पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शेवंतीची वेणी

शेवंतीची वेणी

- सौ. मानसी सोनपेठकर

 

        ...... ती आज आली बसस्टॉपवर पण शेवंतीची वेणी केसांवर माळून. तिच्या जांभळ्या रंगाच्या ड्रेसवर ती पिवळ्या रंगांची शेवंतीची वेणी आज अधिकच खुलून दिसत होती.

        ती बसने दररोज जाणे येणे करीत असे. हुतात्म्यांच्या मुलांसाठी कार्य करणाऱ्या ‘माझा देश माझा अभिमान’ या संस्थेत ती विना मानधन लिपिकाचे कार्य करीत होती.

        दररोज ती ज्या बसने संस्थेच्या कार्यालयात जात असे, त्याच बसमधून एक निवृत्त सेनाधिकारी देखील जात असत. स्वा. सावरकर सैनिक प्रशिक्षण संस्थेत ते वयाची सत्तरी ओलांडल्यावर देखील प्रशिक्षण देण्यासाठी विना मानधन कार्य करीत होते. त्यासाठीच त्यांना रोज जाणे येणे करावे लागे. दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते. चाणाक्ष सेनाधिकारी तिला रोज पाहत असत. का कुणास ठाऊक पण त्यांना तिला पाहिले की, त्यांच्या मनातील वात्सल्यभाव जागृत होई.

         आज तिची शेवंतीची वेणी पाहून त्यांना काहीतरी विशेष जाणवत होते. आज तिचा नेहमीचा अबोली, मोगरा किंवा जुईचा गजरा केसांवर माळलेला दिसत नव्हता. काही संदर्भ असेल का त्या शेवंतीच्या वेणीचा आणि तिच्या चेहऱ्यावरच्या उत्कट आनंदाचा, चेह-यावरील तजेल्याचा,  प्रसन्नतेचा? ..... त्यांचे मन झाले विचारमग्न. दिवसभर ते तिचा आणि तिच्या शेवंतीच्या वेणीचाच विचार करीत होते. मग नेमके काय बरं असेल हे गुपित .... सारखा तोच तोच विचार आणि शेवंतीची वेणी माळलेली तिचीच मूर्ती डोळ्यांसमोर.... या विचारचक्रात त्यांच्या नयनांवर निद्रादेवीने कधी पांघरूण घातले ते त्यांनाही समजले नाही. स्वप्नातही शेवंतीची वेणी... आणि त्याभोवती पिवळा प्रकाश... तेजस्वी वलय... पहाटे जाग येताच 'तिच्या शेवंतीच्या वेणीमध्ये काहीतरी विलक्षण ओजस्विता, तेजस्विता असावी'  असे त्यांना मनोमन वाटले.

        अन् काय तो दैवी योगायोग ....  दुसऱ्याच दिवशी त्यांना " ती " दिसली पण एका व्यासपीठावर स्थानापन्न .... मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका योगशिबिराच्या कार्यक्रमामध्ये. योगशिबिराच्या कार्यक्रमासाठी तिला आयोजकांनी  'प्रमुख अतिथी ' म्हणून निमंत्रित केलेले होते. पुन्हा एकदा तिचे प्रसन्न दर्शन..... आणि तेही शेवंतीच्या वेणीसह... कोण असेल ही ? का बरं वारंवार मन तिच्याकडे आकृष्ट होतंय ? अशा विचारांमध्ये ते होते.

        तेवढ्यात सूत्रसंचालकाने प्रमुख अतिथींचा परिचय करून देताना  

" मनस्विनी अपराजित " असा तिचा उल्लेख केला आणि तिच्या आयुष्यातले अनुभव, त्यासाठी झालेला योगासनांचा उपयोग याबद्दल तिला सांगण्याची विनंती केली.

        मनस्विनी.... नावाप्रमाणेच स्वाभिमानी .... तिचे पती काश्मीर सीमेवरची महत्त्वाची धुरा सांभाळणारे... अगदी आडनावाप्रमाणेच

' सदैव विजयी होणारे म्हणून अपराजित ' ... गेल्याच आठवड्यात पाकिस्तानच्या सात शत्रूंना ठार करणारे तिचे पती अन् त्यासाठीच त्यांना २६ जानेवारीला सम्मानित करणारे आपले भारत सरकार.... सीमेवरची संकटे, हुरहूर, भीती यावर योगासनांद्वारे तिने मनावर कसा ताबा मिळवला हे तिच्या मुखातून ऐकताच सर्वच उपस्थितांच्या  अंगावर शहारे आले  नि सर्वांनीच मनोमन सलाम केला त्या मनस्विनीला.

         आणि अचानक त्यांना जे गुपित विचारण्याचे धाडस नव्हते तिला.... तेच ती सहजपणे सांगू लागली - " ही केसांवर माळलेली शेवंतीची वेणी आहे ना ते शौर्याचे प्रतीक असे आम्ही आमच्या दोघा पती-पत्नीत ठरवलेय आणि तेही विजयोत्सव साजरा करायला !  कारण या शेवंती-तच दडलाय आमचा गुपित अर्थ.

                       शे - शेवटी

                       वन - जिंकली

                       ती - भारतमाता

               (शेवंती- शेवटी जिंकली भारतमाता)

आणि आता तर

               सेवन - सात शत्रूसैनिक

               ती – तिच्या (भारत मातेच्या भूमीवरून दूर झाले, पराभूत झाले, मारले गेले. (शेवंती- सात शत्रूसैनिक तिच्या भूमीवरून दूर झाले.)

असाही अर्थ निघतोय म्हणूनच सध्या मी खूप आनंदात.”

        हे ऐकून ते अधिकारी अवाकच ! कारण स्त्रियांच्या साध्या गजरा, वेणी माळण्यातही किती सखोल अर्थ दडला असेल याची त्यांनी कधीच कल्पनाही केली नव्हती. आज एका शेवंतीच्या वेणीने त्यांना विचारांची एक नवी दिशा मिळाली होती.

शेवंतीची माळ माळली तिने केसांमध्ये

राष्ट्राचा अभिमान तिच्या नसांमध्ये

आदर्श ती भारतमातेच्या कन्यांमध्ये

राष्ट्राचा अभिमान तिच्या नसांमध्ये

        टाळ्यांचा गजर... आभारप्रदर्शन झाल्यावर कार्यक्रम संपला. तिच्याभोवती प्रेक्षकांचा गराडा होता. तिचा मोबाईल क्रमांक मिळवून ते निवृत्त सेनाधिकारी घरी आले. घरी आल्यावर शेवंतीच्या वेणीची ही हकीकत त्यांनी आपल्या पत्नीला सांगितली. दोघांनीही एकमेकांशी बोलताना त्या वीरपत्नीविषयी आदरभाव व्यक्त केला. त्यांनी तिच्याशी मोबाईलवर संपर्क साधून एक दिवस आपल्या घरी बोलावले. तिच्याशी दोघांनी हितगुज केले. तिला आपली लेक मानले. तिनेही आपल्या आई वडिलांप्रमाणे त्यांना जीव लावला. एका शेवंतीच्या वेणीमुळे त्या सर्वांचा जीवन प्रवास वात्सल्याच्या नौकेवर आरूढ झाला आणि ती देशसेवाव्रत मनी बाळगलेली एकत्रित नौका भारतमातेची अखंड सेवा करण्यास मार्गक्रमण करू लागली. 

******

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू