पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आजच्या काळात मराठी भाषेचे महत्व व तिच्या संवर्धनासाठी उपाय

माझी मायबोली - मराठी, माझी मातृभाषा - मराठी - तिला हजारो वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेला आहे.12व्या शतकातील अंबेजोगाईचे आद्यकवी मुकुंदराज यांनी 'विवेकसिंधु या ग्रंथात एकूण 18 ओवीबद्ध प्रकरणे लिहिली.तोच आपला आद्यग्रंथ आहे. आपणा सगळ्यांना ठाऊक आहेच की, ज्ञानेश्वर महाराजानी संस्कृतमधील 'भगवतगीता' आपल्या मराठी बांधवासाठी मराठीत 'ज्ञानेश्वरी' या ग्रंथाद्वारे सुमारे 75 वर्षानंतर म्हणजेच आद्यकवी मुकुंदराज यांच्या मृत्यूनंतर पुढे लिहिली. तो आपल्या मराठीतील दुसरा आद्यग्रंथ आहे. 

हजारोवर्षापूर्वी मराठीत लिहिलेला पहिला शिलालेख कर्नाटकातील 'श्रवणबेळगोळ' येथील गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली आढळतो. ज्ञानपीठ सारखा साहित्यातला पुरस्कार देखील आपल्या मराठी साहित्याला म्हणजेच 'ययाती' या वि.स.खांडेकर लिखित मराठी कादंबरीला मिळाला आहे.
           साहित्याची परंपरा खूप अखंड आहे. संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकडोजी महाराज, संत सावता माळी, संत चोकोबा, समर्थ रामदास स्वामी यांनी देखील आपल्या साहित्याद्वारे माय मराठीची शोभा वाढवली आहे. या आपल्या मायबोली मराठीला 1960 ला राज्यभाषेचा सन्मान मिळाला.
               आपणच आपल्या मराठी भाषेची वाईट दशा करण्यासाठी जबाबदार आहोत. आजकाल पालक आपल्या पाल्यांना मराठी माध्यमातून न शिकवता इंग्रजी माध्यमातून शिकवत आहेत.याचा मोठा परिणाम आपल्या मराठी शाळेला होत असून, कित्येक मराठी शाळेला विद्यार्थी मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर कित्येक मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. इतकेच कशाला आपले सर्व शासकीय कागदपत्रे देखील इंग्रजीमधूनच आहेत. म्हणजेच राजकीयदृष्ट्या आपण जरी स्वतंत्र झालो तरी अजून इंग्रजांची मानसिक गुलामगिरी चालूच आहे.            
               कित्येक मानसशास्त्रज्ञाने सांगितले आहेच की, तुम्ही तुमच्या मातृभाषेत शिक्षण घेतलात तर तुमची प्रगती जास्त हाईल. उदा. कित्येक शास्त्रज्ञ जसे डॉ. अब्दुल कलाम, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. विजय भटकर, इ.नी आपले प्राथमिक शिक्षण आपल्या मातृभाषेत केल्यामुळेच ते यशस्वी जीवनाची इतकी उंची गाठू शकले.म्हणून आता आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी 2023-24 पासून NEP (New Education Policy)आणली आहे.त्याद्वारे देशात सर्वत्र कोणत्याही राज्यात प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून करण्यासाठी कंबर कसली आहे. आज विदेशात जपान, रशिया इ. ठिकाणी आपल्या मातृभाषेतूनच शिक्षण देतात, म्हणून त्यांची प्रगती आपल्याला दिसून येत आहे. हेच लक्षात घेऊन आपले केंद्र सरकार देखील इंजिनिअरींग आणि मेडिकलसारखे उच्च शिक्षण देखील मातृभाषेत करणार आहे.
                   आपल्या मातृभाषेतून आपल्या विचारांचे आणि भावनांचे आदानप्रदान सहज करता येते, म्हणून ती आता आपण कोणत्याही परिस्थितीत स्विकारली पाहिजे. लक्षात ठेवा आपल्याला स्वप्नं मराठी भाषेतच पडतात, इंग्रजी भाषेत पडत नाहीत. आपली मराठी भाषा आपल्यासाठी कुठेही, कधीही अडसर न राहता एक देणगी झाली पाहिजे. आपल्या घरात आपण बोलण्यासाठी आपल्या मायबोली मराठीचा वापर आवर्जून केला पाहिजे, जेणेकरून ती भविष्यात टिकली जाईल. प्रत्येकांनी रोजनीशी लिहिताना या माय मराठीचा उपयोग जास्तीत जास्त केला पाहिजे.बाहेर फिरायला जाताना सामानाची यादी सुद्धा आपल्या मायमराठीतच केली पाहिजे.  सर्वत्र आपला महाराष्ट्रात मराठी पाट्या, मराठी बोलणं याचा वापर सर्वांकडून आवर्जून झाला पाहिजे. आपल्या मराठी भाषेतील साहित्य वाचण्यास सुरुवात केली पाहिजे. सोबत इतरांनाही ते वाचण्यास प्रेरित केलं पाहिजे. कधीमधी नवमराठी लेखक /कवींचं साहित्य देखील वाचलं पाहिजे. एवढंच काय साहित्यिकांनी आपलं साहित्य सातासमुद्रापार कस जाईल हे  पाहिलं पाहिजे. दिड दिवस शाळा केलेल्या अण्णाभाऊ साठेंचं साहित्य रशियन भाषेत अनुवादीत होतं तर त्यापेक्षा अहोभाग्य दुसरं कोणतं?
       तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व इंग्रजी पुस्तके मराठीत अनुवादीत केली पाहिजेत, जेणेकरून ती जनसामान्यांना लवकर उमगतील. सर्व शासकीय योजनांची कागदपत्रे सुध्दा मराठीत उपलब्ध करण्यासाठी शासनाने प्रयत्न केला पाहिजे. आजकाल वेगवेगळ्या सॉप्टवेअर्सच्या माध्यमातून हे सर्व शक्य आहे. असं केल्यानंतरच आपली मराठी भाषा वाचणार आहे. आपल्या मराठी भाषेला शासनाने लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, जेणेकरून आपल्या मायबोलीचा खूप विकास होईल, म्हणून मी शेवटी म्हणतो-
"जपा आपली भाषा मराठी
जपा आपली संस्कृती मराठी"
©®-विश्वेश्वर कबाडे
मु.पो.अणदूर
ता.तुळजापूर
जि.धाराशिव
भ्रमणध्वनी-9326807480
e-mail- vishweshwarkabade41@gmail.com

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू