पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भारतातील चित्ते - काल, आज आणि उद्या

 

 

भारतातील चित्ते - काल, आज आणि उद्या

लेखिका - सौ. मानसी चंद्रहासशास्त्री सोनपेठकर

 

सर्वांची वेधुनी चित्ते  | चपळांग धावती ते |

पट्टे अंगावरी बहु | जणू शोभिवंत बाहू ||

परि सात दशकांपूर्वी | नामशेष ते इथुनि |

झाले ऐसी घोषणा | सरकारी ती केली असे ||

अष्ट वर्षांपूर्वी एक | नरव्याघ्र झाला पदस्थ |

नरेंद्र तयाचे नाम | करितसे थोर कर्म ||

आर्यावर्ती पराक्रम | करूनी आणिले चित्ते |

संख्या तयांची अष्ट | जणू दिग्पाल ते वनस्थ ||

 

प्रस्तावना -

          भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सुमारे 90-92 कोटी रुपये खर्च करून दक्षिण आफ्रिकेतील नामिबिया देशातून तीन नर व पाच माद्या अशा एकूण आठ चित्ताकर्षक चित्त्यांचे आगमन १७ सप्टेंबर, २०२२ रोजी भारतातील मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात झाले आणि १९५२ पासून भारतातून नामशेष झालेल्या या चित्त्याला भारतात परत आणण्याचे १९७० साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी ठरवूनही सर्वोच्च न्यायालयाने तो प्रस्ताव नाकारल्याने त्यांचे अधुरे राहिलेले स्वप्न मोदींच्या कार्यकाळात पूर्ण झाले आणि गेल्या अनेक दशकांच्या वन्यप्राणीतज्ज्ञांच्या मेहनतीचे फळ मिळाले.

 

चित्ते - काल -

          पूर्वी राजे महाराजांच्या काळात चित्ते मारणे हे प्रतिष्ठेचे समजले जात असल्याने त्यांची सर्रास शिकार होत असे. १९४७ मध्ये भारतात अस्तित्व टिकवून असणाऱ्या शेवटच्या उरलेल्या तीन चित्त्यांची शिकार मध्यप्रदेशातीलच रामानुज प्रताप सिंह यांनी केली. भारतात १६ व्या शतकात असलेल्या १0,000 चित्त्यांपैकी १,000 चित्ते मुघल सम्राट अकबराच्या दरबारामध्ये होते अशी नोंद स्वतः अकबराने केल्याचे आढळून येते. १७९९ ते १९६८ या काळात भारतीय जंगलांमध्ये किमान २३० चित्ते होते. ब्रिटिश काळात चित्त्यांना राहण्यास जागा नव्हती. शिवाय त्यांचे भक्ष्य असणाऱ्या काळवीट, सांबर , ससे अशा प्राण्यांचीही प्रचंड प्रमाणात शिकार झाल्याने चित्त्यांचे आगमन अन्नशोधार्थ मानवी वस्त्यांमध्ये झाल्याने ब्रिटिश सरकारने बक्षिसे देऊन चित्त्यांच्या शिकारीसाठी परवानगी दिली होती. त्यामुळे चित्त्यांचे अस्तित्व हळूहळू संपुष्टात आले. संस्थान काळात कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी चित्त्यांकरवी हरणांची शिकार हा खेळ पाहून हैदराबादहून रहिमान खान या चित्तेवानाला कोल्हापुरात आणून चित्तेखाना उभारायचा असा त्यांनी निश्चय केला. नंतर त्यांनी केनियाची राजधानी नैरोबी येथूनही अनेक चित्ते मागवून त्यांची जोपासना केली.

 

चित्ते - आज -

सध्याच्या काळात प्रख्यात चित्ताभ्यासक डॉ. प्रज्ञा गिरडकर या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींमधील एकमेव भारतीय असल्याने त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील नामिबियामध्ये केलेल्या वास्तव्यामध्ये एका महिनाभरात सुमारे ५२ चित्त्यांचा अभ्यास केला. सर्कससाठी १-२ चित्ते आणणे ही गोष्ट वेगळी पण अनेक चित्ते भारतीय अधिवासात आणण्यापूर्वी त्या चित्त्यांचे स्वभाव ,आरोग्य , सवयी इत्यादी गोष्टींची सर्वंकष माहिती अभ्यासली आणि मग भारतस्थ झालेल्या या भारदस्त चित्त्यांच्या गळ्यात कॉलर लावून सुमारे एक-दीड महिनाभर त्यांनी सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेरांद्वारे त्यांचे निरीक्षण केले.

 

चित्ते - उद्या -

आता या चित्त्यांना जंगलात सोडल्यानंतरही अनेक आव्हाने या अभयारण्याच्या वनरक्षकांकडे असतील जसे की या चित्त्यांचा इतर मांसाहारी प्राण्यांबरोबर संघर्ष होऊ शकेल. हे आशियाई देशातील चित्ते नसून आफ्रिकन असल्याने त्यांच्या जनुकांमध्येही बदल दिसतात. तसेच कुनो अभयारण्यात चित्त्यांपेक्षाही ताकदवान असणारे तरस जास्त सरस असल्याने ते या चित्त्यांवर हल्लाही करू शकतात. आनंदाची बाब हीच की ग्वाल्हेरमधील चंबळ प्रदेश हा दरोडेखोरांसाठी प्रसिद्ध असल्याने या प्रदेशात चित्त्यांचे आगमन दरोडेखोरांवर वचक बसवण्यास समर्थ असेल.  चित्त्याचे मुख्य खाद्य चितळ ते या कुनो अभयारण्यात मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या 'परत येणार चित्ता भारतात' या मताला अनुसरून या चित्त्यांना या प्रदेशात स्वास्थ्यकारी वातावरण नक्कीच लाभेल असे वाटते. १९८० मध्ये पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातील चित्ते नामशेष झाले होते. २०१७ मध्ये त्यांनी आणलेले ४ चित्ते आज २०२२ मध्ये २४ संख्येपर्यंत पोहोचले आहेत. या चांगल्या अनुभवावर भारतातूनही चित्त्यांसाठी मोदी सरकारने दाखवलेला हिरवा कंदील स्तुत्य नि कौतुकास्पद आहे.

 

भविष्यकाळात अजून १८चित्ते भारतात आणण्याचे नियोजन पर्यावरण मंत्र्यांचे आहे ज्यायोगे अभयारण्यातही पर्यटक संख्या वाढेल आणि वनखाते व शासनावरही त्याचा आर्थिक भार पडणार नाही. मोठमोठ्या उद्योजकांनी चित्त्यांच्या एकेका जोडीचे पालकत्व घेतले तरी सरकारवरील आर्थिक भार कमी होईल.

 

स्वमत -

          अंटार्क्टिका, दक्षिण कोरिया या प्रदेशांमधून आलेले ८ पेंग्विन २०१६ पासून मुंबईतील राणीच्या बागेत जसे स्थिरावून आजमितीला ते १२ झाले आहेत तसेच नामिबियातून आलेले हे ८ चित्ते आफ्रिकेसम वातावरण असणाऱ्या भारतातही नक्की चांगले रुळतील. त्यांचे आगामी प्रजोत्पादन वाढेल आणि मोठ्या संख्येने अभ्यासू आणि हौशी पर्यटकांना ते चित्तानंद देण्याचे भाग्य लाभू देतील अशी आशा वाटते.  म्हणूनच म्हणावेसे वाटते की,

 

सप्ततिः वर्षभ्यो प्राक् नामशेषाः जाताः चित्रकाः |

परं स्वागतं ते चित्रकाः दर्शनातुराः भारतीयपर्यटकाः ||

(चित्रका: - चित्ते)

( वनराई पर्यावरण वाहिनीद्वारे पारितोषिक प्राप्त निबंध )

 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू