पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्वागत 2023!!

तरुण मित्रहो !
प्रथमतः महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व व महान साहित्यकार पु. ल. देशपांडे यांनी सर्वासाठी केलेले एक महत्त्वाचे आवाहन आपल्या निदर्शनास आणतो. पु.ल. त्यांच्या आवाहनात म्हणतात,
"आयुष्यात मला भावलेले एक गूज मी तुम्हाला सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा; पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचे? हे तुम्हाला सांगून जाईल."
पु.ल. देशपांडे यांच्या आवाहनाचा धागा पकडून सन २०२३ चे स्वागत करताना मी सर्व तरुण मित्रांना आवाहन करतो की, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ६४ कलाप्रकार सांगितले आहेत; त्यापैकी आपणास आवडणारा कोणताही कला प्रकार तुम्ही अवगत करा, अर्थातच त्यामध्ये साहित्यकला प्रकाराचा मात्र प्राधान्याने समावेश करा. थोडक्यात सांगायचे तर तुम्ही साहित्यिक होऊन वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारात लेखन करा. त्याच्या जोडीला वेळ मिळेल तेव्हा भरपूर वाचन करा आणि वाचन संस्कृतीला आलेली मरगळ झटकून तिला उर्जितावस्था प्राप्त करून द्या.
मित्रांनो! साहित्य कला ही सर्वश्रेष्ठ कला आहे. इतरांशी संवाद साधण्यासाठीचे, वाचकांशी हितगुज करण्यासाठीचे ते सर्वाधिक सोपे, सहज साध्य आणि अत्यंत प्रभावी असे माध्यम आहे. साहित्यकला शिकायला फारसे प्रयास करावे लागत नाहीत. कागद आणि लेखणी या अत्यल्प किमतीच्या, सहजा सहजी कुठेही उपलब्ध होणाऱ्या साधनांनी साहित्य निर्मिती करता येते. आता तर आपल्या मोबाईलवर आपण लेखन करू शकता आणि ते जतनही करून ठेवू शकता. आपले साहित्य विविध मार्गांनी इतरांना ऐकवून साहित्यिक त्याचा प्रचार आणि प्रसार करू शकतो. साहित्य कला म्हणजे काय? हे मी तुम्हाला संक्षेपाने समजावून वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारांची माहिती करून देतो; त्यातून तुम्हाला आवडलेल्या वाङ्मय प्रकारात तुम्हाला स्फुरणारे लेखन करा.
मित्रहो, "अक्षर आणि अक्षरांनी सिद्ध होणारा शब्द हा साहित्य कलेचा आदिबिंदू असतो. साहित्याचे माध्यम म्हणजे लिपी व भाषा. साहित्य कला ही गूढ (Abstract) असते, तर बऱ्याचदा ती व्यक्तीनिष्ठ ( Subjective) असते. ती काहीशी अमूर्त असते. साहित्य कलेचा आस्वाद घेताना रस, गंध, स्वाद, नाद, स्पर्श असा अनुभवांचा मोठा सहभाग असतो. आपल्या अनुभूतींचा अवकाश अधिकाधिक सूक्ष्म, सखोल, समृद्ध आणि सर्वंकष व्हावा अशी साहित्यिकाची मनोमन इच्छा असते. आपल्याला वश झालेल्या जाणीवा नि अनुभूती स्वतःजवळ न ठेवता त्या इतरांना अनुभवायला देऊन अनुभूतींचा परीघ वाढवत न्यायचा अशी साहित्यिकाची भूमिका असते. गद्य लेखन स्वभावतःच वर्णनात्मक आणि विश्लेषणात्मक असते. पद्य लेखन किंवा काव्य हा वाङ्मय प्रकार गेय स्वरूपाचा असतो.
साहित्य कलेचे कथा, कविता, कादंबरी, निबंध, नाटक, ललित लेख, व्यक्तीचित्रे, आत्म‌कथन असे बहुविध प्रकार असतात.
पु.लं.नी विविध कला प्रकारांशी मैत्री करा असा संदेश दिला आहे. कलेशी केलेली मैत्री ही शुद्ध स्वरूपाची असते. कारण मानवी स्वभावात जी अनेक वैगुण्ये असतात, उदाहरणार्थ स्वार्थीपणा, अशिष्टता, तिरस्कार, विसरभोळेपणा, मूर्खता, भ्रमिष्टता, गुंडगिरी, नैराश्य, अस्वस्थता, भ्याडपणा वेडसरपणा, आळस, हटवादीपणा,अहंभाव, यापैकी कोणत्याही वैगुण्याचा या मित्रांच्या स्वभावात लवलेशही नसतो. त्यामुळे कलेशी केलैली मैत्री, निखळ, निरपेक्ष नि निर्विष स्वरूपाची असते. या मैत्रीत आपणाला कुठल्याही प्रकारचा धोका संभवत नाही. साहित्य साधनेत लेखकाची समाधी लागते. सर्वसाधारणपणे ज्येष्ठ नागरिकांना वेळ कसा घालवावा असा प्रश्न पडलेला असतो; मात्र जे आमच्यासारखे वयस्कर कला साधक असतात; त्यांना हा प्रश्न सतावत नाही. आमच्या कला साधनेत आम्ही इतके निमग्न असतो की आम्हाला वेळ पुरत नाही.
म्हणून माझ्या तरुण मित्रांनो, मी आपणास पुन्हा आवाहन करतो की आपण साहित्य क्षेत्रात लेखक,साहित्यिक म्हणून या. उत्तम दर्जाचे, सकस लेखन करा. शॉपीजेन सारख्या संस्था आपले लेखन प्रसिद्ध करण्यासाठी पुढाकार घेतील, तुमचे लेखक म्हणून नाव होईल तेव्हा ही संधी दवडू नका. साहित्यसेवा करून आपले व्यक्तीमत्व खुलवा! आपले भविष्य उज्ज्वल करून बहुमान मिळवा!!

*सर्जेराव कुइगडे*
९८१९१९९९१४

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू