पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

संक्रमण

संक्रमण

 

ऑफिसात अर्ध्या दिवसाची रजा टाकून रोहिणी लगबगीने घरी जाण्यास निघाली. मनात उर्वरित कामांचे नियोजन चालू होते. आज तिच्या लाडक्या मुलाचा पार्थ चा वाढदिवस होता .दरवर्षीप्रमाणेच तिला व केतनला आपल्या एकुलत्या एक मुलाचा वाढदिवस जोरदार साजरा करायचा होता. कॉलनीतल्या व त्याच्या शाळेतील मित्रांना घरी बोलावून केक कापायचा होता , त्यांचा सगळ्यांचा नाश्ता झाला की सात वाजता पार्थच्या आवडीच्या सिनेमाला जायचे होते.आणि मग सिनेमा संपल्यावर येताना बाहेर जेवण .असे सगळे नियोजन तयार होते.  

 

          खरं म्हणजे आज रोहिणीच्या कॉलनीत त्यांच्या महिला ग्रुपने हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता संक्रांती निमित्त..पण आज पार्थचा वाढदिवस असल्याने तिला त्यात सहभागी होता येणार नव्हते . रोहिणीला याची खूप खंत वाटत होती. रोहिणी  घरी आली तर पार्थ मित्रांना संध्याकाळचे आमंत्रण देत फोनवर बोलण्यात गुंग होता. " हे काय रे पार्थ? केवढा पसारा घालून ठेवलाय घरभर...! आवर ना जरा पटकन . साडेपाच वाजता येणार आहेत ना तुझे मित्र ! वेळेवर या म्हणा त्यांना. सात वाजता आपल्याला सिनेमाला जायचे आहे उशीर नको व्हायला. तेवढा केक फ्रीजमध्ये ठेव बरं. आणि हो तुझ्या मित्रांना द्यायला मी छान पैकी पुलावच करते लवकर होईल आणि आवडीने खातीलही सगळे."  असं म्हणत रोहिणीने एकीकडे भात लावलाही कुकरमध्ये..."आई ; खरं म्हणजे आता कोणी केक वगैरे कापायला बोलवत नाही मित्रांना. बाहेरच देतात त्यांना बर्थडे पार्टी. मी नववीत आहे आता. तू उगाच हा घाट घातला आहेस " " जाऊ दे रे, तू किती मोठा झालास ना तरी आमच्यासाठी लहानच आहेस" असं म्हणत रोहिणीने भाज्या चिरण्यास घेतल्या .केतन देखील कधी नव्हे तो ऑफिस मधून आपल्या लाडक्या मुलासाठी वेळेवर घरी आला. गरमागरम पुलाव व  केक मोठ्या आवडीने खाऊन पार्थ चे मित्र घरी गेले.  रोहिणी, केतन व पार्थ सिनेमा बघण्यास गेली. 

 

      आपल्या आवडीचा सिनेमा पाहताना पार्थ अगदी आनंदून गेला होता . त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून केतन व रोहिणी खुश होत होते. सिनेमा संपला तेव्हा दहा वाजत आले होते . संध्याकाळी थोडा पुलाव खाल्ल्याने भूक तशी फारशी कोणालाच नव्हती.  पण जेवणाशिवाय वाढदिवसाची सांगता कशी होणार ? म्हणून मग तिघेही जवळच्याच हॉटेलमध्ये जेवण्यास गेली. हॉटेलमध्ये गर्दी फारशी दिसत नव्हती .पटकन जेवण आटोपून घरी जावे या उद्देशाने ते हॉटेलमध्ये शिरणार तेवढ्यात रोहिणीची नजर हॉटेल जवळ असलेल्या एका दुकानाच्या पायरीवर बसलेल्या आजीकडे गेली. सोबत लहान मुलगाही होता तिच्या .नातू असावा बहुदा.  थंडीत कुडकुडत दोघे त्या अंधाराचा आधार घेत बसली होती . त्यांच्या अंगावरील फाटके ठिगळ लावलेले कपडे त्यांच्या परिस्थितीचा पुरावा देत होते. रात्रीचे दहा वाजले तरीही दोघे घरी का बर गेली नसतील ? काय माहित त्यांना राहायला घर असेल की नाही? का एखाद्या पुलाखाली एखाद्या झोपडीत त्यांचं घर असेल? या मुलाच्या आई वडील कोठे असतील? असे अनेक प्रश्न रोहिणीच्या मनात पिंगा घालायला लागले . त्यांच्या पोटातील भुकेच्या आगीची धग रोहिणीला जाणवत होतीे ."आई चल ना लवकर. उशीर होतोय" . पार्थ च्या आवाजाने रोहिणी भानावर आली. " हो आलेच .तुम्ही व्हा पुढे" असं म्हणून रोहिणी त्या आजीजवळ आली. त्या दोघांना आमच्या सोबत जेवायला चला असे कसे म्हणावे या गोंधळात ती होती . कारण परिस्थितीने हतबल केले असले तरी माणसातील स्वाभिमान मात्र नष्ट होत नसतो हे  तिच्या संवेदनाक्षम मनाला माहिती होते . शेवटी त्या दोघांची जराही चौकशी न करता दयाभाव न दाखवता तिने आपल्या मुलाच्या वाढदिवसाचे निमित्त सांगून त्या दोघांनाही हॉटेलमध्ये आणले . तिच्यासोबत जावे की नाही या संभ्रमात असलेली आजी नातवाच्या पोटातील भुकेने येणारी कळ ओळखून हॉटेलमध्ये रोहिणी सोबत आली. त्यांना पाहताच पार्थ व केतनच्या चेहऱ्यावर पडलेल्या प्रश्नांना नजरेनेच उत्तर देत रोहिणीने आजी व तिच्या नातवाला शेजारच्या टेबलावर बसवत जेवणाची ऑर्डर दिली. जेवण येताच  आजी व नातवाचा खुल लेला चेहरा पाहून त्या सगळ्यांना समाधान वाटले. सगळेच पोटभर जेवले. जेवण झाल्यावर तृप्त चेहऱ्याने व तृप्त मनाने आजीने पार्थला भरभरून आशीर्वाद दिले. व ती दोघे जाण्यास निघाली तेवढ्यात रोहिणीने त्या आजीच्या हातात पाचशेच्या दोन नोटा वाढदिवसाच्या भेटीचे कारण सांगत त्या नको नको म्हणत असतानाही अक्षरशः कोंबल्या. पार्थला आशीर्वाद देत आजी व तिचा नातू तेथून निघून गेले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे रोहिणी कितीतरी वेळ बघत होती. 

 

       गाडीत अनेक विचार वादळ तिच्या मन: पटलावर उठत होते. पैशाचे पंख लावून गगन भरारीचा आनंद घेत स्वतःच्या विश्वात रमताना परिस्थितीने छाटलेल्या पंखामुळे जमिनीवरच दुःखाचे चटके सोसत जगणारी अशी कितीतरी माणसे असतील जे दिसतच नाही आपणास किंवा कदाचित श्रीमंतीच्या झापडीमुळे नजरेआड होत असतील. या व्यवहारी जगात टिकून राहण्यासाठी पैशाच्या पाठी धावताना दगड बनलेल्या मनात आज फूटलेला माणुसकीचा झरा तिला आनंदाचा एक नवा मार्ग आणि जीवनाचा नवा अर्थ सांगून जात होता. यापुढे हा झरा असाच अखंड खळाळता ठेवून शक्य तेवढ्या दिन दुबळ्या लोकांच्या चेहऱ्यावर हास्य पसरवण्याचा निर्धार तिने केला .आपल्या मुलाचा साजरा झालेला हा अनोखा वाढदिवस ,संक्रांतीचे नकळत दिले गेलेले वाण अन तिच्या विचारातील संक्रमण तिला जीवन सुखाचे रहस्य नकळत सांगून गेले होते.

 

✍???? सौ.दीप्ती समीर कुलकर्णी...

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू