पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रवास

 

 

".......चला सोडायची का बस? तुमचा माणूस कोण तो कधीचा येतोय आपला....एस टी काही आता थांबायची नाही...चल घे रे पुढे गाडी....."

 

भल्या पहाटे उठून आन्हिकं आटपून वेळेत बस ला गाठणारी माणसं आता किरकिर करायला लागलेली. गाडीत बसायला 'शीट' मिळवणे हे त्याचं आजच्या दिवसाचं पाहिलं ध्येय बहुधा यशस्वीपणे पार पडलेलं होतं. 

"ओ कुणकेश्वर ला जाणार ना?" धापा टाकत गाडीत चढणाऱ्या एका गृहस्थांनी विचारले. 

"काय हे शिकले सवरलेले विचरतत....होय होय चला लवकर " एका अनोळखी आणि खिडकी च्या सीट वर बसलेल्या गृहस्थांनी भुवया उंचावत उत्तर दिलं.

एकदाची गाडी सुटली.

वातावरण कसं एकदम शिवमय. कंडक्टर नी आपलं परंपरागत काम सुरू केलं. हळूहळू स्थिरावलेले लोकं  तिकिटं खिशात ठेऊन व्हाट्सऍप धुंडाळायला लागले.

हळू हळू काना कोपऱ्यातून अस्तित्वात असलेली शंकराची स्तुतीपर गीतं ऐकू येऊ लागली. जय हो जय हो शंकरा!

 

गाडी सुटतानाच गच्च भरलेली. 

"आली तरी खयची लोका एवडी! उभा ऱ्हाउक सुदीक जागा नाय" अर्थातच उभ्या राहिलेल्या लोकांची कुजबुज सुरू झाली.

"ओ शंकर परीक्षा बगता हा...! र्हवचा उबा थोडा टायम. तुमी खय यात्रेक चललात काय?"

"मग!"

 

तोवर कंडक्टर आले. "तिकिटं सगळ्यांनी सांभाळून ठेवा हा. पावसला उपासवाले लोकं आहेत बसलेले. तुम्ही कोण सापडलेत तर म फराळ द्यायला लागेल"

 

फिदीफिदी हसण्याचा आवाज येऊ लागला. मागची मंडळी पुढे बसलेल्या आप्तेष्टांकडे तिकीट काढलं का, नीट ठेवलं का याची विचारफुस करायला लागले. उभ्या असलेल्या असहाय्य लोकांच्या चेहऱ्यावर अनेक दुःख दिसत होती. मोबाईल बघता येत नव्हता. बस मिळाली म्हणून इच्छितांना कळवता येत नव्हतं. इअरफोन असून उपयोग नाही. वर्तमानपत्राची सूरनळी तशीच बॅगेतून डोकावत होती. करणार काय मग आता ? .... निरीक्षण!

 

माझ्या बरोबर समोरच्या सीटवर दोन महिलांनी संसार मांडलेला. तिकीट पर्स च्या आतल्या च्या आतल्या कप्प्यात ठेऊन झाल्यावर हातभर मोठा फोन बाहेर आला. बहुधा बाजूला बसलेली लेक असावी, थोड्याच वेळात माझा अंदाज खात्रीमधे बदलला. "थोबाड फोडेन आता. खिडकी बंद कर. मला थंडी लागतेय. आत्ता वारा वारा करशील नी नंतर ढेंगं वर होतील". मुलींन तोंड फुगवलं. तिने लगेच आपल्या फोनवर 'आई कुठे काय करते' बघायला सुरू केलं. मुलीला कोपरखळी मारून आईने एक सेल्फी घेतला.  "चल आता , वे टु कुणकेश्वर" स्टेटस टाक. आता मात्र मला माझं हसू दाबून ठेवता आलं नाही. तोंड फिरवून मी हसल्यागत केलं. बाकी 'हर हर शंभू शंभू..... शिव महादेव!' चालू होतच. हळू हळू मंडळी ढेपळायला लागली. पहाटे उठून केलेली दगदग आता जरा विसावत होती. काही मंडळी भूकावलेली. पण आज शंकराने अडवून धरलेलं. त्यामुळे वडापाव दिसून सुद्धा माणसं मनाला आवर घालत होती. बटाटा वेफर्स, केळी वेफर्स, राजगिऱ्या च्या पुड्या कुरकुरायला लागल्या. मी मात्र अजूनही आपल्याला बसायला कुठे तरी जागा किमान कोपरा मिळेल या आशेवर होते. एव्हाना माझ्या पोटात जातीण फिरायला सुरुवात झालेली. गर गर गर गर! सुसाट वेगाने धावणारी बस आणि हे पोटात गोलगोल फिरणारं जातं यांनी वेग अगदी मॅच करून टाकला होता. समोरचं महिलामंडळाचं 'सीटव्यापी'  धोरण संपेल असं काही वाटत नव्हतं. उभ्या असलेल्या म्हाताऱ्या कोताऱ्यानी दोन च्या जागी तीन करून कोपरे अडवायला सुरुवात केली होती. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मीही भीत भीत एक शब्द टाकला आणि महिलामंडळाने मलाही सामावून घेतलं. हाssssश! पोटात चालू असलेलं आंदोलन बाहेर येता येता थांबलं! 'बसण्याची' मागणी थोडी तरी पूर्ण झाल्यामुळे!

 

हळूहळू जिल्हा बदलल्याची जाणीव व्हायला लागली. कानांना अतिशय गोड वाटेल अशी बोलीभाषा बोलणारे गाडीत बसायला लागले. आम्ही आधी चघळलेला विषय त्यांनी पुन्हा एकदा नव्याने चघळायला घेतला "मुंबईतसून मानसा इली हत वाटता नाय? नाई तं एवडी गर्दी काय नसता...शिवरात्र नी यात्रा असली म्हनून काय झाला!"

अजूनही उभे असलेले त्रस्त चेहरे आपल्या मनातलं दुःख बसलेले लोक वाचतील या भाबड्या आशेवर होते. नजर फक्त जागा शोधायला भिरभिरत होती. अखेर एका ठिकाणी बस थांबली आणि गाडीत मागच्या काही सीट वर बसलेली फरड उतरायला लागली. 

"ह्या बग काय ता, किर्केटची टीम की काय ही? "

"व्होय बा, जोगेशवरीसून खेळुक आलेत वाटता..."

"पन काय ह्या अक्की टीम आली धा-बारा पोरांची वाटता...!"

"मरूनदेत... उतरा येकदाचे...पाय इलेत मोडत. तेचात उपास आज"

मंडळी अखेरीस बसली. सुखावली. पाण्याचा घोट पिउन शांत झाली. 

माझ्या बाजूला एक बाई येऊन बसल्या. बसायला जागा मिळाली याने त्यांचा चेहरा मेक अप केल्यासारखा चकाकला. केसात माळलेला भरगच्च गजरा लोकं येत जात असताना घरंगळत खाली आला होता, तो आधी त्यांनी नीट केला. मग ओच्याला बांधलेला पान सुपारीचा बटवा काढून पद्धतशीर पान खाऊन झालं. आत्ता कुठे त्यांचं लक्ष शेजारी बसलेल्या माझ्याकडे आलं.

साधारण दोन मिनिटं निरखून शेवटी न राहून विचारणा झाली ," काय गो बाय, मुंबईसून ईलास? खय जाउचा हा?" मी दोन मिनिटं दुःखात मी कोकणातली वाटत नाही की काय? नंतर मी उगाच माझ्या मनाची समजूत केली वाटले असेन मुंबईची! असो. एकूणच त्यांनी सुरू केलेल्या उत्साही चॅटिंग ची सांगता ," गो बाय, तू आता हकडे इलस ना, जत्रेक जा, समुद्राक न्हा, कुणकेश्वराचा दर्शन घे नी म गावाक जा", याने झाली.मी स्मितहास्याने त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. एवढ्यात त्यांची उतरायची वेळ झाली "चल गो बाय...!" म्हणून त्यांनी चालूवाट धरली.

 

'बाय' या शब्दांत जी आपुलकी नी माया आहे त्याची सर कशालाच नाही. गावात आणि कोकणात हा शब्द सर्रास ऐकायला मिळतो. तो शब्द विशिष्ट लयीत बोलला गेला तर त्यातलं प्रेम लगेच पोचतं. अनोळखी माणूस आपला करण्याची ताकद या शब्दात आहे. खिडकीकडे तोंड करून थंडगार वाऱ्याच्या सोबतीने आमचा उरलेला प्रवास सुरू झाला!

 

शिव हर शंकर

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू