पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वाढदिवस

                     स्वयंपाकघरातली झाकपाक उरकून ताराने तिचा व तिचा नवरा भास्करचा बिछाना अंथरला. उशा, पांघरूणे ठेवून ती पुढल्या खोलीत आली.
                        तिची सासू व भास्कर गप्पा मारीत बसले होते व तिचा मुलगा अनिल आजीच्या मांडीवर डोके ठेवून झोपेच्या आधीन झाला होता.
                            सीताआत्याने अगोदरच त्यांचा व अनिलचा बिछाना घालून ठेवला होता. ते पाहून तारा म्हणाली “ हे काय आत्याबाई, तुम्ही कशाला त्रास घेतला? मी येणारच होते तुमचा बिछाना घालायला.
                            त्यावर सीताआत्या म्हणाल्या “ अगं मी बिछाना घातला तर काय झाले त्यात? कामावरून येतेस ती भिडतेस घरच्या कामाला. तुझा हात थोडा हलका करावासा वाटतो. तुझे पण शरीरच आहे. विसावा नको त्याला? बस आमच्याजवळ अंमळ.”
                          जवळच बसलेल्या भास्करने ताराच्या मनगटाला धरले व तिला खाली ओढले तशी तारा कळवळली.
                            भास्कर घाबरून म्हणाला “ तारे,काय झाले हाताला? बस खाली. बघू दे मला.”
                            तारा कळवळून खाली बसली. भास्करने तिचे मनगट अलगद धरले.पाहतो तो काय ताराच्या मनगटावर भाजलेले डाग होते.
                            भास्कर  घाबरून ओरडला “ अगं, काय करून घेतलेस हे? असे कसे झाले? “
                          सीताआत्या कळवळल्या “बया बया. अरे, तळणीचे तेल उडाले आहे हिच्या मनगटावर. काय तळत होतीस गं?”
                          भास्करच्या हातातून मनगट सोडवत तारा म्हणाली “ बटाटेवडे तळत होते तेवढ्यात मांजर माझ्या पायात आले.
                        मी दचकले आणि हातातला बटाटेवडा जोराने तेलात पडला. तेलाचे शिंतोडे हातावर उडाले आणि असे भाजले.”
                       भास्करने विचारले “ काही औषध लावले का?”
                         तारा म्हणाली “ हो तर. ताई धावत आल्या. त्यांनी मलम लावले. माझ्याबरोबर दिले रात्री लावायला. एक गोळी पण दिली रात्री ध्यायला. राहिलेले बटाटेवडे त्यांनीच तळले. म्हणाल्या तू आराम कर.”
                          भास्करने विचारले “ लई काम पडते का गं तुझ्यावर?”
                           सीताआत्या उत्तरल्या “ काय विचारतो पोरा? नोकरी म्हटलं की काम आलेच की. कोणी फुकट पगार देते का? त्यात पाच माणसांचे रांधणे.”
                           तारा म्हणाली “ तर काय. त्यात प्रत्येकाचे खाणे वेगळे.”
                           सीताआत्याने विचारले” आपल्यासारखे वरण,भात, भाजी नाही जेवत ते?”
                           तारा म्हणाली “ साहेब,आजी व ताई आपल्यासारखे जेवतात. त्यातही प्रकार. आजींना जाडसर चपाती तर साहेबांना आणि ताईंना ज्वारीची भाकरी. साहेबांना दोन्ही वक्ताला सलाड. मुलांचे खाणे वेगळेच.
                          भास्कर म्हणाला” सलाड काय असते?”
                         तारा म्हणाली “ सलाड म्हणजे  काय?”
                         तारा म्हणाली “ कच्च्या भाज्या. आपण खातो त्या नाही. सलाडच्या भाज्या वेगळ्या असतात. त्यात आणि पण काय काय टाकायचे असते. कसं सांगू तुम्हाला?”
                           सीताआत्या म्हणाल्या “ तुला बनवतां येते सर्व?”
                              तारा उत्साहाने म्हणाली “ हो. ताईंनी मला नीट शिकवले. त्या म्हणतात की तारा सर्व काही दाखवले तसे बनवते. खूप हुशार आहे.”
                             भास्कर खुशीत येऊन म्हणाला “ माझीच बायको ती.”
                               सीताआत्या म्हणाल्या “ मेहनत कोण करतं आणि भाव कोण खातं. झोपा आता. उशीर झाला.
                              थोड्याच वेळात ते साधेसुधे, कष्टाळू लोक झोपी गेले.
                                 भास्कर व तारा हे नवरा बायको  आत्तेमामे भावंडे होती. भास्करच्या आईने म्हणजे सीताआत्याने अंगाखाद्यावर खेळवलेल्या ताराला सून म्हणून हेरून ठेवले होते. 
                                भास्कर ड्रायव्हरच्या नोकरीत स्थिरावला तसे सीताआत्यांनी स्वत:च्या भावासमोर भास्कर व ताराच्या विवाहाचा प्रस्ताव मांडला. ताराच्या वडिलांनी भास्कर व तारा एकमेकावर अनुरक्त आहेत हे केव्हाच ओळखले होते. त्यांनी विवाहाला खुशीने सम्मति दिली.
                             विवाहबद्ध झाल्यावर भास्कर व तारा भास्करच्या नोकरीच्या शहरी आले. त्या दोघांचा आनंदाने संसार सुरू झाला. तारूण्याची बहार होती आणि दोघांमध्ये मैत्री, प्रेम व तारूण्यसुलभ आकर्षण होते.  दोघे सुखाच्या जलाशयात आकंठ बुडाले होते.
                             लग्नाला दोन वर्ष झाली. भास्कर व ताराच्या आयुष्यात त्यांच्या बाळाने प्रवेश केला. दोघांच्या घरी आनंदीआनंद झाला.
                             बाळाची जबाबदारी पेलत भास्कर व तारा या दोघांचे आयुष्य पुढे सरकू लागले.
                              कुणाच्याच आयुष्यात आनंदाचे क्षण नेहमीकरता येत नसतात. दु:खाच्या झळीत ते विरून जातात.
                             ध्यानीमनी नसतांना अल्पशा आजाराने भास्करच्या वडिलांचे निधन झाले. सीताआत्यांवर दु:खाचा पहाड कोसळला. पित्यावाचून भास्कर अनाथ झाला. भास्कर व तारा तातडीने गावी पोहोचले.
                                वडिलांचे दिवस आटोपून आईला बरोबर घेऊन भास्कर स्वत:च्या घरी परतला. 
                                  भास्कर व तारा सीताआत्यांची जीवापाड काळजी घेऊ लागले. अनिलबाळाच्या बाळलीलांमध्ये सीताआत्या दंग झाल्या. हळूहळू त्यांच्या दु:खावर खपली धरू लागली. 
                          घरकामात सीताआत्यांचा हातभार लागू लागला. दिवसभर कामात असलेल्या ताराला मोकळा वेळ मिळू लागला. मोकळा वेळ आहे तर आपल्याला त्याचा सदुपयोग केला पाहिजे हे ताराला जाणवू लागले.
                      एक दिवस ती व शेजारची सविता  बरोबर बाजारात जात होत्या. सविता तिला म्हणाली “ तुझी सासू आहे ना तुझ्याकडे, मग तू माझ्यासारखे काम का नाही धरत? मी बघ सकाळी जाते आणि दुपारच्याला परत येते. नंतर माझी मी. पैसे कमवले तर आपल्या हातात चार दोन पैसे राहतात. नवऱ्याला पण हातभार लागतो. बघ विचार कर. तुझी तयारी असेल  तर एका घरी स्वयंपाकाला बाई पाहिजे. मी विचारते तुझ्यासाठी. लई चांगली माणसे आहेत.”
                      तारा म्हणाली “ मी कधी विचारच नाही केला गं काम करण्याचा. तू म्हणतेस ते बरोबर आहे. आत्याबाई आल्यापासून अनिल माझ्याजवळ नसतोच. खूप प्रेमाने करतात त्याचे. मी पण आडकाठी नाही करत. दु:खी मनाला तेवढाच विरंगुळा. बघते. भास्कर, आत्याबाई काय म्हणतात ते.”
                        तारा घरी परतली आणि तिच्या मनात विचारसत्र जोरात फिरू लागले. ती मनात म्हणू लागली की आपण चार पैसे कमवले तर भास्करची कामाची वणवण कमी होईल. एकपण ओव्हर टाईम सोडत नाही तो. शिवाय रविवारी  कोणाला ड्रायव्हरची गरज असेल तर भास्कर तयार असतो. आपण आज नको जाऊ म्हटले तर म्हणतो असे कसे करून चालेल. आपल्याला अनिलला शिकवायचे आहे मग पैसा नको जमा करायला?
                      आता तर आपल्या हातात वेळ आहे. काम धरले तर भास्करला थोडा दिलासा मिळेल. पण काम जमेल का मला? दुसऱ्याच्या घरचा स्वयंपाक करणे जमेल? का नाही जमणार? आपल्या हाताला चव आहे असे सर्वच म्हणतात.
                          उलटसुलट विचारांनी तारा भांबावून गेली. बाजारातून आल्या आल्या तिने सीताआत्याला म्हटले “ आत्याबाई, एक विचारू?”
                         सीताआत्या म्हणाल्या “ विचार की. काय विचारतेस?”
                          तारा म्हणाली “ ती सविता विचारत होती की एका घरी स्वयंपाकाला बाई पाहिजे तर तू ते काम घेशील का. मला काही समजेना म्हणून तुम्हाला विचारते.”
                          सीताआत्या शहाणीसुरती बाई होती. ती म्हणाली “ तू तिला तिथल्यातिथे नाही सांगितले का?”
                          तारा म्हणाली “ नाही. मी तिला म्हटले की घरी विचारून सांगते.”
                            सीताआत्या म्हणाल्या “तुझ्या मनात ते काम करण्याची इच्छा आहे पण तुला आमची परवानगी हवी होती. असेच की नाही?”
                               तारा म्हणाली “ मला काही काम करून पैसे मिळवावेसे वाटतात. भास्कर एकटाच खटतो घरासाठी. ते माझ्या जीवाला लागते.त्याचा भार कमी करावासा वाटतो.”
                           सीताआत्या म्हणाल्या “ मला वाटते तू घ्यावे हे काम पण नवऱ्याला विचार हो आधी.”
                           तारा अजीजीने म्हणाली “ तुम्ही विचारा नं माझ्यासाठी. मी विचारले आणि तो चिडून बसला तर मग कसे व्हायचे?”
                       सीताआत्या हसत  म्हणाल्या “ ठीक आहे. मी काढते विषय.”
                        रात्री अनिल झोपी गेला होता. भास्कर व सीताआत्या जेवायला बसले होते. तारा त्यांना गरम गरम भाकऱ्या करून वाढत होती.
                           सीताआत्या भास्करला म्हणाल्या “ पोरा, तुझी बायको काय म्हणते माहित आहे का?”
                          हातातला घास तसाच ठेवून भास्करने विचारले “काय म्हणते तारी?”
                             सीताआत्या म्हणाल्या “ ती म्हणते की एका घरी स्वयंपाकाला बाई पाहिजे तर ते काम  तिला घ्यायचे आहे.”
                            भास्कर चट्कन उद्गारला “ हे काय नवीन खूळ ? बस की घरात चुपचाप.”
                             तारी नवऱ्याकडे बघतच राहिली. सीताआत्या म्हणाल्या “ अस्सं. का म्हणून तिने चुपचाप बसून रहायचे? आजुबाजुच्या सर्वच बायका कामावर जातात. चार पैसे कमावतात. स्वत:चा संसार पण सांभाळतात. शेजारची सविता नाही जात कामावर? तिचा नवरा पण तुझ्यासारखा ड्रायव्हर आहे.”
                         तारा म्हणाली “ हे पहा भास्कर, तू का येवढा खटतोस तर तुला पैसा जमा करून परत गावाकडे जायचे आहे म्हणून.”
                         सीताआत्या आश्चर्याने म्हणाल्या “ म्हणजे? हा गावाकडे परत येणार?”
                      तारा म्हणाली “ तर काय. इथे शहरात त्याचे मन रमत नाही.”
                        सीताआत्या म्हणाल्या “ मला वाटले शहराची चमकधमक ह्याला आवडते.”
                        भास्कर म्हणाला “ आई, कसली चमकधमक? ती असते पैसेवाल्यांसाठी. गरीबासाठी नाही. आपण दोन वक्ताच्या भाकरीसाठी दिवसरात्र कष्ट करायचे.”
                        सीताआत्या म्हणाल्या “ ते खरे आहे पण गावाकडे काय कामधंदा करणार तू?”एक एकराचा जमिनीचा तुकडा आपला. त्यात  पीक काय काढणार तू?”
                       भास्कर आईला समजावत म्हणाला “ दिवस बदललेत आई. आपल्या गावाजवळ कारखाना आलाय. वस्ती वाढते आहे. लोकांच्या गरजा वाढत आहेत. मी टॅक्सीचा धंदा करू शकतो.चहाची टपरी घालू शकतो आणि एक एकरातून भाजीपाला काढू शकतो. 
                                  शहरात राहणाऱ्या माणसांच्या लोंढ्याबरोबर आपण कुठे वहावत जातो आहे तेच समजत नाही.”
                          तारा म्हणाली “ भास्कर, चार हाताने पैसे कमावले तर जास्त  पैसे शिलकीत पडतील. तेही लवकर. तुझे गावी जायचे स्वप्न लवकर पुरे होईल.”
                              दुसऱ्या दिवशी तारा सविताबरोबर सुजाताताईंकडे  कामाचे ठरवायला गेली. 
                               ताराच्या मनात  होणारी धाकधूक सुजाताताईंना बघूनच दूर झाली. त्यांचा शांत, प्रेमळ  चेहेरा तिच्या म नात ठसला.
                                त्यांनी ताराला विचारले “ तू आधी कुठे काम करत होतीस?”
                                ताराने निरागसपणे म्हटले “ मी कुठेच काम करत नव्हते. मला कामाचा अनुभव नाही पण स्वयंपाक करता येतो. तुम्ही दाखवाल तसे मी करीन.”
                            सुजाता सूज्ञ होती.तिने मनाशी म्हटले की वयाने लहान दिसतेय, प्रामाणिक पण वाटते, शिकायची तयारी आहे शिवाय माहितीतली आहे. ठेवावे कामावर.
                           तिने ताराच्या घरची माहिती विचारली. तिला सर्व व्यवस्थित वाटले म्हणून तिने ताराला कामावर ठेवले. मात्र दोन अटींवर. एक सुट्टी घ्यायची नाही आणि कामावर वेळेवर यायचे.
                            अशा प्रकारे ताराची नोकरी सुरू झाली. सकाळी भास्कर  व ती बरोबरच निघत. भास्कर तिला सोडून स्वत:च्या कामावर जात असे. संध्याकाळी पाच वाजता तारा परत येत असे.
                              पहिल्या दहा दिवसातच ताराने स्वत:च्या कामाची छाप उमटवली. तिची तत्परता, शिकून  घ्यायची वृत्ती सुजाताला आवडली शिवाय सुजाताच्या सासूचे पण तिने मन जिंकले. मुलांशी ती प्रेमाने वागत असे.
                             वेगवेगळ्या प्रकारची सुपं, सलाड, बेकड व्हेजिटेबलस, पुडिंग वगैरे कधी न बघितलेले, न खाल्लेले पदार्थ ती सहजतेने बनवू लागली. थोडक्यात म्हणजे तिने सुजाताचा विश्वास पैदा केला.
                               तारा कामाला लागून एक महिना व्हायला आला तेव्हा सुजाताला तिच्या नवऱ्याने विचारले “ काय गं, ही तारा कसे काम करते?”
                             सुजाता उत्साहाने म्हणाली “ अरे, फारच छान. आजकाल मला स्वयंपाकघरात डोकवायला पण लागत नाही. सर्व काही टेबलावर तयार असते. मला माझ्या कामासाठी भरपूर वेळ मिळतो. शिवाय सासूबाई पण तिच्यावर खूश आहेत.”
                           सुजाताचा नवरा म्हणाला “ एक काम कर. तिचा पगार वाढव पुढच्या महिन्यापासून आणि तिला सांग तिच्या मुलांचे शाळेचे शुल्क आपण देऊ. असे आहे की देवळात जाऊन दानधर्म करण्यापेक्षा एका मुलाच्या शिक्षणावर खर्च करणे जास्त योग्य आहे.”
                              सुजाता म्हणाली “ अरे पण येवढे पैसे द्यायचे?”
                                 विनय म्हणाला “ महत्वाचे काय आहे तर तुला तुझे काम निवांतपणे करता यायला हवे. ही मुलगी आल्यापासून तुझ्यावरचा कामाचा बोझ कमी झालेला आहे. तिने तुझ्याकडून सर्व काही शिकून घेतले आहे. तू म्हणतेस की ती प्रामाणिक आहे. कामूस आहे. मग तिला टिकवून ठेवलेले बरे. नाहीतर उद्या दुसरे कोणी जास्त पैशाची लालूच दाखवेल.पटते आहे का माझे म्हणणे?”
                          सुजाता म्हणाली “ तुझ्या बोलण्यात तथ्य अवश्य आहे. शिवाय तिच्या घरची परिस्थिती चांगली आहे.”
                         विनयने विचारले “ म्हणजे काय ?”
                          सुजाता म्हणाली “ म्हणजे तिची सासू कजाग नाही. नवरा दारूडा नाही की तिला मारझोड करत नाही. त्यामुळे ती कसली तक्रार करत नाही नाही. 
                                                   ठीक आहे. तू म्हणतोस तसे होईल. नाहीतरी शेजारच्या प्रतिभाताई तिची जरा जास्तच चौकशी करत होत्या.”
                         महिन्याचा पगार देतांना सुजाता ताराला म्हणाली “ पुढल्या महिन्यापासून मी तुझा पगार वाढवणार आहे बरे का तारा. तुझे काम आम्हा सर्वांना आवडते. शिवाय तुझ्या मुलाच्या शाळेचे शुल्कसुद्धा आम्ही देऊ. केव्हा आणि कीती द्यायचे ते सांगत जा.”
                        ताराला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. पगारवाढ होईल हे तिला कधीच अपेक्षित नव्हते. वर तर वर अनिलच्या शाळेचे शुल्क पण देणार. शाळा सुरू झाली की एकदम सहा महिन्यांचे एकाहाती शुल्क देणे कठीण जायचे. आता तिच्या मनावरचा भार उठणार होता.
                            काम संपवून तारा घरी आली तेव्हा आनंदाने फुललेला तिचा चेहेरा पाहून सीताआत्याने तिला विचारले “ काय गं, कशाचा आनंद झालाय तुला?”
                         तारा हसत म्हणाली “ आत्याबाई, अहो, पुढल्या महिन्यापासून ताई माझा पगार वाढवणार आहेत. येवढंच नाही तर आतापासून अनिलच्या शाळेचे पैसे पण त्या देणार.”
                       सीताआत्या म्हणाल्या “ बाई बाई. ते कशापायी?”
                        तारा म्हणाली “ ताई म्हणतात की अनिलने चांगले शिकावे असे त्यांना वाटते म्हणून त्या मदत करतात. आता पुस्तके आणि शिकवणीचा खर्च आपण करू.”
                          भास्कर पण खुश झाला. तो ताराला म्हणाला “ तारा, तुला चांगली माणसे भेटली आहेत. मन लावून काम कर.”
                         बघता बघता दोन वर्ष सरली. तारा ताईंच्या घरात चांगलीच रुळली होती. प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून ज्याला जे हवे ते देत होती. शिवाय  तिच्या वागण्यात नम्रता होती. कामात सचोटी होती. घरातल्या मंडळींबद्दल तिच्या मनात आत्मियता होती. घरातले सर्वजण तिच्याशी प्रेमाने वागत.
                        एका रविवारी रात्री भास्करच्या साहेबांचा  अचानक फोन आला. साहेब म्हणाले “ भास्कर, उद्या आपल्याला चार दिवसांसाठी बाहेरगावी जायचे आहे. आठ वाजता निघायचे आहे व शुक्रवारी संध्याकाळी परत यायचे. चार दिवस रहायच्या तयारीने ये. उशीर करू नको. वेळेवर ये.”
                        भास्करने त्वरित उत्तर दिले “ जी सर. उद्या आठ वाजता हजर होतो.”
                        सीताआत्याने विचारले “ कोणाचा फोन होता?”
                          भास्कर म्हणाला “ साहेबाचा फोन होता. उद्या आठ वाजता कामावर बोलावले आहे. चार दिवसासाठी बाहेरगावी जायचे आहे. शुक्रवारी परत येणार.”
                        सीताआत्या म्हणाली “ अरे, कुठे जायचे ते नाही विचारले तू? कसे कळणार आम्हाला तू कोठे आहेस ते?”
                         भास्कर हसत म्हणाला “ नोकरी करतो मी साहेबाची. मी त्यांच्या हुकमाचा ताबेदार आहे. फोन करून सांगतो की तुम्हाला.”
                            दुसऱ्या दिवशी भास्कर पावणे आठलाच घराबाहेर पडला. ताराला पण लवकर निघायला लागले कारण भास्कर नसल्यामुळे तिला चालत जावे लागणार होते. एरवी भास्कर तिला त्याच्या दुचाकीवरून सोडत असे.
                            शुक्रवार उजाडला तसे तिघेजण भास्करच्या येण्याची वाट पाहू लागले. अनिलला तर त्याच्या बापूला केव्हा बघेन असे झाले होते.
                            शेवटी तारा काम संपवून घरी निघायच्या तयारीत असतांना भास्करचा फोन आला.
                               तो म्हणाला “ तारे, मी आज न येता उद्या येणार आहे.”
                                तारा म्हणाली “ ते का? आम्ही डोळे लावून तुझी वाट पाहतोय. भास्कर, उद्या अनिलचा वाढदिवस आहे ते लक्षात आहे ना तुझ्या? 
                               भास्कर म्हणाला “ ते काय माझ्या हातात आहे का गं? साहेब म्हणाले की काम संपले नाही. आपण उद्या निघू. वाढदिवसाचे काय येवढे कवतिक? काहीतरी गोडाधोडाचे करा. नवे कपडे तर तू घेतले आहेस.”
                        तारा म्हणाली “ आजूबाजूच्या मुलांचे बघतो आणि त्याला तसेच हवे असते. काय करणार?”
                              रात्री जेवणे झाली तसे तिने अनिलला व सीताआत्याला सांगितले की भास्कर उद्या येणार आहे.
                             ते ऐकून अनिलने भोकाड पसरले. त्याला समजावता समजावता दोघींच्याही नाकी नऊ आले.
                            अनिल शांत झाला पण त्याने वेगळाच हट्ट धरला. तो म्हणाला “ आई उद्या माझा वाढदिवस आहे म्हणून तू कामावर नको जाऊ. सुट्टी घे उद्या.”
                          तारा म्हणाली “ आता? कामावर न जाऊन कसे चालेल? तुझे मित्र तर संध्याकाळी येणार आहेत.”
                           सीताआत्या म्हणाली “ घे की सुट्टी एक दिवस. एक दिवस तरी मुलाचे मन राखायला नको का? कर तुझ्या ताईंना फोन आणि सांग त्यांना येत नाही म्हणून. मुलाचा बापू पण जाऊन बसला कुठे.”
                              शेवटी बिचकत बिचकत ताराने सुजाताताईंना फोन केला.
                               तिचा फोन घेताच त्या म्हणाल्या “ तारा, काय झाले? फोन का केलास?”
                             तारा म्हणाली “ ताई, मी उद्या कामावर नाही येणार. मला एक दिवसाची सुट्टी द्याल का?”
                            ताईंनी विचारले “ का बरे येणार नाहीस तू?”
                             तारा म्हणाली “ उद्या माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. त्याचा बापू पण बाहेरगावी गेला आहे म्हणून तो हटून बसला आहे की कामावर जाऊ नकोस म्हणून.”
                            ताई समजुतीच्या आवाजात म्हणाल्या “ हे बघ तारा, उद्या माझ्याकडे  चौघीजणी येणार आहेत आणि आम्ही दिवसभर काही महत्वाचे काम करणार आहोत. त्यांची पण जेवणे आपल्याकडेच होणार आहेत. मला स्वयंपाकघरात डोकवायला पण होणार नाही.
                           तू कसेही करून ये आणि काम संपले की घरी जा पण उद्यातरी पूर्ण दिवसाची सुट्टी घेऊ नकोस.”
                          ताराचे डोळे भरून आले. ती मनाशी म्हणू लागली की कधी नव्हे ते मी सुट्टी मागितली आणि ताईंनी नाही म्हटले.
                         सीताआत्याने ताराचा उदास चेहेरा पाहिला आणि त्यांच्या मस्तकात तिडिक उठली.
                       त्या म्हणाल्या “ उद्याच काम निघाले तुझ्या ताईंचे? जीव ओतून राबतेस तू त्यांच्यासाठी आणि एक दिवस सुट्टी देत नाहीत? काय तरी बाई जगाची रीत.”
                         सीताआत्यांचा राग पाहून तारा मुसमुसून रडू लागली.
                           ती जाणून होती की ताई विनाकारण तिची रजा नामंजूर करणार नाहीत. तसेच काही तरी महत्वाचे काम असले पाहिजे पण मुलाचा हट्ट पुरवता येऊ नाही यांचे तिला दु:ख होत होते.
                           दुसऱ्या दिवशी, अनिलची समजूत घालून तारा कामावर निघाली. तिला बरे वाटावे म्हणून सीताआत्या म्हणाल्या “ मी होता होईल तेवढी तयारी करून ठेवीन. सविताची दोघे मुलगे येणार आहेत ना जेवायला?”
                          ताराने होकार भरला व तिने ताईंच्या घराची वाट धरली. चालता चालता नकळत तिचे डोळे भरून येत होते. ती स्वत: ला समजावू लागली की ताई तुला कीती प्रेमाने वागवतात पण आजपर्यंत आपण कधीच सुट्टी मागितली नव्हती ती आज मागितली तर त्यांनी नकार का द्यावा.
                              ती ताईंच्या घरी पोहोचली तर ताई त्यांच्या कामाच्या गडबडीत होत्या. तिला पाहताच त्या म्हणाल्या “ बरे झालीस तू आलीस. आम्ही दहा वाजता काम सुरु करणार आहोत. दीड दोन पर्यंत संपेल. आमची जेवणे झाली की तू जेवून घे आणि घरी जा. रात्रीच्या जेवणाचे मी पाहीन.
                               जेवायला वाटाण्याची खिचडी, दहीवडे, वाफवलेली फरसबी व काकडीची कोशिंबीर येवढे कर. सासूबाईंचा आज उपास आहे म्हणून साबुदाण्याची खिचडी करायला लागेल. जास्तीची कर कारण मुलांना पण आवडते.  आणि फ्रीजमध्ये खवा आहे. त्याचे गुलाबजाम कर.”
                              तारा झपझप कामाला लागली. पण आज तिचे डोळे परत परत भरून येत होते. एकुलत्या एक मुलाचा वाढदिवस पण आपण त्याचा हट्ट पूरा करू शकलो नाही. अनिल कधीच हट्ट धरून बसत नाही.
                         त्यात हा भास्कर. काल येणार होता पण आलाच नाही. वर म्हणतो वाढदिवसाचे येवढे काय करायचे. दिवस बदलले हे त्याला समजतच नाही. आजकाल गरीबगुरीब पण मुलांचे वाढदिवस साजरे करतात. मग आपण नको करायला?
                       ताराच्या मनातले द्वंव संपतच नव्हते. त्यामुळे डोळे पाण्याने भरून यायचे थांबत नव्हते.
                          बारा वाजताच्या सुमारास ताईंचा फोन आला. त्या म्हणाल्या “ तारा, पाच कप कॅाफी बनवतेस?”
                          तारा मनाशी म्हणाली की ताराबाई स्वयंपाक बाजूला ठेवा व कॅाफी बनवा. परत तिचे डोळे पाण्याने भरले.
                           दोन वाजता बाया काम संपवून जेवायला बसल्या. सर्वचजणी तिच्या स्वयंपाकाची प्रशंसा करीत होत्या पण नेहेमीप्रमाणे ती हसून प्रतिसाद देऊ शकत नव्हती.
                           जेवणे झाली व ताई स्वयंपाकघरात येऊन म्हणाल्या “ तारा, फ्रीजमधले आईसक्रीम वाडग्यात घालून आण.”
                       त्यावर ताराने विचारले “ आणि गुलाबजाम?”
                          ताई म्हणाल्या” नको. गुलाबजाम नको.”
                           तारा मनाशी फुसफुसली “ द्यायचे नव्हते तर आजच कशाला करायला सांगायचे? आहे तारा खटायला “
                         तेवढ्यात ताई आल्या व म्हणाल्या “ आटोपले का तुझे? शलाका थांबली आहे बाहेर. ती तुला पेट्रोल पंपापाशी सोडेल. तेथून तुझे घर जवळ आहे ना?”
                      ताईंनी  गुलाबजामाचा डबा ताराच्या हातात ठेवला व म्हणाल्या “हे अनिलसाठी.त्याला गुलाबजाम आवडतात असे तू म्हणाली होतीस ना? आज त्याचा वाढदिवस आहे. त्याच्या आवडीचा पदार्थ नको बनवायला? म्हणून तुला गुलाबजाम बनवायला सांगितले.”
                       ताराच्या हातात एक पाकिट ठेवत त्या  म्हणाल्या” या  पैशातून त्याला हवे ते विकत घेऊन दे.”
                       ताराला काय बोलावे ते समजेना.
                        ताई म्हणाल्या “ जा लवकर. शलाका वाट बघते आहे.”
                        तारा घरात शिरली. अनिल व सविताची मुले पुढली खोली रंगीत कागदांनी सजवत होती.
                         सविताचा मुलगा म्हणाला “ मावशी, आमच्याकडे हे रंगीबेरंगी कागद होते. ते आम्ही आणले.”
                        तारा खुशीत येऊन म्हणाली “ जरूर करा पण सांभाळून करा.”
                          ती स्वयंपाकघरात आली तेव्हा सीताआत्या ओट्यापाशी काम करत होत्या. तिला पाहताच त्या म्हणाल्या “ मी खीर करून ठेवली आहे. कणीक पण भिजवली आहे. आता सांभाळ तू.”
                         ताराने गुलाबजामचा डबा उघडला व सीताआत्यांसमोर धरला.
                          सीताआत्या म्हणाल्या “ येवढे गुलाबजाम? विकत आणलेस की काय?”
                         तारा म्हणाली “ नाही हो. ताईंनी दिले अनिलसाठी. हे पण दिले आहे.”
                      ताराने ताईंनी दिलेले पाकिट सीताआत्यांच्या हातात ठेवले.
                        सीताआत्या म्हणाल्या “ चांगल्या आहेत गं ताई.”
                         दिवेलागण झाली व सीताआत्या ताराला म्हणाल्या “ ओवाळून घे त्याला. नंतर जेवायला वाढू. दिवसभर हुंदडला आहे म्हणून झोपेला येईल. “
                            सुस्कारा टाकीत सीताआत्या म्हणाल्या “ भास्कर आला असता तर कीती बरे झाले असते.”
                             तारा ओवाळायला आली तेव्हा अनिल म्हणाला “ आई, असे नाही ओवाळायचे.”
                            तारा वैतागून म्हणाली “ मग कसे? तू आम्हाला शिकवणार?”
                          अनिल म्हणाला “ तू छान जरीची साडी नेसायची. विनोदच्या वाढदिवसाला त्याच्या आईने कीती छान साडी नेसली होती.”
                          सीताआत्या म्हणाल्या “ पूरव की त्याचा हा तरी हट्ट.”
                           तारा जरीची साडी नेसून आली. तिने अनिलला ओवाळायला सुरवात केली तेव्हाच भास्कर दरवाज्यात येऊन उभा राहिला.
                       आनंदाने अनिल त्याच्याकडे धावला. भास्करने अनिलला मांडीवर घेतले व दिलखुलास हसत ताराला म्हणाला “ ओवाळ त्याला.”
                         त्या दोन, मामुली खोल्यांच्या बिऱ्हाडात आनंदाचे चांदणे पसरले व सकाळपासून  अश्रू ढाळणारी तारा तोंडभरून हसू लागली.


                                   लेखिका — नीला प्रधान 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू