पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

धन्य ते गुरु शिष्याचे नाते

"धन्य ते गुरु शिष्यांचे नाते"

माझे परमपूज्य वडील ति. स्व.दत्तोपंत सखाराम माजगावकर हे सुप्रसिद्ध इतिहासकार, शिवशाहीर, पद्मभूषण., बाबासाहेब पुरंदरे यांचे मुलांच्या भावे स्कूल मधले आदरणीय शिक्षक होते.' पुण्यभूषण ' मासिकात त्यांनी आपल्या सरांचा आवर्जून उल्लेख केला आहे. बाबासाहेबांसारखा थोर माणूस आपल्या गुरूंना इतकी आदराने मानवंदना देतो, केव्हढी ही गुरुनिष्ठा आणि गुरुंवरील श्रद्धा!
सारं जग बाबासाहेबांपुढे मान देऊन झुकतं. आणि जगाची मानवंदना स्विकारणारे हे शिवशाहीर माजगावकर सरांचं नुसतं नाव ऐकलं तरी नतमस्तक होत असत.केव्हढी ही शालीनता. आज माझे वडील असते तर ते कृतकृत्य झाले असते .आणि
बाबासाहेबांनी पण कुठल्याही कार्यक्रमाला निघतांना पहिला मानाचा मुजरा सर्वप्रथम आपल्या सरांनाच केला असता. छत्रपती शिवाजी राजांची आढळ श्रद्धा आपल्या गुरुंवर श्री समर्थ रामदास स्वामी वर होती, तितकीचं श्रद्धा ह्या शिष्याची आपल्या गुरूंवर आहे. जगापुढे शिवरायांचा आदर्श मांडणारे इतिहासकार शिवशाहीर श्री बाबासाहेब आपलं श्रेय माननीय सरांना देतात. त्यांच्या नम्रतेची श्रद्धेची गुरुभक्तीची प्रचिती आम्हाला एका प्रसंगाने आली. त्याचं असं झालं, श्री शरद जोशी हे बाबासाहेबांचे शालेय मित्र त्यांच्या सौभाग्यवती म्हणजे माझ्या बहिणीची कमलची शालेय बालमैत्रिण. शरद जोशी यांची 61 होती.
आणि त्या कार्यक्रमाला बाबासाहेब पुरंदरे आले होते. श्री बाबासाहेबांनी आपल्या कर्तबगारीने सुस्वभावाने लोकांची मनं जिंकून कीर्तीचं शिखर गाठलं आणि जनसागरात मानाचा पान पटकावलं होतं. त्यांना इतकां मान होता कीं त्यांचा प्रवेश झाला. आणि ' बाबासाहेब आले'! असं नुसतं कुणीतरी म्हणाल्यावर लोकं जागेवरून उठून उभे रहात असतं. तर असे हे माननीय सुप्रसिद्ध इतिहासकार आपल्या मित्राच्या 61ला आले होते.त्यांच्या उत्साही चपळ, कणखर व्यक्तिमत्वाने,आगमनाने त्या कार्यक्रमाला वेगळीच रंगत चढली होती.
.माझी बहिण पण त्या कार्यक्रमाला हजर होती. सौ जोशींनी माझ्या बहिणीची ओळख करून देताना बाबासाहेबांना सांगितले , "बरं का बाबा साहेब ही माझी बाल मैत्रिण कमल. म्हणजे तुमच्या माननीय माजगावकर सरांची मुलगी आहे. हे ऐकताक्षणी बाबासाहेबांनी काय करावं? ते ताडकन उठले आणि कमलच्या समोर उभे राहून त्यांनी तिला मुजरा केला. माझी बहीण गोंधळून गेली कार्यक्रमाला आलेले सगळेच पाहुणे आश्चर्यचकित होउन बघायलाच लागले.अवघडलेल्या माझ्या बहिणीकडे बघून बाबा साहेब म्हणाले, "तुमचे वडील माजगावकर सर म्हणजे माझे सन्माननीय आदरणीय गुरु आहेत . दुर्दैवाने ते आत्ता नाहीत. हा मुजरा सरांची मुलगी म्हणून तुम्हाला करतोय. पण हा त्रिवार मुजरा माझ्या सरांसाठीच आहे. आणि तो त्यांना पोहोचलाही असेल.
केव्हढी नम्रता! आणि केव्हढी ही गुरुभक्ती! ती बघून कमल चे डोळे वडिलांच्या आठवणीने भरून आले .तर असे होते हे गुरु शिष्याचे अलौकिक अढळ नाते.

श्री.बाबासाहेबांना बघण्याची, भेटण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. पण योग येतच नव्हता. ही खंत मनात होती. आणि अचानक - -अचानक तो योग आला. कमालीचा आनंद झाला मला . खूप दिवसापासूनची माझी इच्छा पूर्ण झाली. फोनवर मी त्यांच्याशी बोलले .आणि मी ' माझी सरांची मुलगी 'अशी ओळख सांगून भेटण्याची इच्छा दर्शवली. आवडत्या माजगावकर सरांचं नाव ऐकून बाबासाहेबांनाही खूप खूप आनंद झाला. माझे जावई चि.सुजित जोशी खूप उत्साही आहेत.त्यांच्या ओळखीने हा सुवर्णयोग जुळून आला. जावई आम्हांला बाबासाहेबांकडे घेऊन गेले .त्यांच्याबरोबर आमच्या फोटो काढला. अतिशय दुर्मिळ आजकाल बघायलाही न मिळणारी अशी मोडीतील वजनदार, लफ्फेदार , सुरेख सही बाबासाहेबांकडून मी मिळवली.
अगदी भारावून गेले होते मी .सारखा मनात विचार येत होता . ही त्यांची ऐतिहासिक वास्तू, त्यांचा लोकसंग्रह आणि समाजात मिळवलेला मोठ्ठा मान .,बघायला, माझे वडील आज हवे होते .
या गुरु शिष्यांच्या नात्याचा शोध माझा भाचा सतीश पंडित मुळे लागला होता.
शेवटी हात जोडून मी मनात म्हणाले , "कालाय तस्मै नमः " निघतांना श्री बाबासाहेब मला म्हणाले," सरांचा फोटो असेल ना तुमच्याकडे?मला तो हवा आहे.
द्याल मला ? मी माझे आत्मवृत्त लिहीतोय,त्याच्या मुखपृष्ठावर मला माजगावकर सरांचा फोटो लावायचा आहे.

सुदैवाने कोट टोपी धोतर असा फोटो माझ्या भाच्याकडून हेमंत कडून मला मिळाला.तो बघितल्यावर बाबासाहेब प्रसन्न हंसले.
आवर्जून सांगावसं वाटतं सतीश मुळे मला या गुरु शिष्याच्या नात्यांचा शोध लागला .आणि सुजित जोशी ह्यांच्यामुळे तर श्री.बाबासाहेब मला प्रत्यक्ष भेटले. आणि माझ्याशी प्रेमाने बोलले. तो आनंद, तो क्षण. माझ्यासाठी , माझ्या आयुष्यातला अत्यंत मोलाचा क्षण होता. अत्यंत मोलाचा 

तर मंडळी असे होते हे गुरु शिष्याचे वाखाणण्यासारखें नाते . धन्य ते शिष्य! आणि धन्य ती गुरुभक्ती!

माझ्या वडिलांना माझा शिरसाष्टांग नमस्कार . आणि बाबा साहेब तुम्हांला माझा मानाचा त्रिवार मुजरा.

धन्यवाद

लेखिका: सौ राधिका (माजगावकर )पंडित. पुणे 51

जय भवानी

जय शिवाजी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू