पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

संकल्प - साकव

*संकल्प-साकव*


सकाळची वेळ…नीलाताई अंगणात रांगोळी काढत होत्या. अगदी तंद्री लागली होती त्यांची. एवढ्यात शेजारच्या घरातून कामावर जायला निघालेल्या मुला-सुनेला 


"वेळेवर डबा खा हो, काळजी घ्या, लवकर या." 


असं म्हणत हसतमुखाने निरोप द्यायला आलेल्या सासुबाई दृष्टीस पडल्या. 

"काकु, छान काढलीत हो रांगोळी…" जाता जाता सुनबाईने तेवढ्या घाईतही दिलेली कौतुकफुलं आणि सासुबाईंचं


" दमून जातात हो पोरं अगदी" 

 

असं स्मितहास्य करत काढलेले मायेचे शब्द नीलाताई अलगद झेलत असतांनाच छोट्या नातवाला घेऊन सासरेबुवा बाहेर आले आणि तिघेजण मॉर्निंग वॉकसाठी निघाले. एवढ्यात दुसऱ्या बाजूच्या शेजारघरातुन भांडणाच्या आवाजात 'काही नको तुमचा डब्बा' असं म्हणत मुलगा-सून बाहेर पडले. नीलाताईंची इच्छा नसतांनाही ते तारस्वरातील शब्द कानांवर पडतच होते. शेवटी रांगोळीचं काम कसंतरी उरकून नीलाताई घरात गेल्या.


'हे दृष्य आणि ते दृष्य…' दोन्ही नित्याचीच…पण आज नीलाताई घरात एकट्याच असल्याने खूपच अस्वस्थ झाल्या. तसं म्हटलं तर दोन्ही परिवारातील सगळ्या बाबतीत खूपच साम्य…समान नव्हते ते घरातील माणसांचे स्वभाव…


एकीकडे शिगोशीग भरून वाहणारं  सौजन्याचं, नम्रतेचं माप… प्रत्येकाचं बोलणं शांतपणे ऐकून नंतर त्यावर व्यक्त होणं…एखादा नावडता विषय, घटना *जाने दो, छोड* *दिया, माफ किया* या सदरात मोडणं, 

एखाद्या घटनेच्या, प्रश्नाच्या दोन्ही बाजू तपासण्याचा निकष, स्वतःला त्या व्यक्तीच्या जागी ठेवून बघण्याचं तारतम्य, संयम आणि सामंजस्य, प्रत्येकाचा त्याच्या गुणदोषांसह केलेला स्वीकार, सहनशीलता, आणि महत्त्वाचं म्हणजे दोन व्यक्तींशी संबंधित असलेल्या महत्त्वाच्या *मधल्या* व्यक्तीचं सँडविच होऊ न देण्याची खबरदारी, 


दुसरीकडे मात्र ठासून भरलेला अहंकार…अर्धवट ऐकून लगेच त्यावर चांगली-वाईट प्रतिक्रिया देण्याची घाई...एक ते दहा अंक उलटे मोजणं साफ नामंजूर…

एकच मुद्दा वारंवार चघळल्या जाणं... कारण सारेच वक्ते आणि श्रोता व्हायला मात्र कुणीच तयार नसणं. 'माझंच खरं' असं प्रत्येकाचं म्हणणं आणि ते तारस्वरात वारंवार ओरडून सांगितलं म्हणजे दुसऱ्याला पटतंच असा ठाम विश्वास असणं…


नीलाताईंना आठवलं, ही काही अशी दोनच घरं नाहीत, आपल्या माहितीतल्या कितीतरी घरात साधारण अशीच परिस्थिती असते. 


ती सुनीता विचारे…केव्हाही भेटली की आपल्या सासूसासऱ्यांच्या कागाळ्या, नवऱ्याची गाऱ्हाणी, मुलांच्या तक्रारी सुरू. आता वयानुसार कामं नसतील झेपत पूर्वीसारखी, नवऱ्याचे, मुलांचेही आपापले काही प्रश्नं, स्वभाव असतील आणि आपण तरी कुठे सर्वगुणसंपन्न असतो, ह्याची जाणीव ठेवुन उपाय शोधले तर...तिला तर 'सुनीता तक्रारे' हेच नाव शोभुन दिसेल…


*अपेक्षांची लांबलचक शिडी*

*उभी असते इतरांसाठी सतत*

*तिचं आपल्याबाजुला असणारं*

*दुसरं टोक मात्र नाहीच दिसत* 


हे कधी कळावं बरं…


याउलट वंदना…नम्र, जाणीव ठेवणारी…म्हणते, 'खूप केलंय आईंबाबांनी आमच्यासाठी…म्हणून मी सांगितलंय त्यांना... 'आता तुम्ही दोघांनी फक्त आपल्या राहून गेलेल्या गोष्टींची *बकेट लिस्ट* पूर्ण करायची, बस्स्...' अखेर त्यांचंही वय झालंय हे स्वीकारायलाच हवं!' 


*स्वीकारले सकलां* 

*निरपेक्ष भावनेने*                  ‌‌ *सौजन्य पाळुनी सतत*

*जिंकियले सुवचने*


*स्वीकार*…तिचा हा शब्द फारच महत्त्वाचा वाटला नीलाताईंना…


जयंत…पतीपत्नी, वयोवृद्ध आईवडील, आणि वयात येणारी दोन मुलं असा तीन पिढ्यांचा षट्कोनी परिवार…प्रत्येकाचं आपापल्या वयानुसार वागणं, समस्या, उपाय आणि समर्थनही…काटकसर आणि चंगळवाद, बोलण्याची भिती आणि स्पष्टवक्तेपणा, काळजी आणि बेफिकिरी…यातून उद्भवणारा संघर्ष…


एकदा जयंत उद्वेगाने मुलांना म्हणाला, "अरे! जरा जाणीव ठेवा रे कष्टांची! सगळं आयतं मिळतंय तुम्हाला, त्याचं काहीतरी चीज करून दाखवा. रात्रीची जागरणं, उशिरा उठणं, बाहेरचं खाणं, पाॅकेटमनी हवा तसा उडवणं…अशानं अभ्यास कसा होणार आणि तब्येत तरी कशी चांगली राहील तुमची?" यावर…


"बाबा, काय सारखं तेच तेच सांगता रोज…आम्हालाही कळतंय ना" असं म्हणत मुलं बाहेर निघून गेली.


जयंतराव, इकडं या…मला कळतेय तुमची घुसमट…आजकाल मुलांना काही बोलता येत नाही. जरा लवकरच मित्र मानावं लागतं त्यांना...पण जरा आपलंही तेव्हाचं वय आणि आपल्या दोघांची जुगलबंदी आठवुन बघा…अरे, ती जनरेशन गॅप का काय म्हणतात त्याचाच परिणाम असतो हा…आणि हे अडनिडं वय…सगळा गोंधळ असतो मनात…केमिकल लोच्या रे"


"बाबा! तुम्हीच बोलताय हे? तुम्ही तर 

तेव्हा मला…"


"हो, मीच बोलतोय…पण आत्ताचा…'देर आयद्, दुरूस्त आयद्' आता समजतंय मला... धाकाच्या, उपदेशांच्या फटकाऱ्यांऐवजी स्नेहाच्या, प्रेमाच्या, मित्रत्वाच्या शब्दांचं वंगण घालून सुसंवाद साधावा. धाक असावा पण आदरयुक्त. सुदैवानं आम्ही दोघंही तब्येतीनं ठणठणीत आणि आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण आहोत. नाहीतर त्या अनिलचं बघ, आई-बापाचं पथ्य-पाणी, औषधं, सेवा-शुश्रुषा, त्याचं ऑफिस आणि मुलांची काळजी ह्यात त्या दोघांचाही आर्थिक, मानसिक, शारीरिक कोंडमारा होतोय आणि मग कधी राग निघतो आई-बाबांवर नाहीतर मुलांवर.

खरं म्हणजे त्याच्या आईबाबांनीही वास्तव समजून घेतलं पाहिजे. बदलती जीवनशैली स्वीकारून सामंजस्याने काही मार्ग काढायलाच हवा ना!"


तर मंडळी…ही काही प्रातिनिधीक उदाहरणं…


पण घरातील कुटूंबियांपासुन ते ऑफिस मधील सहकारी, मित्र मैत्रिणी, शेजारी अशा विस्तृत परिवारातील सगळ्याच नात्यांना जोडून ठेवायला हा एकच शब्द पुरेसा आहे. संबंधात पारदर्शकता असली तर गैरसमजाचं धुकं वितळायला फार वेळ लागत नाही. 'मी- माझं' यापेक्षा 'आपण-आपलं' हे दोन शब्द मनोमिलनाचा साकव सहजतेने बांधू शकतात. 


        *शब्द असतात शस्त्र*

        *शब्दच देतात व्रण*

        *शब्द लावतात मलम*

        *शब्द राखतात मन*


मग या सद्विचारांच्याच सोपानाने चढत करू या संकल्प….


*स्वीकार* 

*सौहार्द*          

*सौजन्य*

*सुवचन*

*सामंजस्य*

*सहनशीलता,* *सकारात्मकता…* सगळ्यांचा साकव साकारून संसार सांधण्याचा? 


भारती महाजन-रायबागकर

चेन्नई 

9763204334

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू