पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तीन पिढ्यांचे तीन तऱ्हेचे प्रेम पत्र

धाडदिशी दरवाजा उघडून,वादळ वाऱ्यासारखी सौम्या घरांत शिरली. आई-बाबांसमोर गुच्छ नाचवत म्हणाली "संकेतला हे शोभतं का बाबा.? सगळ्यांसमोर त्यानी मला गुलाबाच्या फुलात घालून हे लव्हलेटर दिलं. सगळ्यांनी चिडवून बेजार केल मला." खळखळून हंसत बाबा मिस्कील पणे उत्तरले., "त्यात काय ? तू आवडलीस त्याला. आणि काय ग? संकेत, तुला पण आवडतो ना गं ? मग झालं तर.! बाकी काही म्हणा, आहेच संकेत तसा चिकणा आणि सर्वगुणसंपन्न पोरगा . अग इतक्या पोरींमधून तुलाच प्रेम पत्र पाठवून, तुझ्यासारख्या काकूबाई वर प्रेम व्यक्त करण्याचं धाडस केलंय त्यानी.आणि ते सुद्धा अगदी जग जाहीरपणे. . भाग्यवान समज स्वतःला.
" आमच्या वेळी माझी एवढी हिम्मत नव्हती झाली बुवा ",
" अय्या म्हणजे बाबा? तुम्ही पण आईला प्रेम पत्र लिहिलं होतंत?.
हो मग काय! तो एक मजेशीर किस्सा होता. ऐकायचीय तुला ती गंमत ? थांब सगळं सांगतो हं!
बायकोच्या मोठ्या डोळ्यांकडे, दटावण्याकडे बाबांचं लक्षच नव्हतं. "अगं सौम्ये दगडाला लव्ह लेटर बांधून मी तुझ्या आईच्या टेरेसवर फेकलं होतं. आणि विशेष म्हणजे तुझ्या आईने पण ते चपळाईने झेललं होतं. आणि मग काय! तेव्हां पासूनच सुरू झालं आमचं प्रेम पत्र प्रकरण." "अय्या ! पण बाबा!आईला दगड लागून ती नाराज झाली असती तर ? "तर काय गच्चीवर उभं राहून मी मोठ्यांदी ओरडून गाणं म्हणालो असतो , "ये मेरा प्रेम पत्र पढकर, तुम नाराज ना होना l तुम मेरी जिंदगी हो l की तुम मेरी बंदगी हो l आणि म्हणूनच तिला बंदी करून, मी माझ्या जिंदगीतच आणल."
बापरे कसले ग्रेट आणि रोमँटिक आहेत माझे बाबा ! सौम्या डोळे वि विस्फारून बघतच राहिली,आपल्या वडिलांकडे. तरी तिला प्रश्न पडलाच,आणि न राहून तिने विचारलंच "पण बाबा सरळ आईसमोरच का नाही उभे राहिलात तुम्ही?" "अगं कसं जाणार? आईचे बाबा कसले कडक होते. दुसरे जमदग्नीच. त्यातून आमच्यात काही सुरू आहे,हे त्यांच्या चाणाक्ष नजरेने हेरलं होतं. बरं खाली भेटावं तर कुठल्याही नजरेच्या कॅमेऱ्या तून कुणी कसंही पकडलं असतं .सगळीकडूनच जायबंदी ". "पण बाबा हे छोट्या दगडाला प्रेम पत्र बांधण्याच प्रकरण सुचलं कसं तुम्हाला?" काय सांगू बेटा तुला! रात्री मी जागून कितीतरी पत्र लिहिली आणि फाडली सुद्धा .एकच ध्यास डोळ्यासमोर होता, तुझ्या आईपर्यंत लव्ह लेटर पोचवायचचं . पण ते कसं? हाच तर मोठ्ठा यक्ष प्रश्न होता.आणि एकदम ट्यूब पेटली. रस्त्यावर बांधकामाची खडी पडली होती. ती आणली गोळा करून आणि त्याच्यावर प्रेम पत्राची चिठ्ठी लिहून कागद दोऱ्यानी बांधलां " बाबांना मध्येच अडवत खट्याळ लेक म्हणते कशी , " पण काय हो पिताश्री ? दगड कोण मारतं माहित आहे नां तुम्हाला? " अहो बाबा वेडे लोक खडी गोळा करतात .आणि मारतातसुद्धा. " हा टोला खिलाडूपणे झेलत बाबा म्हणाले " होतोच मी वेडा. तुझ्या आईने पागल केलं होतं मला. कसंही करून तिच्यापर्यंत प्रेम पत्र पोहोचवायचचं होतं ना ! पण त्याचं सार्थक झालं.आणि प्रेयसीची माझी प्रिय अर्धांगिनीझाली." आईकडे खट्याळपणे पहातांना सौम्याच्या लक्षात आलं आईची झुकलेली नजर आणि गालावरचे गुलाब फुलून आलेत . ती आईला न्याहाळतच राहिली. तरीपण शंकेचे पिल्लू डोकावलेचं तिच्या मनांत .न राहून तिने विचारलं "काय ग आई? तुझे बाबा विरोधात होते. पण इकडचे आजोबा ते कसे काय तयार झाले ?" टाळ्या वाजवत आजोबाच आले हॉलमध्ये . आजी पण होती बरोबर .आजोबा म्हणाले " मी नाही कसं म्हणणार? कारण तुझ्या बापाच्या बापाने तेच केलं होतं ना ! आ वासून सौम्या म्हणाली " म्हणजे आजोबा, तुमचं पण प्रेम प्रकरण होतं.? आय मीन लव्ह लेटर ?" हंसू दाबत आजोबा उत्तरले "अगं इतकं काय नवल वाटल तुला? नल् दमयंती पासून हे लवलेटर प्रकरण चालू आहे." "म्हणजे आजोबा तुम्ही पण आजीला मागणी घातली होती ? "yes "तुझ्या आजीला पत्र लिहिलं होतं. आणि आजीने थालीपीठाच्या डब्यातून चिठ्ठी घालून मला होकार कळवला होता.
आता मात्र सासूबाईंच्याकडे मिस्कीलपणे पहात सौम्याची आई पुढे सरसांवत म्हणाली "सासुबाई सांगा नं! तो रोमँटिक थालीपीठ किस्सा ."वयामुळे पळता येत नव्हतं म्हणून, नाहीतर सासुबाई वॉकर सोडून, लाजून आतच पळाल्या असत्या. तरी त्या लाजूत म्हणाल्याच "इश्य! काय बाई तरी हा पोरकटपणा? बरं दिसतं का असं हे मुलांपुढे सांगणं ? पण आजोबा कसलं ऐकताहेत,आपलं घोडं त्यांनी पुढे दामटलंचं. ते म्हणाले "त्याचं असं झालं सून बाई, आम्ही एकाच ऑफिसमध्ये होतो . हे लाजाळूचे झाड मला आवडलं. आम्ही सगळेजण एकत्र डबा खायचो. तुझ्या सासुबाईच्या डब्यातलं भाजणीचं थालपीठ म्हणजे लाजवाब . आता थालपीठा इतकीच तू पण मला आवडतेस हे कसं काय सांगणार हीला ? बरं का सौम्या मग तुझ्या बाबांसारखंच डोकं लढवलं ,म्हणजे दगडं बिगडं नाही नां गोळा केली?".
सौम्याचे बाबा किंचाळलेच " म्हणजे बाबा ? तुम्ही --तुम्ही आमचं सगळं बोलणं ऐकलंत ? इतका मी मोठ्यानी बोलत होतो का ? अर्रर्रर्र ! सगळाच घोटाळा झाला !" "अरे घोटाळा कसला त्यात ?
पुढची गंमत ऐक". "आजोबा सांगा ना लवकर तो ,तुमचा रोमँटिक किस्सा. कधी ऐकू असं झालय." " सांगतो ! सांगतो ! धीर धरा. मित्रांच्या गराड्यातून हीच्या पर्यंत पोहोचायच्या ध्यासानी. मी पछाडलो होतो. हीला रिकामा डबा देत मी म्हणालो "माझी आई गांवाला गेली आहे.
तेव्हा प्लीज या रिकाम्या डब्यातून उद्या थालीपीठ आणणार का ? तिने होकार भरल्यावर सगळ्यांच्या नजरा चुकवून मी चिठ्ठी त्या डब्यात सरकवली .त्यावर खरडलं , तुम्हीं मला आवडता.मी तुम्हाला आवडतो का ? मी आवडत असेन तरच डब्यातून थालीपीठ आणा."
" वॉव कसले भारी आहात आजोबा तुम्ही!ग्रेटच आहात.पण मग सांगा ना आजीनी कसा काय रिस्पॉन्स दिला ? आजोबांनी डोळे मिचकावले, म्हणाले "अग ती तर माझ्यापेक्षा बहाद्दर. तिने डब्यात दोन-तीन थालीपीठे भरली. आणि त्यावर गुलाबी चिठ्ठी ठेउन मोठं उत्तर लिहिलं,' हो ' मग काय, मी आवडल्याचा होकार कळल्यावर,मिया बिबी राजी., तो क्या करेगा काजी ? दोन्हीकडच्यानी 24 व्या वर्षीच लगेच आमचं शुभमंगल लावून दिलं". सुनबाई म्हणाल्या, " तरीच बाबा! तुमच्या वाढदिवसाला आई आवर्जून थालीपीठ करतात.
इकडे सौम्याची चुळबूळ सुरू झाली. ती हळूच पुटपुटली "आई मी संकेतला फोन करू का? आजी ने तिचा कावा ओळखला " अगं प्रेम पत्रच लिही नां संकेतला. त्यावर खट्याळ सौम्या चिंवचिंवली "नको गं आजी, लव्ह लेटर लिहिण्यात वेळ जाईल. आणि तो मजनू तिकडे वाट बघत असेल. मोबाईलच करते रिंग पोहोचेल लवकर. काय हो बाबा ? चालेल ना तुम्हाला ?अगं चालेल काय पळेल. पळ! पळ! लवकर. आणि मग काय सौम्याला पंखच फुटले. खाऱीच्या चपळाईने तिने मोबाईल उचलला . आणि मग तो रोमँटिक, ......रसिक धाम...बंगला दणदणून हंसला.आता तिसऱ्या पिढीतील तिसरं ' - प्रेम पत्र- गाजणार होतं

लेखिका -सौ राधिका माजगावकर -पंडित पुणे 51

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू