पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आत्मभान

आत्मभान - मीच मला दिसेना


जीवनाच्या रंगमंचावर 

विविध भूमिका निभावताना, 

अगदी जन्मापासून 

असंख्य मुखवटे बदलताना, 

गडबडगुंडा झालाय, 

गोंधळ झालाय सगळा, 

हरवून गेलोय मी ... 

मीच मला दिसेना ...... 


आईच्या पोटी लाडाचं लेकरु होताना,  

वडिलांकरिता वारस बनताना, 

कुणासाठी पहिला नातू होताना,  

जन्मल्या क्षणापासून हे असे ओझे, 

ते काय असतं हे न कळण्याच्या वयात 

खांद्यावर घेताना, 

एका सोहळ्यात मला भालचंद्र असे म्हणताना, 

मिलिंद म्हणताना, 

नातलगांचे चेहरे निरखून बघितले मी, 

हरवून गेलोय हो मी ... 

मीच मला दिसेना ...... 


लहानपणी, शाळेत अभ्यास करताना, 

मित्रांबरोबर खेळताना, 

मला सांगण्यात आलं 

अमुक करणं वाईट असतं 

तमुक करणं चांगलं,

मग माझ्या भूमिका बनवताना, 

न्यायाधीश बनून 

स्वत:ला बरोबर किंवा चूक 

ठरवत गेलो मी, 

गोंधळ झालाय हो सगळा... 

मीच मला दिसेना ...... 


मुलाची, पुतण्याची, भाच्याची, 

भूमिका करताना, 

पतीची, जावयाची, बाबांची 

भूमिका निभावताना, 

ऑफिस मधे साहेबाची भूमिका, 

सोसायटीत चेअरमन ची भूमिका, 

अहो, गोंधळून गेलोय पुरता, ... 

मीच मला दिसेना ...... 


लहानपणी वेगळा दिसायचो, 

तरुणपणी आणखी वेगळा, 

आत्ता हे कविता वाचन करणाऱ्याची भूमिका करताना, 

त्याहूनही वेगळा,

म्हातारपणी तर खूप वेगळा दिसेन, 

कधीतरी एकदा तर, 

दिसणारच नाही ..... 

मग या भूमिका साकारणारा मी  कोण? 


कुठलीही भूमिका नसताना, 

तरीही असणारा मी कोण? 

कोऽहम्?

मुखवट्यांच्या ह्या भाऊगर्दीत 

पार हरवून गेलोय मी, 

गोंधळ झालाय हो सगळा... 

मीच मला दिसेना ...... 


जर भालचंद्र ही सुद्धा जर एक भूमिकाच असेल, 

तर ती भूमिका करणारा कोण आहे? 

कोऽहम्?

मी कुणाला शोधतोय? 

मलाच? 

मग का नाही दिसत मीच मला? ..... 


अरे, ज्यात अडकला आहेस, 

त्या बंधनातून बाहेर पड आणि चर्मचक्षु मिटून बघ, 

त्या नजरेने, 

शून्यात, शून्यवस्थ होऊन, 

दशदिशांचे भान ठेवून, 

एका वेगळ्या दिशेला बघ, .... 

अरे, मी देहातीत आहे रे, 

होय, मी आत्मा आहे,

निराकार, निर्गुण, निर्लेप, 


मी आहे, आहेच मी, 

त्या चिरंतन सत्याचे अव्यक्त प्रकटीकरण आहे मी .... 

मी ज्ञान आहे, अनुभूती आहे, 

मीच ब्रह्म आहे. 

मी तुझ्यातच आहे. 

एकाग्रतेने पहा आतमध्ये, 

मला ओळख, 

मला बघ, 

मी दिसेन.  


ही अनुभूती घेतलीस ना, 

ओळख पटवलीस, ओळख ठेवलीस, ....   

की कधीच म्हणणार नाहीस, 

मीच मला दिसेना ..... 

की कधीच म्हणणार नाहीस, 

मीच मला दिसेना


©️ भालचंद्र चितळे

९८७०४१४०३१

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू