पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जीवनातले हलके फुलके क्षण

जीवनातले हलके फुलके क्षण
                      प्रत्येकाच्या जीवनात असे अनेक क्षण येतात जे आपल्याला क्षणिक आनंद देतात. असे काही क्षण येतात की मन मोरासारखं थुईथुई नाचतं. काही क्षण थोड्या वेळासाठी का होईना आपल्या मनांत समाधानाची ज्योत तेवत ठेवतात. अशा क्षणांची आपण मोजदाद ठेवत नाही. श्रावण सरीसारखे ते अचानक येतात. आपल्या मनावर आनंदाची झूल घालतात आणि नाहीसे होतात.
                           बरोबरच आहे. अचानक बरसणाऱ्या श्रावणसरींचा आपण आनंद घेतो व विसरून जातो. त्यानंतर सर्वत्र पसरणारा सोन्यासारखा सूर्यप्रकाश आपल्याला उल्हसित करतो. बगीच्यात पसरलेला फुलांचा सुवास मन प्रसन्न करतो. देवघरात तेवत असलेली समई पाहून मनाला समाधान प्राप्त होतं. आपल्या अवती भवती हे सर्व सतत घडत असतं पण आपल्याला त्याची जाणीव नसते.
                                 अशाच एका फुरससदीच्या वेळेस माझं मन भूतकाळात हरवलं आणि एका प्रसंगाची आवर्जून आठवण आली.
                                 त्यावेळेस आम्ही एका कारखान्याच्या. वसाहतीत राहत होतो. आम्ही राहत होतो त्या रस्त्यावर दोन्ही बाजूला बैठी घरं होती. प्रत्येक घरासमोर बगीच्यासाठी जागा होती व सर्वच रहिवाशांनी हौसेनी बगीचा केला होता. कोणाचा बगीचा जास्त चांगला अशी चुरस लागलेली असायची. 
                                     आम्ही त्या रस्त्यावर नुकतेच रहायला आलो होतो त्यामुळे आजूबाजूस राहणाऱ्या लोकांशी ओळख झाली नव्हती. मात्र रस्त्याच्या शेवटच्या घरात राहणाऱ्या श्रीधरनशी माझ्या नवऱ्याची चांगली ओळख झाली होती. दोघांचीही कार्यालये जवळ जवळ असल्याने ते रोजच एकमेकाला भेटत. एकदोन वेळा श्रीधरन व त्याची पत्नी ललिता बाजारात भेटले होते. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की श्रीधरनच्या बायकोशी मैत्री करायला मोठा अडसर होता भाषेचा. तिची मातृभाषा सोडून तिला दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती कारण हवाई सुंदरी सारखं हात जोडून सुहास्य करण्यापलीकडे तिच्याकडून काही प्रतिसाद मिळत नसे.
                               एकदा दुपारची चार वाजताची वेळ होती. मी व्हरांड्यात मुलीला कडेवर घेऊन काऊ चिऊ दाखवित होते. तेवढ्यात श्राीधरनची मुलं आनंद व अरुण शाळेतून परत जातांना दिसली. मी त्यांना पाहून हात केला व ती पुढे गेली.
                                मी घरात आले. दरवाजा बंद केला, मुलीसमोर चार दोन खेळणी ठेवली आणि कामाला लागले.
                                  पंधरा वीस मिनिटे गेली असतील. अचानक दरवाज्यावर थापांचा भडिमार सुरू झाला. आहे तरी कोण असे म्हणत मी दरवाजा उघडला तर श्रीधरनचा मोठा मुलगा दारात उभा होता. धापा टाकत तो मोडक्या तोडक्या इंग्रजीत म्हणाला “ अम्मानी तुला बोलवंलय. लवकर चल.” 
                                 मी घाबरून गेले. ललिताने आत्ता यावेळेस का बोलवले असेल? तशी तिची माझी काही खूप ओळख नव्हती. काही अडचणीत आहे की काय?
                                 मी चट्कन मुलीला उचललं. घराला कुलूप लावलं आणि आनंदला म्हटलं “ चल”.
                                  आम्ही दोघं धावत धावत ललिताच्या घरापाशी पोहोचलो. पाहते तर काय ललितादेवी हवाई सुंदरी प्रमाणे नमस्तेच्या पोझमध्ये उभ्या. मी चाट पडले. मला येवढं घाईघाईने बोलवायचं कारण तरी काय.
                                मी तिच्याबरोबर आत गेले. घरासमोरचा बगीचा, घराचा आतला भाग व्यवस्थित व नीटनेटका होता. खूप शांत, निवांत वाटत होतं. माझं धास्तावलेलं मन स्थिर झालं. 
                                  तरीपण मला का बोलावले हा प्रश्न मनांत उड्या मारतच होता. माझी मुलगी आनंद व अरुण यांच्याबरोबर खेळण्यात रमली होती. ते दोघं तिला काहीतरी माकडचेष्टा करून हसवतं होते. 
                              ललिता स्वयंपाकघरात नाहीशी झाली होती. मी शांतपणे तिचं घर निरखत बसले. साधंसुधं, नीटनेटकं घर मला आवडलं होतं.
                               तेवढ्यात ललिता हातात एक ताटली घेऊन आली. तिने ताटली माझ्यासमोर ठेवली आणि तिने आनंदला हाक मारली. आनंद आला व म्हणाला” आंटी, यू लाईक डोसा. दॅट इज व्हाय अम्मा कॅाल्ड तू. “ ललिता तोंडभरून हसली.
                               माझ्यासमोर होता कुरकुरीत डोसा, वाफाळलेल्या सांबाराची वाटी, नारळाची चटणी व तिच्या सोबतीला सुखी चटणी. चटणीवर ध्यायला सुबक धाटणीचं तेलाचं भांडं व वडिल बहिणीच्या नात्यानं प्रेमाने खाऊ घालणारी ललिता.
                                मी डोशांचा व्यवस्थित समाचार घेतला. नंतर उत्कृष्ट फिल्टर कॅाफीचा आस्वाद घेत आम्ही दोघी एकमेकीकडे स्मित हास्याची शिंपण करत राहिलो. खरंच आहे “ शब्दांवाचून कळले सारे, शब्दांच्या पलिकडचे”.
                                तृप्त, शांत मनाने मी घरी परतले. नुसताच आवडीची वस्तू खायला मिळण्याचा आनंद नव्हता. ललिताने न बोलताच एक मूल्यवान संदेश दिला होता. घर साधं व नीटनेटक असावं. लोकांना प्रेमाने आणि आत्मियतेने आपलसं करावं. गृहिणीपदात खूप ताकद असते म्ह णून स्वत:ला कमी लेखू नये. नुकतेच गृहिणी पद धारण केलेल्या मला तो संदेश खूप मोलाचा होता.
                                 वाचकहो. असे हलके फुलके क्षण आपण पण अनुभवले असतील. ते अवश्य आठवा आणि आठवणींच्या कुपीत साठवा. 
                                एकाकीपणाच्या डोहातून बाहेर पडायला हे क्षण उपयोगी येतात. 
                           लेखिका ……नीला प्रधान

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू