पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

व्यक्तिचित्र :- जोशी सर

लहान पणा पासून ऐकलेली ओळ म्हणजे, छडी लागे छमछम विद्या येई घमघम. मी लहान असताना माझ्या सारख्या विद्यार्थ्यांना ह्या वाक्याचा अनुभव खूप जास्त येत असे. 

शिक्षकांच्या कडे असणाऱ्या फुटपट्टी ने शिक्षा करण्याची प्रथा तेंव्हा अस्तित्वात होती. मुळात प्रथा म्हणण्याचे कारण असे की आज-काल विद्यार्थ्यांना फक्त शाब्दिक शिक्षा मिळत आहेत, परंतु माझ्या लहानपणी विद्यार्थ्यांना नुसत्याच शाब्दिक शिक्षा मिळत नसत.

आम्हाला शिक्षक अथवा शिक्षिकांपेक्षा त्यांच्या हातात असणाऱ्या लाकडी पट्टीचाच धाक जास्त वाटत असे.

प्राथमिक शाळेत असताना शारीरिक शिक्षणाच्या तासाला जे शिक्षक होते ते तेवढे अनुशासन प्रिय नव्हते, परंतु माध्यमिक विभागात आल्यानंतर आम्हाला जे शिक्षक मराठी आणि शारीरिक शिक्षण असे दोन्ही विषय शिकवायचे ते म्हणजे जोशी सर अतिशय अनुशासन प्रिय होते.

सर मला अजून चांगलेच लक्षात आहेत आणि आज व्यक्तिरेखा च्या लेखात मी त्यांच्याबद्दलच लेख लिहिणार आहे.

मी साधारण सातवी-आठवी इयत्तेत असेन, तेव्हा जोशी सर आम्हाला मराठी आणि शारीरिक शिक्षण म्हणजेच फिजिकल ट्रेनिंग (PT) शिकवत असत. 


सेवानिवृत्ती जवळ आल्याने डोक्यावर विशेष केस नसणारे, थोडं पोट सुटलेले, तब्येतीने सुदृढ, कानांमधून थोडेफार पांढरे झालेले केस बाहेर येणारे, साधारण पावणे सहा फूट उंचीचे, कपाळावर लाल रंगाचा आडवा गंध लावणारे आमचे जोशी सर मला आजही स्मरणात आहेत. 


जोशी सरांचे पहिले नाव मला तेव्हा देखील माहीत नव्हते आणि आज देखील माहीत नाही. त्यांचा दराराच मुळी इतका होता की आमचा वर्ग असणाऱ्या माळ्यावरच्या खिडकीमधून त्यांचे डोके दिसले तरी आम्ही गोंगाट करणारी मुलं "शू......" असा आवाज करून चूप राहायचो.


अनुशासन प्रिय असल्याने, मागील बाकांवर ठिय्या मांडून बसणारी माझ्यासारखी मुलं त्यांना फार घाबरत असत. मी मराठी शाळेत असल्याने बहुतांशी सर्व विषयांचे पेपर आम्ही मराठीतच लिहीत असू.  


काना मात्रा च्या चुका वारंवार केल्यामुळे मराठीची तपासायला दिलेली वही जोशी सर नेहमीच लाल रंगाने रंगवून घरी पाठवत असत. 

चुकांमुळे लाल रंगात रंगलेल्या वह्या जेव्हा माझी आई घरी येऊन पाहत असे तेव्हा ह्या वह्यां मधला लाल रंग आई च्या डोळ्यात उतरत असे आणि मग तिच्या हातांद्वारे माझ्या गालांवर उमटत असे

सर त्यांच्या कपाळावर, नेहमी लाल रंगाचा आडवा गंध लावत असत. त्यांच्या कपाळावरच्या गंधाद्वारे सुरू झालेला हा लाल रंगाचा प्रवास, शाळेतल्या वहीतून पुढे आईच्या डोळ्यातून त्यापुढे माझ्या गालांवर संपत असे त्यामुळे सरांना पाहून माझ्या मनात नेहमी धडकी भरायची.


सर चोवीस ह्या अंकाचा उच्चार " च्युवीस " असे करत. त्यांच्या उच्चारांमुळे मला बरेचदा हसू यायचे. 

एक दिवस त्यांच्या उच्चारणावर हसल्यावर त्यांनी मला चांगलीच शिक्षा केली होती. त्या दिवशी नेमके त्यांचे दोन तास होते, त्यामुळे मला २ तास ओणव उभ रहावे लागले होते.

सरांच्या बाबतीत, नाण्याची एक बाजू मी जरी आतापर्यंत सांगितली असली तरी नाण्याची दुसरी बाजू देखील खुप छान आहे. 

मराठी शिकवत असताना सरांनी आम्हाला खूप काही गोष्टी सांगितल्या. विद्यार्थ्यांना कंटाळा आला आहे असे पाहून ते विद्यार्थ्यांना आनंदित करण्या साठी कधी कधी असं करत असत.

त्या वेळेस गोष्टी या पुस्तकातूनच वाचाव्या लागत होत्या कारण मोबाईल किंवा इतर कुठलाही दुसरा पर्याय नव्हता.  त्यामुळे ते पुस्तकातल्या गोष्टी सांगायला लागल्या की आम्हाला एक वेगळीच मजा येई. 

त्यांनी वर्गामध्ये असंच एकदा सांगितलं होतं की परीक्षेचा पेपर सुरू करण्याच्या आधी तुम्हाला तणाव कमी होण्याची इच्छा असेल तर " श्री गजानन जय गजानन " असा 11 अक्षरांचे जप करून तुम्ही पेपर लिहिण्याची सुरुवात करा, तुमचा ताण कमी होईल.

त्यांनी दिलेला तो मंत्र आजतागायत मी माझ्या स्मरणात ठेवला आहे. आज सुद्धा रात्री झोपण्यापूर्वी, माझ ऑफिसचं काम करण्यापूर्वी, गाडी सुरू करण्यापूर्वी असे अनेकदा मी हा मंत्र मनोमन म्हणतो, त्यामुळे गणराया बरोबरच मी नकळतपणे जोशी सरांची आठवण देखील करतो.

पीटीच्या तासाला ते आम्हाला नेहमी मैदानावर घेऊन जात. एका ड्रमवर आवाज करून आम्हाला सोबत व्यायाम करायला लावत. व्यायाम करताना ते नेहमी त्यांच्याकडील शिटीचा देखील वापर करत. आमच व्यायाम करताना लक्ष नसेल तर ते बर्याचदा त्यांच्याकडील शिटीच्या दोरीने आम्हाला फटका मारत. हे सुद्धा मला ते लक्षात आहे.

माझ्या मते शिक्षक हे त्या शिल्पकारासारखे असतात, ज्यांच्या मुळे आमच्या सारखे मस्तीखोर दगड हे एका छानश्या मूर्तीत रूपांतरित होतात.

तेंव्हा ज्या सरांची मला भीती वाटत असे त्यांच्या लावलेल्या शिस्ती मुळेच आज आमच्या सारखे विद्यार्थी पुढे आले आहे. 

हेच कारण आहे की मला त्यांच्या वर असा लेख लिहवासा वाटला. जोशी सर ह्यांच्यामुळे आम्ही अनुशासन शिकलो. मराठी भाषा नीट शिकलो आणि अर्थात शारीरिक शिक्षण देखील शिकलो. 

आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे असे आमचे जोशी सर मला अजून लक्षात आहेत.

आम्ही आठवीत होतो तेंव्हा ते सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर अजून देखील मी त्यांना कधी भेटलो नाहीये

आशा आहे की व्यक्तिरेखा आशया खाली जोशी सरां साठी लिहिलेला हा लेख कदाचित ते वाचतील आणि ह्या त्यांच्या विद्यार्थ्यांशी त्यांची नक्कीच भेट देखील होईल.

सरांच्या विद्यार्थी

अमेय पद्माकर कस्तुरे 




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू