पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सार्थक

*सार्थक* 

आज भीमाचे कामाकडे  लक्षच लागत नव्हते. गेले पंधरा दिवस शेखर म्हणजे भीमाचा  मुलगा त्याच्याकडे स्पोर्ट्स शुज मागत होता. त्याच्या बुटांचे तळवे पार झिजल्यामुळे त्याच्या तळपायाला खडे बोचत होते. पण सध्यातरी  शेखरची इच्छा पूर्ण करणे भीमाला शक्य नव्हते. 

     भीमा एका कंपनीत कंत्राटी कामगार होता. 

त्याला मिळणारी तुटपुंजी मजुरी    आणि चार घरची धुणीभांडी करून त्याची बायको मालती मिळवत असलेले थोडेसे पैसे यामुळे त्यांचा चरितार्थ जेमतेम भागत होता. 

    पण पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे गेल्या दोन  महिन्यापासून मालती  कामावर जाऊ शकली नव्हती. 

भरीत भर म्हणून भीमा कंपनीत ज्या कंत्राटदाराकडे कामाला होता तो कंत्राटदार त्याच्या गावाला गेला होता आणि गेला दिड महिना तिकडेच अडकला होता.  पुढचे दहा दिवस तरी तो येण्याची शक्यता नव्हती.  त्यामुळे भीमाचा दोन महिन्याचा पगार झाला नव्हता. मालतीच्या आजारपणात घरातली सगळी शिल्लक संपली होती.  आणि त्याच्यातच कधीही हट्ट न करणाऱ्या शेखरने  स्पोर्ट्स शूजचा  हट्टच धरला होता. त्याचे देखील तसे बरोबरच होते-----

" अरे भीमा कुठल्या विचारात आहेस?  मिटींगला येतोयस ना?" मित्राच्या हाकेने तो भानावर आला. 

 कंपनीच्या व्यवस्थापनाने   कामगारांना मिटींगमध्ये  सांगितले " काही दिवसांपासून  कंपनीत नवीन धोकादायक रसायनांचे उत्पादन चालू झाल्यामुळे नियमानुसार उद्यापासून  प्लँट मध्ये काम करणाऱ्या  सर्व कामगारांना सेफ्टी शूज वापरणे बंधनकारक राहील.  तरी आज घरी जाण्यापूर्वी प्रत्येक   कामगाराने कंपनीतून आपल्या पायाच्या मापाचे शूज घेऊन जावेत ". 

भीमा व्यतिरिक्त सर्व कामगार खुश होते.  भीमाला वाटत होते "कंपनीने सेफ्टी शूज ऐवजी स्पोर्ट्स शूज दिले असते तर? "

     संध्याकाळी तो सेफ्टी शूज घेऊन कंपनीतून बाहेर पडला.  त्याची घरी जायची अजिबात इच्छा नव्हती. शेखरला काय सांगायच? हा प्रश्न त्याला भेडसावत  होता. 

त्याचा मित्र गणू त्याला म्हणाला "आता मी दारूच्या दुकानात हे शूज विकणार आणि मस्त पार्टी करणार" 

     गणूच वाक्य ऐकल  आणि भीमाने सायकल थेट  चपलांच्या दुकानाकडे वळवली.   

दुकानदाराकडून त्या अतिशय  मजबूत तीन हजार रुपयांच्या सेफ्टी शूजच्या बदल्यात    चांगल्या प्रतीचे आदीदासचे स्पोर्ट्स शूज 

घेऊन तो आनंदात घरी आला. 

बाबांवर फुरंगटलेल्या शेखरने    स्पोर्ट शूज  पाहून आनंदाने उडीच मारली आणि तो भीमाला  बिलगला. 

मालतीच्या डोळ्यात मात्र प्रश्नचिन्ह होते. भीमाने  तिला गप्प राहण्याची खुण केली. 

रात्री सगळे झोपल्यावर    भीमाने  सेफ्टी शूजची गोष्ट मालतीला सांगितली.  "तुम्ही अस करायला नको होतं. तुमची कंपनी धोकादायक आहे. उद्या तुम्हाला काही झालं तर?" मालतीने काळजीने विचारले. 

" अगं काही होत नाही. आठ दहा दिवस मी सावधगिरीने काम करीन. तोपर्यंत शेठ  गावाहून येतीलच. ते आले की मी पगारातून शूज आणून टाकीन. काळजी करू नकोस" त्याने  मालतीला समजावले. 

 सकाळी भीमा उठण्यापूर्वीच  शेखर नवीन शूज घालून मैदानात धावायला गेला होता. 

     भीमा कामावर गेल्यानंतर मालतीला स्पोर्ट शूजची  गोष्ट शेखरला सांगितल्याशिवाय रहावलं नाही. ती ऐकून शेखरच्या  डोळ्यांत पाणी आले पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच निश्चय दिसत होता. 

     नंतरचे दोन दिवस भीमा कंपनीत चप्पल घालून जात होता पण त्याला कोणीही हटकलं नाही. पण तिसऱ्या दिवशी एक छोटीशी दुर्घटना घडली.  दारूसाठी आपले शूज विकणाऱ्या गणूच्या पायावर काम करताना अँसिड सांडल आणि त्याचा पाय थोडासा भाजला. त्याच्या पायात स्लीपर होती. सेफ्टीशूज नसल्यामुळे गणूला अपघात झाला ही गोष्ट व्यवस्थापनाच्या  लक्षात आली. 

त्यांनी ताबडतोब सगळ्या कामगारांना बोलावलं आणि त्यांची तपासणी केली असता लक्षात आलं की बहुसंख्य कामगारांनी पायात सेफ्टी शूज घातलेले नाहीत. 

 व्यवस्थापनाने सक्त ताकीद दिली "उद्यापासून ज्या कामगाराच्या पायात सेफ्टी शूज घातलेले नसतील त्याला कंपनीच्या गेटमध्ये प्रवेश दिला जाणार नाही आणि  पुन्हा कधीही या कंपनीत  नोकरी मिळणार नाही" .  

 भीमा खूप टेन्शनमध्ये आला. गेली आठ वर्ष तो ज्या कंपनीत कंत्राटी म्हणून का होईना काम करत होता त्या नोकरीवर उद्याच्या सणाच्या दिवशीच गदा येऊ घातली होती. 

  विचारातच  तो कंपनीतून बाहेर पडला. आता काय करायचं?  तो पुन्हा त्याच दुकानदाराकडे गेला पण दुकानदाराने त्याला उधार शूज देण्यास नकार दिला. 

 संध्याकाळी उशीरा तो घरी आला. शेखर त्याची वाटच बघत होता.

भीमाला आल्या आल्या  डोळे मिटायला सांगून शेखरने  त्याच्या हातात काहीतरी ठेवलं. त्याने डोळे उघडले. ती अतिशय आकर्षक  ट्रॉफी होती.  शेखरने धावण्याच्या स्पर्धेत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून   

त्याला मिळालेल्या स्पोर्ट शूजच  चीज केलं होतं. 

भीमाने शेखरला गच्च मिठी मारली. तो आपली काळजी विसरून गेला.

शेखरच्या सांगण्यावरून 

त्याने पुन्हा डोळे मिटले. 

"आता डोळे उघडा, आणि समोर बघा". त्याने डोळे उघडले. - - - - - - - - समोरच्या स्टुलावर नवीनकोरे, मजबूत, काळेभोर बाटा कंपनीचे सेफ्टी शूज ठेवले होते. 

शेखरला मिळालेल्या  तीन हजार पाचशे रुपयांच्या पारितोषिकातून  शेखरने आपल्या बाबांसाठी सेफ्टी शूज आणले होते. 

  भीमाने शेखरला छातीशी कवटाळले. त्याच्या डोळ्यातील आनंदाश्रू  थांबत नव्हते. संक्रांतीच्या दिवशी त्याच्या नोकरीवर येऊ घातलेली संक्रांत त्याच्या मुलाने टाळली होती. 

  शेखर सारख्या सुपुत्राला जन्म दिल्यामुळे आज बाप म्हणून त्याच्या जीवनाचे सार्थक झाले होते.

              नितीन मनोहर प्रधान 

                 रोहा रायगड 

                 9850424531

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू