पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

खरी वाघीण

खरी वाघीण 

========

 

" खरंच खूप छान पध्दतीने तुझ्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी पार पाडलीस गं बाई तू, खूप खूप कौतुक आणि अभिमान वाटतोय बघ तुझा ....!" कविताताई बोलत होत्या आणि अनघा त्यांच्या गळ्यात पडून इतका वेळ रोखून धरलेल्या आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देत होती. 

दुपारीच अनघाच्या मोठ्या मुलीचं लग्न अतिशय दिमाखदार पध्दतीने पार पडलं होतं व संध्याकाळी तिची बिदाई सुध्दा तितक्याच शानदार पध्दतीने झाली. नव-या मुलीला निरोप देऊन सर्व जण मंगल कार्यालयात परत येत असतानांच कविताताई अनघाच्या पाठीवर हात ठेवून तिचं कौतुक करत होत्या. कविताताईंनी तसं करणं हे  देखील अगदी स्वाभाविकच होतं म्हणा, कारण गेल्या काही वर्षांत अनघाच्या जीवनात आलेल्या संकटाच्या व त्या संकटांशी अनघाने समर्थपणे केलेल्या सामन्याच्या त्या एक साक्षीदार होत्या. 

अनघाची आज लग्न झालेली ही मुलगी पहिलीच्या वर्गात आणि तिच्या पाठीवरची दुसरी मुलगी नर्सरीत शिकत असतांनाच अनघासमोर एक भयानक मोठं संकट ऊभं ठाकलं होतं. अनघाचा नवरा कामावरुन घरी परत येत असतानां एक भरधाव ट्रक त्याला चिरडून अनघाला व तिच्या मुलींना अंध:कारमय जीवनात ढकलून पसार झाली होती. हे एवढं भलं मोठं, आभाळा एवढं दु:ख सहन करत करत नव-याचे मृत्यूनंतरचे विधी व्यवस्थितपणे पार पाडत असतानांच अनघाच्या सासरच्या मंडळींनी " आता तुझ्या बरोबर आमचे काहीही संबंध राहिलेले नाहीत, आमच्या घराण्याच्या इस्टेटीत सुध्दा आता तुझा काहीही वाटा असणार नाही " असे स्पष्टपणे सांगून तिच्या समोर असणा-या अडचणींमध्ये वाढचं करुन ठेवली. 

कविताताईंना या सगळ्या घटना कळाल्या. त्यांनी अनघाला 'आमच्या परिवाराकडून तुला संपूर्ण मदत व पाठिंबा मिळेल' असे सांगून अनघाला धीर दिला, ज्याची अनघाला खरे तर गरजही होती व आवश्यकताही होती. एक जुनी शेजारी या नात्याने कविताताईंनी त्यांचे कर्तव्य  उत्कृष्टपणे पार पाडले. इतकेच नव्हे तर अडचणीत असलेल्या व्यक्तीला धीर देण्याचे, तिला मदत करण्याचे लहानपणी झालेले संस्कारही कविताताईंनी प्रत्यक्षात आणून दाखवले होते. 

कुणीतरी आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे हे लक्षात आल्यावर अनघाने सुध्दा पतीच्या जाण्याचे दु:ख बाजूला सारत, फक्त आपल्या मुलींकडेच पूर्णपणे लक्ष देण्याचे  ठरवले व त्यानुसार काम करण्यास सुरुवातही केली. त्यातल्या त्यात एक गोष्ट मात्र खूप चांगली झाली होती की, काही वर्षे आधीच अनघाने ब्युटी पार्लरच्या कामाचे प्रशिक्षण घेतले होते म्हणून आता तेच काम आपल्या उपजीविकेसाठी करावयाचे तिने ठरवले व त्या दिशेने तिची वाटचाल सुरु झाली. 

या सगळ्या वाटचालीत अनघाच्या होत असलेल्या धावपळीकडे व दमछाकीकडे गावातील एका प्रतिष्ठित देवमाणसाचे, सामाजिक क्षेत्रात काम करणा-या व सुधारित पध्दतीने शेती करणा-या आबासाहेब नावाच्या एका शेतक-याचे बारकाईने लक्ष होते. दोन दोन लहान मुलींना बरोबर घेऊन संकटाशी सामना करणा-या एखाद्या विधवा स्त्री कडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन कसा असतो याची जाणीव सामाजिक कार्य करणा-या आबासाहेबांना होती आणि म्हणूनच या सर्व बाबी लक्षात आल्यावर त्यांनी त्यांच्या काही मित्रांबरोबर या विषयावर चर्चा केली व अनघाशी लग्न करण्याची तयारी असल्याचे बोलून दाखवले व तसा प्रस्तावही अनघाकडे पाठवून दिला. 

आबासाहेबांच्या एकंदरीत स्वभावाची माहिती ऐकलेली असल्यामुळे अनघानेही सुरक्षिततेच्या व मुलींच्या भवितव्याचा विचार करुन या प्रस्तावास मान्यता दिली व अनघा आणि आबासाहेब गांधर्व पध्दतीने विवाहबध्द झाले. 

असे हे वेगळ्या पध्दतीचे लग्न पार पडल्यानंतर आबांनी दोनही मुलींना खेड्यातल्या शाळेतून काढून एका चांगल्या दर्जाच्या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे काम हाती घेतले व त्यात त्यांना यशही आले. आपल्या मुलींच्या बाबतीत आबांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अनघामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला. 

पुढची काही वर्षे भुर्रकन निघून गेली. मुली काॅलेजला गेल्या. मोठ्या मुलीने इंजिनिअरिंग मध्ये पदवी प्राप्त केली व तिला नोकरीही लागली, तर लहान मुलीने कृषी अभ्यासक्रमात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला व ती पुढील शिक्षणासाठी परदेशात गेली. तिथे "अर्न एण्ड लर्न " योजनेखाली तिला नोकरीही मिळाली. 

आता सगळे व्यवस्थित होत आहे असे वाटत असतांनाच नियतीने अनघाला अजून एक जबरदस्त धक्का दिला. शेतक-यांसाठी महत्वाचा असलेल्या बैल पोळा या सणाच्या दिवशीच मोटार सायकलने शेतातून घरी जात असलेल्या आबांना दुस-या एका मोटार सायकलने जोरदार धडक दिली आणि आबा जागीच गतप्राण झाले. 

आता मात्र अनघा आणि तिच्या मुली ख-या अर्थाने पोरक्या झाल्या. पण मध्यंतरीच्या बारा-पंधरा वर्षांच्या काळात आबांच्या मिळालेल्या खंबीर साथीमुळे त्यांच्यातही एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झालेला होता. आता कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याची मानसिक शक्ती त्यांच्यात निर्माण झाली होती आणि त्यामुळेच आजचे हे एक अतिशय अवघड असे कार्य अनघाच्या हातून अगदी सहजपणे घडून गेले. अर्थातच अनघाच्या माहेरची मंडळी, हितचिंतक व तिच्यावर प्रेम करणारी ही सगळी मंडळी या  कार्याला आवर्जून हजर राहून अनघाला आश्वासक पाठिंबा देत होती, अनघाचं " खरी वाघीण " म्हणून कौतुक तर करत होतीच पण " जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले । तो चि साधु ओळखावा, देव तेथेही जाणावा ॥ " हा संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी दिलेला संदेश आपल्या कृतीतून प्रत्यक्षात उतरवणा-या आबांची आठवणही सर्वांना अगदी पदोपदी येत होती. 

 

 

दिवाकर चौकेकर, गांधीनगर 

मोबाईल  :  9723717047.

  

 

 

 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू