पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

थंडगार आईस्क्रीम

???? थंडगार आईसक्रीम ????

                       

                        आजकाल वर्षभर केव्हाही, कुठेही आईसक्रीम मिळणे सहज शक्य झाले आहे. समारंभ लहान असो वा मोठा असो, त्यात आईसक्रीमची हजेरी असतेच.आईसक्रीममध्ये विविधता तरी कीती! वेगवेगळ्या चवी, वेगवेगळे रंग, वेगवेगळे प्रकार.

                         आमचं गाव राज्यातल्या एका कोपऱ्यात वसलेलं. सुधारणा व आधुनिकता या दोघी बहीणींना आमच्या गावापर्यंत पोहोचायला उशीरच झाला. मात्र पोहोचल्या तेव्हा ग्रामवासियांनी त्यांचे सहर्ष स्वागत केलं

                           कित्येक वर्षांपर्यंत आम्हाला आईसक्रीम म्हणून काही असतं हेच माहित नव्हतं. तसं म्हटलं तर बाहेरगावी शिकत असलेली आमची भावंडं सुट्टीत घरी आली की आईसक्रीमबद्दल बोलत असत पण आम्ही आमच्याच आयुष्यात मश्गुल असायचो. त्यांच्या सांगण्याने आमच्या मनात काही उत्सुकता निर्माण व्हायची नाही.

                          परन्तु एक दिवस आईसक्रीम आपणहून आमच्या घरापर्यंत येऊन पोहोचले.

                             त्याचं असं झालं की एका संध्याकाळी भाऊ खेळून आल्या आल्या आईला म्हणाला “ आई, आज मला गुणवंत भांडारच्या मालकाने  बोलावले होते.”

                           आईने विचारले “ तुला कशाला बोलावले त्यांनी? तुझ्याकडे काय काम त्यांचं?”

                           भाऊ म्हणाला “ माझ्याकडे काय काम असणार? ते म्हणाले की घरी सांग की त्यांनी जिल्ह्याच्या गावावरून आईसक्रीम बनवायचं भांडं आणलयं भाड्याने द्यायला. जेव्हा हवं असेल तेव्हा घेऊन जा.”

                            आई खुश होऊन म्हणाली “ फारच छान. आणू या आपण ते भांडं आईसक्रीम बनवायला.”

                            संध्याकाळी वडील घरी आले तेव्हा आईने त्यांच्या कानावर ही बातमी घातली.

                           वडील म्हणाले “ अरे वा. फारच छान. मुलांना उद्याच आईसक्रीम बनवायला सांगा.”

                            वडिलांनी दोघा भावांना जवळ बोलावले व आईसक्रीम बनवण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. ते कामात व्यस्त असत म्हणून या गोष्टींसाठी त्यांना वेळ काढणं जमत नसे.

                              दुसऱ्या दिवशी वडील भावंडांची धावपळ सुरु झाली. आईसक्रीमचं भांडं आणल्या गेलं. ते स्वच्छ धुवून वाळायला ठेवलं. पहिलाच प्रयोग होता म्हणून बाहेरच्या कुणाला बोलवायचं नाही असं ठरलं. दोघी बहीणींनी दूध बनवायची जबाबदारी स्वीकारली. दोन प्रकारचे आईसक्रीम करायचे ठरले. एक केशर व बदाम घालून व दुसरे पिस्ता रंग टाकून. 

                         बबन्याने सुताराकडून भरपूर लाकडाचा भूसा आणला व भरपूर बर्फ आणून ओल्या तरट्यात गुंडाळून ठेवला. जाडे, खडे मीठ घरात होतंच.

                           आम्ही मुले बर्फ खाण्यासाठी हपापलो होतो पण बर्फ मागितलात तर आईसक्रीम मिळणार नाही अशी ताकीद मिळाल्यामुळे चूप बसलो.

                           घराच्या आतल्या बाजूची खोली उन्हाळ्यातसुद्धा थंड रहात असे म्हणून तिथे आईसक्रीम करायचे ठरले. खोलीत सतरंज्या अंथरल्या.

                             आईने ठेवणीतल्या बशा काढल्या शिवाय आईसक्रीम  खाण्याचे खास चमचे जे कधीतरी तिने वेगळ्या आकाराचे म्हणून  विकत धेतले होते ते आज प्रथमच उपयोगात आले.

                            एकूण सर्व तयारी झाली होती. दुपारची जेवणं झाली की आईसक्रीम करायला ध्यायचं असं ठरलं.

                             जेवणानंतर आम्ही सगळे आतल्या खोलीत जमलो. धाकट्या भावानी आईसक्रीमसाठी आरडाओरडा सुरू केला. 

                             दोघे वडील भाऊ व बबन्या यांनी मिळून आईसक्रीमचं भांडं तयार केलं.

                                 गणपती बाप्पा मोरया असं म्हणून त्या तिघांनी आळीपाळीने हॅंडल फिरवायला सुरवात केली. आम्हीपण हॅंडल फिरवायची हौस पूरी करून  घेतली.

                              करता करता गरगर फिरणारं हॅंडल  जड होऊ लागलं.जोर लगाके हैय्या म्हणत, घाम पुसत ते तिघंजण घायकुतीला आले. 

                               मोठ्या बहीणीच्या वसतिगृहात मुलींनी मिळून आईसक्रीम बनवलं होतं म्हणून ती स्वत:ला आईसक्रीमच्या बाबतीत जाणकार समजत होती. ती केव्हा हॅंडल फिरवणे थांबवतेय याकडेच सर्वांचं लक्ष होतं.

                               शेवटी तिने स्वत: हॅंडल फिरवून आईसक्रीम तयार असल्याची ग्वाही दिली. हॅंडल फिरवणाऱ्या वीरांनी सुटकेचा निःश्वास टाकला. आईने त्यांची समजूत काढली की  दुसऱ्या वेळेस कमी फिरवायला लागेल .

                            आतापर्यंत आमची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आम्ही आपआपल्या बशा व चमचे धेऊन पुढे सरसावलो. 

                              सर्वांच्या बशा भरल्या गेल्या व आम्ही अधाशासारखे आईसक्रीम खायला सुरवात केली.

                              थंडगार, चवदार, गोड आईसक्रीम, तेही घरी बनवलेलं. आवडलं नाही तर नवलच.

                               तेवढ्यात घरगडी मल्लया खोलीत अवतरला. तो नेहमी दुपारची कामं संपवून, त्याच्यासाठी ठेवलेलं जेवण घेऊन घरी जात असे.

                              घराच्या पुढच्या भागात आम्ही कोणी नाही हे पाहून तो आतल्या खोलीत आला होता.

                               त्याला पाहून आम्ही एकच गलका केला. आम्ही म्हणालो “ मल्लया, आईसक्रीम खाऊन जा.”

 मल्लयाच तो आम्ही सांगितलं आणि त्याने ऐकलं असं कधी व्हायचं नाही.

                               तो म्हणाला “ मला नको. मी असलं तसलं खात नाही. मला घरी जाऊन जेवायचे आहे.”

                               मल्लया खरोखरच रोजचं दोन वेळचं जेवण सोडून काही खात नसे. होता पण शिडशिडीत बांध्याचा. कष्टाळू आणि मेहनती. स्वच्छतेचा महान भोक्ता.

                              शेवटी आई म्हणाली “ अरे मुलं आग्रह करताहेत तर खाऊन बघ.”

                              तो खाली बसला व हात पुढे करत म्हणाला “ द्या थोडंस हातावर. “

                          आमची हसता पुरेवाट झाली. भाऊ म्हणाला “ खूप थंड आहे. हातावर घेतलेस तर थयथय नाचायला लागशील.”

                            शेवटी मल्लयाने हार स्वीकारली. तो म्हणाला “ बरं द्या बशीत पण चमचा नको.”

                             आम्ही त्याला समजावलं “ अरे, हाताने नाही खाता येणार. तो काय वरणभात आहे का? आईसक्रीम चमच्यानेच खायला लागतं. “

                               त्याने दोन चमचे आईसक्रीम तोंडात घातलं आणि स्वारी खुश पडली. तो म्हणाला “ लई गोड लागतं बघा. गरमीचं थंडगार खायला मजा येते. आण्णा, घाला थोडं बशीत.”

                             खाता खाता त्याला त्याच्या बायकोची म्हणजे राजम्माची आठवण आली. तो आम्हाला म्हणाला “ तिला बोलवा नं.”

                              धाकटा भाऊ खिडकीकडे धावला व त्याने ओरडून राजम्माला सांगितले “ राजम्मा, मल्लया तुला बोलवतोय.”

                              राजम्मा काम आटोपून शेजारणाशी गप्पा मारत होती. तिने समज करून घेतला की तिचा नवरा काही काम करायला बोलवतोय. तिच्या अंगाचा तीळपापड झाला. ती तरातरा आली व दोन्ही हात कंबरेवर ठेवून मल्लयासमोर उभी राहिली. तिचा अवतार पाहून मल्लयाच काय आम्ही पण हबकून गेलो.

                           रागाच्या भरात तिने नवऱ्याला विचारले “ कशाला बोलवलं मला?”

                              आईने बाजू सावरली. ती राजम्माला म्हणाली “ अगं राजम्मा, त्याने नाही बोलवलं तुला. आम्ही बोलवलं तुला. आधी मुकाट्याने बसून घे.”

                               आईचा आवाज ऐकून ती नरमली व खाली बसली. आम्ही तिच्यासमोर पिस्ता आईसक्रीमची बशी पुढे केली.

                               तिने विचारले “ हे काय आहे?”

                                मल्लया म्हणाला “ खाऊन बघ.”

                                 तिने दोन चमचे आईसक्रीम खाल्लं आणि खुश पडली.

                                 मल्लया खोचकपणे म्हणाला “ हेच खायला बोलवलं होतं तुला. तू आलीस अंगावर मारक्या म्हशीसारखी.”

                               राजम्मा ओशाळे हसली. नंतर दोघे नवरा बायको मजेत आईसक्रीम खात बसली.

                              तेवढ्यात “ मालक, मालक हो, मालक” असे ओरडत कोंडबा म्हणजे शेतावरचा कारभारी खोलीत शिरला. 

                               भाऊ त्याला म्हणाला “ काय रे वाघ लागला तुझ्या पाठीशी? ओरडायला काय झालं?”

                               कोंडबा म्हणाला “ पुढचं कवाड सताड उघडं. पुढच्या दारी कोणी नाही. भेव वाटलं मला. तुम्ही सगळे आतमध्ये.”

                               आई म्हणाली “ अरे, कुत्रं आहे की दाराशी.”

                                कोंडबा म्हणाला “ ते कुत्रं ढाराढूर झोपलंय.”

                                भाऊ म्हणाला “ ते कुत्रं चोर कोण साव कोण बरोबर ओळखतं. साव असेल तर गुमान पडून रहातं आणि चोर असेल तर उठून लचका काढतं. बरं, हे खाऊन घे.” असं म्हणत आईसक्रीमची बशी त्याच्या समोर धरली.

                              बशी पाहूनच तो गयावया करू लागला. तो म्हणाला “ मी भाकरतुकडा खाऊन आलो. मला नको काही.”

                               आई म्हणाली “ जाऊ दे त्याला. हे कष्टकरी लोक. सकाळची न्याहरी आणि दोन वेळच्या भाकरतुकड्याशिवाय काही खात नाहीत. फक्त सणासुदीला पुरणपोळी तीही तुरीच्या डाळीच्या पुरणाची. आपणच जिभेचे चोजले पुरवतो.”

                              आईसक्रीम पुराण संपलं होतं. आईने बबन्याला सर्व आवरायला सांगितलं आणि ती आराम करायला गेली. तिच्या पाठोपाठ मोठी बहिण पण गेली.

                              दोघा भावांचा दुसराच बेत होता. ते म्हणाले “ जाऊ नका. आपण एक नवीन आईसक्रीम बनवणार आहोत. छान थंड, आंबट, गोड.” आम्ही हावरटासारखे बसून राहिलो.

                               बहिणीने विचारलं “ कसले आईसक्रीम बनवणार?”

                                 भाऊ म्हणाला “ आम्ही दह्याचं आईसक्रीम बनवणार आहोत.”

                                 बहिण म्हणाली “ वेडे आहात. दह्याचं आईसक्रीम बनत नाही.” ती आम्हाला म्हणाली “ तुम्ही इथे कशाला बसलात? जा खेळायला.”

                               असे म्हणून ती निघून गेली. भाऊ स्वयंपाकघरात गेला व दह्याने भरलेला सट घेऊन आला. एका मोठ्या भांड्यात दही ओतले. मग त्यात साखर घातली. दही आंबट होतं म्हणून साखर जास्तच टाकायला लागली. नंतर त्याने लाल रंगाचं सरबत बनवण्यासाठी द्रव होतं ते भरपूर प्रमाणात घातलं. नंतर ते मिश्रण  आईसक्रीम बनवायच्या भांड्यात ओतलं व गरगर हॅंडल फिरवीत बसले. 

                               आम्ही आशाळभूतासारखे आंबट, गोड, थंड आईसक्रीमची वाट पहात बसलो.

                                 आईसक्रीम घट्ट होण्याने नाव घेईना. थोडा वेळ थांबा असे म्हणत भाऊ आम्हाला खेळायला जाऊ देत नव्हता. आम्ही बसून बसून कंटाळलो होतो. त्यावरून आमची भांडाभांड सुरु झाली.

                                  आईला भांडणाचा आवाज आला म्हणून ती बघायला  आली आणि चाट पडली.

                                ती रागावून म्हणाली “ काय चाललंय तुमचं? झालं  नं आईसक्रीम खाऊन ? 

                               आम्ही पण काही कमी नव्हतो. आम्हीच  लगेच माहिती पुरवली की ते दह्याचं आईसक्रीम बनवत होते म्हणून

                               आईच्या रागाचा पारा चांगलाच चढला. ती म्हणाली “ कुणी सांगितलं तुम्हाला दह्याचं आईसक्रीम बनवतात म्हणून? विचारायचे तरी.  चला आटपा लवकर. ते दही खाऊ नका. आजारी पडाल. दह्यादूधाचा असा नाश करू नाही.

                               त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्याकडे अनेक वेळा आईसक्रीम पार्ट्या झाल्या. गावात घरोघरी मित्रमंडळींचे घोळके आईसक्रीमसाठी जमत. आबालवृद्ध एकत्र येत. गाणी, गप्पांना उत येई व सर्वजण मिळून आईसक्रीमवर ताव मारीत.

                              सहभाग, सहकार्य व सहवास हे तीन ‘सह’ समाजातील एकोप्यासाठी फार महत्वाचे आहेत. एखाद्या कार्यात सहभागी व्हायचे, कार्य यशस्वी होण्यासाठी एकमेकाला मदत करायची व एक दुसऱ्याच्या सहवासाचा आनंद लुटायचा हे खऱ्या माणुसकीचे उदाहरण आहे.

                          

                           लेखिका_____नीला प्रधान

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू