पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कर्दमातील कमळ

कर्दमातील कमळ


मदनशेटने *निवारा* या वास्तूच्या दरवाजाची फित कापली आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

कमलाने बोलायला सुरुवात केली…


"शेठजी, तुम्ही स्वतःच्या प्रतिष्ठेची पर्वा न करता समाजापुढे एक आदर्श निर्माण केलात. आमच्या प्रवाहपतित आयुष्याचं उत्तरायण एवढ्या चांगल्या वळणावर सुरू होईल अशी आम्ही कल्पनाही केली नव्हती. आपले उपकार…" 


डोळे भरून आल्यामुळे तिला पुढे काही बोलता येईना.


"कमला, या साऱ्याचं श्रेय तुला जातं. आम्हीच तुम्हाला उपेक्षेच्या, कुचेष्टेच्या, अवहेलनेच्या कर्दमात लोटून निसर्गाने दिलेल्या त्रुटीची शिक्षा देत असतो. 

शरीरावरून व्यक्तीची किंमत करणाऱ्या या जगात तुमचे सख्खे आईबापही तुमच्या मनाचा विचार करत नाहीत. 

पण आज तू स्वतःबरोबरच ह्या सगळ्यांचंही आयुष्य घडवलंस. कमळाप्रमाणेच तुझ्या कार्याचा सुगंध पसरवलास. कमला, तू आपलं नाव सार्थक केलंस. मी फक्त निमित्तमात्र.

नको आम्हा गर्व ईशकृपेचा

कार्य तुमचे थोर, जरी दोष नशिबाचा." 


मदनशेठला तो दिवस आठवला…


त्यादिवशी सिग्नलला 

दोन-तीन तृतीयपंथीयांना एका गाडीवाल्याने…

"हट्टेकट्टे हो, काम क्यू नही करते?" असं विचारताच…

"हम तो तैयार है, तुम देते हो क्या काम?"

असं त्यांनी म्हणताच तो पसार झाला. हे पाहून मदनशेठच्या मनात मात्र एक वेगळाच विचार आला.


मदनशेठने त्यांना विचारलं,


"क्या नाम है तुम्हारा?"


"मै कमला, ये लक्ष्मी और ये रोशनी…" 


"सुनो कमला, मेरे कारखानेमे काम करोगी? 


"क्यूं शेठ मजाक करते हो? आप हमे काम देंगे? आपकी बिरादरीवाले और कारखानेके लोग? वो क्या सोचेंगे आपके बारे मे? और हमे वो उनके साथ रहने देंगे?" कमलाने प्रश्नांचा भडीमार केला.


"वो सब मै देख लुंगा. लेकिन तुम्हें भी अपनी कुछ आदते छोडनी पडेगी. सोचकर बताना."


तीन-चार दिवसानंतर कमला त्या दोघींबरोबर मदनशेठच्या बंगल्यावर आली. 


मदनशेटने आपल्या कारखान्यात सक्षम व्यक्तींबरोबर मतिमंद, अपंग व्यक्तींनाही नोकरीला ठेवलं होतं. मदनशेटने त्या तिघींना कारखान्यात कसं वागायचं त्याबद्दल सूचना दिल्या.


"तुम्ही काळजी करू नका शेठ. तुमचा भरोसा तोडणार नाही आम्ही." 


त्या तिघींचाही जन्म मराठी कुटुंबातच झाल्यामुळे आणि त्या थोड्याफार शिकलेल्या असल्यामुळे त्यांना मराठी बोलता येत होतं.


मदनशेठने कारखान्यातील सर्व कामगारांना एकत्र बोलावून त्या तिघींचा परिचय करून दिला. सर्वांमध्ये नापसंतीची कुजबूज सुरू झाली. परंतु मदनशेठने त्यांना समजावुन सहकार्य करण्यास बजावले. प्रथम त्यांनी स्वतःच त्यांना कामात मदत केल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनीही त्यांना सहकार्य केले. 


सन्मानाने मिळालेल्या स्व-कष्टांच्या कमाईमुळे आता त्यांचे राहणीमानही बदलले. मग इतर अनेक तृतीयपंथीही त्यांना येऊन मिळाले. कमलाने त्यांच्यातील अल्पवयीन मुलांना आपल्याजवळच आश्रय देऊन त्यांच्या शिक्षणाचीही सोय केली. त्यांच्या आणि वयस्कर झालेल्यांच्या आरोग्याचीही ती काळजी घेत असे. तसेच तिने सर्वांना आपल्या कमाईतून बचत करण्याचीही सवय लावली. 


एवढंच नव्हे तर कमलाने आता आपल्या हक्कासाठीही आवाज उठवला होता. आपल्या शारीरिक परिस्थितीस केवळ निसर्ग कारणीभूत आहे. त्यामुळे स्त्रिया आणि पुरुषांप्रमाणेच आम्हालाही

फक्त एक व्यक्ती म्हणून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतल्या जावे, अशी तिची मागणी होती. समाजमाध्यमांनीही पाठिंबा दिल्याने तिच्या कार्याला हळूहळू यश येत होते.  


आता कमलाने या सर्वांसाठी एक हक्काचा निवारा बांधण्याचे ठरवले. मदनशेठ तर नेहमीच तिच्या पाठीशी होते. आज त्याच वास्तूचा गृहप्रवेश मदनशेठच्या हस्ते होत होता. त्यांच्या निर्णयाच्या सुपरिणामाचा सुवास सर्वांना दिशादर्शक ठरणार होता.


भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

9763204334




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू