पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मायमराठी मायबोली

पूर्वीच्या काळी जात्यावरची ओवी ऐकत किंवा म्हणत असतांना लोकांचा दिवस सुरू होत असे, मराठी भाषेतील ह्या ओव्यांची गोडी इतकी अवीट होती की ऐकतांना मन तल्लीन होऊन जात असे आणि काही वेळाकरीता आपल्या दुःखाचा, काळजीचा विसर पडत असे आणि रामप्रहराच्या रम्य, प्रसन्न वातावरणासारखंच मन सुध्दा अगदी प्रसन्न होऊन जात असे परिणामी संपूर्ण दिवस आनंदात जायचा, काही ओव्यांत नात्यांची गुंफण असे तर काही ओव्यांत देवाची भक्ती, देवाशी संवाद असे,लटका राग असे देवावर, एकंदरीत काय तर भक्तिरसात मन चिंब चिंब होवून जायचं. कालांतराने रेडिओ आले आणि मराठी भक्तीगीतांच्या कार्यक्रमाने लोकांचा दिवस सुरू होऊ लागला एकंदरीत काय तर रामप्रहराची, सकाळची सुरुवात मराठी भाषेतील गीतांमुळेच आणि ह्या रामप्रहराचं, सकाळचं वातावरण जेवढं रम्य, प्रसन्न असतं अगदी तसाच लोकांचा दिवस प्रसन्न होऊन जात असे.

                 21व्या शतकात विज्ञानाच्या वेगवान विकासामुळे मानवी जीवन आधुनिकरणाने पछाडले गेले आणि पाश्चात्यांच्या अनुकरणात वहावत चाललेले आहे. आपली संस्कृती, आपली भाषा, आपला धर्म हे सगळं आजचा माणूस विसरत चालला आहे. जगात एकंदर 2700भाषा ,7000बोली,बोलल्या जातात ,प्रत्येक भाषेचं, प्रत्येक बोली एक महत्व आहे, त्या त्या देशानुसार, त्या त्या वातावरणानुसार भाषा ही महत्वाची असते आणि असायला सुध्दा हवी. आजकाल मराठी भाषेपेक्षा इंग्रजी भाषा वरचढ होते आहे कारण काय तर स्पर्धेच्या युगात वावरायचं आहे, खूप शिक्षण घेवून उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचं आहे तेंव्हा इंग्रजी भाषेत शिक्षण आवश्यक आहे, मला इंग्रजी किंवा इतर भाषेचा राग किंवा तिरस्कार अजिबात नाही पण मराठी भाषा मात्र अतिशय प्रिय आहे.

                आपल्या देशात होवून गेलेले तुकाराम महाराज, एकनाथ महाराज ह्यांसारख्या संतांचे अभंगातसुध्दा मराठी ची अवीट गोडी समजते इतकेच नव्हे तर ज्ञानदेवांनी केलेले मराठी भाषेचे कौतुक, सांगितलेले महत्त्व, गोडी आपल्याला सर्वश्रुत आहेच, मराठी भाषेचा जितका अभ्यास आपण करू तितकी ती अधिक प्रिय होत जाते, आपली मायबोली मराठी आहे ह्याचा अभिमान वाटायला लागतो. 

                   आजकालच्या स्पर्धेच्या किंवा आधुनिकरणाच्या युगात मराठी भाषा दुर्लक्षित होत चालली आहे, तिचं महत्त्व कमी होत चालले आहे, मराठी भाषेला दुय्यम दर्जा दिला जातो आहे ह्यासाठी आपणच जबाबदार आहे, आज आपण मुलामुलींना अगदी बालपणापासून इंग्रजी शाळांमध्ये घालतो जेणेकरून ही मुलंमुली सुरवातीपासूनच इंग्रजी लिहू वाचू व बोलू शकतील व पुढे त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, यावेळी आपण सपशेलपणे हे विसरून जातो की बालपणातच आपल्या मातृभाषेची, आपल्या मायबोलीची अक्षर ओळख होणं गरजेचं आहे जेणेकरून बालमनावर आपल्या धर्माचे संस्कार होण्यास मदत होईल, आपली संस्कृती, आपल्या देशाचा इतिहास आपल्या मातृभाषेतच चांगला शिकता येईल,आपली परंपरा, आपले सणवार ह्यांबद्दल वेगळी माहिती सांगावी लागणार नाही कारण आपण आपल्या पध्दतीने घरात सण साजरे करत असतो, मराठी भाषा पूर्वीही महत्वाची होती आणि आजही तेवढीच महत्वाची आहे, आपणच तिच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील व्हायला हवे.  

                   आपल्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, तिला वाचवण्यासाठी आपण आपल्या मुलांना सुरुवातीपासूनच मराठी शाळांमध्ये घालावे, शाळांमध्ये सुध्दा अनेक उपक्रम राबवता येतील उदाहरणच द्यायचे झाले तर ग्रंथदिंडी चे देता येईल यामुळे मुलांना आपल्या ग्रंथांचीओळख तर होईलच अन् आपले ग्रंथ म्हणजे एक अनमोल ज्ञानाचा खजिना आहे हेही समजेल किंवा आपल्याला त्यांना समजवून सांगता येईल आणि मराठी चे महत्व पण कळेल, मान्य आहे की बदलत्या काळानुसार मुलांना इंग्रजी भाषा शिकणे आवश्यक आहे पण आधी मराठीत समजवून सांगितले पाहिजे आणि मग तीच गोष्ट इंग्रजीत सांगावी, वाढत्या वयाबरोबर मुलं इंग्रजी आत्मसात करतीलच, जिथे मराठी चा वापर आवश्यक आहे तिथे मराठीच वापरावी आणि जिथे इंग्रजी चा वापर आवश्यक आहे तिथे जरूर इंग्रजी वापरावी, काही लोकं लँपटाँप किंवा फोन वर मराठी टाईप करतात पण इंग्रजी अक्षर वापरून टाईप करतात ही गोष्ट अगदी चुकीची आहे कारण तिथे मराठी अक्षरं उपलब्ध असतात. 

                ज्ञानोबांनी मराठी भाषेचे कौतुक केलं आहे ह्याचा आपल्याल सार्थ अभिमान आहे कारण संतश्रेष्ठ कौतुक करतात म्हणजे मराठीत भाषा किती श्रेष्ठ, किती महत्त्वाची आहे हे आजच्या पिढीला समजायला हवे नव्हेतर आपणच इंग्रजी चे गोडवे गाणाऱ्या नव्या पिढीच्या डोळ्यांवरून आधुनिकतेची, सुशिक्षीततेची झापड दूर सारून जिथे जिथे मराठी भाषा वापरणं आवश्यक आहे, शक्य आहे तिथे तिथे मराठी भाषा वापरलीच पाहीजे असे सांगून मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. 

                वि. वा. शिरवाडकर (विष्णू वामन शिरवाडकर) उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो ही मराठी माणसांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आजकाल नवीन पिढीमध्ये एक प्रत्येक दिवस अमुक डे तमुक डे म्हणून साजरा करण्याचे खूळ बोकाळलं आहे आणि ते महत्त्व फक्त एक दिवसच असतं त्याप्रमाणेच मराठी भाषा दिनाचे सुध्दा एकच दिवस महत्त्व असतं, हे कुठेतरी थांबायला हवे आणि म्हणूनच मुलांनी बालपणापासूनच प्राथमिक शिक्षण तरी मराठीतच शिकावे असा अट्टाहास आपण करायला हवा जेणेकरुन मराठी भाषेबद्दल प्रेम, ओढ, त्यांना वाटेल थोडक्यात सांगायचे म्हणजे मराठी भाषेलाही "अच्छे दिन "येतील.

              दुर्लक्षित होत चाललेल्या मराठी भाषेला दर्जा मिळावा यासाठी खूप गाजावाजा, गवगवा, बोभाटा, आंदोलने करण्याची अजिबातच गरज नाही, "Charity begins from home " ह्या उक्तीप्रमाणे आपण आपल्याच घरापासून सुरुवात करायला पाहिजे म्हणजे नव्या पिढीला आपसूकच मराठी भाषेचे महत्त्व कळेल. 

       थोर भाग्य मराठी मायबोली लाभली आम्हाला 

         अवीट गोडी हिची, कौतुके किती सांगु तुम्हाला

         माय मराठीत आमुच्या नाही तोटा रसाळ शब्दांला 

          ज्ञानार्जन करू हिच्यासंगे ,घालू गवसणी गगनाला

                

   

श्वेता किशोर 

  नागपूर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू