पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पंखातलं बळ!

"काकू,आज अगदी दमले बघा.सकाळपासून सावीला तयार करता करता नाकीनऊ आले.आज वसंत पंचमीला शाळेत सरस्वती पूजन आहे. पिवळा ड्रेसकोड!डब्यात पण काहीतरी पिवळ्या रंगाचं हवयं.नुसता पिवळा सलवार सूट नाही चालणार आमच्या पोरीला मेकअप पण करून हवा.आधीच उठायला उशीर करते आणि मग माझी धावपळ होते.कधीकधी वाटतं चांगले दोन धपाटे घालावे.पण मग तारसप्तकातला सूर निघतो ना त्यांनी अजून त्रास होतो.सुयशचं वेगळंच रूटिन असतं.सोमवार ते शुक्रवार काम,काम, काम आणि शनिवार रविवार घरचं पेडिंग काम!

ऑफिस,घर आणि हिचा अभ्यास ह्यातच माझा दिवस निघून जातो. स्वत:साठी पण अजिबात वेळ मिळत नाही. आई म्हणतेय ये निवांत चार दिवस! ते पण अशक्य आहे. नुसतं गाडीला जुंपलेल्या घोड्यासारखं आयुष्य धावतंय.

ही पण एवढी त्रास  देते ना मला की कधी वाटतं होस्टेलला पाठवते म्हणजे कळेल हिला आईची किंमत.जे खायला केलयं ते कायम नकोच असतं काहीतरी वेगळं हवं.ही एकेकटी मुलं वाढवणं पण कठीण काम आहे." ऑफिसला जाता जाता आपल्या घराची किल्ली द्यायला आलेली स्नेहा एका श्वासात बोलली.

रमाकाकूंच्या घरासमोर राहणारं स्नेहा, सुयश आणि सावी हे त्रिकोणी कुटुंब. पहिलीत जाणाऱ्या अवखळ सावीच्या बाललीला पाहायला रमाकाकूंना खूप आवडायचं.त्या तिच्याशी खूप गप्पा मारायच्या. तिच्या तोंडून तिची खास गम्माडीजम्मत सांगताना आनंदाने लुकलुकणारे डोळे बघून त्यांना आपल्या लेकीची आठवण यायची.

कधीकाळी आवाजाने भरलेल्या स्वतःच्या घराचं जुनं रूपडं आठवायचं. त्यांचा मुलगा आता नोकरीनिमित्त दुसऱ्या गावी राहत होता.दोन वर्षांतच त्यांची समिधा ही कॉलेजनिमित्त पुण्याला होस्टेलला राहायला गेली आणि गजबजणारं हे घरटं पार सुनंसुनं झालं.आधी पसारा करतात म्हणून मुलांना रागवणारे आपण आता पसारा करणारं कुणी घरात असावं म्हणून आसुसतोय.

रमाकाकू म्हणाल्या"अगं,घरातल्या ह्या भिंती मुलं घरी आलीय की तेवढ्या सजीव वाटतात नाहीतर ह्या निर्जीव घरात मी आणि काका. मुलं घरी आली की काय करू काय नको असं वाटतं.भरभरून बोलावंसं वाटतं पण खरं सांगू आता त्यांचं आपापलं जग आहे गं.त्या क्षितीजापारच्या जगात,आईबाबा म्हणून आम्हाला ठराविक अंतरापर्यंतच जाता येत. त्यापलीकडे त्यांचं आयुष्य फक्त दूरवर काचेतून पाहिल्यासारखं भासतं. आल्यावर दोन तीन दिवस भरभरून बोलतात पण नंतर त्यांना आमच्यापेक्षा त्या जगाची आठवण सतावते.ह्यात काही चूक गैर आहे असं नाही पण क्षितीजापार उडण्याचं बळ आलं ना की घरटं दुरावतं.

मी लग्न होऊन इकडे आले ना की सारखी आईची आठवण यायची. हळूहळू संसाराचा व्याप वाढत गेला आणि माहेराची ओढ कमी होत गेली.आई खूपदा म्हणायची तूला आमच्यासाठी वेळच नाही पण तेव्हा संसारात बुडालेल्या मला तो वेळ काढणं पण जमलं नाही.आज खूप वाटतं गं आईच्या कुशीत डोकं ठेवून निवांत पडावं पण आता ते थोपटणारे हातचं नाहीये. तेव्हा आईबाबांना किती रिकामं वाटतं असेल ते आत्ताच जाणवतेय.फक्त हे रिकामपणं त्यांना आमच्या लग्नानंतर जाणवलं आणि आम्हाला मात्र मुलांच्या शिक्षणापासूनच जाणवलं.

तुला एक सांगू! हा लहान सावीचा प्रत्येक क्षण तुझ्या मनात जप.एकदा ही पाखरं भुर् उडाली ना की फक्त त्या आठवणीचं गाठोड उघडायचं आणि त्या राज्यात भरपूर फेरफटका मारायचा.हे छोटे छोटे गोड क्षणच आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात.पाखरं घरटं सोडून स्वतःच्या जगात रमले की आपल्याला मात्र एकटेपणा खायला उठतो.ही जगाची रीतच आहे पण प्रत्येकाला ह्याला सामोरं जाणं अवघड वाटतं.

बरं आम्ही अगदी एकटे किंवा दु:खी नाहीत बरं का! आमचेही नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींचे गोतावळे आहेत.बाकीचेही व्याप आहेत. गरज पडली की मुलं एका हाकेला धावून येणार हे पण माहिती आहे पण कायम सोबत नसणारे हे मात्र खरं.

आत्ताची ही मेहनत सावीच्या पंखात बळ आणण्यासाठी चाललीय ना. जेव्हा ती यशाच्या शिखरावर उभी असेल ना तेव्हा पायथ्याशी उभ्या असलेल्या तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल.
म्हणून सांगते तिचं बालपण साठवून ठेव ह्रदयात.मोठ्ठी होत जातांनाच एक एक दिवस जग. सगळ्या चिंता बाजूला ठेवून एकमेकांसोबत जगा. रूसवे फुगवे,राग लोभ,आनंद उत्साह ह्या सगळ्यांनी घर भरून जाऊ दे. त्या नवचैतन्यानी मुलांच्या पंखांना बळ मिळेल आणि ते गगनभरारी घेण्यास सज्ज होतील."
रमाकाकूंच बोलणं स्नेहाला पटलं. जगण्याचा नवा अर्थ आज तिला समजला होता. वसंत पंचमीच्या सोनसळी प्रकाशात न्हाऊन आता ती जबाबदारीचं ओझ सांभाळत सावीच्या पंखांना बळ देत ती तिच्यासोबतचा क्षण अन् क्षण जगणार आणि जपणार होती.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू