पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भगवद्गीता संक्षिप्त परिचय

भगवद्गीतेतील निरूपण सशास्त्र असले तरी भगवद्गीतेतील सर्व विषय श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधील संवादाच्या स्वरूपात सुलभ व मनोरंजकपणे वर्णिलेले आहेत त्यामुळे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी,
" भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे " असे शब्द आल्यावर पुढे "श्रीकृष्णार्जुन संवादे" असे गीता निरुपणाच्या स्वरूपाचे निदर्शक शब्द येत असतात. सातशे श्लोकात केलेल्या अशा प्रकारच्या संवादात्मक निरूपणाची किंवा गीतोपदेशाची माहिती थोड्या-थोडक्या शब्दात करून देणे सोपे नाही, अतिशय कठीण काम आहे; तरीही वाचकांना भगवद्गीतेचा परिचय संक्षेपाने करून देण्याचा प्रयत्न येथे केला आहे. हा संक्षिप्त परिचय करून देताना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या गीतारहस्य या ग्रंथातील विवेचनाचा आधार घेतला आहे.


*अध्याय १*
कौरव-पांडवांची सैन्ये लढाईस्तव सज्ज होऊन कुरुक्षेत्रावर उभी आहेत व आता लढाईस तोंड लागणार, इतक्यात अर्जुनाच्या सांगण्यावरून श्रीकृष्णाने त्याचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन, उभा केला. "तुला ज्यांच्याबरोबर लढावयाचे आहे ते भीष्म, द्रोण समोर दिसतात पहा, असे श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितले, तेव्हा अर्जुनाने दोन्ही सैन्याकडे दृष्टी फेकल्यावर त्याच्या असे नजरेस आले की, आपल्याला वडील असलेले काका,आजे, मामे, बंधु, पुत्र, नातू, स्नेही, आप्त, गुरु, गुरुबंधू वगैरे दोन्हीकडे भरलेले असून या युद्धात सर्वांचाच नाश होणार! लढाई काही एकदम उपस्थित झालेली नव्हती आणि लढाईचा निश्चय होऊन दोहोबाजूंनी सैन्याची जुळवाजुळव बरेच दिवस चालली होती; तथापि परस्परांमधल्या या लढाईमुळे होणाऱ्या कुलक्षयाचे प्रत्यक्ष स्वरूप प्रथम जेव्हा डोळ्यासमोर आले; तेव्हा अर्जुना सारख्या महायोद्ध्यासही वाईट वाटले. "अरेरे! आम्हाला राज्य मिळावे म्हणून आमच्या कुलाचा हा भयंकर संहार करून आम्ही कुलक्षय करणार! त्या पेक्षा भिक्षा मागितलेली काय वाईट? " असे त्याच्या तोंडून उद्गार निघाले व "मलाच शत्रूंनी ठार मारले तरी चालेल; व त्रैलोक्याचे राज्य जरी कोणी देऊ केले, तरी देखील पितृहत्या, गुरुहत्या, बंधुहत्या यासारखी घोर पातके मी करू इच्छित नाही." असे त्याने श्रीकृष्णास सांगितले.
अर्जुनाच्या सर्वांगाला कंप सुटला, हातपाय गळाले, तोंड कोरडे पडून खिन्नवदन होत, हातचे धनुष्यबाण टाकून देऊन तो बिचारा आपल्या रथात खाली बसला. ही कथा भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात आहे. या अध्यायास 'अर्जुन विषाद योग ' असे म्हणतात.


*अध्याय २*
दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी श्रीकृष्णांनी अर्जुनाची कान उघडणी करीत,"अरेरे ही अवदसा (कश्मल) तुला कुठून आठवली? तुझे हे कापुरुषा सारखे वागणे (क्लैब्य) तुला शोभा देत नाही. हे वागणे तुझ्या कीर्तीचे वाटोळे करील, म्हणून तू हा दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा!" असे अर्जुनाला सांगितले;@ तथापि अर्जुनाने भागुबाई प्रमाणे पुन्हा पहिलीच रडकथा गाऊन मी भीष्म, द्रोण आदि माहात्म्यांस कसे मारू? मरणे बरे का मारणे बरे? या संशयातून माझे मन भ्रमित झाले आहे; म्हणून यापैकी कोणता धर्म श्रेष्ठ ते मला अवगत करून द्या, मी तुम्हाला शरण आलो आहे; असे दीनवाण्या मुद्रेने श्रीकृष्णास सांगितल्यावर थोडे हसल्यासारखे करीत, "अशोच्यानन्वशोचस्त्वं". (गी.२.११) वगैरे ज्ञान श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगायला सुरुवात केली. अर्जुन ज्ञानी पुरुषासारखा न वागता कर्मसंन्यासारखा बोलू लागलाय, हे पाहून श्रीकृष्णांनी कर्मे सोडणे व कर्मे करणे असे जे दोन पंथ म्हणजे निष्ठा आढळून येतात, तेथपासून आपल्या उपदेशास प्रारंभ केला आणि या दोन्ही निष्ठांपैकी कोणतीही निष्ठा घेतली, तरीही तू चुकतच आहेस हे अर्जुनाच्या निदर्शनास आणून दिले. नंतर ज्या ज्ञान किंवा सांख्य निष्ठेच्या आधारे अर्जुन कर्म संन्यासाच्या गोष्टी बोलू लागला होता; त्या सांख्य निष्ठेच्या आधारे प्रथम "एषातेऽभिहिता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां श्रृणु।" (गी.२.११-३९) येथपर्यंत उपदेश केला आणि "कर्म मार्गाला धरून युद्ध हेच तुझे खरे कर्तव्य आहे" असे अर्जुनाला सांगितले.
भीष्म, द्रोण आदिकांना मी कसे मारणार? ही तुझी समजूतच खोटी आहे, कारण आत्मा मरत नाही व मारीतही नाही. मनुष्य ज्याप्रमाणे आपली वस्त्रे बदलतो त्याप्रमाणे आत्मा एक देह सोडून दुसऱ्या देहात जातो इतकेच! वासांसि जीर्णानि..(गी.२.२२) पण त्यामुळे तो मेला असे म्हणून शोक करणे योग्य नव्हे. बरे, 'मी मारणार' हा भ्रम मानला तरी युद्ध का करावे? असे म्हणशील, तर शास्त्रतः प्राप्त झालेल्या युद्धापासून परावृत्त न होणे हा क्षत्रिय धर्म आहे, तू तुझे कर्तव्यकर्म करण्यापासून दूर राहशील तर लोक तुला नावे ठेवतील. किंबहुना युद्धात मरणे हा क्षत्रियाचा धर्म होय! मग व्यर्थ शोक का करतोस? आता युद्ध करणे हेच तुझे कर्तव्य आहे; म्हणून युद्ध कर.
युद्धासारखे स्वर्गाचे द्वार क्षत्रियाला क्वचित उघडे सापडते. युद्धात मेलास तर स्वर्ग आणि जय मिळवलास तर पृथ्वीचे राज्य मिळेल. ( गी.३२-३७)
हे अर्जुना! कर्मे करण्यापुरताच तुझा अधिकार असून त्यांचे फळ मिळणे किंवा न मिळणे ही गोष्ट केव्हाही तुझ्या ताब्यातली नाही; फल देणारा तो परमेश्वर आहे (गी.२.४७) असे मानून कर्माचे फळ मिळो वा न मिळो, आपल्याला सगळे सारखेच! अशा समबुद्धीने केवळ कर्तव्य कर! ज्याची बुद्धी सम झाली, तो स्थितप्रज्ञ म्हणावा, ( गी.२.५३) असा उपदेश श्रीकृष्णांनी अर्जुनाला द्वितीय अध्यायात केला आहे.


*अध्याय ३*
"कर्मयोग मार्गातही कर्मापेक्षा बुद्धीच जर श्रेष्ठ तर मी माझी बुद्धी स्थितप्रज्ञासारखी सम करतो. मला घोर युद्ध करायला कशाला भाग पाडता?" असा तिसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुनाने प्रश्न केला आहे?
या प्रश्नास श्रीकृष्ण असे उत्तर देतात की, "कोणाही मनुष्यास कर्मे सर्वथैव सुटणे अशक्य आहे. इंद्रिय संयमनाने, बुद्धी स्थिर व सम करून निष्काम भावनेने केवळ कर्मेन्द्रियांनीच आपली कर्तव्यकर्मे करीत राहाणे हे अधिक श्रेयस्कर आहे. कर्मे नाही केलीस तर तुला खायला देखील मिळणार नाही." (गी.३.३-८)
"मनुष्य कितीही ज्ञानवान झाला तरी त्याला प्रकृतीचे व्यवहार सुटत नाहीत; म्हणून कर्मे सोडून देणे तर दूरच परंतु कर्तव्य म्हणून स्वधर्माप्रमाणे कर्मे करीत असता जरूर पडल्यास त्यातच मरणेही श्रेयस्कर आहे. (गी.३.३०.३५) याकरिता कर्मे करीत राहा नि मला सर्व कर्मे अर्पण कर!"(गी.३.३०.३१) असे परमेश्वरार्पणपूर्वक कर्मे करण्याच्या भक्ती मार्गातील तत्त्वाचेही या अध्यायात सूतोवाच झाले आहे.


*अध्याय ४*
चौथ्या अध्यायाच्या आरंभी या कर्मयोगाची म्हणजे भागवत किंवा नारायणीय धर्माची त्रेतायुगातील परंपरा दिली आहे. "आदौ किंवा युगारंभी मीच हा कर्मयोग मार्ग विवस्वतास, विवस्वताने मनूस, मनूने इक्ष्वाकूस सांगितला होता; पण मध्ये नष्ट झाल्यामुळे तोच योग (कर्मयोग मार्ग) मी आता तुला पुन्हा सांगितला;" असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. तेव्हा " विवस्वत तर भूत काळात होऊन गेला, त्याच्या आधी तुम्ही कसे असणार?" असा प्रश्न अर्जुनाने केला. तेव्हा सज्जनांचे रक्षण, दुष्टांचा नाश आणि धर्माची स्थापना करणे (गी.४.७-८) असे आपल्या अनेक अवतारांचे प्रयोजन सांगून त्याप्रमाणे हे लोकसंग्राहक कर्म मी करत असताही माझी त्या ठिकाणी आसक्ती नसल्यामुळे मला त्याचे पाप-पुण्यादि फल लागत नाही, असे कर्मयोगाचे समर्थन श्रीकृष्णांनी केल्यावर, आचरणाचे हे तत्त्व जाणूनच जनक आदिकांनी पूर्वी कर्मे केली व तूही तसेच कर, असा भगवंतांनी अर्जुनास पुन्हा उपदेश केला.
केवळ तीळ,तांदूळ जाळणे किंवा यज्ञात पशु बळी देणे हा एक प्रकारचा यज्ञ खरा, पण हा यज्ञ हलक्या प्रतीचा आणि संयमाग्नीत कामक्रोधादि इंद्रियवृत्ती जाळणे किंवा 'इदं न मम 'म्हणून सर्व कर्मांची ब्रह्मात आहुती देणे हे वरच्या पायरीचे यज्ञकर्म अशी यज्ञाची विस्तृत व व्यापक व्याख्या करून यज्ञासाठी फलाशा सोडून कर्मे करावी म्हणजे यज्ञही निष्काम बुद्धीने केला तर यज्ञाकरिता केलेल्या कर्माचे फल मिळाल्याशिवाय राहत नाही. सर्व भूते आपल्या ठायी म्हणजे भगवंतांच्या ठायी आहेत असे जे ज्ञान, त्याला साम्यबुद्धी म्हणतात. "सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते।" सर्व कर्म ज्ञानात लय पावते. कर्मे स्वतः बंधक नसून अज्ञानाने बंध उत्पन्न होतो; यासाठी अज्ञान सोडून दे व कर्मयोगाचा आश्रय घेऊन लढायला उभा राहा!" असा भगवंतांनी श्रीकृष्णाला उपदेश केला.
सारांश, कर्मयोग मार्गाच्या सिद्धीसाठीही साम्यबुद्धीरूप ज्ञान असणे जरुरीचे आहे अशी चौथ्या अध्यायात ज्ञानाची प्रस्तावना झाली आहे.


*अध्याय ५*
भक्ती हे परमेश्वर प्राप्तीचे एक साधन आहे व साधन या अर्थी भक्तीला जरी योग म्हणता आले, " मां च योऽव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते। ( गी.१४.२६) तरी ती अखेरची निष्ठा होऊ शकत नाही. भक्तीने परमेश्वराचे ज्ञान झाल्यावर जो कर्मे करील तो कर्मनिष्ठ व जो भक्ती करणार नाही तो सांख्यनिष्ठ म्हणावा लागेल. कर्मयोग हा नेहमीच विशेष असतो, "कर्मयोग विशिष्यते " (गी.५.२) म्हणूनच कर्मयोग करणे ही निष्ठा अधिक श्रेयस्कर असते. असे अर्जुनास स्पष्ट सांगून संन्यास मार्गाने जो मोक्ष मिळतो तोच कर्मयोग मार्गानेदेखील मिळतो. "योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति।"(गी.५.५) असा अभिप्राय भगवंतांनी पाचव्या अध्यायामध्ये आपल्या उपदेशात अर्जुनाला सांगितला आहे.


*अध्याय ६*
सहाव्या अध्यायात कर्मयोगासाठी अवश्य लागणारा इंद्रिय निग्रह संपादन करण्याची पातंजल योगातील साधने वर्णिली आहेत; पण एवढ्याने कर्मयोगाचे वर्णन पुरे होत नाही; इंद्रियनिग्रह म्हणजे कर्मेंद्रियांकरवी करावयाचा एक प्रकारचा स्वाध्याय आहे. या स्वाध्यायाने इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवता येतात; पण मनुष्याची वासनाच खोटी असेल तर इंद्रिये ताब्यात असून उपयोग होत नाही; कारण वासना दुष्ट असल्यावर याच इंद्रियनिग्रह रूपसिद्धीचा कित्येक लोक जारण-मारण आदि दुष्कृत्ये करण्यासाठी वापर करतात; असे आढळून येते; म्हणून इंद्रिय निग्रहाबरोबरच वासनाही "सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि "(गी.६.२९) किंवा " यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति।"
(गी.६.३०) याप्रमाणे सर्वांभूती सम झाली पाहिजे अशी आत्मैक्यज्ञानाचीही आवश्यकता या अध्यायात वर्णिली आहे. म्हणजे योगी पुरुष निःसंदेह साक्षात्कारी असतो आणि तो सर्व प्राणिमात्रांमध्ये मला पाहतो,तद्वतच सर्व प्राणीमात्रांना माझ्यामध्ये पाहात असतो; असे भगवंतांनी या अध्यायात सांगितले आहे.


*अध्याय ७*
परमेश्वराविषयीचे ज्ञान कर्मयोगाद्वारे आचरणात आणताना कर्मे तर सोडून द्यायची नसतात; मग याला विकल्प काय? असा प्रश्न उपस्थित होतो. भगवंतांनी भक्ती व ज्ञान हे दोन मार्ग सातव्या अध्यायापासून पुढे विकल्प म्हणून सांगितले आहेत. प्रवृत्तिपर नारायणीय धर्म त्यातील विधींसह सांगितला आहे. भगवद्गीतेत भक्ती, सुलभ व प्रधान मानली आहे. अध्यात्म ज्ञान व भक्ती ज्ञान सांगत असतानाच भगवंतांनी अर्जुनास "तू कर्म म्हणजे युद्ध कर "असा सातत्याने उपदेश केला आहे.
सातव्या अध्यायात क्षराक्षर(विनाशी-अविनाशी) सृष्टीच्या म्हणजे ब्रह्मांडाच्या विचारास आरंभ करून ही सर्व सृष्टी, पुरुष आणि प्रकृती माझीच परात्पर स्वरूपे असून या मायेच्या पलीकडले अव्यक्त रूप ओळखून जे मला भजतात त्यांची बुद्धी सम होऊन त्यांना मीच सद्गती देतो; असे अव्यक्त किंवा अक्षर परब्रह्माचे ज्ञान भगवंतांनी प्रथम सांगितले असून सगळ्या देवता, सगळी भूते, सगळे यज्ञ, सगळे कर्म, सगळे अध्यात्म मीच आहे; माझ्या खेरीज या जगात दुसरे काहीही नाही; असे आपल्या स्वरूपाचे वर्णन श्रीकृष्णांनी सातव्या अध्यायात केले आहे.


*अध्याय ८*
आठव्या अध्यायाच्या प्रारंभी,"अध्यात्म,अधियज्ञ, अधिदैव व अधिभूत म्हणजे काय, त्याचा अर्थ मला सांगा," असा अर्जुनाने प्रश्न केल्यामुळे या शब्दांचे अर्थ सांगून या प्रमाणे माझे स्वरूप ज्याने ओळखले त्याला मी विसरत नाही; असे वर्णन केल्यावर सर्व जगात अविनाशी किंवा अक्षर तत्त्व कोणते, सर्व जगाचा संहार केव्हा व कसा होतो, आणि परमेश्वर स्वरूपाचे ज्ञान झालेल्या पुरुषास कोणती गती प्राप्त होते व ज्ञानाशिवाय नुसती काम्य कर्मे करणाऱ्यास कोणती गती मिळते याचे संक्षेपाने विवेचन आहे.


*अध्याय ९*
नवव्या अध्यायातही तोच विषय चालू ठेवून चोहोकडे याप्रमाणे भरून राहिलेल्या अव्यक्त परमेश्वराच्या व्यक्त स्वरूपाची भक्तीने ओळख करून घेऊन अनन्यभावाने त्याला शरण जाणे हाच ब्रह्मप्राप्तीचा प्रत्यक्षावगम्य सुलभ मार्ग किंवा राजमार्ग होय आणि राजविद्या किंवा राजगुह्य यालाच म्हणतात; असा उपदेश आहे. तथापि या तिन्ही अध्यायात ज्ञानवान किंवा भक्तिमान पुरुषाने कर्म करीत राहिले पाहिजे; हे कर्ममार्गाचे प्रधान तत्त्व मधून मधून सांगण्यास भगवान विसरत नाहीत. "तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च।" (८.७) " म्हणून सर्व वेळ माझे स्मरण ठेव आणि युद्ध कर; असे आठव्या अध्यायात तर सर्व कर्मे मला अर्पण केल्याने कर्माच्या शुभाशुभ फलापासून तू मुक्त होशील असे नवव्या अध्यायात " यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्। ( गी.९.२७-२८).भगवंतांनी म्हटले आहे.


*अध्याय १०*
हे सर्व जग माझ्यापासून झालेले व माझे स्वरूप होय. जगातील प्रत्येक श्रेष्ठ वस्तू माझीच विभूती आहे. बुद्धी, ज्ञान, संशय आणि मोह यातून मुक्तता, क्षमा, सत्यता, इंद्रिय संयमन, मनोनिग्रह, सुख आणि दुःख, जन्म-मृत्यू, भय, निर्भयता, अहिंसा, समता, संतुष्टी, तपस्या, दान, यश आणि अपयश इत्यादी जीवांचे विविध सर्व गुण माझ्या द्वारेच उत्पन्न झाले आहेत. "बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः।" (गी.१०.५ ) अशी अनेक उदाहरणे देऊन श्रीकृष्णांनी अर्जुनाची समजूत काढली आहे.


*अध्याय ११*
अकराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण आपले विश्वरूप अर्जुनाला प्रत्यक्षात दाखवून मीच परमेश्वर चहुकडे भरलेलो आहे; या गोष्टीची सत्यता अर्जुनाच्या डोळ्यांपुढे मांडून अनुभवास आणून देतात. याप्रमाणे विश्वरूप दाखवून सर्व कर्मे करविता मीच आहे, अशी अर्जुनाची खात्री केल्यावर लागलीच खरा कर्ता मी व तू निमित्तमात्र आहेस म्हणून निःशंक होऊन युद्ध कर! " तस्मात्त्वमुतिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून्भुङ्क्ष्व।" (गी.११.३३) असे अर्जुनाला सांगतात. सर्व जगात एकच परमेश्वर आहे असे 'प्रमाण' अर्जुनाला मिळाल्यावर "त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्।" (११.३७) म्हणजे हे देवाधिदेवा! या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परमअविनाशी, सर्व कारणांचे कारण आहात; असे अर्जुन भगवान श्रीकृष्णाला सांगतो.


*अध्याय १२*
जागोजाग परमेश्वराचे अव्यक्त स्वरूपच मुख्य आहे, अशी वर्णने आली असल्यामुळे परमेश्वराची उपासना करताना ती त्याच्या व्यक्त स्वरूपाची करावी की, त्याच्या अव्यक्त स्वरूपाची करावी असा बाराव्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुनाचा प्रश्न आहे. " एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते।" (गी.१२.१) तेव्हा नवव्या अध्यायात वर्णिलेली व्यक्त स्वरूपाची उपासना सुलभ असे आपले मत सांगून दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाचे जसे वर्णन आहे त्याप्रमाणे परम भगवद्भक्ताच्या स्थितीचे वर्णन करून " जे या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परमलक्ष्य मानून श्रद्धेने पूर्णतया मला संलग्न होतात हे मला आत्यंतिक प्रिय आहेत "ये तु धर्मामृतमिदंयथोक्तंपर्युपासते।" ( गी.१२.२०) असे या अध्यायाच्या अखेरीस श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात.


*अध्याय १३*
भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायात भगवंतांनी क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग सांगून प्रकृती, पुरुष,क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान व ज्ञेय यासंबंधातील अर्जुनाच्या जिज्ञासेची "एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते" (गी.१२.१) उकल करून देताना शरीर म्हणजे क्षेत्र आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणावे असे सांगत त्याच्या सर्व शंकांचे निरसन केले आहे.
परमेश्वरच सर्व ब्रह्मांड किंवा क्षराक्षर सृष्टी व्यापून आहे असा, विश्वरूप दर्शनाने अर्जुनाच्या चर्मचक्षूंस प्रत्यक्ष अनुभव आणून दिल्यावर हाच परमेश्वर पिंडात म्हणजे मनुष्याच्या शरीरात किंवा क्षेत्रात आत्मा या रूपाने राहात असून या आत्म्याचे म्हणजे क्षेत्रज्ञाचे जे ज्ञान तेच या परमेश्वराचेही (परमात्म्याचे) ज्ञान होय, असा क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार तेराव्या अध्यायात सांगितला आहे. पैकी प्रथम परमात्म्याचे म्हणजे परब्रह्माचे "अनादिमत्परं ब्रह्म" (गी.१३.१३) इत्यादी उपनिषदांचे आधारे वर्णन केल्यावर पुढे हाच क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार प्रकृती आणि पुरुष या सांख्य विवेचनात अंतर्भूत झालेला आहे, असे दाखवले आहे आणि अखेर प्रकृती व पुरुष हा भेद ओळखून सर्वगत निर्गुण परमात्मा ज्याने "ज्ञानचक्षुने जाणिला तो मुक्त होतो, असे वर्णन आहे. तथापि त्यातही सर्व कर्मे प्रकृती करते, आत्मा कर्ता नव्हे हे जाणिल्याने कर्मे बंधक होत नाहीत." समं पश्यन्हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम्। (१३.२९) असे कर्मयोगाचे आणि "ध्यानेनात्मनि पश्यन्ति" (१३.२४) असे भक्तीचे सूत्र कायम राखले आहे.


*अध्याय १४*
सातव्या अध्यायाच्या आरंभाप्रमाणेच चौदाव्या अध्यायाच्या आरंभी "परं भूयःप्रवक्ष्याभि ज्ञानानां ज्ञान मुत्तमम् (१४.१) फिरून तुला तेच 'ज्ञान विज्ञान' पूर्ण करून सांगतो, असे भगवंतांनी म्हटले आहे.
एकच आत्मा अगर परमेश्वर एकत्र असतानाही सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांच्या भेदामुळे जगात वैचित्र्य कसे उत्पन्न होते याचे सांख्य शास्त्राप्रमाणे वर्णन असून जो हे प्रकृतीचे खेळ जाणतो व आपण कर्ता नाही हे ओळखून परमेश्वराची भक्तीयोगाने सेवा करतो तोच खरा त्रिगुणातीत किंवा मुक्त असे सांगितले आहे व अखेरीस स्थितप्रज्ञ व भक्तिमान पुरुषाच्या स्थितीप्रमाणेच त्रिगुणातीताची स्थिती अर्जुनाच्या प्रश्नावरून वर्णिली आहे.


*अध्याय १५*
पंधराव्या अध्यायात परमेश्वराचे कधीकधी वृक्ष रूपाने जे वर्णन श्रुती ग्रंथातून येते त्याचे आरंभी वर्णन करून व सांख्य ज्याला प्रकृतीचा पसारा म्हणतात, तो पसारा म्हणजेच हा अश्वत्थ वृक्ष होय. असे सांगून अखेर क्षर आणि अक्षर या दोघांच्या पलीकडला जो पुरुषोत्तम त्याला जाणून त्याची भक्ती केल्याने मनुष्य कृतकृत्य होतो त्याप्रमाणे तू कर, "इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयानघ। " (गी.१५.२०) असा अर्जुनास उपदेश केला आहे.


*अध्याय १६*
सोळाव्या अध्यायात प्रकृती भेदामुळे जगात जसे वैचित्र्य उत्पन्न होते तद्वतच मनुष्यामध्येही दैवी संपत्तीचे व आसुरी संपत्तीचे असे दोन भेद होतात असे सांगून त्यांची कर्मे कशी असतात व त्यांना कोणकोणती गती प्राप्त होते याचे वर्णन आहे.


*अध्याय १७*
त्रिगुणात्मक प्रकृतीच्या गुणवैषम्यामुळे होणारे वैचित्र्य श्रद्धा, दान, यज्ञ, तप, इत्यादिकांमध्येही कसे दृष्टीस पडते याचे अर्जुनाच्या प्रश्नावरून सतराव्या अध्यायात विवेचन असून अखेर "ॐ तत्सत् " या ब्रह्म निर्देशातील तत् या पदाचा निष्काम बुद्धीने केलेले कर्म, आणि सत् या पदाचा चांगले परंतु काम्य बुद्धीने केलेले कर्म असा अर्थ करून हा सामान्य ब्रह्मनिर्देशही कर्मयोगमार्गासच अनुकूल आहे असे दाखवले आहे. सारांश जगामध्ये चोहोकडे एकच परमेश्वर आहे मग तो विश्वरूप दर्श़नाने ओळखा किंवा ज्ञानचक्षूंनी ओळखा, शरीरात क्षेत्रज्ञही तोच आहे, आणि क्षर सृष्टीत अक्षरही तोच आहे, तोच दृश्य सृष्टीत भरलेला पण तिच्याही बाहेर किंवा पलीकडे आहे. तो जरी एक आहे तरी प्रकृतीच्या गुणभेदामुळे व्यक्त सृष्टीत नानात्व किंवा वैचित्र्य आढळून येते आणि या मायेने किंवा प्रकृतीच्या गुणभेदाने ज्ञान, श्रद्धा,तप, यज्ञ धृति,दान यांचे किंवा मनुष्यामध्येही अनेक भेद होतात परंतु या सर्व भेदांत जे ऐक्य आहे ते ओळखून त्या एक व नित्य तत्त्वाच्या उपासनेने मग ती उपासना व्यक्ताची असो वा अव्यक्ताची असो, प्रत्येकाने आपली बुद्धी स्थिर व सम करून त्या निष्काम, सात्विक किंवा साम्य बुद्धीनेच केवळ कर्तव्य म्हणून जगातील स्वधर्माप्रमाणेच प्राप्त झालेले सर्व व्यवहार केले पाहिजेत, असे या सर्व म्हणजे सातपासून सतरापर्यंतच्या अकरा अध्यायांचे तात्पर्य आहे.


*अध्याय १८*
स्मृति ग्रंथातून वर्णिलेला 'संन्यासाश्रम' या कर्मयोगात राहात नाही व त्यामुळे मनुस्मृतीवगैरे स्मृतीग्रंथांचा व या कर्मयोगाचा विरोध येण्याचा संभव आहे अशी एक शंका मनात येऊन "संन्यास व त्याग यातील रहस्य काय? ते मला सांगा!" असा अठराव्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुनाचा प्रश्न आहे. भगवान यास असे उत्तर देतात की, संन्यास म्हणजे सोडणे असा मूळ अर्थ असल्यामुळे व कर्मयोग मार्गात कर्मे सोडली नाही तरी फलाशा सोडतात; म्हणून कर्मयोग हा तत्त्वतः संन्यासच होतो; कारण संन्याशाचा वेष स्वीकारून भिक्षा मागितली नाही तरी बुद्धी निष्काम ठेवणे असे जे वैराग्याचे व संन्यासाचे स्मृतींमध्ये सांगितले तत्त्व ते कर्म योगातही कायमच राहते; पण फलाशा सुटली म्हणजे स्वर्गप्राप्तीची आशा राहत नसल्यामुळे यज्ञ यागादि श्रौत (श्रुतींनी सांगितलेली) कर्मे करण्याची जरूरी राहत नाही;अशी दुसरी एक शंका या ठिकाणी येते; म्हणून सदर कर्मे चित्तशुद्धी कारक असल्यामुळे ती ही इतर कर्मा बरोबरच पण निष्काम बुद्धीने करून यज्ञ चक्र लोकसंग्रहार्थ कायम ठेवले पाहिजे; असे आपले निश्चित मत भगवंतांनी सांगितले आहे. याप्रमाणे अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरे झाल्यावर ज्ञान, कर्म,कर्ता, बुद्धी, धृति व सुख यांचे प्रकृती स्वभावानुरूप सात्विक, राजस व तामस असे जे भेद होतात त्यांचे निरुपण करून गुणवैचित्र्याचा विषय पुरा केला आहे. नंतर यापैकी निष्काम कर्म, निष्काम कर्ता, आसक्तिरहित बुद्धी, अनासक्तीपासून होणारे सुख, आणि " अविभक्तं विभक्तेषु " या न्यायाने होणारे आत्मैक्यज्ञान हीच सात्विक किंवा श्रेष्ठ ठरविल्यावर याच तत्त्वावर चातुर्वर्ण्याचीही उपपत्ती देऊन चातुर्वर्ण्यधर्माने प्राप्त झालेली कर्मे सात्विक म्हणजे निष्काम बुद्धीने केवळ कर्तव्य म्हणून करीत राहिल्यानेच मनुष्य या जगात कृतकृत्य होऊन अखेर त्याला शांती व मोक्ष मिळतो असे सांगितले आहे; आणि कर्मे हा प्रकृतीचा धर्म असल्यामुळे ती सोडू नयेत; सर्व कर्ता व करविता परमेश्वरच आहे अशा बुद्धीने त्याला शरण जाऊन सर्व कर्मे निष्काम बुद्धीने करत जा," यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः। तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ।। जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे.(गी.१८.७८) मीच तो परमेश्वर आहे, माझ्यावर विश्वास ठेवून मला भज, मी तुला सर्व पापातून मुक्त करीन असा अर्जुनास भक्तिमार्गाचा निश्चित उपदेश करून भगवंतांनी गीतेतील प्रवृत्तिपर धर्माच्या निरुपणाची समाप्ती केली आहे.
मोक्ष रुपी आत्मकल्याणाच्या आड न येता परमेश्वरार्पणपूर्वक केवळ कर्तव्यबुद्धीने आणि स्वधर्माप्रमाणे लोकसंग्रहार्थ सर्व कर्मे करीत राहण्याचा जो हा योग आहे की युक्ती आहे तिच्या श्रेष्ठत्वाचे हे भगवत्प्रणित उपपादन जेव्हा अर्जुनाने ऐकले, तेव्हा संन्यास घेऊन भिक्षा मागण्याचा मनात आलेला विचार सोडून देऊन, केवळ भगवान सांगतात म्हणून नव्हे, तर कर्माकर्मशास्त्राचे पूर्ण ज्ञान झाल्यामुळे तो स्वेच्छेने युद्ध करण्यास प्रवृत्त झाला आहे. अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करण्यासाठी गीता सांगण्यास सुरुवात झाली व गीतेचा शेवट ही तसाच झाला आहे.(गी.१८.७३)
मी यापूर्वी म्हटल्या प्रमाणे, एका प्राचीन स्मृतीग्रंथामध्ये भगवद्गीतेचे खालील प्रमाणे सार्थ वर्णन केले आहे.
"सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः।
पार्थोवत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृत महत् ।।"
सर्व उपनिषिदे म्हणजे श्री कृष्णासमोरच्या गायी. श्रीकृष्णांनी त्या गायींचे दूध काढून ते वत्साला म्हणजे अर्जुनाला पाजले. ते दूध म्हणजेच गीतामृत.


*सर्जेराव कुइगडे*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू