पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ध्रुवतारा

** ध्रुवतारा **


" पूर्ण विश्वास आहे मला माझ्या ज्ञानावर, माझ्या ज्योतिषशास्त्रावर तारा, तुमची दोघांचीही पत्रिका बघितलीय ,तुला तुझ्या प्रेमापासून दूर करायचं नाहीये , पण… पण या शास्त्रावरही अविश्वास कसा दाखवू मी ?         ज्यानुसार माझ्या आयुष्यातल्या घटनांच भविष्य अगदी तंतोतंत बरोबर ठरलयं. स्पष्ट सांगतो, ध्रुव आणि तुझं लग्न शक्य नाही. तुझी पत्रिका ज्या मुलाशी जुळेल त्याच्याशी तुझे लग्न झाले तरच तुझा संसार सुखाचा होईल. आपल्या बाबांच्या शब्दांवर विश्वास ठेवावाच लागेल तुला तारा ".


    आपल्या अनुभवांनुसार ज्योतिषाचार्य श्रीधरपंतानी आपल्या मुलीच्या प्रेमविवाहाला सौम्य शब्दांतून पण कडाडून विरोध दर्शविला.


" तुम्ही दीदीच्या लग्नाला परवानगी दिली होती ना? तिचाही प्रेम विवाह  होता, होय ना?" . 


      " औटघटकेचं का होईना संसारसुख तिच्या नशिबी यावं म्हणून तो निर्णय होता. अवघं बाविस वर्षाचं अल्पायुष्य ती घेऊन जन्माला आलीय हे तिच्या जन्मपत्रिके नुसार ज्ञात होतं. तिची इच्छा अधुरी राहू नये म्हणून तिचं लग्न मिलिंदशी लावून दिलं होतं.  पण आताची ही आपल्या काळजाच्या तुकड्याच्या मंगल जीवनासाठी केलेली विनवणी समज."


            " मलाही माझं भविष्य जाणून घ्यायचंय, काय  अमंगल घडणार आहे माझ्या आयुष्यात?   ध्रुवला चांगली नोकरी आहे. त्याच्या कुटुंबातलेही प्रेमळ आहे.                              ‌    बाबा!  ऐका ना, 'ध्रुवतारा' एकच आहे.त्यांना वेगळं नका करू. आईवडिलांचा आशीर्वाद हा मुलांच्या यशस्वी जीवनाचा पाया असतो "


 निर्धाराने बोलून तारा आत निघून गेली. 

‌श्रीधररावांनी शांतपणे आपले डोळे मिटले. त्यांच्या शास्त्रानुसार ताराचे भविष्य  त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होतं. फक्त उत्सुकता म्हणून आपण ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करायला लागलो आणि सखोल अभ्यास करत गेलो. दुसऱ्यांचे भविष्य वर्तविता वर्तविता आपण आपल्या आयुष्यात कधी डोकावून बघितलंच नाही. जे घडलं ते आपल्या दैवानुसार यावर विश्वास ठेवून घडणाऱ्या प्रत्येक घटनेला मुकाटपणे सामोरे गेलो.


      ' नको ,नको !पण आता ही विषाची परीक्षा नको.' श्रीधर पंत स्वतःचीच म्हणाले.                          'पत्नीनंतर मागे राहिलेल्या दोन लहान मुलींचा आपण सांभाळ केला. एकाकी मनाचं एकटेपण अनुभवलयं. वियोगाचं दुःख काय असते हे जाणून आहोत आपण.ताराचा प्रेमभंग झाला तरी चालेल परंतु तिचं ध्रुवशी लग्न होता कामा नये.तिच्या पत्रिकेतील दोषामुळे तिच्या भविष्यात घडणाऱ्या  चित्र- विचित्र घटनांच्या विचाराने श्रीधर पंताच्या मनात शंका कुशंका निर्माण होऊन ते बेचैन झाले.     



"बाबा! बाबा!"                      ताराच्या प्रेमळ  स्वराने श्रीधर पंत भानावर आले म्हणाले,


    "माझं ऐकणार ना बाळा?" 


   " मी तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही बाबा."

ताराने श्रीधरपंताचा हात हाती घेतला. वडीलांच्या डोळ्यात अपार स्नेहा बरोबर आपल्या भविष्याविषयीची चिंता दाटून आलेली तिने बघितली.


"बाबा! मी  बाहेर जाऊन येते"


"आज १४  फेब्रुवारी न गं  तुमच्या प्रेमीयुगलांचा 'प्रेम दिवस'!"


"हं"!                                     म्हणून तारा पायात चपला सरकवून बाहेर पडली. तिला घराबाहेर पडतांना बघुन  श्रीधरपंत जरा अविश्वासानेच  तिच्याकडे बघत राहिले.

              'आजची नवीन पिढी ज्योतिषशास्त्रावर नव्हे तर आपल्या प्रेमावर विश्वास ठेवतात. नाहीतर आपण, प्रेम विवाहाला वडिलांचा नकार ऐकताच पळपुटेपणा दाखवला.शुभांगीला लग्नाचं वचन देऊन आपण आपल्या पहिल्या प्रेमाची फसवणूक केली.वडिलांनी सुचवलेल्या मुली सोबत बोहल्यावर चढलो. कुठे असेल शुभांगी? इतक्या वर्षानंतर तिला आठवत असेल का आपलं पहिलं वहीलं  प्रेम?' .       त्यांचं  मन भुतकाळात गेलं.

 

       " बाबा !बाबा! " या ध्रुवताराच्या एकत्रित आवाजाने त्यांनी समोर बघितले. ध्रुवताराला एकत्र बघून पुन्हा एकदा त्यांना आपल्या पहिल्या प्रेमाची प्रकर्षाने आठवण झाली आणि हृदयात एक  विरहाची तिडीक उठली.  ध्रुवताराच्या मागोमाग ध्रूवचे आईबाबाही आत येतांना दिसले.

 " नमस्कार! या"

 सोफ्यावर बसलेल्या श्रीधरपंतांच्या तोंडून आदरातिथ्याचे शब्दं बाहेर पडले. तारा आपल्या बाबांच्या पायाशी बसली, त्यांच्या मांडीवर हनुवटी टेकून त्यांच्या डोळ्यात बघत म्हणाली,


"बाबा, तुमचं शास्त्र सांगते वधू-वरांचे जास्तीत जास्त गुण जुळले तरच  ते लग्न यशस्वी होतं, मग तुमचा संसार का अधुरा राहीला? बाबा ज्योतिष हे एक शास्त्र आहे ,भविष्यात येणाऱ्या संकटापासून माणसाला सावधान करण्याचं. पण त्या भविष्यावर विश्वास ठेवून आपण आपला वर्तमान का बिघडवायचा.  या अशा गोष्टीवर विश्वास ठेवून आपलं प्रेम गमविणाऱ्यांपैकी  मी नाही.       'ध्रुवतारा' एकच आहेत. आम्ही आमच्या प्रेमाने व विश्वासाने आमचं अढळ स्थान निर्माण करू. आम्ही लग्न केलं तर काही अमंगळ घडेल असं तुमचं ज्योतिष शास्त्र सांगते ना, मग आम्ही लग्नविधी न करताच तुमच्या व ध्रुवच्या आई बाबांसमोर सप्तपदीतले सातवचनं जन्मभर पाळण्याचे  एकमेकांना वचन देतो. शास्त्रानुसार पत्रिकेतील ग्रहस्थानामुळे आमच्या वैवाहिक जीवनात होणाऱ्या उलथा पालथीला समोर जाण्यास आम्ही तयार आहोत. ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवून भविष्यात अमंगल घडणाऱ्या गोष्टींचा बाऊ करून मनावर दडपण घेऊन जगण्यापेक्षा ,मनाने खंबीर व सक्षम होऊन येणाऱ्या संकटावर मात करत जीवनाला सामोरे जाण्याच मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्यासारख्या गुरूची आवश्यकता आहे बाबा!.                                       आज 14 फेब्रुवारी  हा 'प्रेमदिवस' म्हणून साजरा करतात. पण हा दिवस फक्त प्रेमियुगलांचा नाही बाबा, हा दिवस आहे कुटुंबातील एकमेकांनी एकमेकांवर प्रेम व विश्वास व्यक्त करण्याचा. बाबा ,तुम्ही  द्याल ना  तुमच्या मुलीला 'अखंड सौभाग्यवती' होण्याचा   आशीर्वाद?"

ध्रुव व तारा श्रीधरपंताच्या पायाशी आशीर्वादासाठी वाकले.

श्रीधरपतांना  गहीवरून आले.डोळ्यातुन  नकळत अश्रूंच्या धारा वाहु लागल्या. त्यांनी एक क्षण डोळे मिटले आणि ताराच्या डोक्यावर हात ठेवत म्हटले,                                   "अखंड सौभाग्यवती भव:!"

*********************************

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू