पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तरुणाई कडून साहित्य अपेक्षा आणि साहित्य प्रबलन

  अलीकडे अनेक विषयावर तरुण पिढी लिहू लागली आहे. खरंतर त्यांनी हाताळलेले साहित्यप्रकार आणि विविध साहित्य विषयातील आशयावर जाणीवपूर्वक जाणत्या लेखकांनी लक्ष देणे, त्यांना प्रोत्साहन देत मार्गदर्शन करणे निकडीची गरज आहे.

   साहित्यलेखन हा समजपूर्वक वाचन, चिंतन, मनन, बैठक यातून विकसित होणारा छंद होय. मात्र भराभरा लिहिण्याच्या नादात आपण काय लिहितो आहोत? कसे लिहितो आहोत? कशासाठी व कोणासाठी लिहीतो आहोत? या प्रश्नाकडे कानाडोळा करून लेखनमार्ग स्वीकारणे म्हणजेच फक्त वैयक्तिक आनंदाच्या पलीकडे साहित्यकृतीला कुठलेही स्थान प्राप्त होणार नाही. हेही तेवढेच लक्षात घ्यायला हवे.

   'साहित्य हा समाजाचा आरसा असतो.' म्हणतात उगीच नव्हे! डार्विन, मार्क्स, फ्राईड या तत्त्ववेत्यांनी सामाजिक क्रांती अनुषंगाने साहित्य विचाराचा जागर मांडीत अभ्यासपूर्ण शैलीने अख्खा युरोप बदलविला आहे. त्यांचे साहित्य विचार हे जीवन जगण्याचा मार्ग बनलेले आहे. कालातीत साहित्यरूपाने घेतली जाणारी ही शाश्वत नोंद होय. तेव्हा आज नव्या दमाने उभे राहू बघणाऱ्या समस्त साहित्यिकांनी या नोंदीकडे बघत आपणही आपल्या साहित्याला समाजनिकड काय? याची मनमिंदूत पेरणी करीत समोर आले पाहिजे. तरच आजच्या एकविसाव्या शतकातील साहित्य हे समाजाच्या सापेक्ष नोंदीचे कारण ठरेल. त्या साहित्य प्रवाहाला मान्यता प्राप्त होईल. असे सहज अपेक्षा ठेवणे क्रमप्राप्त आहे.

      "बुडती हे जन देखवेना डोळा,

म्हणुनी कळवळा येतसे" ||

   संत तुकाराम महाराजांचे हे अभंगवचन म्हणजेच आजच्या नवोदित साहित्यिकांना साहित्याप्रति सुजाण जाण देणारी बाब आहे. मात्र आज पायलीचे पसाभर, खंडीभर रचनाकार विविध भाषेतून व्यक्त होताना दिसतात. कवीतेचा तर पाऊसच जणू इथे शब्दाचा चिखल होतो आहे. या चिखलातून जे टवटवीत फुलं उगवायला हवेत, एखादं शिंगाड्यासारखं फळ आस्वादक मिळायला हवा. असं होतंय काय? काही अपवादात्मक साहित्यशैली, विषय, आशय व त्यांचे स्वरूप सोडले तर आजचे साहित्य हे फक्त वैयक्तिक हव्यासाच्या कात्रीत सापडल्याची नोंदच जागोजागी प्राप्त होते आहे. यातच भर म्हणून की काय, बैलांच्या पोळ्यागत भरणाऱ्या साहित्य जत्रा त्यात पुरस्काराच्या बंदुकीगत झाडल्या जाणाऱ्या फैरी बघता, याचे सूक्ष्म निरीक्षण केले तर शासकीय स्तरावरील टेबलाखालील भ्रष्टाचाराच्या वाळवीगत इथे एक स्वतंत्र साखळी तयार झाल्याची नोंदही मीडिया माध्यमातून आपण बघितली असेल. असो! "कालाय् तस्मे् नम्:" म्हणत उगे राहूया.

      "एक बिजा केला नाश

मग भोगीले कणस."

   पुन्हा हे वचन आपणांसमोर ठेवतोय. शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनाची, त्याच्या प्रचंड श्रमाची जाणीव या वचनाद्वारे करताना, त्यातील अर्थगर्भता आपण साहित्यकाराकडून अपेक्षित ठेवायला हवी. नव्हेतर याकरता आपणही जागृत राहून होईल तेवढे प्रयत्न साहित्यिकांकडून, सर्व जाणकाराकडून करण्यास प्रयत्नवादात गुंतायला हवे.

   भरारी साहित्य मंच, नागभीड ही संस्थापक-अध्यक्ष म्हणून मी अगदी तरून वयात सुरू केलेली साहित्यवेली आहे. आज वटवृक्षरुपात नसली तरीपण या अनुषंगाने नवोदित साहित्यिकांना साहित्यविषयक जाणीवा, मार्गदर्शन, प्रकाशन सहकार्य देण्याचे कार्य करीत आहे. अगदी समाज निकड नुसार व्यक्त होण्यास प्रबलन देण्याचे माध्यम ठरले आहे. शेकडो साहित्यिकांना लेखक प्रकाशन हेतूने कुठलाही व्यवसाय मंत्र न ठेवता सहकार्य व मदत करीत आम्ही आलो आहोत. तसेच 'विचारविश्व डॉट कॉम' ही वेबसाईट या वर्षीपासून वैचारिक लेखन अनुषंगाने सुरु करीत मराठी रसिकापर्यंत सुयोग्य विचारप्रणाली पोहचवीत आहे. यातून साहित्याची बाळसेदार रोप बघावयास मिळाले आहे. तरी अनेक खंत राहूनच जातात.

   आज साहित्यात कविता, कथा, कादंबरी, नाटक, स्तंभलेखन, वैचारिक व इतर तत्सम प्रकाराचा अंतर्भाव होतो. ट ला 'ट' आणि र ला 'र' जोडून जागोजागी गवत उगवावे तसे साहित्य पेरल्या जात आहे. यातील साध्यता फक्त गाजावाजा करून 'आमच्यासारखे आम्हीच' हे बिंबवण्याचा प्रयत्न होतो आहे. मात्र याच साखळीत गुरफटलेले साहित्य मन कधी आपल्या काव्य, लेखनतंत्राने, व्याकरणाने, शुद्धतेने, विषय, आशय, स्वरूप, वैशिष्ट्याने सूक्ष्म अभ्यास हेतूने बघताना आढळत नाहीत. नव्हेतर ते त्यांचे प्रांतही नसते. कथा, कादंबरी प्रकारात तर नवे, जुने विषय, नवकल्पना प्रयोगातून नावीन्यतेने समोर आणत त्यावर अभ्यासमय होऊन समाज विचाराच्या कक्षा रुंद करण्याचा प्रयत्न केल्याचेही दुर्मिळ अपवादात्मक उदाहरणे आढळतात.

   तेव्हा माझीही एक भूमिका म्हणून आजतागायत ज्या ओढीने साहित्यप्रांतात आपण समोर येतोय तीच ओढ, तेच मन इतरांच्या लेखणीतूनही प्रसवणे काळातीत गरजेचे वाटते आहे. याकरता तरुणपिढीला या छांदिष्टात जगू पाहणाऱ्या प्रत्येकांस प्रोत्साहनच नव्हेतर मार्गदर्शन देत सर्वतोपरी सहकार्य देण्याचे प्रयत्न पुढल्या काळात सुरू राहणार आहेत. तेव्हा आपणही आपले मन या ओढीने नावीन्यता, कल्पकता, अभ्यासशैली स्वीकारत नव्या बदलाची नोंद घेण्याची सकारात्मकता अंगी बाळगत समोर येण्यास्तव प्रयत्नवादी असणे गरजेचे असेल. नाहीतर "येरे माझ्या मागल्या" ही म्हणही अबाधीत लागू पडेल. त्यात नवोदिकांचे साहित्य या साहित्याच्या गर्दीत कुठेतरी चिखलात तुडलेले दिसेल. याचीही नोंद घ्यावी.

   आम्ही भरारीच्या माध्यमातून सर्व साहित्यप्रकारातील नवोदित रचनाकारांना विषय देत नवे साहित्य प्रसवण्याचे प्रयत्न करतोय. त्याप्रमाणे त्यांनी ते स्वअभ्यासाने समोर येत उद्दिष्ट पूर्ण करण्यास्तव प्रयत्नरत आहोत. काव्यप्रकारात निकड काय? समाजजागृती करीत काळातील उरणारं साहित्य कोणतं? यावर मार्गदर्शन, कार्यशाळा घेणे, नव्याने लिहू पाहणाऱ्या साहित्यिकांचे संघटन, अभ्यासवृत्ती वाढीस लागावी याकरता स्वतंत्र, वैयक्तिक ग्रंथालय निर्मिती व वाचनवृत्ती वाढीस लागावी याकरता साहित्य निर्मितीचे हेतू. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, वैचारिक सांस्कृतिक उद्दिष्टाची पूर्तता, साहित्यातून साधना करीत प्रबलन देण्याचे कार्य करणे, कविसंमेलन, साहित्यसंमेलन असे अत्यावश्यक कार्य त्याप्रति आम्ही जागरूक आहोत.

   साहित्यात कुठला ट्रेंड चालू आहे, हे बघत त्यानुसार निव्वळ कविता प्रकाराकडे न बघता कथा, कादंबरी व इतरही प्रकाराकडे लक्ष देत प्रबलन देण्याचे कार्य सुरु राहणार आहे. याप्रति आम्ही तत्पर आहोत. नव्या वर्षात अनेक साहित्य निर्माण, लेखनच नव्हेतर प्रकाशन रूपाने निखार्चिक सहज साध्य होणारे शॉपीझन प्रकाशन उपलब्ध करून देत त्यांना स्वतंत्रपणे सहकार्य करणे व समोर आणण्यास आम्ही बांधील राहणार आहोत. पुढेही शेकडो रचनाकारांना पुस्तक रूपाने मंच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. निव्वळ पुस्तक उपलब्ध करणेच नव्हेतर वाचन संस्कृती वाढवून प्रत्येक मनामनात साहित्य विचार झिरपण्यास्तव आजतागायत लाखो रुपयाची अनेक पुस्तके दान केलीत. पुढेही हे कार्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू राहणार आहे.

   समाजाचे जगणे, दुखणे, सोसणे, शोषण, वेदना, घडणाऱ्या घटना, प्रसंग यातील भेदात्मक विश्लेषण, समग्र राजकीय परिस्थितीतील बोधमय तत्त्व, वैचारिकता देत या देशातील कुवृत्ती अमंगल बाबीवर तुटून पडत त्यातून सकारात्मक बदल साहित्यातून करणे अगत्याचे आहे. ज्या साहित्याने आज विज्ञानयुग, संगणकयुगात प्रचंड क्रांतीची दालने उभी केलीत. तीच दालने पूर्ण होण्यास्तव नवा आविष्कार साधत नवोदितांच्या पाठीशी आमची लेखणी, विचार, साथ, हात सदैव पाठीशी राहणार आहे.

   शॉपिझेन साहित्याकडूनही भरपूर अपेक्षा आहेत. खरेतर शॉपिझेन फार तळमळीने कार्य करते आहे. पुढे अनेक नव्या समाजनिकडीच्या विषयावर काव्य, कथा, कादंबरी, लेख अशा प्रकारावर साहित्य मागवून त्यावर स्पर्धात्मक आढावा घेत, नवे संदर्भ, नवे ग्रंथ, संशोधन नवोदितांच्या अभ्यासपूर्ण लेखणीतून समोर आणण्याचा प्रयत्न जोमाने करणे ही अपेक्षा ठेवतो आहोत. आम्ही यात हातभार लावणार. समाज चैतन्यमय साहित्याला स्थान देत नाही भारतवर्ष बदलवू शकलो तरी साहित्यातून मन, मेंदू, मस्तक, मनगट सशक्त करण्याचे कार्य करीत, आमच्या धडावर आमचेच डोके असेल असा स्वाभिमानी बाणा निर्माण करणे, साहित्य प्रसवणे ही अपेक्षा ठेवत आहोत.

 

संजय येरणे

नागभीड.

मो. 9404121098

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू