिली दुसरीतील एक मुलगा होता. बरीच वर्षे झाली, आई शिकवण्या घेते, त्या मुलाला आईजवळ शिकायला पाठवायचे होते. 

मुलगा आईच्या मागे-मागे घरात आला, नमस्कार, हैलो वगैरे करायला आजकाल पालक नाहीच शिकवत... येवून सोप्यावर बसला. 

आईची मुलाखत सुरू झाली.. हो आईची! 

किती तास शिकवाल? काय विषय शिकवाल? बाकी कोणती मुले येतात? किती वर्षांपासून शिकवत आहात? ह्याचे इंग्रजी "वीक" आहे, तुम्ही ते जास्त शिकवा. मला इंग्रजीचीच जास्त चिंता आहे..(दुसरीचा मुलाच्या अभ्यासाची अति काळजी करून) परिक्षेच्या वेळी "एक्स्ट्रा" शिकवणार की नाही? संडेला पण शिकवणार का? "होमवर्क" करवणार की नाही? 

कोणत्या खोलीत शिकवणार...? मग त्या खोलीचे परिक्षण निरिक्षण केले गेले. 

बिजनेस डील होते तशी डील करून त्या म्हणाल्या "ठीक आहे, उद्यापासून पाठवते"

मी बघत बसले होते. न राहावता बोलले, "आई गेल्या 30 वर्षांपासून शिकवण्या घेतेय मुलांचे नंबर किती आले ह्या गोष्टी हून जास्त ती मुलांवर संस्कार किती झाले ह्याची जास्त काळजी घेते. आल्याबरोबर नमस्कार नाही केला ठीक आहे, किमान आज शिक्षक दिन आहे, विश करायला तरी सांगा मुलाला.."

"आज पहिल्यांदा आला आहे, लहान आहे अजून, त्याला ओळख करायला वेळ लागतो जरा" डोक्यावर आठ्या आणून त्या उत्तरल्या  आणि कार मधे बसून निघून गेल्या. 

हे एक उदाहरण आहे पण गेल्या काही वर्षांत पालकांच्या अश्या वागणुकीमुळे मुलांची शिक्षकांप्रती श्रद्धा ढासळत चालली आहे. आधी त्यांना शिक्षणाविषयी जी आदरयुक्त भीती वाटत होती ती राहिली नाही. त्यांच्या डोक्यात कुठे तरी हे बिंबवले गेले आहे की आपले आई बाबा ह्यांना पैसे देतात म्हणून हे आपल्याला शिकवतात, देट्स इट! 

जसा आपले आई बाबा ड्रायव्हर, कुक, गार्डनरला पैसे घेवून "इंस्ट्रक्शन" देतात तसेच ह्यांना पण देत आहे. आणि आपल्याला शिकवणे ह्यांची ड्यूटी आहे..! आणि म्हणून रागावणे, शिक्षा देणे हा तर त्यांचा अधिकारच राहिला नाही. 

 आधी परिक्षेच्या शेवटल्या पेपर नंतर गुरुजींना फक्त पेपर दाखवण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी जात होतो. आजकाल शेवटल्या पेपर नंतर तर कोणता पेपर.. कोण टीचर?? असा तोरा मुलांचा असतो. 

निकाल येण्याच्या दिवशी बाबा आधी पेढे आणायचे, शाळेत शिक्षकांना नमस्कार करून पेढे द्या मग निकाल काय आला ते बघू. 

त्यांच्या मते शिक्षकांनी वर्षभर तुम्हाला ज्ञान दिले आहे, आता तुम्ही त्या ज्ञानाचा कितपत उपयोग केला आणि किती अंक मिळवले ही नंतरची गोष्ट, पण आधी त्यांच्या वर्षभराच्या परिश्रमासाठी कृतज्ञता व्यक्त करणे महत्त्वाचे! 

आणि आता, गेल्या कित्येक वर्षांपासून मी बघतेय की जर नंबर कमी आले तर रिझल्टच्या दिवशी पालक आईजवळ येवून मुलांसमोरच आईशी वाद घालतात की ट्यूशन पाठवून काही उपयोग झाला नाही, तुम्ही बरोबर शिकवले नाही! 

आणि जर नंबर चांगले आले तर पेढे बिडे देणे तर सोडाच पण अक्षरशः व्हाट्सऍप वर रिझल्टचा फोटो पाठवून देतात, आणि काही पालक तेवढे सुद्धा करत नाही! 

पुढच्या वर्षी परत ट्यूशन सुरू करतांनाच भेटतात! 

गुरू, त्यांचा सन्मान, त्यांच्या बद्दल आदर, प्रेम... हे संपत चालले आहे. 

आणि हे ही खरे आहे की ह्या साठी शिक्षक पण तेवढेच जवाबदार आहेत, शिक्षणाचा बाजार त्यांनीच मांडला! मुलांना आपुलकीने शिकवणे, त्यांना संस्कार देणे, त्यांच्या वर माया लावणे हे तेच विसरले. 

बस जास्तीत जास्त पैसा कमावणे हेच लक्ष सामोरी ठेवून ते शिक्षक झाले, ज्या शाळेत जास्त पगार मिळेल त्या शाळेत जा, मुलांकडून तगडी फी घ्या आणि त्यांना अगदी मोजून मापून शिकवा, संस्कार, सामान्य ज्ञान, इकड तिकडच्या गोष्टी नकोच. 

..... म्हणजे चूक दोन्ही कडून होतेय. आणि गुरु शिष्य परंपरा संपत चालली आहे. 

सर्व कसे प्रॅक्टिकल होत चालले आहे, गुरू शिष्य नाते नसून बिजनेस डील झाली आहे. 

श्रीराम-वशिष्ठ ऋषी, श्रीकृष्ण- सांदिपनी ऋषी, शिवाजी- रामदास स्वामी, विवेकानंद- रामकृष्ण परमहंस अशी गुरु शिष्याचा इतिहास ज्या देशात आपण बघितला आहे, त्याच देशात आता गुरू-शिष्य हे नाते असे कृत्रिम होता कामा नये. 

आणि समाधान तर मला सध्या तरी सुचत नाही, कारण भावनेची, संस्कारांची, नैतिक मूल्यांची वेलच सुकली आहे... तिला किती जरी पाणी घातले तरी सुद्धा ती टवटवीत हिरवीगार होईल की नाही, शंकाच आहे. 

असो...... कालाय तस्मै नम: म्हणत मी देवाजवळ हीच प्रार्थना करते की परिस्थिती सुधारेल आणि पुन्हा एकदा निष्ठावंत गुरू आणि शिष्य ह्या भारत देशाला लाभतील. 

 

 

 

 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू