पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

महाराष्ट्राच्या मातीत रुजली माय मराठी

महाराष्टाच्या मातीत रुजली माय मराठी

 

     संस्कृत भाषा जगासि कळेना

     म्हणोनी नारायणा दया आली हो

      देवाजीने परि घेतला अवतार

       म्हणति ज्ञानेश्वर तयालागि हो!

   आपले सगळे ग्रंथ हे संस्कृत भाषेत लिहिलेले आहेत. वेद उपनिषदापासून तर  रामायण महाभारत या सारखे महाकाव्य सुद्धा संस्कृत मध्ये लिहिलेले आहे.  अर्जुनाला कुरुक्षेत्रावर भगवंताने सांगितलेली गीता सुद्धा संस्कृत मधेच आहे. वेगवेगळ्या कारणांनी ज्यांना ही भाषा शिकता आली नाही अशा सर्वसामान्य व्यक्तीला  आपले सगळे ज्ञान जे संशोधन करून स्वबळावर अनुभवाच्या पट्टीवर घासून आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवले आहे ते सहजपणे समजायला हवे, आत्मसात करता यायला हवे हा विचार आपल्या संतांनी केला. आणि हळूहळू सगळे ज्ञान मराठी जी महाराष्ट्राची बोली भाषा आहे त्यामध्ये लिहून सगळ्यांपर्यंत पोहचविले. अन मराठी रुजली इथे, फळली,फुलली. आज ती मातृत्वाच्या पदावर विराजमान आहे. वास्तविक पाहता दर बारा कोसावर भाषा बदलते. महाराष्ट्रात मराठी या भाषेचेच विविध रूपं ऐकायला मिळतात. तिचीच ही सारी लेकरं.  

     शब्दोच्चार कसेही असले तरी भाव तोच आहे प्रत्येकाच्या बोलण्यात आणि मनातही. ज्ञानोबा म्हणता येत नसले तरी ग्यानोबा म्हटले तरी ते स्वीकारले गेले कारण ज्ञानेश्वर माऊली बद्दलचा आर्त भाव सारखाच आहे. तेच पुढे प्रचलित झाले. धोडक्यात काय तर मराठी ही जशी बोली भाषा तशी स्वीकारल्या गेली कारण तिचे बोलणे, समजणे आकळणे सोपे वाटले असावे.

     मराठी भाषा जशी वाकवली तशी वाकते असे साधारण बोलल्या जाते. एकाच शब्दाचे अनेक अर्थ असलेली ही एकमेव भाषा. त्यातून ऱ्हस्व दीर्घ यामुळे ही अर्थ बदलत जाणारी ही भाषा. तरीही या मराठमोळ्या भागात ती बहरली, तिचा सुगंध आसमंतात दरवळतो आहे.

     शिक्षणासारख्या क्षेत्रात सुद्धा मराठी भाषेतून शिक्षण द्यावे म्हणजे विद्यार्थी लवकर ज्ञान आत्मसात करतील असे आहे.

     आता आपली जबाबदारी आहे या मातेचे संरक्षण करण्याची. हिच्याच अंकावर बसून आकाशी भराऱ्या घेण्याचे स्वप्न पाहिले आपण. मराठीचा हात धरूनच गगनाला गवसणी कशी घालता येईल याचा विचार करायला हवा. आपल्या पूर्वजांनी मराठीचे बीज या महाराष्ट्राच्या मातीत रुजवले, प्राणपणाने जपले आणि आपल्याला आज ही मधुर फळे मिळतात आहे. मराठी भाषा कशी टिकून राहील, तिचा प्रचार, प्रसार कसा करता येईल हे आपले सगळ्यांचे स्वप्न असावे तरच कवी सुरेश भट म्हणतात तसे आपण अभिमानाने संपूर्ण जगाला सांगू शकू 

     लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

     जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

      धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी

      एवढ्या जगात माय मानतो मराठी

हीच मराठीला मानवंदना ठरेल..

 

रसिका राजीव हिंगे

 

 

    

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू