पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शिवाईच्या निमित्ताने

 

दिवाळीला खाद्यफराळासोबत स्वाभाविकच, अक्षरफराळालाही तेवढ़ाच मान असतो. आणि मराठी माणसाच्या घरची दिवाळी ही दिवाळी अंकाच्या विविध साहित्यिक विधांने समृद्ध होत असते. या सुरेख आणि मनस्वी परंपरेसाठी जर इतिहासात डोकावले, तर १९०५ मध्ये बाळकृष्ण विष्णू भागवत यांचे मित्रोदय मासिक ज्याचा नोव्हेंबर अंक दिवाळीप्रित्यर्थ होता त्यास आणि रीतसर पुढ़े काशिनाथ रघुनाथ मित्र यांच्या १९०९ मधील मनोरंजन दिवाळी अंकाला या परंपरेचा पाया मानला जातो.
या काळात जसजसे मराठी वाचकांच्या वाचनाचे आणि उत्तम साहित्याचे स्वागत करण्याचे दालन विस्तारित होत गेले तसेच दिवाळी अंकातही कथा, कविता, नाटक, पर्यटन, राजकारण, ललित लेखन, समीक्षा, अर्थकारण, आंतर्राष्ट्रीय संबंध यावर केन्द्रित दिवाळी अंक सुद्धा येणे सुरु झाले. आणि आज आपण ऑडियो आणि डिजिटल दिवाळी अंक यांचा आनंदही तेवढ्याच उत्साहाने घेत आहोत. इतकेच नाही, तर दिवा प्रतिष्ठान अर्थात दिवाळी अंकांच्या संपादकांची संघटना असून यांचे सुद्धा विशिष्ट साहित्यिक अधिवेशन भरवण्यात येऊन विविध परिसंवाद, चर्चासत्रे इत्यादि नियमित होतात हे एका परंपरेचे मुकुटमणि म्हणावे.
तर आता वळूया, मी निवडलेल्या दिवाळी अंकाकडे. निवडलेला अंक आहे, शॉपिजेन तर्फे प्रकाशित दसरा दिवाळी विशेषांक शिवाई. खरं तर एक सुरेख आणि आगळेवेगळे इलेस्ट्रेशन जे सारंग क्षीरसागर यांनी केले आहे, पूर्णपणे लक्ष्यवेधी आणि सणाला शोभणारे आहे. विशेषांकाचे वैशिष्ट्य असे, कि काव्य, कथा, लेख, आरोग्य, व्यक्तिचित्र, मुलाखत, बालविश्व, नाट्यछटा, प्रवास वर्णन आणि पाककृति या सर्व चवीने सज्ज तरीही आरोग्याला उत्तम असली मेजवानी देणारा हा विशेषांक आहे.
काव्य विभागात सुरेख कविता आहेत, ज्यात विजयादशमीला उद्देशून सुद्धा उत्तमोत्तम सृजन दिसून येतं. त्याच सोबत दिवाळी, जीवनाचे कर्तव्य, सामाजिक भान, मनातील भावनिक चढ उतार आणि वैचारिक स्वरुपाने जपलेले वैविध्य या काव्य विभागात जपलेले दिसले.
कथा विभागात दिवाळी अंकाला शोभतील अशा आणि आजच्या जीवनशैलीत समरसून असलेल्या विविध कथा आहेत. तृप्ति सारखी कथा, ज्यात वयस्क मंडळींना कितीही उच्चतारांकित असले तरीही बाहेरच्यापेक्षा घरातील अन्नाची चव कशी तृप्त करते, याचे रुचकर वर्णन आहे. सेल्फी सारखी कथा लिव इन कडे गेल्यानंतरही वात्सल्याच्या आनंदाला साद देत घरात परत येत असलेल्या मुलीची आहे. रानभूल सारखी रहस्यकथा वेगळाच आस्वाद देते. तसेच शकुन, आणि एक फिरकी, फुलपाखरु सारख्या सामाजिक कथा सुद्धा आहेत.
विविध वैचारिक लेख या अंकाचे वैभव द्विगुणित करतात, त्यात डॉ. वसुधा गाडगिळ यांचा आपट्याच्या पानावरील विशिष्ट लेख ’निसर्गातील पिवळा कांचन" लक्ष्यवेधी आहे. त्याशिवाय अंतरा करवड़े यांचा महाप्राण निराला रचित ’राम की शक्ति पूजा’ यावर आधारित ’आत्मिक राम आणि शक्तिपूजनातील निहितार्थ’ या ललित लेखाला स्थान मिळाले आहे.
या लेखमालिकेत साहित्याच्या प्रगतिसाठी व्हॉट्सएप्पचे योगदान असा पूर्णिमा प्रदीप हुंडीवाले यांचा सोशल मीडियाच्या महत्वाला पटवून देणारा लेखही दिसतो तर आजचा रावण जजमेंटल आहे, मनावर विजय, कॉन्टिनेन्टल उदरभरण पासून तर हुंडा पद्धति आणि घटस्फोट व शाश्वत व्यवसाय सारखे माहितिपरक लेख सुद्धा शामिल केल्याने भरपूर मनोरंजन आणि ज्ञानवृद्धि पण होते.
यापुढ़े जाता आरोग्यवार्ता, यात मधुमेह संबंधी माहिति देणारे चिकित्सक आहेत तर भेसळयुक्त अन्न पदार्थ कसे ओळखावे ही माहिति सुद्धा आहे. नो साइड इफेक्ट थैरेपी देत असलेल्या नर्मदा परिक्रमा केलेल्या डॉ. सुरुचि नाईक पण आहेत.
व्यक्तिचित्रांमध्ये, डॉ. टायरॉन हेज यांची आश्चर्यकारी कामगिरी कळते तसेच वीरांगना रमाताई तेलीण बद्दल माहिति सुद्धा मिळते.
याच बरोबर कैप्टन ऎश्वर्या विकास ठाकुर यांची प्रेरणादायी मुलाखात खूप काही शिकवून जाते.
बालविश्वात दोन लहान कथा लक्ष्यवेधी आहेत. तसेच प्रवास वर्णनात नीदरलैण्ड्स आणि ओमान या देशांची माहितिपरक भटकंती उत्तम प्रकारे पर्यटनाचा आनंद देते. आणि शेवटी अनेक लज्जतदार पाककृति दिवाळीच्या वेळेस काहीतरी वेगळे करण्याची हौस भागवण्यास मदत करतात.
या दिवाळी अंकात मधून सुंदर सुविचार आहेत आणि सुरेख रेखाचित्र आहेत ज्यांच्यामुळे अंकाचे सौन्दर्य खुलून दिसते. छपाईचे फॉन्ट्स ठळक आणि सर्वसामान्य दिवाळी अंकांपेक्षा थोड़े मोठे असल्याने ज्येष्ठ मंडळी सुखावते. शॉपिजनच्या लेखकांसाठी असलेल्या विविध प्रकाशन योजना उत्तम प्रकारे नियमांसह दिल्या असल्याने नवीन लेखकांसाठी सुद्धा महत्वाच्या ठरणार.
संपादकाच्या दृष्टिने पाहिले, तर संपादक आणि शॉपिजनच्या मराठी विभाग प्रमुख, ऋचा कर्पे यांनी या अंकासाठी भरपूर श्रम केले असून भरपूर वैविध्य आणि नावीन्य देण्याचे प्रयत्न केले आहे. स्थापित, नामवंत आणि नवीन व प्रयोगवादी, सर्व प्रकारच्या लेखकांना आपण बरोबरीने स्थान दिले असून यात वर्तनीशुद्धिवर सुद्धा श्रम केलेले दिसतात.
एकूण संपूर्ण असलेला हा अंक आणिक सुसज्ज होणार जर यात आतील पानात रंगीत चित्रे असतील, बाल विभागात काही कार्टून किंवा चित्रकथा असतील, व्यंग्य विभाग असल्यास वैविध्य वाढ़ेल आणि एखादी वैश्विक कथा जर भाषांतर करुन असेल, तर अंकाचे सुफळ संपूर्ण होणार हे म्हणणे अतिशयोक्ति ठरणार नाही.
आता, शिवाई या अंकाच्या निमित्ताने एक दोन बिंदु एकूण दिवाळी अंक आणि साहित्य व वाचन संस्कृति विषयी या समृद्ध मंचावरुन बोलाव्याशा वाटतात.
पहिले असे, कि डिजिटल आणि ऑडियो स्वरुपात दिवाळी अंक आले, आपण नवीन तंत्रज्ञान म्हणून त्यांचे स्वागतही केले, पण एक प्रश्न दर दिवाळीला बोचरा होत चालला आहे. तो असा, कि या समृद्ध संस्कृतिमध्ये, पुढ़ील लेखक, संपादक, चित्रकार, कथाकार, कवि, गायक तयार कसे होणार आणि संस्कृतिचा वारसा पुढ़े कोण घेऊन जाणार, या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर कुठे आहे, आणि हे संस्कार देण्यात आपण कितपत यशस्वी होत आहोत? आज हा वारसा आपल्याला मोठ्या भाग्याने मिळाला आहे आणि यात आपल्या श्रमाचे अमृत भरुनच हा संस्कृतिघट पुढ़ील पीढीला देणे आपले कर्तव्य आहे. तेव्हां श्रमाचे अमृत तर गोळा होणारच, पण हा संस्कृतिघट तेवढ्याच सन्मानाने पुढ़े नेणारे हात सुद्धा तयार झाले पाहिजे, आणि त्यासाठी आपण काही वेगळे करावे, असे वाटते.
दुसरी गोष्ट म्हणजे, इंटरनेटवर मराठी दिवाळी अंक आणि या समृद्ध परंपरेच्या सध्याच्या परिस्थितिबद्दल खूप काही सकारात्मक वाचनात येत नाही. ज्या दिवाळी अंकांच्या समृद्ध परंपरेचा झेंडा आम्ही इतर समाजबंधुंसमोर फडकावतो, त्याच अंकांविषयी विषम परिस्थितिचा प्रकार दिसतो. यात जाहिरातदारांच्या अतिरेकी दबावाखाली असलेले संपादक किंवा ढासळलेला साहित्याचा प्रकार, मात्रा जास्त असल्यामुळे कमी झालेली गुणवत्ता यावर भरपूर लिखाण झालेले आहे. तेव्हां याबद्दल काही एकत्रित प्रयत्न झाले पाहिजे आणि हा समृद्ध वारसा नेहेमीच सांस्कृतिक श्रीमंतिच्या मानात राहिला पाहिजे, हे सुद्धा आपलेच कर्तव्य आहे. यासाठी प्रयत्नशील असणे आणि आपापल्या परीने सकारात्मक बाजू जपणे हे महत्वाचे वाटते.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू