पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कॅन्सर मुक्तीचा प्रवास

लेखक ः- सर्जेराव कुइगडे

        

      रामराव माने एक सत्तरी उलटलेले कुटुंबवत्सल आणि सुखवस्तु गृहस्थ. मुले कमावती झाल्यावर तर सर्व आर्थिक, प्रापंचिक जबाबदाऱ्यातून मुक्त होऊन निवृत्तीनंतरचे आपले आयुष्य रामराव अत्यंत सुखा समाधानात जगत होते.

      आताशा रामरावांना प्रकृतीसंबंधातील एक  तक्रार तीव्रतेने जाणवू लागली होती. त्यांना मूत्र विसर्जनासाठी वारंवार उठावे लागत होते. तशी ही तक्रार जुनीच होती; काही वर्षांपूर्वी त्यांनी त्यासंबंधातील तपासणी करून घेतली होती. त्यांच्या शरीरातील प्रोस्टेट ग्रंथी वाढल्या असल्याने प्रोस्टेट ग्रंथींचा वाढलेला भाग काढून टाकण्यासाठीची शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला त्यावेळी  डॉक्टरांनी त्यांना दिला होता; पण या, ना त्या कारणाने  रामरावांचे त्याकडे दुर्लक्ष झाले होते. 

      अशीच पाच सहा वर्षे गेली तेव्हा त्यांच्या

मुलांनीच त्यांना मूत्ररोग तज्ज्ञाकडे नेले. रामरावांनी डॉक्टरांच्या अगोदरच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून फार मोठी चूक केली होती; कारण मूत्ररोग तज्ज्ञांनी केलेल्या तपासणीत रामरावांना प्रोस्टेट ग्रंथींचा कॅन्सर झाल्याचे व तो काही प्रमाणात नजीकच्या हाडांमध्ये पसरल्याचे निदान झाले. 

     आपणाला कॅन्सर झाल्याचे निदान ऐकताच रामरावांना फार मोठा धक्का बसला. कॅन्सर झालेल्या व्यक्तीस अतीव वेदना सोसत कणाकणाने मृत्युला सामोरे जावे लागते याची अनेक उदाहरणे त्यांनी पाहिली होती. आता आपण फार दिवसाचे सोबती नाही, कॅन्सरच्या मरणकळा आपणास सोसवणार नाहीत; ही जाणीव होताच त्यांना नैराश्याने घेरले; पण त्याचवेळी त्यांचे दुसरे मन त्यांना सांगत होते, तू मर्द मराठा ना? शिवकाळात तुझ्या पूर्वजांनी तलवार गाजविली होती. लढाया जिंकल्या होत्या. तो इतिहास आठव आणि समोर आलेल्या संकटाचा सामना कर. त्यांना 'शोले' मधल्या गब्बरसिंगचा तो डायलॉग आठवला,

"जो डरेगा, वो साला मरेगा !" आणि मग रामरावांनी हिम्मत धरली. आपण या रोगावर जिद्दीने मात करायचीच असा त्यांनी निर्धार केला नि त्यांच्या मुखावर हासू उमटले. 

      सकाळ होताच  रामरावांनी कॅन्सरची लागण आणि त्यावरील उपाय याविषयीचे महाजालावर उपलब्ध असलेले सर्व साहित्य वाचून काढले. या वाचनाने त्यांना कॅन्सर कसा होतो, कॅन्सर बरा होऊ शकतो ते समजले; शिवाय त्यांच्या मनातील कॅन्सरसंबंधीच्या सर्व शंका कुशंकांचे निराकारण झाले. 

      अनियंत्रित पेशी-विभाजनामुळे उद्भवणारा रोग म्हणजे कॅन्सर. कॅन्सरमुळे शरीरातील निरोगी ऊतींचा नाश होतो आणि जीवाला धोका निर्माण होतो. सजीवांच्या पेशींमधील गुणसूत्रांमध्ये जनुके असतात. पेशींची वाढ आणि प्रजनन जनुकांमार्फत होत असते. जेव्हा या जनुकांमध्ये बिघाड होतो आणि पेशींचे विभाजन नियंत्रणाबाहेर घडून येते तेव्हा कॅन्सर उद्भवतो.  मध्यमवयीन आणि प्रौढवयीन लोकांमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण अधिक असते.

•  त्वचेचा कॅन्सर हा जगभर सामान्यपणे दिसून येणारा कॅन्सर. याची वाढ सावकाश होते.

• स्तनांचा कॅन्सर स्त्रियांना तसेच पुरुषांनाही होऊ शकतो. 

• पचनसंस्थेमध्ये सामान्यपणे बृहदांत्र आणि गुदद्वार या इंद्रियांना कॅन्सर होतो. यकृत, जठर आणि स्वादुपिंड या इंद्रियांनादेखील कॅन्सर होऊ शकतो. 

• श्वसनसंस्थेतील घसा आणि फुप्फुस या इंद्रियांना कॅन्सर होतो.

•  प्रजननसंस्थेचा कॅन्सर  स्त्रियांमध्ये तसेच पुरुषांमध्ये दिसून येतो. 

•  सामान्यतः पन्नास वर्षावरील पुरुषांना प्रोस्टेट ग्लॅंड्सचा कॅन्सर होतो. योग्य उपचार वेळीच केल्यास या कॅन्सरची वाढ आटोक्यात आणता येते. 

• स्त्रियांच्या प्रजनन संस्थेच्या कॅन्सरमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक आढळते. काही स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुख्य भागात कॅन्सर उद्भवतो, तर काहींमध्ये गर्भाशयाखाली असलेल्या ग्रीवेचा कॅन्सर उद्भवतो. 

• अस्थिमज्जा आणि रक्त निर्माण करणार्‍या इंद्रियांच्या कॅन्सरला श्वेतपेशी कॅन्सर (ल्युकेमिया) म्हणतात. 

• लहान मुलांमध्ये चेता-ऊती, डोळे, वृक्क, मृदू ऊती आणि हाडे इ. भागांचे कॅन्सर आढळतात. 

       अभ्यासाने झालेल्या उद्बोधनाने कॅन्सरविरुद्धची लढाई आपण जिंकणारच याची रामरावांना खात्री झाली. 

       मूत्ररोग तज्ज्ञांनी प्रोस्टेट ग्रंथीची शस्त्रक्रिया करण्याबरोबरच त्यांच्या शरीरातील अंडकोषही शस्त्रक्रियेने काढून टाकावे लागतील अशी सूचना केली  होती. ही बाब रामरावांना तितकीशी पटली नव्हती; म्हणून मुंबईच्या टाटा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे स्वतंत्र परंतु निर्णायक मत आजमावून पाहावे असे त्यांनी ठरविले.

      दुसऱ्या दिवशी रामराव आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन टाटा रुग्णालयात पोचले. डयुटीवरील तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांचे हसतमुखाने स्वागत केले. सर्व तपासण्यांचे रिपोर्ट पाहिल्यावर रामरावांना कॅन्सर झाल्याच्या निदानाला त्यांनी दुजोरा दिला. रामराव तर योद्ध्याच्या भूमिकेत होते. मुलांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून स्वतः रामरावांनीच मुलांची समजूत काढली. 

      टाटा हॉस्पिटलमधील रुग्णांची प्रचंड गर्दी पाहून आपणास इथे उपचार घ्यायचे नाहीत असे रामरावांनी डॉक्टरांना सांगितले; तेव्हा पुढील उपचारांसाठी टाटा हॉस्पिटलमधील कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या व तेव्हा  मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या डॉ. हेमंत टोणगावकर यांना भेटा असे डॉक्टरांनी सुचविले.

       डॉ. टोणगावकरांनी सर्व रिपोर्ट पाहिले आणि  रामरावांचे वार्धक्य लक्षात घेऊन शस्त्रक्रिया न करता केवळ रेडिएशन आणि हार्मोन ट्रीटमेंटने कॅन्सर रोगावर मात करता येईल असा रामरावांना दिलासा दिला. रामरावांचा आत्मविश्वास, अतुलनीय इच्छाशक्ती, कर्करोगाशी लढा देण्याची जिद्द आणि डॉ. टोणगावकरांचे सुयोग्य उपचार यांच्या जोरावर २०१५ साली सुरू झालेल्या या आजारपणाचा शेवट आता दृष्टीपथात आला आहे; कारण त्यांचा  कॅन्सर आटोक्यात आल्याने आता त्यांना औषधोपचारांची गरज नाही अशी सुखद वार्ता डॉक्टर टोणगावकरांनी रामरावांना नुकतीच दिली आहे.

       रामरावांनी अशाप्रकारे दुर्दम्य इच्छाशक्ती व लढाऊ बाणा दाखवत कॅन्सरसारख्या असाध्य समजल्या गेलेल्या रोगावर यशस्वी मात करून   कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी एक आदर्श वस्तुपाठ  निर्माण करून ठेवला आहे. आत्मविश्वास गमावल्यामुळे नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या सर्व कॅन्सरग्रस्त रुग्णांनी त्याचे अवश्य अनुकरण केले पाहिजे.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू