पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दिवाळी कालची आणि आजची

"मला पाऊस हवाय!" नव्या परकर पोलक्यातल्या छोट्या दिवाळीने फटाक्यांकडे बोट दाखवले. "अनार म्हणतात याला" इति आजोबा. "अनारस्सा?" ठसक्यातले ते चिमखडे बोल मामाच्या घरच्या दिवाळीच्या स्मृती जागवत अजून रूंजी घालताहेत. अभ्यंगस्नानाला भाऊबीजेची लालूच दाखवत धाकट्या मावशीकडून अंग रगडून घेणारा मिस्कील मामा आठवतोय. पंचक्रोशीत उठून दिसेल असा भला मोठा कंदील टांगलेला असायचा. तो करणारा आजोबांचा हरहुन्नरी पोरसवदा गडी ! एकदा त्याने केलेलं भलं मोठं शीडाचं गलबत अजून डोळ्यासमोर आहे. पणत्या मांडण्यासाठी पायऱ्यापायऱ्यांचा खास लाकडी स्टँड बनवून घेतला होता. त्यावरच्या डोळे मिचकवणाऱ्या पणत्या गच्चीतून आभाळातल्या चांदण्यांशी आंधळी कोशिंबीर खेळताहेत असं वाटायचं. आजूबाजूच्या घरात जाळीदार लेसने आच्छादलेली फराळाची ताट जायची!
नंतरची मनात सतत तेवणारी चैतन्यमय दिवाळी आमच्या वाडीतील! तिथला दिवाळीचा माहोल काही वेगळाच! दिवाळीत नवे कपडे घेण्याचा सिलसिला आमच्याकडे नव्हता. तो मान उन्हाळ्याच्या सुट्टीचा! पण वडिल आईसाठी पाडव्याच्या ओवाळणीची साडी मात्र न चुकता आणत. ती आणायला त्यांच्याबरोबर आई कधी गेलेली आठवत नाही कारण ती दिवाळीच्या फराळात व्यग्र! बहिणीचा, तिच्या अभ्यंगस्नानाचा फटाका वाडीत पहिला वाजलाच पाहिजे हा हट्ट पुरवण्यासाठी फराळ करून दमली असली तरी भल्या पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नानाची तयारी करणारी आई!  दिवाळीच्या सुट्टीत शुभेच्छापत्रं स्वतः बनवून पाठवणे, आईला फराळ बनवायला मदत करणे, स्वहस्ते बनवलेला कंदील दिमाखात टांगणे, दुपारी दोन तास खपून ठिपक्यांची रांगोळी काढणे आणि संध्याकाळी सगळयांच्या रांगोळ्या बघत वाडीभर फिरणे यातली गंमत काही औरच होती! कंदीलांचीही दरवर्षी काहीतरी खासीयत असे. घरात आम्ही तिघी मुलीच असून कंदीलही बनवतो म्हणून आमचं वाडीला केवढ कौतुक! आमची भाऊबीजही खासच! आम्हाला सख्खा भाऊ नाही त्यामुळे चुलत, मावस, मानलेले अशा आमच्या भावांची तसेच आईच्याही भावांची दिवसभर वर्दळ असायची. वडिल लांब प्रवास करून घाऊक बाजारातून फटाके आणायचे त्यामध्ये दरवर्षीची काहीतरी नॉव्हेल्टी असायचीच. एक खास मामा जो ढीगभर फटाके घेऊन यायचा आणि मग फटाक्यांच्या या सोहळ्यात शेजारचे बाळगोपाळ सामील व्हायचे. अशा माणसांनी गजबजलेल्या वाडीतून बंद फ्लॅटमध्ये आलो तेव्हा तर कॉलेजमध्ये जायला लागलो होतो! दिवाळीच्या तोंडावरच घर बदललं होतं. या बंद घरात दिवाळी पार हिरमुसून गेली होती आणि ते पाहून आमच्यावर वैतागलेल्या आईचा चेहरा अजून आठवतोय. रांगोळी काढायला दाराबाहेर फारशी जागा नव्हती आणि घरात ती काढली तरी बघणार कोण त्यामुळे रांगोळ्या काढायच्या उत्साहावर जे विरजण पडलं ते आजतागायत!
पण कंदील बनवायची परंपरा मात्र तिथेही जपली. मग इथल्या दिवाळीचीही हळूहळू सवय झाली. दिवाळीची पहाट रेकॉर्डप्लेअरवर गीत रामायण लावून सुरू होऊ लागली. दिवाळी अंकासाठी दिवाळी आतूर होऊ लागली. अंक विकत आणून भेट देणे, वाचनालयातून दिवाळी अंक आणणे असे सारे सुरू झाले.
आजची दिवाळी आता वार्धक्याकडे हळूहळू झुकू लागली असली तरी फक्त उसासे टाकण्यासारखी नॉस्टॅल्जिक झाली आहे असं वाटत नाही. अजूनही माझ्या नव्वदीपुढच्या  आईचा फराळ करण्याचा उत्साह अचंबित करतो. आजची माझ्या भाचेकंपनीची नवी पिढी
नव्या लाटांवर स्वार होत ब्राऊनी आणि चॉकलेट्स बनवायला शिकते, घाऊक बाजारातून मातीच्या पणत्या आणून त्यावर कलाकुसर करते आणि नवं मार्केटिंगचं तंत्र आत्मसात करत दिवाळीत ऑर्डर्स घेते
तेव्हा त्यांच्या व्यवसायिक दृष्टीकोनाचं कौतुकच वाटतं. ही नवी पिढी दिवाळीच्या दिवशी म्हाताऱ्या आजीला आवर्जून भेटायला येते, आपण बनवलेल्या वस्तुची भेट देत तिच्या पायात पडत तिच्या हातचा फराळ खाते आणि फराळ करून दमलेल्या आमच्या पिढीसाठी भाऊबीजेच्या दिवशी तयार जेवण मागवून घरातील कामवालीसह सर्वांना आनंदात सहभागी करून घेते, प्रदूषणाचा विचार करून  मर्यादितच फटाके फोडते तेव्हा या पिढीची दिवाळी प्रगल्भ झाल्यासारखी वाटते.
आणखी एका जुन्या गोष्टीबद्दल मला आता राहून राहून वाईट वाटतं. आम्ही वाडीत रहात होतो तो काळ बायका नुकत्याच नोकरी करायला लागलेल्या! त्यामुळे शाळेतील शिक्षिका सर्रास असल्या तरी एखादीच बाई ऑफीसला जाणारी दिसायची. असं आमच्या वाडीत एकच बिऱ्हाड नंतर आलं होतं. सकाळी साडेनऊच्या सुमारास ऑफिसला जाणाऱ्या त्या टापटीप ललनेची इतर बायकांना असूयाच वाटत असावी. दिवाळीत बिचारी एकटीच रात्रभर जागून फराळ बनवायची. वाडीतील इतर बायका एकमेकींना मदत करायला जात असल्या तरी तिच्याकडे मात्र परग्रहावरचा प्राणी असल्याप्रमाणे बघायच्या आणि तिच्या मुलांकडून काही चुका झाल्या तर त्यांच्या संस्कारांचे वाभाडे निघायचे. तरी त्या बिचारीचा कायम हसतमुख चेहरा आणि सांभाळून घेत थोड्या अलिप्तपणेच सगळ्या शेजारणींशी ठेवलेला व्यवहार माझ्या अजून लक्षात आहे. तो काळ तसा मोठ्या स्थित्यंतराचा आणि नोकरी करून घराला हातभार लावणाऱ्या स्त्रियांची परीक्षा बघणारा होता. या पार्श्‍वभूमीवर आजच्या तरूण पिढीची कोणतेही काम हलके न समजण्याची आणि आपल्या बायकोला सर्व कामात मदत करण्याची वृत्ती सुखावून जाते.
आपली दिवाळी आता आपल्या ब्रेनड्रेनबरोबर परदेशातही ड्रेन झाली आहे. इथे बनवलेले कंदील आणि फराळाला तिकडे मोठी मागणी असते. पारंपारिक वेषभूषेत आपली कलासाधना तिथेही जोपासली जाते. भले दिवाळीचे पंचांग त्यांच्या सोईनुसार पुढेमागे होत असेल पण त्यांच्या मनातली दिवाळीची ओढ अजूनही तितकीच खरी आहे.
नवी पिढी पर्यावरणाबाबत सजग आहेच. ती नुसती बोलघेवडी नाही. फक्त खेळण्यातले किल्ले सजवत नाही तर खऱ्याखुऱ्या किल्ल्यांवर जाऊन साफसफाई करते. तिथल्या आदिवासी पाडयांच्या दारात दीप लावून आपल्या त्यांच्यातील अंतर मिटवायचा मनापासून प्रयत्न करते.
आज दिवाळी अंकांचं पुस्तकी वाचन कमी झालेलं दिसत असलं तरी डिजिटल रूपातले दिवाळी अंक बरेच दिसताहेत. त्यात लिहिणारी तरुणाई फक्त मुंबई पुण्यातीलच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यातील आहे आणि ती आपल्या बोलीभाषेतूनसुद्धा डिजिटल माध्यमी सक्रीय आहे हे वास्तव आनंददायक आहे. आता तयार फराळ मागवायचे कल असला तरी त्यामुळे महिला बचत गटातील मेहनती भगिनींच्या दिवाळीवर खुशीची मोहर उमटते हेही नसे थोडके!
फक्त समाजमाध्यमांवर सदा सक्रीय असणारी तरुणाई दिवाळी पहाटेला पारंपारिक वेषात फडके रोडवर मुद्दाम भेटीगाठींसाठी वेळ काढते हेही अप्रूप! 'दिवाळी पहाट' सारखे कार्यक्रम कलागुणांना वाव देत व्यावसायिक प्रतिष्ठाही मिळवून देत आहेत.
काळानुसार सणवार साजरे करण्याच्या पद्धतीत फरक होत जाणारच. पण आमची दिवाळी हीच कशी पारंपारिक दिवाळी होती याबद्दल फक्त गळे न काढता जो बदल होतोय त्यातली सकारात्मकता शोधली तर नव्या जुन्या पिढीतील अंतर कमी होत खऱ्याखुऱ्या आनंदाचे दीप मनामनात प्रज्वलित होऊन दिवाळीसारखे सण साजरे करण्याचा मूळ उद्देश सफल होईल नाही का?

नीलिमा रवि

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू