पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अर्ध्यावरती डाव मोडला

 

 

अर्ध्यावरती डाव मोडला......

 

        तब्बल पंचवीस वर्षानंतरच्या भेटीअंती, समीरणं आपलं मन मोकळं केलं. सांगतांना त्याच्या दोन्ही डोळ्याच्या कडा पानावल्या होत्या. अधून मधून आसवांची टिपेही गळत होतीच. हुंदके आवरता आवरत नव्हते. तो मध्ये-मध्ये स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न करी. पण भावनांचा आवेगच एवढा तीव्र होता की, त्याला त्या रोखणं शक्य होत नव्हतं. काही वेळातच दाटून आलेल्या भावनांचं संपूर्ण वीरेचन झालं. आभाळात गच्च दाटून आलेला एखादा कळाकुट्ट मेघुट धो-धो कोसळून आभाळ निरभ्र व्हावं, तसं तो आतून पुरता मोकळा झाला होता. त्याला आता अगदी हलकं हलकसं वाटत होतं.

             समीर आईवडिलांना एकटाच. तीन बहिणी, त्याही चांगल्या घरी दिलेल्या. वडील महसूलात चांगल्या हुद्यावर. गावाकडं शेतीबाडी. एकंदरीत मध्यमवर्गीय म्हणावं असा कौटुंबिक वारसा लाभलेला. गडी दिसायला राजबिंडा. अगदी सिनेमातला जॉकी श्राफ शोभावा असा लोभस. कॉलेजात असतांना स्वप्नाची अन त्याची ओळख झाली. स्वप्नाही दिसायला साजरी. शिक्षणात हुशार. पण तिच्या घरची परिस्थिती मात्र जेमतेमच. पुढं कॉलेजचं गॅदरिंग, ट्रिप, एन.एस.एस.कॅम्प, यानिमित्त भेटीगाठी वाढत गेल्या. समीर आणि स्वप्ना नकळत एकमेकांच्या जवळ ओढले गेले, आणि प्रेमात पडले. आता जगायचं तर सोबत अन मारायचं तेही सोबतच. अशा आणाभाका घेऊन कॉलेजचे, त्यांचे ते दिवस हळू हळू पुढे सरकत होते.

            पुढे आणायासे जिल्हापरिषदेत क्लरीकलच्या जागा निघाल्या. समीरचा टायपिंगचा कोर्स झालेला होताच. ग्रॅज्युएशनलाही डिस्टिंगशन असल्यामुळं सलेक्शन अगदी पक्क होतं. बांधलेल्या अंदाजाप्रमाणे समीरचं जिल्हा परिषदेत क्लार्क म्हणून सलेक्शन झालंही. पुढच्या आठ सहा महिण्याच्या फरकानं स्वप्नालाही नर्स म्हणून जिल्हा रुग्णालयात नोकरी मिळाली. दोघेही आता आपापल्या पायावर स्वतंत्र वृत्तीने उभे राहिले होते. 

             स्वप्ना आणि समीरच्या प्रेमाची कुण कुण, एव्हाना समीरच्या आईवडिलांच्या कानावर हस्तेपरहस्ते गेली होतीच. वडिलांनी एकांतात त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण तो फारसे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. हे लक्षात आल्यावर त्यांनी जास्त आढेओढे न घेता त्या दोघांना  लग्नाची परवानगी देऊन टाकली. दोघांनीही कोर्ट मॅरेज करून जिल्ह्याच्या ठिकानी नवा संसार थाटला. दोघांनाही नोकरी. तीही जिल्ह्याच्या ठिकाणी. समीरला जिल्हा परिषदेचं क्वार्टरही मिळालं. स्वप्नाची ड्युटीही जिल्हा रुग्णालयातच. त्यामुळं कुठलीही ओढातान नव्हतीच अगदी. सारं काही सुरळीत चाललं होतं.

            हळू हळू त्यांची संसारवेल बहरू लागली. प्रेमाच्या नाजूक नात्याला विवाहाच्या रूपानं मूर्त स्वरूप आलं. समीर अगदीच हळवा. तो स्वप्नाचे हवे नको ते सर्व लाड पूरवीत असे. वीकएंडला मोती बागेत फिरायला घेऊन जाई. कधी शॉपिंगला घेऊन जाई. स्वप्नाही तिच्या परीने समीरचं मन जपण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असे. त्याच्या आवडी निवडी. त्याच्या खाण्या पिण्याच्या, डब्ब्याच्या बाबतीत तर ती खुपच जागरूक असे. वर्षभरानंतर त्यांच्या संसारवेलीला "सोनूच्या" रूपानं सुंदर फळंही लगडलं. त्या जोडीला गोंडस असं पुत्ररत्न प्राप्त झालं. घरात खुशीचा माहोल मावेना. चहुंकडे आनंदी आनंद. दुधात साखर पडावी असा दुग्ध शर्करायोग.

         समीरचे बाबा नुकतेच महसूल खात्यातून सेवानिवृत्त झाले होते. समीर हा त्यांचा एकुलता एक लाडका मुलगा. त्यामुळे सेवानिवृत्ती नंतर आई बाबांनी माझ्या सोबत राहायला यावं असं समीरला वाटणं साहजिकच. तसा विचार त्यानं स्वप्नाजवळ भीत भितच बोलून दाखवला. तीनंही त्याच्या सुरात सूर मिसळून ती त्याला हो म्हणाली. समीरला आकाश ठेंगणं झालं. त्याला वाटलं आपली चॉईस खरी उतरली. खरं तर आपलं लव्ह मॅरेज. आई बाबांना घरी आणायला स्वप्ना परवानगी देईल की नाही याबद्दल तो मनात थोडा साशंक होता. कारण बाबांनी सुरुवातीला त्यांच्या लग्नाला परवानगी नाकारली होती. पण ह्या दोघांचं "एक दुजे के लिए" पक्क आहे असं समजल्यामुळे, सर्वच इलाज खुंटले. म्हणून शेवटी नाईलाजाने का होईना, परवानगी देऊन मोकळेही झाले होते.

         दरम्याच्या काळात कांचननगर मध्ये समीर आणि स्वप्नाने चांगला दोन हजार स्क्वेअर फुटाचा टूमदार बंगला बांधून पूर्ण केला होता. समीरच्या बाबांची सेवानिवृत्ती आणि ह्यांच्या बंगल्याचा गृहप्रवेश असा सुवर्ण योग जुळून आला होता. समीर, स्वप्ना, सोनू, आई, बाबा ह्या सर्वच जणांनी वास्तुशांतीच्या दिवशी सर्व आप्तेष्ठाच्या साक्षीने गृहप्रवेश पूर्ण केला. समीर आणि स्वप्ना ह्या दोघांनाही सरकारी नोकऱ्या. त्यामुळे ऑफिसची वेळ गाठतांना त्यांची सतत दमछाक व्हायची. लहानग्या सोनूला सांभाळण्याचा प्रश्न निर्माण व्हायचा. आता आई बाबांच्या येण्यानं तो प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघाला होता. लहानग्या बाळाकडे लक्ष द्यायला आता आई आणि बाबा घरी होते. त्यामुळे समीर आणि स्वप्ना निश्चिन्त झाले होते. घरात गोकुळ नांदत होतं. कुठंच कशाची कमी भासत नव्हती. दिवसं आनंदात मागे पडत होते. बाळही हळू हळू दिवसांगणिक मोठं होत होतं.

           स्वप्ना तशी जिद्दी मुलगी होती. सरकारी हॉस्पिटल मधील नर्सची नोकरी. लहानग्या बाळाचा सांभाळ आणि घरातील चार चौघाच्या स्वयंपाक पाण्यापासून ते कपडालत्ता, भांडी धुण्यापर्यंत सर्व करीत ती अभ्यासाला वेळ काढीत असे. एम.पी.एस.सी.ची परीक्षा देऊन अधिकारी होण्याचं कॉलेजात पाहिलेलं स्वप्न तीला पूर्ण करायचं होतं. एक दोन अटेम्ट देऊन पहिले.  पण त्यात तीला यश आलं नाही. अपयशानं ती खचलीही नाही. उलट ती जिद्दीने अभ्यासाला लागली. यावेळी मात्र कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पास व्हायचंच असा  मनाशी हिय्या केला. तीनं शेवटचा अटेम्ट दिला आणि काय आश्चर्य....!! आरोग्य अधिकारी वर्ग दोन पदी तिची एम.पी.एस.सी मार्फत नियुक्ती झाली. धुळ्याला तीला पोस्टिंग मिळाली.

            दरम्याच्या काळात सोनू चांगला मोठा झाला होता. तो आता शाळेत जाऊ लागला होता. समीर आणि स्वप्नावरील त्याचं अवलंबित्व थोडं कमी झालं होतं. स्वप्नानेही धुळे इथे वर्ग दोन आरोग्य अधिकारी पद जॉईन केलं होतं. समीरला वेळ मिळंल तसं तो स्वप्नाला भेटायला जात असे. कधी कधी शक्य झाल्यास स्वप्नाही समीरला भेटायला येत असे. असं त्यांचं ऍडजेस्टमेन्ट लाईफ नव्यानच सुरु झालं होतं. बायको वर्ग दोन ची अधिकारी झाल्याचा आनंद समीरच्या गगनात मावत नसायचा. स्वप्नाबरोबर लग्न करून संसार थाटल्याचा त्याला मनोमनी हर्ष वाटत असे. अन निर्णय सार्थकी लागल्याचं समाधानही.

            पण कालांतरानं दिवस पालटले. जेंव्हा केव्हा स्वप्ना कुटुंबाला भेटायला म्हणून घरी यायची, तेंव्हा तिचे आईबाबावरून  समीर सोबत हळू हळू खटके उडायला सुरुवात झाली. समीर मात्र तरीही थोडं सबुरीनं घ्यायचा, तीला समजावून सांगायचा. पण कधी कधी तिचा हट्ट हा ऐकण्यापलीकडचा असायचा. समीरला मात्र इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली होती. आई वडिलांची बाजू घ्यावी की पत्नीची, अशी द्विधा परिस्थिती त्याच्या समोर अचानक उभी राही. त्यावेळी तो अगदी दिग्मूढ होऊन जात असे. काय करावे हे त्याला क्षणभर सुचत नसे. पूर्वीचा स्वप्नाचा स्वभाव आणि अधिकारी पदावर आरुढ झाल्यानंतरचा स्वभाव यात त्याला जमीन अस्मानचा फरक दिसू लागला. तो त्याच्याच तंद्रित तल्लीन असायचा. बायकोलाही दुखावता येत नसे अन आई बाबांनाही अडचण सांगता येत नसे. समीर अन स्वप्नाच्या नात्यातलं बिनसलेपण कधी कधी आई बाबांच्या लक्षात यायचं. पण असतील नवरा बायकोचे रुसवे फुगवे म्हणून ते त्याकडे दुर्लक्ष करायचे. पण हळू हळू स्वप्नाची हिम्मत चांगलीच वाढत गेली अन आई बाबांनाही ती टाकून पाडून बोलू लागली. तेंव्हा कुठं त्यांच्या लक्षात आलं की स्वप्नाचा अबोला, तिच्या वागण्यातला बदल हा नवरा बायकोच्या नात्यापुरताच मर्यादित नसून आम्हा उभयतांच्या घरातील असण्याशी त्याचा थेट संबंध आहे.

          समीरचे आई बाबा चांगलेच करारी. त्या उभायतांनी आपलं अख्ख आयुष्य अगदी उत्तम रीतीनं आनंदात व्यथित केलेलं. कधी भांडण नाही की तंटा नाही.पण ही अचानक अशी घरात सुरु झालेली धुस फूस. समीरची नेहमीच होणारी घुसमट. त्यांना सतत छळत होती. स्वप्नानं अशी टोकाची भूमिका घ्यायला नको. पण हे तीला कोणी आणि कसं सांगावं हे त्यांना कळत नव्हतं. म्हणून आपणच ह्यांच्या भरल्या घरात अडचण झाल्यापेक्षा काहीतरी वेगळा निर्णय घेऊन इथून बाहेर पडणं योग्य राहिल असं त्यांना वाटू लागलं. त्या उभयतांनी आपसात चर्चा केली आणि आपला निर्णय समीर आणि स्वप्नाच्या कानावर घालून मोकळे झाले. त्यांनी आता गावाकडील घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. साहजिकच निर्णय स्वप्नाच्या इच्छेसारखा असल्यामुळे मनातून ती खुश होती. तीला नवरा, बायको आणि आपल्या लेकराशिवाय ह्या घरात दुसरं कुणीही नकोच होतं. समीर मात्र खूप दुःखी झाला होता. पण त्याच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता.

              दुसरा दिवस उजाडला. सामानाची बांधाबुंध झाली. बाहेर सामानाची गाडी आली. आई बाबा आवरून गावाकडे जायला निघाले. तसं आईबाबांच्या अंगाखांद्यावर लहानपणापासून खेळलेला सोनू हंबरडा फोडून रडू लागला. आपल्या घरात हे काय विपरीत घडतंय हे त्याच्या कळण्यापलीकडचं होतं. पण आई बाबांनी इथून जाऊ नये असं त्याला वाटायचं. म्हणून तो सारखा हट्ट करू लागला. "जाऊ नका नं बाबा.... जाऊ नका नं आई..." त्याची ही आर्त हाक ऐकून आई बाबांचे आणि समीरचे डोळेही आसवांनी डबडंब भरून आले. वातावरण धिरगंभीर झालं. स्वप्ना मात्र किचन मधून बाहेर आली नाही. ती कडवट चेहरा करून तशीच तिथे उभी होती. आई बाबा गाडीत बसून जायला निघाले. समीरला शब्दही फुटत नव्हते. सोनूही आईबाबांचा हात सोडायला तयार नव्हता. पण कसं तरी जड अंतःकरणानं नातवाचा हातातला हात सोडवत गाडी निघाली आणि थेट गावाच्या दिशेने सुसाट चालती झाली. समीर आणि स्वप्नाच्या घरातून आई बाबा कायमचे हद्दपार झाले होते. गावी रवाना झाले होते.

            लग्न झाल्यापासून आईबाबांच्या रवानगी निमित्तानं, पहिल्याच वेळी समीरच्या मनात स्वप्नाविषयी अढी निर्माण झाली. यापूर्वी सर्व काही सुरळीत होतं. पण स्वप्ना परीक्षा देऊन अधिकारी झाली आणि तिच्या वागण्यात अमूलाग्र बदल झाला. आईबाबा गावी निघून गेल्यानंतर असेच काही दिवस हळहळीत निघून गेले आणि संसाराची चाके पुन्हा सुरळीत रुळू लागली. समीर आणि स्वप्ना आता तिच्या बदलीच्या मागे लागले. अनेक प्रयत्न केल्यानंतर, मंत्रालयीन शिफारशीवरून तिची बदली आता जालन्याला झाली होती. परत पहिल्यासारखंच दोघांचंही ऑफिस जिल्ह्याच्याच ठिकाणी. दोघांनाही चांगली पगारवाढ झालेली. स्वप्ना तर अधिकारी असल्यामुळं तिला चिरीमिरीच्या स्वरूपात वरकमाई भरपूर असे. त्यामुळं त्यांनी पूर्वीच्याच घरावर दोन मजले चढवले. शहराभोवतालीच चांगली वीस बावीस एक्कर शेती खरेदी केली. शेती कसण्यासाठी वाटेकरी ठेवला. शहराची मार्केट ऐतिच उपलब्ध असल्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री कोंबड्यांचा व्यवसायही सुरु केला. त्यांच्या प्रगतीचा वेग वाखाणण्याजोगा होता. विकएंडला दोघंही गाडी घेऊन शेतात जायचे. आठवडाभराच्या कामाचं टिपण लावून, शेतात डब्बा पार्टी करून वापस यायचे. असा त्यांचा नित्यक्रम ठरलेला होता.

           दिवसामागून दिवस लोटत होते. तसं तसं उभयतांच्या प्रगतीचा आलेख उंच उंच जात होता. स्वतःचं उत्पन्न दांडगं असल्याकारणानं, नव्यानं खरेदी केलेली संपूर्ण प्रॉपर्टी स्वप्ना आपल्या नावे करून घेत असे. यापूर्वी घेतलेली संपूर्ण शेती सुद्धा स्वप्नानं आपल्याच नावे करून घेतली होती. जालन्यातील घर तेवढं समीरच्या नावे होतं. समीरला वाटायचं काय हरकतंय. प्रॉपर्टी तिच्या नावावर काय अन आपल्या नावावर काय? शेवटी सगळं काही दोघांचच. दरम्यानच्या काळातच औरंगाबाद येथे चांगल्या उच्चभ्रू सोसायटीत स्वप्ना आणि समीरणं मोठ्ठा टोलेजंग टू.बी.एच. के. फ्लॅट खरेदी केला. तेथे राहायला गेले. त्याचेही खरेदीखत स्वप्नाने स्वतःच्या नावे करून घेतलं होतं. स्वप्नाची वर्ग दोन अधिकारी या पदावरून आता वर्ग एक अधिकारी पदी बढती झाली होती. स्वतंत्र शासकीय गाडी. नोकर चाकर तिच्या दिमतीला होते. सर्व्हिसमधील पदोन्नती बरोबरच तिच्या घरातील वागण्यातही बदल जानवत होता. तिचे समीरसोबतचे संबंध हळू हळू ताणल्या जात होते. दोघांनाही एकमेकासोबत प्रेमविवाह करून आता चांगली वीस बावीस वर्ष उलटून गेली होती. एकुलता एक सोनूला माध्यमिक शिक्षकाची नोकरी लागली होती. उभायतांनी त्याच्यासाठी एक चांगलं शिक्षिकेचं स्थळ पाहून त्याचाही विवाह उरकून घेतला होता. ते दोघे स्वतंत्रपणे वेगळा फ्लॅट घेऊन किरायाणं राहायला निघून गेले होते.

             आई बाबा घरातून गावाकडे निघून गेल्यापासुन स्वप्ना आपला अधिकारीपणाचा तोरा अधून मधून घरात दाखवत असे. आता तर तिची बढती झाली होती. समीर सोबतचं तिचं वागनं पुरतं बदलून गेलं होतं. पण समीर सोशिक होता. त्याला वाटायचं आज ना उद्या तिच्या वागण्यात बदल होईल. "आता काय आपण भांडायच्या वयाचे राहिलो आहोत काय?" असे म्हणून तो तीला समजावण्याचा प्रयत्न करीत असे. "एकाणं ज्वाला झालं की दुसऱ्यानं पाणी व्हावं" या न्यायाणं समिरचं वागणं असे. आलेला प्रसंग तो निभाऊन नेण्याचा कसोशीने प्रयत्न करी. परंतु स्वप्नाचं वागणं समीरच्या अगदीच विपरीत. "मोडेन पण वाकणार नाही असला अडमुठा बाणा". त्यामुळं त्यांच्या नात्यातला गोडवा हळू हळू कमी होत होता. नात्यातलं प्रेम सरून जणू त्याचा उबग यावा यां टोकावर ते येऊन पोहोंचलं होतं.

            स्वप्नाला आता समीर म्हणजे नुसतं लोढणं वाटू लागलं. आपण... आपलं ऑफिस.... आपलं पद..... आपली प्रॉपर्टी.....आपलं स्टेटस....याचा तीला गर्व चढला होता. समीर म्हणजे केवळ एक कारकूनी बाबू. असले कितीतरी बाबू आपल्या हाताखाली आहेत. त्यामुळं नवरा म्हणूनचं तिच्यासोबतचं त्याचं अस्तित्व तीला सारखं सारखं डाचू लागलं. मुलगा आणि सून यां दोघांवरही तिचाच अंकुश असल्यानं समीरला त्यांचाही साहरा घेता येईना. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली. गोष्ट झाकूनही ठेवता येईना आणि कुणाला सांगताही येईना. आशा कात्रीत तो सापडला.

              एके दिवशी असंच कुठल्या तरी किरकोळ गोष्टीवरून त्या दोघांमध्ये जोराची खडाजंगी झाली. भांडण विकोपाला गेलं. ते दिवस कोरोनातील लॉकडाऊनचे होते. सर्वजण बंद दाराआड बंदिस्त होते. चहुंकडे पोलिसांचा खडा पहारा होता. रेल्वे, बसेस, प्रायव्हेट वाहनेही बंद. अशा परिस्थितीत स्वप्नाने समीरला तडक "या घरातून कायमस्वरूपी चालता हो….!!" म्हणून बजावलं. "माझ्या नावे असलेल्या शेतातही पाऊल ठेवायचं नाही म्हणून ठणकावलं." तेंव्हा तिच्या बोलण्याचे घाव समिरच्या चांगलेच जिव्हारी लागले. म्हणून अशा विपरीत परिस्थितीतही मजल दरमजल करीत समीर रातोरात औरंगाबादहुन जालन्याला आला. आत्महत्या करून ह्या कटकटीतून एकदाचं मोकळं व्हावं असं त्याला वाटू लागलं. एकदा दोनदा त्यानं तसे प्रयत्नही केले. पण पुन्हा त्याच्याच अंतर्मनानं त्याला सवरलं. पुढे तो हळू हळू योगासनांकडे वळला. त्यानं विपस्यनेचा अधार घेतला. चार दोन मित्रांना सर्व हकीकत सांगितली. मित्रांनीही त्याचं दुःख ऐकून घेत त्याला सहनुभूती दाखवली. एकदम टोकाचं पाऊल उचलू नको म्हणून सांगितलं. तो आता ह्या विपरीत परिस्थितीतून हळू हळू सावरत आहे. आपलं एककल्ली जीवन कंठत आहे. जो भेटेल त्याला आपल्या वेदना, व्यथा सांगून दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करत आहे. 

             परवा एका लग्नाच्या निमित्तानं आम्हा दोघांची भेटगाठ झाली. भेटीत गेल्या वीस पंचवीस वर्ष्यापासूनचा, त्याचा आणि स्वप्नाच्या वैवाहिक नात्याचा लेखाजोखा, हकीकत सांगता सांगता त्याचं हृदय कमालीचं भरून आलं होतं. तो अतिशय भावविव्हळ होऊन डोळ्यातून आसवं गाळीत दुःखीत अंतःकरनाणं त्याची जीवन कहाणी सांगत होता. आयुष्याच्या उत्तरार्धातील एका विकल अवस्थेत, त्याच्या एकाकीपानाची दुःखद कहाणी ऐकून मीही अगदी सुन्न सुन्न झालो होतो.

 

                          -भानुदास धोत्रे

                           परभणी

                           7972625086

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू