पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आभार 2022

सरतं वर्ष काय देऊन जातं ?
एक संपलेली वाट
दगडधोंड्यांनी अडवलेली
खाचखळग्यांनी भरलेली
चुकतमाकत ठेचकाळत
कशीबशी पार पाडलेली
उमेदीने सुरूवात केलेली
पडता लडखडता सावरत
भ्रमनिरास झालेली

येणारं वर्ष काय घेऊन येतं ?
एक दार किलकिलतं असतं
पलिकडे कुणीतरी खुणावत असतं
मागच्या बंद रस्त्याने गोठवलेली आस
पुन्हा तरारून येत असते
नवी आशा नवे संकल्प
नव्या जगण्याचे नवे संदर्भ
वठल्या झाडातून झिरपू लागतो
नवा जीवनरस
जो देऊन जातो नवसंजीवनी
खचलेल्या मनाला
पुढील प्रवासासाठी

मागचं वर्ष सरताना ही कविता सुचली तेव्हा माहीत नव्हतं की आपल्यासाठी खरंच एक दार किलकिलणार आहे, खुणावून सांगणारं आहे की "काय पांढऱ्यावर काळं करते आहेस ते पाठवून दे माझ्याकडे डिजिटल माध्यमावर प्रसिद्ध करायला!" तोपर्यंत काही मासिकांतून कविता, प्रवासवर्णन, कथा वगैरेंनी हजेरी लावली होती, 'पहिले आठ दिवस-करोनाग्रस्त लॉकडाउनचे' या रूपकात्मक दीर्घकथासंग्रहाचं सहलेखन केलं होतं आणि मग कवितेचं रसग्रहण करण्याची गोडी लागली. डॉ.निशिकांत श्रोत्री या अष्टपैलू साहित्यिकाच्या कवितांचं रसग्रहण 'शॉपिझन' वर 'निशिगंधाची फुले' या सदरात सादर करण्याची संधी मिळाली. इथे कविता आणि लेखही प्रसिद्ध झाले. 'शॉपिझन' च्या 'शिवाई' या दिवाळी अंकात कविता आली. २०२२ ने आपल्या मनात येईल तेव्हा व्यक्त होण्यासाठी 'शॉपिझन' सारखा एक सुंदर साहित्यमंच उपलब्ध करून दिला जिथे काहीशा अप्रसिद्ध पण होतकरू अशा साहित्यिकांचं फार सुंदर लिखाण वाचायला मिळालं आणि मुख्य म्हणजे ऋचासारखी एक धडाडीची संपादक आणि भावस्पर्शी कवयित्री लेखिका मैत्रिण लाभली.
२०२२ ने आपल्या माणसांच्या दुर्धर आजारपणात कसोटीचा काळ जागवत शारीरिक आणि मानसिक क्षमतेची परीक्षा घेतली आणि कठोर परिश्रमाबरोबरच दुर्दम्य आशावाद आणि सकारात्मक दृष्टीकोन तारून नेतात याची जाणीव करून दिली. या काळात जे ऋणानुबंध होते ते हाकेला ओ देऊन अधिकच दृढ झाले.
२०२२ चे सर्वात मोठे ऋण म्हणजे साता समुद्रापलिकडील छोट्या पांच वर्षाच्या नातीशी अशा गाठी बांधल्या गेल्या की दुधावरची साय अधिकच घट्ट झाली.
आता नेमेचि येणाऱ्या नववर्षाचं स्वागत करताना एक आंतरिक समाधान, भविष्याप्रति थोडी तटस्थ वृत्ति आणि २०२२ साठी कृतज्ञता मनात भरून राहिली आहे.

नीलिमा रवि
३१-१२-२०२२

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू