पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तो घरी नसतो तेव्हा

#तो_घरी_नसतो_तेव्हा...!


आज मनाची तगमग अगदी टोकाला गेलेली. वातावरणात सुद्धा अचानक झालेला बदल जाणवत होता. दिवसभर रणरणत्या उन्हाने घामाच्या धारा वाहतच असतांना अचानक थंड हवेची झुळूक अंगाला रखरखता स्पर्श करुन गेली. आपण आपलं मन नेहमीच मारत असतो असं सारखं वाटत होत. ह्याला जबाबदार आपणच म्हणून सगळा रोष स्वतः वरचं ती घेत होती.... 


घड्याळाचा काटा नेहमी प्रमाणे १०ला टेकला होता. त्याची येण्याची वेळ झाली होती, पण विमान उशिराने निघाले ,हे तिला कुठे ठाऊक..! ती मात्र त्याच उत्कंठेने त्याची वाट बघत होती. उशीर होईल म्हणून साधा एक फोन तर करावा म्हणून मनातच त्याच्यावर त्रागा करीत होती. फिरस्तीवर असतांना तो निघायच्या आधीच सगळे तिकीटच वेळापत्रक ती आधीच विचारुन घ्यायची. घड्याळाचा काटा आता १२ला पोहोचत होता. तिचे डोळे केविलवाणी आशेने दाराकडे लागले होते. 


खर तर हल्ली त्याला वेळ कुठे असतो बोलायला..?मुळात कोण कोणाला वेळ देत आहे किंवा नाही ह्याच गणित करणच चुकीचं आहे. वेळ मिळाला तरी एकतर तो टीव्ही समोर दिवसभराच्या घडामोडी बघत बसलेला असतो, नाही तर हातात मोबाईल फोन घेऊन असतो. कधी फक्त घरात दोघांचच राज्य असलं तरी काय बोलावं हा प्रश्न असतो त्याला... माझ्याशी बोल म्हटलं तर... काय बोलू? तूच बोल... मी ऐकतो म्हणत...एका वाक्यात उत्तर देऊन संवादाला पूर्णविराम लावतो...तो आता जरा जास्तच बदलला आहे... पूर्वीपेक्षा कामाचा व्यापही खूप वाढला आहे म्हणा त्याचा...तरी आठवणीने, कसा गेला दिवस म्हणून विचारपूस करतो आपली, हे काय कमी आहे..!


पण काहीही असो...मी रागवले आहे ,नाराज आहे ह्याकडे त्याचे लक्षच नसतं...आपल्या मधे नात्याची डोर जरा सैल झाली आहे, ह्याचा जणू विसरच पडला आहे त्याला... तिच्या मनात कितीतरी विचारांची उलाढाल होत असते पण त्याला कुठे काय पडली आहे... ती सतत अनेक विचारांचा कोडं मारा आपल्या अंतर्मनात करीत होती. 


तिची नजर सारखी फोन कडेच जात होती. लग्न जुळले तेव्हा फोन करून आता तूच मला रोज पहाटेला उठवायचे असा त्याचा हट्टच असायचा. त्याच्या अशा प्रेमळ वागण्याने तिचे मन बहरून जायचे. मग हळूहळू एकमेकांशी बोलायला दिवस कमी पडायला लागला. सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही मला तुझी आठवण आली तर माझा फोन तू घ्यायचा, अशी प्रेमळ सक्त ताकीद सुद्धा देणारा तूच होतास. कधी तुझ मला हसवणे, माझ्या नाकवरच्या शेंड्याला आलेल्या रागाला रोमँटिक होऊन चटकन बदलणे तुला चोख जमायचं. 


त्याला तासनतास फोन वर तिच्याशी बोलायला आवडायचं, आणि आज उशीर होईल म्हणून साधा मेसेज सुद्धा नाही... काळजीने तिला व्याकूळ केले होते. कारण रोजच्या ठरलेल्या मेसेजची सवय असलेल्या तिला त्याच्या अशा तुटक वागण्याचा फार त्रास होत होता. कधी कधी अभ्यासाची पुस्तकं बाजूला ठेऊन त्याच्या बरोबर तासन तास चँटिंग मधे कधी जायचे समजतच नसे. कधी भांडण..कधी रुसण....कधी हसण आणि बोलता बोलता तो विरह असह्य झाला तर रोमँटिक होऊन तिच्यावर कविता करणं तर त्याचा आवडीच..!


मी तुझ्या शिवाय आता नाही राहू शकत असे म्हणून त्याचं अधिर होण ... सारच तिला आवडायचं...एकदा तर कहरच केला... वाढदिवसाला भेटू शक ला नाही म्हणून दर तासाला फोन केला...हे सगळच तिला हवंहवंस वाटणारं...का नसेल बरं...! जगावेगळच होत त्याचं प्रेम...!


बघता बघता त्याचा राग कधी त्याच्या आठवणी गिरविण्यात गेला तिला कळलेच नाही...इतक्यात मोबाईलची मेसेज टोन वाजली... अर्थात मेसेज त्याचाच होता...


"सॉरी, मेसेज करायला उशीर झाला. माझं विमान गेल्या तासाभरापासून आकाशात गिरकी घेत होत. पोहोचतो आहे एका तासात...आज झोपू नकोस...केक कापायचा राहिला आहे अजून... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...प्रिये..."


त्याच्या मेसेजने  तिच्या मनाची सगळी उलथा पालथं केली... 


तुझ्या विना एक एक क्षण सुना वाटतो...

 तू जवळ नाहीस म्हणून एकटेपणा जास्तच खलतो...

 तू म्हणजे माझे जग, 

तुझ्या विना हृदयाचा श्वासही मुका झालेला वाटतो... 


अगं बाई...मनाची कळी आता चांगलीच खुलली होती...त्याच्या एका मेसेजने पुन्हा एकदा धो- धो पावसात ती चिंब भिजली होती...


© नेहा खेडकर.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू