पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मराठी भाषा संवर्धन उपाय

 

मराठी भाषा वृद्धिगत करण्यासाठी उपाय योजना 

 

माझी मराठी मराठी 

नवरत्नाची ती खाण 

अमृताही पैजा जिंके

आम्हा तिचा अभिमान

 मराठी भाषेची महती सांगताना कवी वरील ओळीतून आपला भाव व्यक्त करतो.चपखल शब्दांमध्ये तिची महती वर्णन करतो. अशी ही आमची माय मराठी आमच्या मनामनात वसते  आमच्या घरात अंगणात नांदते, आमच्या हृदयात भावभावनांचे कंगोरे तयार करते, राजभाषा म्हणून बहुमानाने मिरवते, ज्ञानभाषा म्हणून ज्ञानाचाचे अमृत पाजते,तंत्र भाषा म्हणून तंत्रज्ञान शिकवते,बोलीभाषेतून अस्सल मातीचा गोडवा गाते.

 गोड मराठी माझी

जणू वासराची गाय

जशी बहिणाईची गाणी

बाळा जोजविते माय 

मराठी ही केवळ बोलण्याची भाषा नसून ती आम्हा महाराष्ट्रातील जनतेची जगण्याची रीत आहे.रोजच्या जीवनाचे गीत आहे,संस्कृतीचे मीत आहे.इतर कितीही भाषांचा शिरकाव झाला तरी तिचं हृदय एवढं मोठं आहे की ती इतर भाषांना आपल्या सामावून घेते

ज्ञाना तुका नामा जना

दिले शब्दांचे हो धन

महानुभाव, पंत, तंत

वाढवी मराठीची शान

डफ शाहिरी तुणतुणं

ललकरीची जान

कवी लेखक विचारवंत

नवलाखाची खाण

 अशा या मराठीला अधिक उज्वल भविष्य मिळण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी आपण खालील उपाय करूया आणि मायमराठीचे पांग फेडूया 

1) अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होणे

 मराठी भाषा ही किती प्राचीन आहे याचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने आपले सर्व पुरावे देऊ केलेले असून मराठी भाषा ही अभिजात आहे हे सिद्ध केले आहे त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा जेणेकरून ही भाषा राष्ट्रीय स्तरावरती पोहोचेल व तिचा विकास करण्यासाठी अधिक चांगले वातावरण तयार होईल.

 

2)शालेय अभ्यासक्रमात मराठी विषय सक्तीचा असावा.

 महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत मराठी विषय हा सक्तीचा असावा तसेच या विषयासाठी असे आशयसंपन्न असा अभ्यासक्रम असावा तसेच बऱ्याच ठिकाणी इतर बोर्डांच्या शाळेमध्ये कोणीही मराठी विषय येऊन शिकवते. असे न होता मराठी अध्यापनासाठी मराठी विषयांमध्ये पदवीत्तर पदवी असलेल्या शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी जेणेकरून मराठी विषय शिकवण्यासाठी त्यामध्ये तज्ञ असलेला शिक्षक विद्यार्थ्यांना मिळेल व त्यामुळे इतर भाषिक विद्यार्थ्यांना मराठी विषय अवघड वाटण्याऐवजी सोपा वाटू लागेल. त्याचा भाषेतील रस वाढेल.

 

3) महाविद्यालयातील वाड्मय मंडळे सक्षम करणे

 विविध महाविद्यालयामध्ये मराठी वाडमय  मंडळे असून या मंडळाच्या वतीने अतिशय चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात परंतु हे प्रमाण कमी असून याचे प्रमाण वाढवले पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांना या उपक्रमासाठी काही गुण देण्याची पद्धत सुरू करण्यात यावी जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी या वाड्मय मंडळामध्ये सहभागी होईल व वाड्मय मंडळाचे उपक्रम दिवसेंदिवस वाढत जातील तसेच या वाड्मय मंडळामध्ये वर्षभर उपक्रम होणे गरजेचे आहे त्यासाठी शासनाकडून किंवा तेथे स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेकडून निधी पुरवण्यात यावा.

 

4)मराठी भाषा संस्था प्रचार प्रसार होणे 

 मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी आपल्या राज्यात असणाऱ्या विविध संस्था अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, मराठी साहित्य परिषद, मराठी साहित्य संवर्धन संस्था  मराठी साहित्य संस्कृती मंडळ या संस्था शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे काहीच लोकांचं प्रतिनिधित्व या संस्थांमध्ये झालेले दिसून येते.खरे साहित्यिक आहेत ते मात्र या संस्थेपासून दूर असतात त्यामुळे तेथे काय  उपक्रम सुरू असतात ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे या संस्थांचे प्रचार प्रसार हा खूप मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे.अखिल भारतीय साहित्य संस्था ही फक्त काही शहरांपुरतं मर्यादित आहे असेच वाटते तिची नोंदणी कुठे होते कशी होते याबद्दल काहीच माहिती मिळत नाही त्यामुळे ह्या संस्था समाजामध्ये कशा विस्तारत जातील हा प्रयत्न केला पाहिजे.

 

5)विज्ञान, तंत्रज्ञान  याची पुस्तके मराठीत असावीत.

 आजचा काळ हा तंत्रज्ञानाचा असून आजच्या काळामध्ये तांत्रिक शब्दांचा वापर फार मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो.यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान याची पुस्तके मराठी भाषेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येणे गरजेचे आहे. यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे तसेच विविध प्रकारचे इतर भाषेतील साहित्य अनुवादित करून मराठीमध्ये उपलब्ध होणे गरजेचे आहे. बराच वेळ अनुवादित पुस्तकांची किंमत ही जास्त असते त्यामुळे  ते घेतले जात नाही. शासन स्तरावरून या पुस्तकांचा अनुवाद करण्यात यावा व ती पुस्तके कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यात यावीत.

 

6)मराठी भाषा विदयापीठ असावे 

 मराठी भाषेचा विकास करण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी सर्व विविध संस्था यांना एकत्रित करून मराठी भाषा विद्यापीठ असणे गरजेचे आहे की ज्या विद्यापीठाद्वारे मराठी भाषा संदर्भातील,साहित्य संदर्भातील छोटे छोटे अभ्यासक्रम,पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम,संशोधन अभ्यासक्रम,पीएचडी अभ्यासक्रम,हे या ठिकाणी राबविण्यात यावेत तसेच साहित्य व कला संस्कृती या संदर्भातील सुद्धा विविध उपक्रम राबवण्यात यावेत.

 

7)कार्यालयीन मराठी भाषा साधी सोपी असावी.

 कार्यालयीन भाषेमध्ये मराठीत किचकट शब्दांचा वापर करण्यात येतो त्या ठिकाणी आपल्या दैनंदिन व्यवहारातील साधे सोपे शब्द वापरणे गरजेचे आहे सामान्य लोकांना हे शब्द पटकन समजतील व त्यांना ही भाषा किचकट वाटणार नाही.

 

8)दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा मोठया प्रमाणात वापर करणे.

 दैनंदिन व्यवहारामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे हे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. एका पुरोगामी व प्रगतशील राज्याचे नागरिक म्हणून आपल्या भाषेचा विकास करण्यासाठी प्रत्येकाने मराठी भाषेत बोलणे गरजेचे आहे तसेच आपले व्यवहार मराठी भाषेमध्ये करणे गरजेचे आहे.

 

9)मराठी शाळा सक्षम करणे.

 मराठी भाषेचा विकास करत असताना मराठी माध्यमातील शाळा हा आपल्या समोरचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आज तयार झाला आहे. यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे तसेच या प्रयत्नांना समाजाकडूनही चांगला प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे मराठी शाळा कशा पद्धतीने दर्जेदार होतील,तेथील अध्यापन कशा पद्धतीने चांगल्या दर्जाचे होईल, तिथल्या सर्व सोयी सुविधा या कशा पद्धतीने चांगल्या होतील, कडे शासन व समाज यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

 

10)संस्था मंडळ यांचे सहकार्य 

 समाजामध्ये असणाऱ्या विविध साहित्य संस्था मंडळे विविध प्रकारचे ग्रुप यांच्याद्वारे मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात या उपक्रमांना शासन स्तरावरून आर्थिक मदत गरजेचे आहे तसेच या संस्थांना राज्यस्तरावरील संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे आहे जेणेकरून सर्व हात एकत्र आल्यावर या माय मराठीची सेवा व तिचा उत्कर्ष आपल्या सर्वांना मिळून सांगता येईल

 अशाप्रकारे विविध उपक्रम राबवून विविध उपायोजना करून आपल्याला आपली मराठी भाषा वृद्धिगत करता येईल आणि येणाऱ्या नवीन आव्हानांसाठी सज्ज होता येईल.

उज्वल आमची मायमराठी

आमचा तुकायाचा गाथा

नतमदतक तूझ्या चरणी

महाराष्ट्राचा माथा.

प्रदीप महादेव कासुर्डे

घणसोली नवी मुंबई

मो.7738436449

 

 

 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू