पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बालदिन

 

बाल दिन

 

आमच्या शाळेत बाल दिन दर वर्षी आनंदाने व उत्साहाने साजरा केल्या जात असे.

त्या एका वर्षी बाल दिनाच्या दिवशी मेळ्याचे आयोजन करायचे ठरले. शिक्षक वर्ग व बाकीच्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे स्त्रोत वाहू लागले. शाळेची कुठलीही गोष्ट उत्साहाने उचलून धरायची हा आमचा पिंड होता.

या मेळ्याची विशेषता ही होती की मेळा फक्त आमच्या शाळेच्या मुलामुलींसाठी होता. मेळ्यासाठी पालकांना आमंत्रण नव्हते. म्हणून सकाळची वेळ ठेवली होती.

मेळा आमच्याच शाळेच्या विस्तृत मैदानात भरणार होता. मेळ्यांत खेळाचे व खाद्यपदार्थांचे स्टाल लावायचे ठरले.

मेळ्याच्या संदर्भात मुख्याध्यापकांनी मिटींग बोलावली. नेमके त्याच मीटींगला मी आणि फरनाझ उशीरा पोहोचलो. तोपर्यंत बहुतेक खाद्यपदार्थांचे व खेळांचे वाटप झाले होते.

फरनाझ मला म्हणाली “ स्टाल आणि तोही खाण्याच्या पदार्थांचा लावायचा असं आपलं ठरलंय. हो की नाही?” मी होकार भरला व म्हटले “ बहुतेक सर्वच मुलांच्या आवडीचे पदार्थ वाटल्या गेलेत. मग आपण काय विकणार?. ती म्हणाली “ आपण जिलबी विकू.”

मी तिला आश्चर्याने विचारले “ तुला जिलब्या बनवतां येतात? मला त्यातलं ओ की ठो कळत नाही. खायला मात्र आवडतात”

फरनाझ म्हणाली “ मला तरी कुठे येतात? अगं विकत आणायच्या “

मी म्हटले “ त्यात आपलं काय contribution?

ती म्हणाली “ विचार कर. आपलं सुंदर, मोकळं मैदान. हवेत हलकासा गारवा. सर्वजण एकत्र आलेले. हातात जिलबीचा द्रोण घेऊन हिंडत, फिरत खायला कीती मजा येईल. ती मजा आपण मुलांना देणार आहोत. “

मला तिचं म्हणणं पटलं व आम्ही मुख्याध्यापकांना तसं सांगितलं. ते ऐकून सर्वांनी एकच गलका केला. आम्हाला पण हव्यात जिलब्या. सकाळी एक प्लेट बटाटेवडा आणि एक प्लेट जिलब्या. मस्त नाश्ता होईल.

या गडबडीत शाळेचा व्यवस्थापक महेश उठला व म्हणाला “ महोदय, या वेळेस सपोर्ट स्टाफला पण स्टाल लावायचाय.”

मुख्याध्यापक म्हणाले “ पण त्यांना तर मेळ्याच्या दिवशी जास्त काम असेल तेव्हा स्टाल सांभाळायला त्यांना सवड कशी मिळेल?”

महेश म्हणाला “ मी बघतो कसं जमवायचं ते. त्यांच्या कामांची हेळसांड होऊ देणार नाही पण त्यांना भलताच उत्साह आलाय मुलांसाठी काही करायचा तरी त्यांचा हिरमोड होऊ नये.”

मुख्याध्यापकांनी मान्यता दिली आणि विचारलं “ विकणार काय आहात तुम्ही?”

त्यावर महेश म्हणाला “ ऊसाचा रस विकणार आहोत आम्ही. एकजण गावी गेलाय . त्याचं गुऱ्हाळाचं मशीन मिळालय भाड्यानी. ऊस बाजारात मिळेल. आलं, लिंबू घालून झकास स्वच्छ ऊसाचा रस देऊ सर्वांना व तोही स्वस्त.”

ऐकणाऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. एकच आरडाओरडा सुरू झाला. “ आम्हाला पण हवा. भरपूर ऊस आण.”फक्त मुलांपुरता नको.”

मिटींग बरखास्त होणारच होती की यामिनी ने खुसपट काढलं “ महोदय, मुलांनी गणवेशात यायला हवं का? बाल दिवस म्हणून त्यांना चांगला पोशाख घालावासा वाटणार.”

त्यावर मुख्याध्यापक म्हणाले “ सुरक्षेच्या दृष्टीने मुलं गणवेशात आलेली बरी. तसा शाळेचा नियम आहे. तो शिथील करून चालणार नाही.”

यावर रंजना म्हणाली “ माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. सर्व मुलांनी व आपण सर्वांनी headgear म्हणजे शिरोभूषण घालून यायचे. कीतीतरी वेगवेगळे प्रकार आहेत. पगडी, टोपी, फेटा, मुकुट. सर्वांनी तिची कल्पना उचलून धरली. प्रत्येक वर्गाच्या वर्गशिक्षिकेने आपआपल्या वर्गांना शिरोभूषण म्हणजे काय ते समजावून सांगायचे ते ठरले.

विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला. ज्यानी त्यानी वाचनालयाकडे धाव घेतली.

फरनाझ महा कल्पक. ती मला म्हणाली “ आपल्या दोघींसाठी मी बनवून आणीन. मी म्हटले “ बरं झालं. मला माझ्या मुलींसाठी पण बनवायला लागेल. माझ्याकडे रंगीबेरंगी खडे आहेत. कार्डबोर्डचे मुकुट बनवून त्यावर खडे चिटकवले की छान दिसेल.”

१४ नोव्हेंबरची सकाळ उजाडली. घरची कामं उरकून सर्वांनीच शाळेची वाट धरली. शाळेचे मैदान तर झकपक तयार होऊन जणू आमची वाट पहात होतं. वर स्वच्छ निळं आकाश, आजूबाजूला हिरवीगार वनश्री आणि मधोमध मैदान. मन प्रसन्न झालं.

व्यवस्थापक महेशने मेळ्याची जय्यत तयारी केली होती. आम्ही आपआपले स्टाल सजवले. सर्व व्यवस्था चोख होती. स्काउट व गाईडस आळीपाळीने सर्वत्र खास करून लहान वर्गाच्या मुलांकडे लक्ष ठेऊन होती.

सेक्रेटरीबाईंच्या हस्ते उद्घाटनाचा छोटासा समारंभ झाला व मेळ्याला सुरवात झाली.

मुलांनी तऱ्हेतऱ्हेच्या टोप्या धातल्या होत्या. काहींनी वेगवेगळ्या पद्धतीच्या पगड्या घातल्या होत्या. बऱ्याच जणांनी घरी बनवलेले मुकुट घातले होते. एकूण काय की शिरोभूषणाच्या कल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

???????? शाळेच्या प्रयोगशाळेत काम करणारे रत्नाकर व सुभाष विदुषकाचा पोशाख घालून आले होते व मुलांची भरपूर करमणूक करत होते.

जशी मेळ्याला सुरवात झाली, मुले आपल्या पसंतीच्या स्टालपुढे रांगा लावू लागली. खेळाच्या स्टालसमोर आनंदाचे, उत्साहाचे कारंजे उडू लागले.

 

 

 

 

 

 

 

 

आम्ही पाच किलो जिलबी आणली होती. तसं आमचे दोघींचे नवरे बाजारहाट सांभाळत असल्यामुळे, आमचं या बाबतीतले ज्ञान यथातथाच होतं. त्यामुळे झालं काय की पाच किलो जिलबी बघता बघता संपली. आमचं गिऱ्हाईक म्हणजे खालच्या वर्गातील मुले. शिवाय स्टाफपैकी बहुतेकांनी आम्हाला अगोदरच पैसे देऊन जिलब्या बुक केल्या होत्या.

मी मोठ्या हिकमतीने आमच्या माळ्याला गाठलं व त्याला गोकुळभाईच्या दुकानातून तीन किलो जिलबी आणायला सांगितली व सांगितले लवकरात लवकर परत ये. मुलं रांगेत उभी आहेत.

माळी बिचारा घामाघूम होऊन जिलब्या घेऊन आला व म्हणाला “ बाई, ते सेठ म्हणाले की कीती फेऱ्या मारणार त्यापेक्षा मी हलवाई सामान घेऊन पाठवतो. तो तिथल्यातिथे जिलब्या काढून देईल.”

आम्ही दोघी माळ्यावर ओरडलो” अरे, नफा तो घेईल की. आम्हाला काय मिळणार?”

तो म्हणाला “ तुमचं बरोबर आहे. मी जातो. आमचा पण स्टाल आहे.”

त्याचं असं होतं की मेळ्यापासून होणारा नफा शाळेच्या वाचनालयाला दिल्या जाणार होता व जास्तीत जास्त नफा मिळवणाऱ्या स्टालला बक्षिस दिलं जाणार होतं. म्हणूनच आमच्यात चुरशीची भावना निर्माण झाली होती.

तीन किलो जिलबी बघता बघता संपली पण मुलांची रांग संपेना. मी महेशची मदत ध्यायची असं ठरवलं.

ऊसाच्या गुऱ्हाळाचं दृश्य पाहून मी हसत सुटले. महेश घामाघूम होऊन मुश्कीलीने चाक फिरवत होता व त्याचा चेला ऊस चरकात घालत होता व मुलांची लांबच लांब रांग ऊसाच्या रसाची वाट पहात उभी होती.

मला पहाताच महेश म्हणाला” दोन गोष्टी मागू नकोस. उसाचा रस व कोणी माणूस काही आणायला.

पुढे तो म्हणाला “ बाजारातून आणलेला ऊस बघता बघता संपला. आता बाजारात ऊसच नाही कारण बाकीच्या गुऱ्हाळवाल्यांनी ऊस विकत घेतला. आता मी माझ्या चेल्यांना त्यांच्याकडून वाटेल ती किंमत देऊन ऊस विकत घेऊन यायला सांगितले.नफा वगैरे सोड. माझ्या खिशातलेच पैसे खर्च होत आहेत.पण तेही ठीक आहे. ऊस मिळाल्याशी कारण. मुलांची निराशा व्हायला नको.

बाकीच्या स्टालची हीच गत होती. बहुतेकांचे सामान संपलं होतं पण मुलांच्या रांगा संपत नव्हत्या आणि त्यांना आज निराश करून चालणार नव्हतं कारण आज बाल दिवस होता. त्याकरिता प्रत्येकजण येण केण प्रकारेण जास्त सामान मागवण्याचा प्रयत्न करत होते.

तेवढ्यात मला आशेचा किरण दिसला. माझा नवरा मुलींना मेळ्यासाठी घेऊन आला. तो येताच मी म्हटलं “ बरं झालं तुम्ही आलात.”नवराच तो, त्याने लगेच ओळखलं की काही काम आहे.

तो म्हणाला “लांबण लावू नकोस. काय काम आहे ते सांग.” मी म्हटलं “ जिलब्या संपल्यात आणि मुलं बिचारी उभी आहेत.”

तो म्हणाला “जातो. मुलींना बघ. “आणि थोड्याच वेळात एक भलं मोठं पुडकं घेऊन आला. त्याला येवढ्या लवकर आलेले पाहून फरनाझने विचारले “ येवढ्या लवकर कसे आले?” मी म्हटलं “ स्कूटर दामटली असणार. दुसरं काय?”

नवरा म्हणाला” आठ किलो जिलबी आहे. विका आता जेवढी विकायची तेवढी. तीन किलो तयार होत्या आणि पाच किलोची एक ॲार्डर तयार होती.मी आणली ती उचलून. गोकुळभाई आपला दोस्त आहे. तो काय बोलणार? मी चाललो. मला फुटबॅालची मॅच बघायला जायचयं.” असं म्हणून तो नवरा नावाचा माणूस लांब टांगा टाकत निघून गेला.

मी आणि फरनाझ जोमाने जिलबी विकू लागलो. भरपूर माल होता. संपायची काळजी नव्हती. ज्यांनी अगोदर पैसे दिले त्या सर्वांना त्यांची ॲार्डर पोहोचवली. करता करता मुलांची रांग संपत आली होती. फरनाझचा मुलगा आणि माझ्या मुली मजेत जिलबीचा समाचार घेत होत्या.

काही काळ सुस्तावलेल्या मेळ्यांत परत चैतन्य भरले होते. तेवढ्यात गाण्याचे बोल कानावर पडले. वरच्या वर्गातील मुले मुली गोलाकार फेर धरून, टाळ्या वाजवीत गात व नाचत होती. अधिकाधिक मुले, शिक्षक वर्ग सामिल होत होता. गोलाकार वाढत होता.

वाऱ्याच्या झुळकीबरोबर गाण्याचे बोल ऐकू येत होते. “ हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब. हम होंगे कामयाब एक दिन. है मन में विश्वास. पूरा है विश्वास.हम होंगे कामयाब एक दिन.

खरंच एक दिवस ही आमची भावी पीढी मजबूत, कर्तव्यदक्ष, कार्यक्षम, संवेदनाक्षम बनेल व मातृभूमित मानवतेची, ऐक्याची व समतेची ज्योत तेवत ठेवेल.

नीला प्रधान

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू